Saturday, December 31, 2011

फस गये ओबामा-आवृत्ती दुसरी

फस गये ओबामा-आवृत्ती दुसरी
      मल्लिका शेरावत यांना आता कोण ओळखत नाही.याचा अर्थ त्यांना पूर्वी कुणी ओळखत नव्हतं असा होत नाही.पण पूर्वी त्यांची ओळख ही केवळ बांद्रा तलावापुरतीच मर्यादित होती.पण त्यांना अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी चहा पिण्याचे आमंत्रण दिले ,तेव्हा पासून ,सारं
जग त्यांना ओळखायला लागलय.
    या जगामध्ये अमेरिकेतले जसे तमाम नागरिक आहेत,त्याचप्रमाणे आफ्रिका खंडातले समस्त बांधव आणि भगिनी,चिनी देशातले समस्त बांधव आणि भगिनी शिवाय पृथ्वीतलावरील अभिजनांच्या घरी असणारी  सर्व श्वानपथके,सिंह,वाघ,हत्ती आणि महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल,मच्छिबाजारात येणाऱ्या पापलेट पासून मरळ पर्यंत,समुद्रातील व्हेल पासून शॉर्क पर्यंत,पॉल ऑक्टोपस मृत्यूमुखी पडले नसते तर ते आणि काहीशे अब्ज कोटी जलचर,डोळयाला दिसू शकणारे पृथ्वीचर यांना सुध्दा मल्लिका शेरावत या आता ओळखीच्या झाल्या आहेत.
    याला पुरावा काय,असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.वर ज्यांचा -ज्यांचा उल्लेख आहे,त्यांच्यापलिकडे खात्रीचा पुरावा कोण बरे राहू शकेल.? त्यावर विश्वास ठेवायचा नसल्यास मग सीबीआयचे पोलीस जशी चौकशी करतात तशी त्यांची प्रत्यक्ष चौकशी सुध्दा करता येऊ शकेल.ही बाब स्वत:मल्लीका शेरावत यांनीच स्वयंस्पष्ट केली आहे.शिवाय त्यांचे असे म्हणणे आहे की प्रेसिडंेट ओबामा मला ओळखतात.त्यांनी आपल्याला व्हाईट हाऊस मध्ये बोलावून चहा दिला.हे तर सत्य आहेना.या घटनेचे व्हीडीओ आहेत.प्रेस मध्ये फोटं छापून आले आहेत.यू ट्यूबवर ते व्हीडीओ आहेत.ज्या प्रमाणे टाईम्स ऑफ इंडियाच्या संपादकांना देशाच्या पंतप्रधानांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली पद समजले जाते.तसेच युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकेच्या प्रेसिडंेटला इन्सपेक्टर जनरल ऑफ वर्ल्ड असे संबोधले जाते.या न्यायाने ते या जगाचे राजे आहेत.याला प्रतिवाद अद्यापपावेतो चीनने केलेला नाही.सध्या तरी ते डेप्युटी इंस्पेक्टर जनरल ऑफ वर्ल्ड,या पदावरच समाधानी आहेत.यावरुन हे स्पष्ट होते की प्रेसिडंेट ओबामा हेज जगाचे राजे आहेत,म्हणेज त्यांना जेव्हा एखादी गोष्ट ओळखीची होते,तेव्हा ती समस्त जगालाच ठाऊक झाली,असा प्रमेय आपोआपच सिध्द होतो.
    मल्लिकांच्या मते,चंद्रावर आणि मंगळावर जर 2011साली कुणी राहत असते तर त्यांनाही त्यांची ओळख झालीच असती.तिथे कुणी राहत नाही ,यात आपला काही दोष नाही.
    मल्लिका शेरावतांना ओबामा यांनी खरोखरच चहा प्यायला बोलावलं होतं का?हा प्रश्न काही दुष्टबुध्दीच्या आणि मल्लिकांवर जळणाऱ्या जळकुकड्यांना पडू शकतो.कारण मुळात ओबामा चहा पितात काय?हे व्हाईट हाऊसने आणि मिशेल वहिनींनी अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.व्हाईट हाऊसमध्ये पाहुण्यांना चहा दिला जातो काय काय? हे अद्याप एकाही पत्रकाराला कळलेले नाही.
