Saturday, February 9, 2013

राग-अनुराग


राग-अनुराग
   राग येऊ नका,रागावर नियंत्रण ठेवा,शांत राहा,असं आपल्या कानावर येतं,लहानपणापासून.आपल्या पिता-मातोश्रींना त्यांच्या पिता-मातोश्रींनी हेच सांगितलं असतं.त्यांच्या पिता मातोश्रींना आधीच्या पिढींनं सांगितलं असतं.राग येऊ देऊ नका,हा अनुराग पिढ्यानपिढ्या ट्रान्स्फर केला जातो.सध्यकालीन बाबा,बुवा,बापू,महाराज,आचार्य,महंत मंडळी आपल्यानित्य प्रवचनातूनच हेच सांगत असतात.पण,हा आर्यावर्त शास्त्रीय संगीतातील रागांसह मानवी रागांच्या श्रेष्ठपरंपरेचा पाईक आहे,नव्हे हीच या देशाची ख्याती आहे,हे कां बरे विसरले जाते.
   राग हीच ज्यांची ओळख होती ते जमदग्नी ऋषी हे आर्यवर्तातलेच. अगस्तीमुनी आपल्या रागावर नियंत्रण ठेऊ शकत नसत,असं ग्रंथांमध्ये नमूद आहेच.त्यांचा राग अनावर झाला तेव्हा ते हिमालयातून उठले.विंध्य पर्वतात आले नि काही बाही करते झाले,असेही आपल्या कानावर वय वाढत असताना कोणत्यातरी टप्प्यांवर पडतं.वेदकालीन,महाभारतकालीन ,रामायणकालीन ऋषी-मुनींनी रागाची भूषणावह परंपरा कायम ठेवली.त्या रागाचं खणखणित नाणंही वाजवलं.
    रागावर नियंत्रण ठेवा असं कुणीही सांगत नव्हते.राग आला की राक्षसगण तपर्श्चयेलाच बसत नि इतकी घोर तपश्चर्या करीत की देवमंडळींना प्रसन्न होण्यावाचून पर्यायच उरत नसे.राक्षसगणांना आलेला राग त्यांना आपल्या उद्दिष्टापांसून जरासुध्दा भरकटू देत नसे.रागाचा पेंडूलम दोलायमान होत असल्यानेच मानवगणांना देवमंडळीचे वर कमी मिळाले हा इतिहास खोटा कसा ठरविता येईल.
   रागातून तपश्चर्या,तपर्श्चेतून वर,वरामुळे धुमाकूळ,या धुमाकुळीमुळे देवगणांना राग,या रागातून संघर्ष,त्यातून युध्द..असा तेव्हा जिंवत आणि रसरशित मामला होता. महादेवांचा राग हा तिसऱ्या नेत्राच्या निर्मितीची पूर्वपीठिका होती.
   पृथ्वीतलाच्या पाचहजार वर्षाच्या ज्ञात आणि शंकेस वाव घेण्यास किंचितही नसलेल्या इतिहासाच प्राण हा रागच राहिल्याचं दिसतं.रागाने घडवलं.बिघडवलं नाही.द्रोपदीस राग नसता आला तर महाभारत घडते का?दुर्योधनास राग नसता आला तर कौरव पांडव युध्द घडते का? मारुतीरायास राग नसता आला तर सोन्याच्या लंकेला धग लागली असती का?आर्य चाणक्यास राग नसता आला तर चंद्रगुप्त मौर्य बिहारच्या रस्त्याच्या कडेला उभे राहिले असते,सम्राट झाले असते का?अमेरिकेला राग आल्यानेच अणुबॉम्बची निर्मिती झाली,नाही का?माओ साहेबांना राग आल्यानेच चीनमध्ये क्रांती झाली की नाही.असं म्हणतात की शेक्सपिअरला राग यायचा तेव्हाच त्याच्या सृजनाचीशक्ती सातव्या आकाशात पोहचायची.कालिदासाला प्रेयसिच्या बेवफाईचा राग आला नि त्याच्या हातून रामटेकच्या गडावर मेघदूत कलाकृती प्रसवली.रागिष्ट रिकी पाँटिंग आणि यशाची चढती कमान हे समिकरण आता आतापावेतो आपल्या समोर होतेच की.
   सांगायचा मुद्दा हाच की राग करु नका,रागावर नियंत्रण ठेवा असं जे परंपरेनं सांगितलं जातं नि तुमच्या माझ्यासारख्या सामान्यांच्या डोक्यात बसतं,ते एक मोठ षडयंत्र तर नाही ना,अशी शंका व्यक्त करण्या इतपत एक नवकोरं संशोधन परदेशी आलय.हे संशोधन आर्यवर्तातल्या कोपिष्ट मूनीवर्यांच्या या भावनेला सॅल्युट ठोकणारं निघालय.जर्मनितील जेना युनिव्हर्सिटीचे संशोधक गेल्या काही वर्षांपासून राग आणि त्यांचे सदुपयोग या विषयांवर संशोधनात मग्न होते.हे संशोधन त्यांनी शांतपणे आणि धिरानं केलं असलं तरी या संशोधनातून निघालेले निष्कर्ष हे भारतीयांचं मन उल्हसित करणारे आहेत.
   हे संशोधन सांगतं की जी व्यक्ती राग राग करते,तीचं आयुष्य दोनवर्षांनी वाढतं.द्या टाळी.आपली आजी आपल्या आजोबाची राग राग कां करायची हे लक्षात आलं का,आजा गचकल्यावर आजी दोन वर्ष ठणठणित राहून सुनेला खडे बोल सुनवायला रेडीच असायची.जमदग्नी ऋषी हे दीर्घायुषी झाले त्याचं कारण त्यांचा राग होता,हे लक्षात घ्यायला हवं.राक्षस गणांचा इतिहास हा दीर्घायुष्याच आहे की राव.आलमगीर औरंगजेब दीर्घायू होते ते कारण ते मराठ्यांचा राग राग करीत होते. पिस म्हणजेच शांती मॅन अमोल पालेकर यशस्वी की अँग्री म्हणजेच रागावलेला मॅन ,अमिताभ बच्चन यशस्वी ?
    भारतातील रागाच्या या समृध्द  परंपरेवर परकीय शिक्कामोर्तब झाले हे बरेच झाले.शिवाय मॅक्समुल्लर साहेबाच्या जर्मनी या देशांतील संशोधकांचं हे संशोधन आहे.मॅक्समुल्लर यांनी संस्कृत भाषा ही देवांनाम् प्रिय असल्याचं सांगितलं,वेदग्रंथांचा अभ्यास केला,तेव्हाच आपली खात्री पटली होती.तसच आताही रागावरील संशोधनाची महती मान्य करण्यात होईल, अशी आशा करू या.
   राग राग केल्याने आयुष्य वाढतं.राग दाबून ठेवल्यानं ब्लड प्रेशर ते किडनी प्रेशर वाढतं.रागास मुक्त केल्यानं ते वाढणार नाही.असं हे संशोधन सांगतं.बघा,आपले पूर्वज जे सांगत होते त्याची  खात्री पटण्यासाठी परदेशी संशोधन व्हावं लागतं.आता तरी आपले बाबा,बुवा,बापू,महाराज,श्री श्री ,महंत,माँ आदी गॉडमेन ऍ़ण्ड वुमेन शांतीचा जपमाळ करणार नाही अशी आशा बाळगू या.

No comments:

Post a Comment