Saturday, April 6, 2013

विदर्भ एक्सप्रेसात उंदिर..निंद हराम


विदर्भ एक्सप्रेसात उंदिर..निंद हराम
   उंदरासारखा सारखा उंदिर (तो त्याचाच सारखा असणार,तो काही अर्नाल्ड स्वात्जबर्ग पहेलवानासारखा कसा असेल?) परवा विदर्भ - गोंदिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील अभिजनांना त्यांच्या डब्यात दिसला काय नि एकच हलकल्लोळ माजला काय? हा इथे आलाच कुठून आणि कसा हा पहिला सवाल दणक्यात अभिजनमुखी आला नि आरडाओरड सुरु झाली.विदर्भ - गोंदिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये या उंदराने येऊ नये असे फर्मान रेल्वेबोर्डाने काढलेले नाही.हे अभिजनांना ठाऊक असायला हवे.असो प्रश्न असा आहे की हा उंदिर डब्यात आला कसा किंवा शिरले कसा ?
   अभिजन ज्या मार्गानी आपआपल्या श्रेणिंच्या डब्यात दाखल होतात,त्याच मार्गाने उंदिरसुध्दा येऊ शकतात.तसे असेल तर मग तो डब्यात शिरत असताना एकाही अभिजनांच्या लक्षात कसे आले नाही.किंवा मग उंदिर खुष्किच्या मार्गाने प्रवेश करता तर झाला  नाही ना! हिंदी आणि अर्नाल्डच्या हॉलिवूड सिनेमांमध्ये हिरो आणि विलेन रेल्वेतील खुष्कीच्या मार्गाचा उपयोग करुन पोलिसांच्या हातावर तुरी देताना आपण पाहिलेलेच आहे.उंदरांसाठी तो मार्ग निषिध्द असल्याचे सुध्दा फर्मान हिंदुस्थान आणि अमेरिकेतल्या रेल्वे बोर्डाने काढण्याची सुतरात शक्यता नाही.
   अभिजनांच्या एसी-टू डब्यात प्रवेश करता झालेल्या उंदराकडे हे अभिजन वेगवेगळ्या कोनातून बघू लागले.आपल्या मागावर असलेला हा कुणीतरी इस्लामाबादी वा लाहोरी हेर नाही ना असे काहिंना मनात वाटून गेले असावे.काही जणांची अव्यक्त सुक्ष्म प्रतिक्रिया,इज ही टेरॅरिस्ट,अशीही असावी.पोलिसांना बोलवा किंवा गाडिची साखळी ओढा असे उपाय तातडिने करायला हवे असे एकमेकांच्या विको टर्मेरिक आणि पॉण्डस लावलेल्या गोजिऱ्या मुखाकडे बघत अभिजनांना एकमेकांना म्हणावेसेही वाटू लागले असावे.मात्र अभिजनांनी प्रत्यक्षात ते काही केले नाही.काहिंनी अटेंन्डन्टला शिव्या हासडल्या.दिखता नही क्या,चुहा आया करके,असे ते डाफरले.उंदरावर नजर ठेवण्यासाठी काही अटेंडन्टची नियुक्ती नाही.तो बिचारा सेवेकरी.त्याला धारेवर धरुन या गुस्ताखीसाठी तोच जबाबदार असावा असेही एखाद दुसऱ्या अभिजनांनी आपल्या हावभावातून व्यक्त केलेच.