    ओबामा हे फिटनेसला प्राधान्य देतात.ज्याला फिट राहायचं असतं,ते चहा पासून चार हात दूरच राहतात.आपण तसे राहिलो नाही,म्हणून आपल्याला हार्ट अटॅक आला असं,बिल क्लिंटन यांनी सांगूनच ठेवलं आहे.हिलरी वहिनींनी याला दुजोरा दिलेला नाही.खाजगीत नीता वहिनी अंबानी यांना हिलरी वहिनी,म्हणाल्या होत्या की,बील चहाच्या प्रेमात पडला असता ना, तर मला वाईट वाटले नसते,पण तो डिफरंट डिफरंट बिल्लींच्या (उदाहरणार्थ मोनिका लेवेंस्की इत्यादी) प्रेमात पडला.इतक्या बिल्लींच्या प्रेमाचं प्रेशर पडूनच त्याचं हार्ट कमकुवत झालं.एकदा असं झालं की हार्ट ब्रेक होतच की.सुदैवानं ते फेल झालं नाही.
    ही गुप्त बातमी आमच्या पर्यंत कशी बरे पोहचली?अहो हिलरी वहिनींनी,नीता वहिनींना हे सत्य सांगितलं.त्या निता वहिनींच्या बंगल्यावरुन निघून गेल्यावर नीता वहिंनींना स्वस्थ बसवेना(आठवा बघू- कर्णाने कुंतीला दिलेला अजरामर शाप.)हिलरी वहिनींनी मोठया विश्वासाने त्यांच्याजवळ आपलं मन मोकळं केलं होतं.हिलरी वहिनी जशा आपल्या विश्वासातल्या तशा अंजली वहिनी तेंडूलकरही आपल्या विश्वासातल्या आणि फास्ट मैत्रिण की.त्यांना हे सिक्रेट सांगितलं तर आपलंही मन मोकळं होउुन जायचं,असं नीता वहिनींना वाटलं.त्यांनी अंजली वहिनींना फोन लावला .सारं काही सांगितलं.झालं.एकसे दोन.दो से.तीन. एका क्षणात होऊन गेलं.अंजली वहिनींनी ही बातमी आम्हाला दिली ,असं आम्हाला म्हणायचं नाही.पण त्या कुणाशीतरी बोलल्या आणि आणि त्यांनी आपलं मन मुक्त केलं.असं ते मुक्त होत होत आमच्यापर्यंत पोहचलं.कम्युनिकेशनच्या सिध्दांतानुसार जी गोष्ट दोन व्यक्तिंना माहिती असू शकते,ती पुढे अनेकांना कळू शकते.फक्त तथ्यांची मोडतोड होते. कधी कधी .समजा प्रारंभी हे तथ्य अर्जूनाशी संबधित असेल तर प्रसरण पावत पावत पुढे त्याचे बृहन्नडा होऊन जाते.काळोख असेल तर उजेड होतो.वाघ असेल तर गाढव होतो.पण हे चालायचच.त्यावर अद्यापपावतो तरी काही,
जनसंवाद शात्रज्ञांनी उतारा काढलेला नाही.
    तर मुद्दा हाच होता की हिलरी वहिनींनी ,नीता वहिनींना, बील भाऊंच्या सो मेनी बिल्ली प्रेमप्रकरणांविषयी सांगितलेली गुप्त वार्ता आम्हाला कळली होती. ही बाब चहाशी संबंधित होती.चहा ओबामांशी संबंधित होता.
    व्हाईट हाऊसमध्ये पाहुण्यांना चहा दिला जातो की नाही हे माहीत नसल्यानं,मल्लिकाला चहा प्यायला ओबामांनी बोलावलं,यावर कितपत विश्वास ठेवायचा,हा मुद्दा आहे.मात्र हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही.कारण मल्लिकांनीच यावर समंजस भूमिका घेतली.त्यांचं यावरचं निवदेन असं आहे की,समजा ओबामा यांनी मला चहा प्यायला बोलावलं नसल्याचं कुणाला मान्य नसेल,तर त्यांनी कॉफी प्यायला बोलावलं असं समजावं,तेही कुणाला मान्य नसेल तर,त्यांनी मला बीअर प्यायला बोलावल,असं समजावं,तेही मान्य नसेल तर रम प्यायला बोलावलं असेल असं समजावं,तेही मान्य नसेल तर त्यांनी मला वाईन प्यायला बोलावलं असेल,तेही मान्य नसेल तर त्यांनी मला कोकाकोला प्यायला बोलावलं असेल हे समजावं,हेही मान्य नसेल तर त्यांनी मला रुह अफजा शरबत किंवा रसना शरबत प्यायला बोलावलं असेल,तेही मान्य नसेल तर त्यांनी मला एक ग्लास पाणी प्यायला बोलावलं असेल हे मान्य करावं ना.ओबामांना पाणीही चालत नाही ,असा आक्षेप तुम्ही घेऊ शकत नाही.फरक एवढाच राहील की हे पाणी गंगेच्या एैवजी हडसन नदीचं असेलं.मल्लिकांच्या या निवेदनात निश्चितच दम आहे.हे सांगणे लगे.याचा निष्कर्ष असा निघतो,की ओबामांनी मल्लिकांना काहीतरी प्यायला बोलावलं होतं.ते चहापासून वाईनपर्यंत काहीही असलं तरी त्यातलं महत्वाचं इनग्रेडिएंट हे पाणीच ठरतं.नाही का?
