Friday, March 23, 2012

पॉलची डायरी

पॉलची डायरी
पॉल ऑक्टोपसने दक्षिण ऑफ्रिकेत झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत 9 वेळा अचूक भविष्यवाणी वर्तवली .त्यामुळे तोच यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा खराखुरा विजेता ठरतोय असं सर्व मिडियाने एकमताने सांगितलं.आपल्या अचूक भविष्यवाणिने पॉल एका महिन्यात मेगा-सुपरस्टार बनला.कोन होतास तू आणि काय
झालास तू अश् त्याची स्थिती झाली.त्याचं आयुष्य बदलून गेले..ते कसं कसं बदललं याचा वृतांत त्याने स्वत: एका डायरित लिहून ठेवली.ही डायरी नुकतीच त्याने आमच्याकडे प्री पब्लिकेशन प्रसिध्दीसाठी दिली.या डायरितील काही भाग आपणासाठी आम्ही खुले करत आहोत..
1
आजचा दिवस कसा जाईल या चिंतेत होतो मी..पण सॅटनफोर्थ(माझा देखभालक)ने मला दोन चेंडू ठेवलेल्या एका काचेच्या पॉटमध्ये टाकलं.मला जाम भूक लागली होती,त्यामुळे मी त्यातील एक चंेडू पकडला.त्याक्षणी सॅटनफोर्थने मला पॉटमधून बाहेर काढलं.माझ्या पायांमधून त्याने बॉल ओढला.. मला त्याचा इतका राग आला होता की विचारु नका.त्याचे मंुडके छाटून टाकावक असा दुष्ट असला तरी विचार माझ्या मनात आला..कारण प्रश्न भुकेचा होता..तोंडा जवळ आलेला घास असा ओढून नेण्याऱ्याची गय करायची नसते हे आमच्या बाबांनी लहानपणीच आम्हाला शिकवलेलं आहे..
2
सॅटनफोर्थला कदाचित ठाऊक नसेल की पॅसिफिक महासागरातील माझे काही भाऊ आणि काही
भगिनी वेळ प्रसंगी शार्कला सुध्दा मारुन टाकू शकतात..असे काहिसे विचार मनात येत असतानाच सॅटनफोर्थने माझ्यापुढे गोड्या पाण्यातले पाच मासे ठेवले.माझ्या तोंडाला पाणी सुटलं.क्षणार्धात सॅटनफोर्थबद्दल माझ्या मनात येणारे दुष्ट विचार पाण्यात विरघळून गेले.सॅटनफोर्थ हा मनकवडा असल्याची माझी खात्री झाली..पाच माशांनी माझी भूक शांत झाली..सॅटनफोर्थ बॉल घेऊन निघून गेला..मी शांतपणे झोपी गेलो.
3
कसल्यातरी आवाजाने मी जागा झालो..स्वर्गीय सुखाची झोपमोड करणाऱ्याची तंगडी तोडण्याचे मनोमन ठरवून मी डोळे उघडले तर समोर सॅटनफोर्थच नाचत दिसला.आपल्याला मासे देणारा या इसमाची तंगडी कशी तोडणार ,असे माझ्या मनी आले.तो विचार मी बाजूला ढकलला.हा इसम वेडा तर नाहीना असे मला वाटायला लागले. कारण त्याने एका शार्क माशाच्या पिलाची माझ्यासाठी खमंग डिश आणली होती...वाव..डिशचा सुंगध यूम होता.सॅटनफोर्थ यू आर ग्रेट,अस मला जोराने म्हणावसं वाटलं.
 4
सॅटनफोर्थ माझ्यावर इतका मेहरबान कसा काय झाला,या प्रश्नांचे ऑक्टोपसी जाळे माझ्या भोवती पडले..त्यातून रात्रभर सुटका झाली नाही.. सॅटनफोर्थची ही सुबुध्दी अशीच कायम राहो ,अशी जलदेवतेला प्रार्थना करुन मी पहाटे पहाटे झोपी गेलो.
5
सॅटनफोर्थ सकाळी सकाळी धावत आला.त्याने दुस-यांदा माझ्या पॉट मध्ये दोन बॉल टाकले.त्यातील एक बॉल मी पकडला..तोंडात टाकणार तोच सॅटनफोर्थने मला पेटीतून बाहेर काढले.माझ्या तोंडातून बॉल  काढला..पुन्हा तोच प्रश्न मला पडला..सॅटनफोर्थ हा माझा शत्रू नसतानासुध्दा माझ्या तोंडचा घास कां काढून घेतो.या प्रश्नाचा गुंता काही सुटेना..
 6
बॉल घेऊन जाण्याआधी सॅटनफोर्थने मला मटन पिसेस दिले..वॉव.. समुद्रात मटन पिसेस मी कधी खाल्ले नव्हते ..त्यामुळे या डिशने दिलेला परमानंद मी आयुष्यात विसरु शकत नाही. माझ्या तोंडी येऊ बघणारा बॉल हिसकवणारा सॅटनफोर्थ हा मला एकाच वेळी माझा शत्रू आणि  ठार वेडा ही वाटायचा..पण मटन पिसेस ,मासे ,आणि शार्क डिशेश देणारा तोच मला जगातला सगळयात मोठा शहाणा अाणि मित्रही लगेच वाटायचा..त्याचे हे दोन्ही रुपडे लोभसवाणे होते.