सेवेकऱ्याने उंदराला शिव्या हासडून,आता दाखवतो इंगा असे बोलून उंदराचा शोध प्रत्येक कम्पार्टमेन्ट सुरु केला.उंदिर त्याच्या स्वागताला थोडाच दर्शनी भागात उभा राहणार.तो सेवेकरीला दिसलाच नाही.त्याने हुश्श केले.अभिजनांनीही हुश्श केले.सुटलो बुवा,हीच प्रतिक्रिया बहुतेकांची.या प्रतिक्रियेचा श्वास घेऊन होत नाही तोच उंदिर तुरुतुरु इकडून तिकडे.
   पुन्हा,रात भर निंद डिस्टर्ब.बॅग आणि संत्र्याच्या पिशव्या कुरतडून ठेवणार.पायाची बोटे कुरतडली तर?कानच कुरतडायाचा.या प्रतिक्रिया आणि उंदराला शिव्या.पोलीस बुलाव आणि साखळी ओढण्याची पुन्हा अव्यक्त इच्छा.सेवेकरीला व्यक्त शिव्या.उंदराचा उध्दार.कम्पार्टमेन्टमधील आरडाओरड आणि पायांनी हाटहूट करण्यामुळे उंदिर पुन्हा तुरुतुरु इकडून तिकडे.शोधुनही दिसत नाही.
   साल्ला ये है कोन ?मंगळावरुन तर आला नाही ना ?गुप्तहेर आहे का ? मोबाईलवरुन चालणारे अभिजनांचे गुफ्तगू ऐकण्यासाठी ,त्यास कुणी भरडा किंवा चिकनी सुपारी दिली नाही ना ? दाऊदका तो आदमी (?) नही ये.आपल्याच कम्पार्टमेन्टमध्ये आणि आपल्याच डब्ब्यात कसा?अरे,कुछ नही यार किसी बच्चे का टॉय-वाय होंगा.अशा बहुवीध अव्यक्त प्रतिक्रियांनी काळजीचे ढग एसीटूच्या डब्ब्यात दाटून आले.सेवेकऱ्याने,उंदिर ते किटक भगाव हिटचा फवारा प्रत्येक कम्पाटमेंटमध्ये जोरात आणि जोशात ओढला.त्या हिट सुंगधाने अनेकांची डोकी दुखायला लागली.आता आपण सुरक्षित अशी सुखाची लकेर चेहऱ्यावर उमटत नाही तोच उंदिर पुन्हा तरुतुरु इकडून तिकडे.एसीटूमध्ये सुखाची निंद घेण्यासाठी आलेल्या अभिजनांची निंद हराम.
   मला वाटले हा उंदिर टॉम आणि जेरीतला जेरी तर नाही ना.. हा मिकी माऊस तर नाही ना..अरे हा स्टुअर्ट लिटल तर नाही ना..अरे हा मुषकस्वामी तर नाही ना..डब्यातल्या अनेकांना असेच काहीबाही वाटत राहिले.साखळी कुणी ओढली नाही.कारण ते करायचं कुणी,हा प्रश्न होताच.पोलिसांना सांगायचं कुणी,कारण एका उंदराला तुम्ही डरता.डरपोक कहिके,असे पोलिसांनी म्हंटले तर,ही भीती.त्यामुळे तेही नाही.प्रवास असाच काळजित,निंद हराम करतच झाला.कोणे एकेकाळी नाना पाटेकर म्हणाले होते की एक मच्छर आदमी को काही-बाही करु शकतो.तसेच उंदिर एसीटूची (सुखाची) निंद हराम करु शकतो.आपली अंगभूत पॉवर उंदरास कळली तर आजपासून पाच हजार वर्षांनी एखादी उंदिर टोळी आख्खी ट्रेनही हायजॅक करु शकतील.. 