    चला,ओबामांनी मल्लिका यांना व्हाईट हाऊसमध्ये काहीतरी प्यायला निमंत्रण दिलं.हे आता आपल्याला  आवडो की आवडो हे सत्य इतिहासाच्या पृष्ठांवर अधारेखित झाले आहेच.
0000
    ओबामांनी मल्लिकांना बोलावले काय किंवा आणखी कुणाला बोलावले काय,हे तुमच्या आमच्या सारख्या महागाईच्या चक्रात मान सापडलेल्या पामरांना काय घेणं देणं.पण ज्यांना महागाई म्हणजे काय हेच माहीत नाही,तिच्याशी कसा सामना करावा लागतो हे माहीत नाही,अशांसाठी मात्र मल्लिकांना ओबामांनी निमंत्रण दिलं हे,सत्य पचनी पडलं नाही.त्यांना असं वाटतं की आपल्यापेक्षा ही मल्लिका कोण लागून गेलीय, तिस्मार खान.म्हणजे एक शेलाटी फिगर सोडलं तर काय असं आहे तिच्यापाशी,जे आपणापाशी नाही.अपरं नाक,जाडेभरडे डोळे,भदाडे ओठ,वगेैरे वगैरे.मग ओबामांनी कोणता बरे ,क्रायटेरिया लावला,मल्लिकाला चहापानासाठी निमंत्रण देण्यासाठी.
    असं काहीसं वाटण्यात पहिला क्रमांक अर्थातच सौ.माधुरी श्रीराम नेने -दीक्षित यांचा आहे.पहिला क्रमांक कारण ,त्या गेल्या काही वर्षात अमेरिकत राहतात.त्यांचा नवरा अमेरिकन नागरिक आहे.असावे सुंदर अपूलं घरटं,असं त्यांचं हक्काचं घर,अमेरिकेत आहे.त्या आता स्वत:नॉन रेसिंडेंट इंडियन आहेत.त्यांना असं वाटतय की,काय हे,मी माधुरी दीक्षीत असताना ,ओबामा मला निमंत्रण देत नाहीत.माझ्यात आणि मल्लिका मधे फक्त एकच साम्य म्हणजे तिचं आणि माझं नाव पासून सुरु होतं.माझ्या हास्यावर सारा हिंदुस्थान फिदा होता.असं म्हणतात की ,अजूनही आहे.असं म्हणतात की,समस्त हिंदुस्थान माझ्या मस्त तेजाबी डान्सवर डोलायचा.मल्लिकेचं काय,काहीच नाही.16 चुंबनं. हे काय क्वालिफिकेशन झालं.मी सुध्दा विनोद खन्नाला दयावान मध्ये चुंबन दिलं होतच की.काही जण म्हणतात,ते खरं हॉट अँड पॅशेनेट चुंबन होतं.मल्लिकेंच चुंबन फक्त घासाघासी होती .ओठांशी.नो आर्ट ओन्ली फर्राट.माझ्या डायरेक्टरनी मला सतरा चुंबन दृष्य द्यायला सांगितलं नाही ,हा काय माझा दोष.तुम्हीच सांगा.मल्लिका हरियाणा प्रातांची आहे ,हे क्वालिफिकेशन कसं बरं होऊ शकेल.ती हरियाणाची असेल तर मी मुंबईची आहे ना.पाचशे मुंबई एकत्र केल्यावरही हरीयाणाला त्याची सर येणार नाही.हे ओबामांना कळायला नको का.त्यांचे सल्लागार फारच भुक्कड दिसतात.अरे, मला निमंत्रण दिलं असतं तर त्यांच्या आख्या कुटुंबाला आयुष्यभर फुकट औषधं दिली असती माझ्या नवऱ्यानं नि फुकट शिकवलं असतं कथ्थक त्यांच्या मुलिंना.मी. आणि पुरणपोळी शिकवली असती ,मिशेल वहिनींना.जाऊ द्या.आपण कशाला मनाला लावून घ्यायचं.त्यांच्या नशिबात माधुरी नसेल तर काय करणार.किमान पत्रिका तरी महादेव शास्त्री डोंबिवलीकर यांच्याकडून बघून घ्या म्हणाव ,आता.कोणते ग्रह कुठे आहेत,ते तरी कळेल,
ओबामांना.अन्यथा त्यांनी आता मल्लिका बोलावलं,पुढे एखाद्या मलायकाला बोलावण्याची घोडचूक करतील.महादेव शास्त्री डोंबिवलीकर यांचा पत्ता व्हाईटहाऊसच्या इमेलवर पाठवायचा निश्चय माधुरी यांनी केला.मल्लिकाच्या विश्वातून बाहेर पडण्याच्या त्यांना सुचलेला हा मार्ग होता.
