Thursday, August 15, 2013

घरची भजी आणि हॉटेलची भजी-एक शोध-एक अन्वयार्थ

घरची भजी आणि हॉटेलची भजी-एक शोध-एक अन्वयार्थ
      दुपारी मस्त पाऊस पडत होता. भाऊसाहेब रावसाहेबांना म्हणाले, चला रामभरोसेत. झक्कास भजी मिळते तिथे.
      भाऊसाहेबांच्या ऑफरला रावसाहेबांनी नाकारणं शक्यच नव्हतं. कारण भाऊसाहेबांच्या ऑफरी बिग बाझारी स्टायलिच्या असत. म्हणेज एकावर पाच फुकट-बिकट. रावसाहेब नोकरित आल्यावर याच भाऊसाहेबांनी त्यांना ही बिकट वाट सोपी करुन दाखवली होती. त्यामुळे भाऊसाहेब बोले नि रावसाहेब हाले. तिकडे नो आर्ग्यूमेन्ट. तेव्हा भजी म्हंटल्यावर रावसाहेबांची नसलेली भूक प्रज्वलित झाली. फुकटात-बिकटात हे सारच चालतं. यात पोट-बिट बिघडलं तरी पुन्हा भाऊसाहेबच डॉक्टरकडे नेण्यास कार्यतप्तर. औषधही तेच घेणार नि बिलही तेच देणार. म्हणजे इथेही फुकटात-बिकटातच . तेव्हा रावसाहेबांना तशी काही चिंता नव्हतीच.
      भाऊसाहेब सोबत असताना सर्व चिंता अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसमध्ये नेऊन ठेवायच्या असतात याचं ज्ञान त्यांना नोकरीच्या तिसऱ्याच महिन्यात उत्तमरित्या आलं होतं.
      आता हे भाऊसाहेबांना जमत कसं हे मात्र विचारायचं नाही. तसा अलिखत नियम सम्राट अकबरानेच केला होता म्हणे . तो नियम कोणत्याही बादशाही-पादशाही - राजेशाही-निजामशाही-इमादशाही-लोकशाहीने बदवलला नाही.
      भाऊसाहेब-रावसाहेबांची जोडी वीरु-जयपेक्षाही घट्ट होती. याचा अर्थ रावसाहेब भाऊसाहेबांसाठी मदारीवाला बंदर नव्हते हे सुध्दा तितकेच खरे. मात्र या रावसाहेबांना भजी म्हंटली की त्यांचे बंदर झाल्याशिवाय राहतच नसे. त्यामुळे रावसाहेब भाऊसाहेबांसोबत रामभरोसेत अतिव आनंदानेच आले.
      भाऊसाहेबांनी दोन प्लेट कांद्याभज्यांची ऑर्डर दिली.पाच मिनिटात छोटूने दोन प्लेट गरमागरम भजी दोघ्यांच्या पुढ्यात ठेवले.
      अशी कुरकुरित भजी आपल्या बायकांना कां करता येत नसावे हो, रावसाहेबांनी भाऊसाहेबांना विचारलं. कुरकुरित भजी हॉटेलातच. घरी फक्त बायकोचं बोलणं तेव्हढं कुरकुरित.मॉलमध्ये फक्त कुरकुरे चिप्स. हा हा हा भाऊसाहेबांनी त्यानांच समजेल असा (पांचट) विनोद केला .फुकट-बिकट भज्याला जागण्यासाठी रावसाहेबांना हा हा करावे लागले.