बिल्ली,बिपाशा आणि आपण



बिल्ली,बिपाशा आणि आपण

सौ चुहे खाके बिल्ली हजलाच कां गेली,या प्रश्नाचं उत्तर विश्वकोशाच्या एकाही खंडात मिळत नाही.ब्रिटानिया एनस्लायकोपीडिआवाल्यांना स्वत:च्या अपडेशनचा फार अभिमान असला तरी लॅटेस्टतम ब्रिटानिकामध्येही याचं उत्तर मिळत नाही.म्हंटले,गुगलून बघावे तर तेथेही याचं उत्तर नाही.मुळात आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून यावयाचे,हेच खरे.
   ही जी बिल्ली आहे तिला हरीद्वारला कां जावे वाटलं नसेल?हा आम्हास प्रश्न पडला.या प्रश्नाचं उत्तर शोधताना या बिल्लीला हजलाच कां जावं वाटलं हा प्रश्न मिळाला.हजलाच गेलेली बिल्ली ही सौदी अरेबियामधील किंवा आखाती देशातील असण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण ही बिल्ली आर्यावर्तातील असती तर तिला रामेश्वर किंवा कन्याकुमारी किंवा अमरनाथला जावं वाटलं असतं.ही फक्त शक्यता झाली.आर्यावर्तातील बिल्लीने हजला जाऊ नये,असं काही व्यासमुनिंनी महाभारतात लिहून ठेवलेलं नाही.किमान जर्मनीच्या मॅक्समुल्लर साहेबांना तरी तसे आढळलेलं नाही.हे मॅक्समुल्लर साहेब महाभारताचे गाढे अभ्यासक समजले जातात.त्यांच्यामुळेच महाभारताची ओळख जर्मनीला आणि नंतर यथावकाश जगाला झाली अशी अफवा कम वदंता दशकानुकशे आर्यवर्तात लोकप्रिय आहे.
   बिल्ली आर्यवर्तातीलही किंवा अरबस्थानातील किंवा पृथ्वी लावरील कुठल्याही भूप्रदेशातील राहू शकते.बिल्लींना व्हिसा आणि पासपोर्टची अजिबातच गरज नसल्याने त्या इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे सुखनैव जावू शकतात.9/11 च्या प्रकरणानंतर सुध्दा एकाही बिल्लीला जगातील कोणत्याही विमानतळावर अडविल्याचं कानी आलेलं नाही.
   अशा या बिल्लीला सौ चुहे खाल्ल्यानंतर हजला जावेसे वाटले पण व्हॅटिकनला कां नाही,हा प्रश्न मनी आला तरी तो वरणातील झुरळासारखाच बाहेर काढणेच इष्ट ठरावे.आपण काही कुणाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही.प्रश्न असा पडतो की या बिल्लीला 100चुहेच खाल्यानंतर कां जावेसे वाटले.111 पर्यंत तिने वाट कां बघितनर नाही.किंवा मग 49 चुहे झाल्यावरही तिला उपरती कां झाली नसावी.याही प्रश्नांचं उत्तर केवळ त्याच बिल्लीलाच ठाऊक असणार.शिवाय 100 चुह्यांचा आकडा आला कुठून?हेही महत्वाचं.त्याची नोंद बिल्लीचे पीए करुन ठेवत होते की चुह्यांमधील कोणी हुषार आणि स्मार्ट चुहा करुन ठेवत होता ? हा आकडा 1000 सुध्दा राहू शकतो की.तसा तो असेल तर ही बिल्ली भीमपराक्रमीच ठरते.तिचा हा पराक्रम कमी लेखण्यासाठी हा आकडा हजारवरुन शंभरावर आणण्यात तर आलेला नाही ना !असे असेल तर हे मोठेच षडयंत्र दिसते.ते चुह्यांनी रचले की त्यांना यासाठी कुणी प्रवृत्त केले ? याचा शोध कसा घ्यायचा ?
   उलटे सुध्दा राहू शकते.सौ चुहैंच्या ऐवजी एकच चुहा असू शकतो.पण बिल्लीने आपल्या कम्युनिकेशन स्कीलमधून तो आकडा सौ केला असू शकतो.तसे करुन आपण किती भीमपराक्रमी आहोत असेही तिस सिध्द करावयाचे असू शकते.म्हणजेच याबाजूलाही षडयंत्र असू शकते.गंमत म्हणजे दोन्ही बाजूंना षडयंत्राची कल्पना नसावी.समजा असेल तर बिल्ली आणि चुह्यांची गोलमेज शिखर परिषद होऊन सन्मानजनक तोडगा काढलेला असावा.म्हणजे बिल्लीने हजारावर दावा करावयाचा नाही आणि चुहै यांनी एकवर अडून बसावायाचे नाही.त्यातून 100 हा सन्मानजनक आकडा निघाला असण्याची दाट शक्यता आहे.मात्र याचाही शोध घ्यायचा कसा आणि कशासाठी.कारण या बिल्लीने हजला जाऊन आपल्यावर काही उपकार केले नाहीत.खर तर त्याची चिंताही करण्याची आपणास गरज नाही.ही बिल्ली सॅनफ्रँन्सिस्को किंवा हडसननदीच्या तिरी गेली असती तरी तरी सूर्य पश्चिमेलाच मावळला असता आणि कोंबडा पहाटेच आवरला असता.त्यामुळे सांप्रतकाली कुमारी असणाऱ्या बिपाशा बसू या हरीद्वारला जाणार असं जे परवा परावा छापून आलय ना,त्याने उल्हासित होण्याचं,आनंदानं आणि अभिमानानं न्हाऊन जाण्याचं कारण नसावं.बिपाशा हरिद्वारला जाते.बिल्ली हजला जाते.आणि आपणही हळूच शिर्डीला जातोच की..
000