000
2
ऐश्वर्या रॉय बच्चन यांना जेव्हा,मल्लिका ओबामा भेट वृत्त कळलं,तेव्हा त्यांच्या अंगांची लाही लाही झाली.इतकी की त्यांची गौर कांती काळीठिक्कर पडते की काय,अशी भीती निर्माण झाली.त्या स्वत:क्षणात सावध झाल्याने तसं होणं वाचलं.
    त्यांचं असं म्हणणं पडलय की,हू इज धिस मल्लिका वल्लिका.मी तर मिस युनिर्व्हस म्हणजे जगत सुंदरी आहे.या सो काल्ड मल्लिकाला धारावीमध्ये उभी केली.तिथे मिस धारावी स्पर्धा घेतली तर हिचा पाचशेवाही नंबर लागणार नाही.ओबामांना गुप्त माहिती देणाऱ्या सीआयएला सुध्दा हे कळू शकत नाही का?याचा अर्थ आमच्या महाराष्ट्राची सीआयडीच बरी की.ओबामा जरा लक्ष द्या इकडे,सीआयएच्या बॉसला आमच्या महाराष्ट्रातल्या सीआयडी बॉसकडे ट्रेनिंगसाठी पाठवा.म्हणजे भविष्यात तरी अशा गफलती होणार नाही.
    मल्लिका पन्नास वेळा न्युयार्कला गेली असेल तर मी पाचशे वेळा गेली की हो,न्युयार्क आणि लॉस एंजेलिसला.मल्लिकाच्या सोळा किसचं काय घेऊन बसलात.एव्हरी बडी नोज,राईट फ्रॉम विकू ओबेरॉय व्हाया अनिल कपूर टू मिस्टर सलमान खान यांच्या ओठांवर ओठ मी ठेवलय,त्याला काय चुंबन म्हणत नाही काय?शिवाय मिस युनिर्व्हसच्या ओठांमध्ये नि कशातच काही नसलेल्या मल्लिकाच्या ओठांमध्ये फरक करणार की नाही ओबामा तुम्ही?
    मे बी,ओबामंाना,मल्लिकाच्या काही बिग गोष्टींनी भूरळ घातली असू शकते.अहो ,मी ओरिजनल बिग बीची बहू आहे की आता.कसं बाई होणार या ओबामांचं.असले निर्णय ते घेत राहिले तर,अमेरिका खड्यात नाही का जाणार.
    मिसेस मिशेलना सुध्दा ,हू इज धिस मल्लिका हा प्रश्न पडायला नको होता का.पण पडला नाही.मल्लिकाने ब्लॅक मॅजिक तर केले नाही ना.ज्या अग्ली अँड पग्ली बाईला मर्डर करणं सोपं आहे,तिला ब्लॅक मॅजिक करायला कितीसं अशक्य.मला त्यांनी निमंत्रण दिलं असतं तर ,एखाद्या मिस युनिर्व्हसचा सन्मान करण्याचा पहिल्यांदाच मान व्हाईट हाऊसला मिळाला असता.जे पहिलं असतं,त्याची इतिहासात गौरवशाली नोंद होते.इतिहासात वाश्गिंटनच्या नंतर एकाही अमेरिकन राष्ट्रपतीची अशी गोैरवशाली नोंद झालीय का?ओबामांनी संधी दवडलीय हो.जाऊ दे.नशिबाचा भाग .त्यांच्या.खरं तर त्यांनी त्यांच्या हस्तरेषा बघून घ्यायला हव्यात आता.त्यामुळे भविष्यात तरी त्यांच्या हातून अशा काही गफलती होणार नाहीत.पां ना विचारते  नि एखाद्या नामवंत हस्तरेषा तज्ज्ञांचा पत्ता ओबामांना कळवते.