      हॉटेलमधीलच भजी कुरकुरे कां होतात ,याचा शोध घ्यायलाच हवा गडे. रावसाहेब पुन्हा मूळ मुद्यावर आले. भाऊसाहेबांनाही त्यांचं म्हणनं पटलं. हा शोध घेणं अत्यावश्यक असल्याच त्यांनाही वाटू लागलं होतं. कारण त्यांच्या बायकोला तर भजेच बनवता येत न्हवते. कुरकुरे भजे  अफगानिस्तानातच राहिले. त्यामुळे रावसाहेबांच्या प्रपोजलला भाऊसाहेबांनी पाठिंबा दिला. घरची (नॉट-सो कुरकुरित) भजी आणि हॉटेल (हॉट-सो-कुरकुरित) ची भजी-एक शोध-एक अन्वयार्थ, समकालीन वास्तवाचे सत्यशोधन..हा संशोधनाचा विषय रावसाहेबांना सुचला सुध्दा.
      पीएचडी करण्याचे त्यांचे स्वप्न होतेच. हे स्वप्न मरण्यापूर्वी पूर्ण करणार() असा त्यांचा पण होता. आतापर्यंत त्यांना विषय सूचत नव्हता. व्यासमुनिंनी सारे काही लिहून ठेवले होते. त्यामुळे विषयांचा ठणठणपाळ होता. विषय नाही म्हणून संशोधानाला सुरुवात नाही,असे रावसाहेबांच्या बाबतीत इतकी वर्षं होत होते. पण आज अचानक त्यांना संशोधनाचा विषय सापडला.
      ऑर्किमेडिजला तो स्नानगृहात उघडाबंब असताना कोणतातरी शोध सापडला तेव्हा तो युरेका युरेका ओरडतच भोंगळाच बाहेर धावत सुटला होता. रावसाहेबांना हॉटेलमध्ये भज्यावर ताव मारताना विषय सापडला होता. त्यांनाही कुरेका कुरेका असे ओरडत बाहेर जाऊन नाचायची इच्छा होत होती पण ते आर्किमेडिजच्या ऐवजी रावसाहेब होते ना. त्यामुळे पंचाईत झाली. पण त्यांनी मनातल्या मनात युरेका अरे कुरेका, असे म्हणून त्यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी छोटूला थाटात हाक मारली आणि तो येताच पुन्हा दोन प्लेट कुरकुरित भज्याची ऑर्डरही दिली. याचे बिल आपणच देणार हे त्यांनी जाहीर करुन टाकले. भाऊसाहेबांना हा धक्का मानवणारा होता.. पण हॉटेलातील कुरकुऱ्या भज्यांचे रहस्य शोधण्यासाठी त्यांनी हा धक्का मोठ्या धिराने आणि साहसाने सहन केला..
    000
   