    एैश्वर्यांनी आपल्या मनाचं समाधान करुन घेतलं.समाधान खोटं होेतं,कारण वारंवार त्यांना प्रश्न पडतच होता की ,हू इज धिस मल्लिका..म्हणजे कोण लागून गेलीय ही उर्वशी की मेनका..
    या प्रश्नाचं उत्तर मिळतय कां कुठे ,याच्या विचारमंथनात सध्या एैश्वया मग्न झाल्या आहेत.
000
3
    सुष्मिता सेन ,यांनी मल्लिका-ओबामा भेटीकडे थंडपणे बघितले.त्यांनी एक निश्वास सोडला.बॉलिवूड मध्ये त्यांना आता कुणी विचारत नाही,भूमिका देत नाही.हे शल्य त्यांच्या मनात आहेच.मिस वर्ल्डचा इतिहास आता कुणाला आठवत नाही.त्यांच्या जीवनात अनेक पुरुष आले,पण त्यात एखादा अभिषेक बच्चन नसल्यामुळे,त्यांचे सारे अफेअर्स सुध्दा विस्मरणात गेले.चित्रपटांच्या दुनियेत त्यांचा ग्राफ घसरता असला तरी,मल्लिका-ओबामा भेट त्यांना पचनी नाही पडली.
    त्यांनी स्वचिंतन केले की,ओबामांना,मल्लिका मध्ये काय क्वालिटी दिसली असेल.मी तर भूतकाळातील कां होईना मिस वर्ल्ड आहेना.मिस मल्लिका होण्यापेक्षा मिस वर्ल्ड होणं हे किती कठिण.एकदाचं अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचं इलेक्शन जिंकता येईल,पण मिस वर्ल्डचा किताब जिंकणं,एैऱ्यागैऱ्याचं काम नव्हेच ते.
    मी ,मिस वर्ल्ड ,म्हणजे मी ,एैरी गैरी नाही.आय ऍ़म समथिंग स्पेशल.स्पेशल गोल्डन चहा नि आर्डनरी चहा यामध्ये जो फरक असतो ,
तोच फरक माझ्यात आणि मल्लिकात.मी जेम्स हेडली चेस असेल तर मल्लिका गुरुनाथ नाईक.मी गंगा नदी असेल तर मल्लिका मिठी नदी.मी न्युयार्क असेल तर मल्लिका फरिदाबाद.मी व्हाईट हाऊस असेल तर मल्लिका 2000चौरस फुटांचा फ्लॅट .मी प्लेबॉय मॅगेझिन असेल तर मल्लिका डेबोनेर मॅगेझिन.मी रविंद्रनाथ टागोरांची पोयट्री असेल तर मल्लिका आनंद बक्षींची फिल्मी गाणं.इतका जमीन अस्मानाचा फरक,आहे आमच्या दोघिंमध्ये.ओबामांना क्वालिटीचं काही ज्ञानच दिसत नाही.काय करणार?अमेरिकच्या नशिबाचं काही खरं नाही बुवा.ओबामांनी फेस रिडिंग करुन घेणंच बरं.कळवू या का त्यांना एखाद्या फेस रिडरचा पत्ता.
    हा पत्ता पाठवायचा किंवा नाही याच्या विचारात सध्या सुष्मिता सेन गढून गेल्या आहेत.
000
4
श्रीदेवीचं म्हणणं पडलं की,आय ऍ़म ओल्ड ,आऊट डेटेड लेडी.मल्लिका इज न्यू एज लेडी.काळाचा महिमा.मी जर केनेडींच्या काळात असते,तर त्यांनी मर्लिन मनरोकडे ढुंकूनही बघितलं नसतं.मेबी,ओबामंाना मल्लिकामध्ये ,मर्लिन दिसली असेल.गॉड ब्लेस बोथ ऑफ देम.
000
5
करीना कपूर यांनी मल्लिका -ओबामा भेटीकडे वेगळया अँगलने बघितलं.त्याचं म्हणणं पडलं की,
    ओबामांनी आपल्याला निमंत्रण दिलं असतं तर सैफू रागावला असताना बाबा.पंधरा मिनिटाच्या भेटीसाठी कशाला आपल्या प्रेमपात्राला नाराज करायचं.ओबामांनी निमंत्रण दिलं नाही,हे आपलं भाग्य.लाँग लिव्ह ओबामा.
000
6
    प्रियंका चोप्रा यांनी सुध्दा या घटनेवर बरच विचार मंथन केले.त्यांनी त्यांचा फास्टेस्ट फ्रेंड शाहरुख खान यांच्याशी चर्चा केली.त्यांना हे कळेना की हरीयाणा आणि पंजाब ही शेजारी शेजारी राज्य.पण पंजाब इज बीग राज्य.त्या पंजाबातील आपण कुडी.शिवाय मिस वर्ल्ड.असं असताना ओबामांचं लक्ष हरियाणाच्या कुडीकडे कसं काय गेलं बुवा.आपला मॅनेजर फुकटाचा पगार घेतो.मल्लिकाच्या हुषार मॅनेजरला पटवायला हवं आता.मल्लिका आणि माझं वजन करायला वजन काटयावर ठेवलं तर माझं वजन जास्त नाही का होणार.मी शाहरुख,सलमान,ह्रतिक,अभिषेक,अक्षयकुमार,रणबीर ,शाहीदची हिरोईन.मल्लिकाने या हिरोंचे नाव तरी एैकलय की नाही,वाहे गुरुच जाणे.ओबामांच्या सल्लागारांचंं अज्ञानच यातून दिसून येतं.इंडियातल्या अभिनेत्रिंना चहासाठी निमंत्रण द्यायचच होतं,तर मग रेखा काकू कां नको.त्यांच्या पायांच्या नखाची सर तरी मल्लिकाला येईल का.जया बच्चन आँटी कां नको.त्यांच्या हाताच्या नखाची सर तरी मल्लिकाला येईल का.जया प्रदा मॅडम कां नको.शी इज ब्युटिफुल तर आहेच पण खासदार असल्याने बोल्डही आहेत.आणि माझी काजोल ताई.तिच्या कशाची तरी सर मल्लिकाला  येईल का हो.बरं माझं जाऊ द्या.मुग्धा गोडसे,दॅट लव्हली गर्ल फ्रॉम मॉय मुव्ही फॅशन,ती तर बोल्ड नव्हे बोल्डरच आहे.तिला निमंत्रण दिलं असतं तरी चालू शकलं असतं ना..
    ज्यांचे सल्लागार असे असतात,त्यांची जहाजं बुडायला वेळ लागत नाही,असं मॅनेजमेंट तज्ञ रॉबर्ट डी दुसरा ,याने लिहूनच ठेवलय ना.
    व्यवस्थापनच्या अभ्यासक्रमासाठी बायबल समजल्या जाणाऱ्या या पुस्तकाची इतकी मागणी वाढली की ते पुस्तक पुरवता व्यवस्थापकाला नाकी नऊ आले.पण पुस्तकासाठीच्या मागणीचा प्रेशर असल्याने,प्रेस अखंड सुरु ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापकाने घेतला.त्यामुळे प्रेस खूप गरम झाला.नि प्रेसने पेट घेतला.त्यात साऱ्या प्रती  आणि फ्रुफं ,कंप्युटर जळून गेले.त्यामुळे आता हे पुस्तक आऊट ऑफ मार्केट आहे.त्याची एकच प्रत केवळ माझ्याकडेच शिल्लक आहे.कुणाला बघायची असल्यास त्याने अवश्य यावे नि प्रत्यक्ष बघून घ्यावे.
    सल्लागारांच्याच फॉल्टी मार्गदर्शनामुळेच नेपोलियन हरला.क्लिंटन फसले.बुशचं जहाज बुडालं.मुशर्रफांची सत्ता गेली.औरंगजेबाला दिल्लीच्या तख्ता पासून 25 वर्षे तिकडे दख्खनमध्ये अडकून पडावं लागलं.पानिपतात मराठा वॉरियर्सची दानादान उडाली.राजेश खन्ना यांचं एम्पायर बघता बघता खालसा झालं.कनिमोझी अम्मा तुरुंगात गेल्या.हिमेश भाई रेशमीया गटांगळया खायला लागले.इतकी मोठी उदाहरणं आहेत.समोर.पण लक्षात कोण घेणार.नका घेऊ.अशा सल्लागारांच्या गराडयात राहाल तर आणखी एखाद्या मल्लिकाचा गराडा पडेल नि व्हाईट हाऊसच्या बाहेर कधी जावं लागेल हेही
कळायचं नाही
    खरं तर हा अग्रलेखाचा विषय.आपण एखाद्या वृत्तपत्रांच्या संपादिका असतो तर यावर अत्युकृष्ट अग्रलेख लिहिला असता.त्या स्वत:शीच बोलल्या नि आपल्या विचारमंथनाला शब्दरुप देण्याचं काम शोभा डे करु शकतात,हे त्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी शोभाजींना मोबाईल लावला.