Thursday, August 8, 2013

साठी बुध्दी..

साठी बुध्दी..
  
    महाराज आणि प्रधानजी उपवनात नित्याप्रमाणे फिरायला निघाले. थोडे अंतर चालून झाल्यावर प्रधानजीला महाराज विचारत झाले,
    प्रधानजी साठी झाली की काय होतं हो..
    बुध्दी नाठी होते महाराज, असं कुणीतरी कधीतरी आणि केव्हातरी म्हंटलेलं असावं .
    कुणी म्हणजे, थोरल्या महाराजांच्या आजोबाश्रींचे हे सत्य वचन आहे.
    म्हणजे मग प्रश्नच उरला नाही महाराज. सत्य  वचनाची परंपरा आपल्या घराण्यासारखी अलम दुनियेत कुठेच नाही महाराज हे काय आम्हास ठाऊक नाही..पण महाराज आज आपणास साठीच आठवन कां बरे होतेय..
    प्रधानजी माझी साठी कधी  होतेय याची वाट बघतोय मी. म्हणजे नाठीच्या नावाखाली निवृत्ती स्वीकारायला आणि एक्सपर्ट कमेंट करायला मोकळे होऊ..
    महाराज असं काही बोलू नका. तुमच्या शिवाय राज्य म्हणजे तेला  शिवाय अरब..
    प्रधानजी काय म्हणायच तुम्हाला..
    ते मला सुध्दा कळलं नाही महाराज. पण, तुम्हाला आज साठीचा विचार  कां  बरे सतावतोय  हो.
    प्रधानजी ते मी सांगतोच ,पण तुम्ही मला सांगा की शोभा डे किंवा दे मॅडम ह्यांचं काय  बरं वय असावं.
    महाराज , अहो महाराणी साहेबांनी हे ऐकलं तर त्या रुसून -फुगून  बसतील हो. साठी व्हायच्याच आधी तुमची बुध्दी नाठी झाल्याचे बघून त्या धाय मोकलून आक्रोश करतील.
    प्रधानजी, गैरसमज करुन घेऊ नका . तुमच्या  डोक्यात कोणता  किडा वळवळला हे कळण्याइतपत मी दुधखुळा नाही हो प्रधानजी.
    क्षमा असावी महाराज, आम्हाला जे वाटले ते तुमच्या  मनी नाही हे ऐकून  किती समाधान वाटले म्हणून सांगू तुम्हांस.
    ते  काही  सांगू नका प्रधानजी, फक्त सांगा की शोभा डे किंवा दे मॅडम यांचं वय किती असावं?
    महाराज त्यांनी कधीचीच साठी पार केलीय..
    म्हणूनच म्हणूनच प्रधानजी त्यांची बुध्दी नाठी  झालीय  हो..
    काय झाले हो महाराज.
    प्रधानजी, थोरल्या महाराजांचे आजोबाश्री चुकूच कसे शकतील याची खात्री पटली आता..
    आम्ही समजलो नाही हो  महाराज,
    प्रधानजी  साठी बुध्दी नाठी  नसती तर डे किंवा दे मॅडम यांनी, त्या ज्या मोहल्यात राहतात त्या मोहल्ल्याचे स्वतंत्र राज्य करा अशी मागणी नसती  का  केली..
    करेक्ट  महाराज करेक्ट..महाराज त्या साठीच्या पलिकडे आणि सत्तरीच्या अधेमध्ये आहेत हो..
    हो का तरीच..तरीच ..
    काय तरीच महाराज?
    प्रधानजी,त्या साठीच्या आणि सत्तरीच्या अध्येमध्ये आहेत म्हणूनच त्या ज्या मोहल्ल्यात राहतात त्या मोहल्ल्याला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्याचं सुचलं नाही हो त्यांना..
    खरच की महाराज.. प्रधानजी महाराजांच्या तर्कदुष्ट बुध्दीला दाद देत उद्गारले.
   