00
7
    मल्लिका आणि ओबामांच्या भेटीचं वृत्त कानावर पडताच राखी सावंतांनी आकाशाकडे बघितले नि देवा,ओबामांनी काय केलय हे त्यांना कळलेलं नाही,त्यामुळे त्यांना तू माफ कर असं त्यांनी आकाशस्थ देवाला विनंती केली.हे राखी सावंत यांचं सॉफ्ट रुप होतं.
    या सॉफ्ट रुपातून हॉर्ड रुपात त्यांना यायला वेळ लागला नाही.त्या तशा येताच त्यांचा जळफळाट झाला.त्या स्वत:शीच म्हणाल्या,ती मल्लिका शेरावत असेल तर मी राखी सावंत आहेना.राखी सावंत हे नावच पुरेसं नाही का.मल्लिका ज्या शाळेतील विद्यार्थीनी आहे.त्याशाळेची मी डिलीट धारक स्टुडंट आहे.तिच्या मुखात फुलझडया असतील तर माझ्या मुखात फटाके आहेत.ओबामांना ती आयटम वाटत असेल तर मी आयटेम बाँब्म आहे.ओबामांना हे कुणी तरी सांगायला हवं की मल्लिकाला टीआरपीच नाही.पण राखी सावंतचा टीआरपी नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.मल्लिका बोलते तेव्हा जर वाद निर्माण होत असेल तर राखी सावंत जेव्हा बोलते तेव्हा वितंडवाद निर्माण होतो.समजा मी आणि मल्लिका एकाच नाण्याच्या दोन बाजू असेल तरी,खरं नाणं -खोटं नाणं कोणतं हे ठरविण्याचा निरक्षिर विवेक ठेवायलाच हवा.
    राखी सावंत छत्रपतींच्या राज्यातील कन्या असल्याने तिला खोटं बोलणं अजिबात पसंत नाही.मल्लिका भजनलालांच्या राज्यातील कन्या असल्याने तिच्या बोलण्याची सत्यता कोण तपासणार.
    राखी का स्वंयवर ते राखी का इंसाफ या साऱ्या टप्प्यांवर मी जाऊन आले आहे.मर्डरच्या पुढे मल्लिकाची मजल कुठे गेली तर हिस्स करण्यात.ते कसं फुस्स झालं हे ओबामांना कुणीतरी सांगायला नको का.
    शाहरुख खान म्हणतो आय ऍ़म बेस्ट.तो त्याच्या प्रातंातला बेस्ट आहे.व्हीवीयन रिचर्ड म्हणाला,सचीन बेस्ट.सचीन त्याच्या प्रांतातला बेस्ट आहे.मल्लिकाला तिच्या प्रांतातील ती बेस्ट आहे असं,   महेश भट्ट सुध्दा म्हणणार नाही.बेस्ट गाडयाच बेस्ट असतात असं ते म्हणतील.मल्लिका जर बेस्ट नसेल तर कुणी तरी बेस्ट असेलच की नाही.ती बेस्ट म्हणजे राखी सावंत.हे ओबामांना सांगायला हवं.
तुम्ही म्हणाल वेळ निघून गेल्यावर आता कशासाठी सांगायचं.अहो,मल्लिकाला बोलावून त्यांची बूंदने गेली आहे.ती भरुन काढणारा हौद म्हणजे राखी सावंत .
    माणूस हा स्खलनशील प्राणी असल्याने त्याच्याकडून चुका होतातच.त्या जर झाल्या नाही तर देअर इज समथिंब डिफेक्ट इन हिम ,असं समजायला हवं ,असं ओशो रजनीश 24 वर्षापूर्वी म्हणाले होते.4 महिन्यांपूर्वी हेच श्री रविशंकर म्हणाले.असं समजूया की ओबांमाकडून चूक झाली.चुका दुरुस्त करता येतात.त्यासाठी नवग्रहांची शांती करण्याची किंवा पशुपतीनाथाच्या मंदिरात जाऊन अभिषेक करण्याची गरज नाही.तिरुपती बालाजीला सोन्याचे दागिने देण्याची गरज नाही.सत्यनारायण करण्याची गरज नाही.हाजी अलिला चादर चढविण्याची आवशक्यता नाही.गुरुद्वारात मथ्थाच टेकवायला हवा ,असं कुणी सांगितलं तुम्हाला.माहीमच्या चर्च मध्ये जावं लागतं असं कोण बरं म्हणतय..अहो चुका दुरुस्त करण्याचे 121 मार्ग आहेत,बाबा सोमदेव यांच्या पुस्तकात.ओबामांना चूक दुरुस्त करण्याची संधी दिलीच पाहिजे की नाही.दुर्याेधनाला त्याच्या अनंत चुका दुरुस्त करण्याची वांरवार संधी कृष्ण देत होता.रावणाला त्याच्या चुकीची दुरुस्ती करण्याची संधी देण्यासाठी हनुमंत लंकेत गेला होता.तेव्हा ओबामांची ही पहिलीच चूक असल्याने त्यांना ती दुरुस्त करण्याची संधी देण्याची माझी आग्रही मागणीच आहे.शशी थरुर यांच्या मार्फत मी ही मागणी युनस्कोमध्ये मांडू शकते.
     राखी सावंतला चहासाठी निमंत्रण देऊन ओबामा ही चूक दुरुस्त करु शकतात.यावेळी त्यांनी चहा पिला नाही तरी चालेल.मी सेवाग्राम येथे तयार होणारे आंबाडीचे शरबत घेऊन जाते.सेवाग्राम म्हणजेच गांधी बाबांच्या वास्तव्याने पवित्र झालेले ठिकाण.ओबामा गांधी बाबांचे भक्त.तर गांधी बाबांच्या गावातील शरबत म्हणजे त्यांना तीर्थासारखे पवित्र.
    बघा, मला बोलवल्याने मल्लीकाला
बोलावून त्यांनी केलेली चूक दुरुस्त होईल आणि नि मी दिलेल्या आंबाडी शरबतामुळे पापक्षालनही होईल.राखी सावंतलाच हे कळू शकतं.सुचू शकतं.तीच हे करु शकतं.
0000
    राखी सावंत यांनी आपल्या मनातील या विचारांना मोकळीक करुन दिली आहे.त्यांचे हे विचार आता अमेरिकेकडे हवेसोबत उडत उडत निघाले आहेत.ते लवकरच व्हाईट हाऊस मध्ये पोहचतील.ओबामा आणि मिशेल वहिनी या विचारांना तपासतील आणि राखी सावंत यांना चहापानासाठी निमंत्रण देतील अशी आशा करु या..
0000
    तो दिवस धन्य करणारा असेलच कारण,अटकेच्या अटके पार झेंडा लावणाऱ्या पहिल्या मराठी मुलीचा व्हाईट हाऊसने,सन्मान केला,हा गौरव आपल्याला प्राप्त होईल.
    राखी सावंत यांनी दिलेल्या  आंबाडी शरबताने प्रभावित झालेले ओबामा या शरबातचं आंतरराष्ट्रीय उत्पादन करण्यासाठी सेवाग्रामला प्लांट काढण्याचा निर्णय घेतील.
    डे वुईथ ओबामा ही लेख मालिका राखी सावंत टाईम्स ऑफ इंडियासाठी लिहितील.
    टीआरपी वाढविण्यासाठीचे गुरुमंत्र राखी सावंत ओबामांना देतील.
    कदाचित,कदाचित राखी सावंत यांना ऑफिसर ऑन स्पेशल डयूटी-सल्लागार, या पदावर सुध्दा ओबामा नियुक्ती देऊ शकतील..
    000
अस घडणार नाही.हे कुणी खात्रीपूर्वक सांगू शकतील का..नाही ना..अहो,जगात क्षणाक्षणाला चमत्कार घडत असतात  की.मल्लिका शेरावत हीस चहापानासाठी ओबामांच्या निमंत्रणाचा चमत्कार घडू शकतो ,तर राखी सावंत यांना निमंत्रण आणि पुढचं सारच काही घडू शकण्याचा चमत्कार कां होणार नाही..चला बेट लावा बरं..