000


Friday, August 2, 2013

बैठक आणि नॉनव्हेज

बैठक आणि नॉनव्हेज
भाऊसाहेबांची पदोन्नती रावसाहेब म्हणून झाली. त्यामुळे स्वाभाविकच त्यांना आकाश ठेंगणे झाले.धोनीने पहिला हेलिकॉप्टर शॉट मारल्यावर त्याला जसा आनंद झाला असेल तसाच रावसाहेबांना झाला. त्यांना मोठे ऑफिस भेटले. बरेच अधिकराही भेटले. ते ज्या कार्यालयात रावसाहेब म्हणून पदोन्नतीने गेले,त्याठिकाणी त्यांच्यावर बॉस-साहेब होता. पण रावसाहेबांनी पहिल्या दिवसापासूनच त्यांची मर्जी संपादन केली. त्यामुळे बॉस-साहेब प्रसन्न होऊन त्यांनी रावसाहेबांना आणखी अधिकार दिले.
रावसाहेब, आता बैठका बोलावणे, त्या कंडक्ट करणे, बैठकांचा अजेंडा ठरवणे, बैठकीची सर्व व्यवस्था करणे आदी बैठकांशी संबधित सर्व विषय हँडल करु लागले.
भाऊसाहेब असताना त्यांना बैठक हा विषय जाम आवडाचा. एखादेवेळेस त्यांच्यापुढे कुणी दीपिका पडुकोन की बैठक असा पर्याय ठेवला असता तर ते दीपिकाला सोडून बैठकीकडे,भाग मिल्खा भाग केले असते. बैठकीवरचे हे प्रेम लैलाचे मजूनवर असलेल्या प्रेमापेक्षाही थोर होते. त्यांचे हे बैठकप्रेम बघून त्यांच्या ऑफिसातील लोकांना त्यांचे नामकरण बैठकराव भाऊसाहेब असे करुन टाकले होते. भाऊसाहेब असताना बैठकिंना केवळ उपस्थिती द्यावी लागे तरी त्यांचा आनंद अरबी समुद्रासारखा व्हायचा. रावसाहेब म्हणून प्रत्यक्ष बैठकीच्या सूत्रधाराचे काम अंगी पडल्यावर तर त्यांचा आनंद हिंद महासागरा सारखा अथांग झाला. आपल्या आईवडिलांनी कधीतरी जे पूण्यकर्म केले त्याचेच हे फळ असल्याचे त्यांनी ताडले आणि बैठकी कंडक्ट करण्याचा आदेश जेव्हा बॉस-साहेबांनी त्यांना दिला तेव्हा त्यांनी बॉस-साहेबांना वाकून नमस्कार केला आणि देवाघरी गेलेल्या आईवडिलांना मनातल्या मनात दंडवत घातला. त्या दिवशी त्यांना बायका-पोरांना जोरात आणि जोशात पार्टी दिली. हनुमानाच्या मंदिरात नारळ फोडला. सोसायटीत रावसाहेबांच्या पोराने पेढे वाटले. मात्र हे पेढे कशासाठी आहेत हे काही त्यास,ज्यांनी ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांना सांगता आले. त्याने घरी आल्यावर जेव्हा रावसाहेबांना पेढे-वाटप-कारण विचारले ,तेव्हा त्यांचे उत्तर एैकून आपल्या बापाने आज वाटलेले पेढे हे फोकनाड पेढे असल्याचे पोराला वाटले. कारण बैठकीची लावणी,असे त्याच्या कानावरुन गेले होते,पण बैठकीचे पेढे ,हे काही त्याने कधी ऐकले होते ना बघितले होते. रावसाहेब झाल्यावर तरी फोकनाडा कमी करायला बाबांना सांग,असे त्याने मग आईला सूचना केली. माऊलीने ही सूचना रावसाहेबांकडे पास केली.त्यांनी डोक्यावर हात मारुन घेतला.
रावसाहेबांकडे बैठकीची जबाबदारी आल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बॉस-साहेबांनी त्यांना एक महत्चाची बैठक आयोजित करण्याचे फर्मान सोडले. हे फर्मान हाती पडताच,अजी म्या ब्रम्ह पाहिले,अशी त्यांची अवस्था झाली. त्यांच्या उत्साह डोपिंग न करताही शंभर मिटर शर्यतीत पहिल्या येणाऱ्या धावपटुसारखा झाला. भराभर ते कामाला लागले. हाताखालच्या लोकांकडे अनंत सूचनांचा पाऊसच त्यांनी पाडला. बैठकीची तारीख निश्चित करुन तशी नोट त्यांनी बॉस-साहेबांकडे पाठवली.
बॉस-साहेबांकडे कोणतीही नोट वा फाइल गेली की ते दोनच शब्द लिहून नोट किंवा फाइल परत पाठवत. ते शब्द असत ओके किंवा प्लिज स्पिक. मात्र बैठकीच्या तारखेच्या नोटेवर साहेबांनी तेरा शब्दांचं एक वाक्य लिहिल्याचं दिसतात, रावसाहेबाचे गिली-गिली-अप्पाच व्हायचे तेवढे शिल्लक राहिले. श्वास रोखून त्यांनी बॉस-साहेबांनी‍ि लिहिलेले वाक्य वाचले. त्यांच्या जीव भांड्यात पडला. बॉस-साहेबांनी लिहलं होतं की, बैठक दोन तारखेएैवजी तीन तारखेस करा कारण,दोनला उपवास असतो,नॉनव्हेज कसे चालणार? रावसाहेबांनी कॅलेंडर बघितले. तीन तारखेला त्यांचा उपवास होता. बॉस-साहेबाला त्यांनी शिव्या हासडल्या..कारण आता त्यांचे नॉनव्हेज हुकणार होते..पहिलीच बैठक अशी भाकड जाणार या कल्पनेने ते हिरमुसले..लवकरात लवकर बॉस-साहेब कर,असे साकडे त्यांनी कुलदैवतेला घातले.
000