7
संध्याकाळी सॅटनफोर्थ,आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे असं गाणं गुणगुणत आणि नाचतच माझ्याकडे आला..आता तो एकटाच नव्हता..त्याच्या सोबत क्लिक क्लिक करुन फोटो काढणारे बरेच लोक होते.माझ्या पायांच्या गुंत्यापेक्ष्याही केसाचा गुंता असलेली एक बाई माझ्याकडे टक लावून बघत होती.तिच्या डोळयाला माझा डोळा भिडल्यागत झाला.माझ्या अंगावर शहारे आले..पण चमत्कार झाला.तिने मला अलगद उचलले आणि माझा मसाज केला..अहाहा वंडरफूलच..समुद्रातील माझ्या मैत्रिणीचा स्पर्शसुध्दा मला इतका मस्त कधीच वाटला नाही.त्या मैत्रिणीचा कसला स्पर्श हो ...निव्वळ काट्यांची रानवाट..या मसाजवाल्या बाईचा मुलायम स्पर्श असाच मिळत राहावा अशी मी प्रार्थना करत असताना तिने माझे तोंड अलगद उघडले.माझी आवडती शिंपले डिश भरवली..सॅटनफोर्थने टाळया वाजवल्या.. सॅटनफोर्थच्या पाया पडावे ,असं मला वाटू लागलं.
 8
त्या बाईने मला त्या पॉट मधून काढून दुसऱ्या भल्या मोठ्या फाईव्हस्टार पॉटमध्ये अलगद ठेवले.पॉटमधील पाण्याचं तपमान कंट्रोल्ड असल्याचं ती सॅटनफोर्थला म्हणाली..ते निम-उष्ण-थंड पाणी मला माझ्या  घरच्या म्हणजे पॅसिफिक महासागरात ज्या ठिकाणी मी वास्तव्याला होतो,त्याच्या सारखं वाटलं..
9
सॅटनफोर्थने  आज तिसऱ्यांदा दोन बॉल माझ्यापुढे आणून टाकले.मी एक बॉल पकडला .तोंडात टाकणार तोच त्याने मला बाहेर काढले.बॉल माझ्या तोंडून हिसकावून घेतला.टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.मी सुस्तावलेले डोळे उघडून बघितले.शेकडो लोक माझ्याकडे कौतुकाने बघत टाळया वाजवत होते.काही जण माझा जयजयकार करत होते.मला माझ्या फाईव्हस्टार पॉटमध्ये अलगद सोडून सॅटनफोर्थ बॉल घेऊन पळत पळत निघून गेला.जमलेल्या लोकांनी पुन्हा माझा जयजयकार केला..अनेकांनी मला डोळा भरुन बघितले.
 10
संध्याकाळी सॅटनफोर्थ बेभान होऊन नाचतच आला.त्याने मला अलगद वर उचलले नि फुटबॉलचा चेंडू वर कसा फेकतात तसे त्याने मला वर फेकले..मला वाटले गेला माझा जीव..हा अर्धवेडा आणि अर्धशहाणा माणूस माझी वाट लावणार असे वाटले.मी डोळे गच्च मिटले.माझ्या मैत्रिणीला मारलेली शेवटची मिठी माझ्या चक्षुपुढे आणली.आता भविष्यात तो आनंद मला कधीच मिळणार नव्हता.कारण माझं भविष्य मला स्पष्ट दिसत होतं..पण ..पण मी आणि माझं भविष्य सुरक्षित राहिलं हो.कारण,सॅटनफोर्थने मला अलगद झेलले..त्यानेही हळूवार माझा मसाज केला.तो मसाज परवा त्या बाईने केलेल्या मसाज सारखा मुलायम नव्हता.पण भागते भूत को लंगोटी सही या न्यायाने मला सॅटनफोर्थचाही मसाज छान वाटला.आज त्याने माझ्यासाठी खेकड्यांची चटणी आणली होती.वॉव...चटणी खात असतानाच त्याने माझ्या तोंडात काही तरी द्रव टाकलं..कानात हळूच म्हणाला..सम्राट नेपोलियन पित होता ती ही व्हाईट वाईन रे राज्या..कोण बरे हा सम्राट नेपोलियन..मी बराच वेळ विचार करत होतो.माझा एखादा पूर्वज तर नाही ना..
11
सॅटनफोर्थ माझी एवढी बडदास्त कां ठेवतोय हेच मला कळेनास झालय..आता पुन्हा माझ्या पॉटचा आकार वाढला आहे.मी पॅसिफिक समद्रातच परत आलो नाही ना असंही मला वाटू लागलय..पण इथे मी एकटाच आहे.माझी मैत्रिण इथे असती तर काय मज्जा आली असती.एकट्याला किती कंटाळा येतो..सॅटनफोर्थला सांंगावं म्हणतो,याबाबत..मनवकडा सॅटनफोर्थ नक्कीच मैत्रिणीची व्यवस्था करेल..
12
आता सॅटनफोर्थच्या पावलांची ओळख मला झालीय..त्याने चौथ्यांदा माझ्यापुढे दोन बॉल टाकले.मी एक पकडला.तोंडात टाकणार तोच त्याने मला बाहेर काढले.माझ्या पायांमध्ये अडकलेला बॉल काढला..माझ्या तोंडचा घास हां इसम पळवतो तरी कशाला असा प्रश्न पुन्हा एकदा माझ्या डोक्यात येत असतानाच त्याने माझ्या समोर व्हेलच्या मेंदूच्या खिमा ठेवला..जे माझ्या बापजन्मात शक्य झालं नसतं ते भाग्य मला मिळालं..व्हेल माझ्या पोटात जाणार..हा हा..माझं नशिब थोर म्हणूनच मला ही डीश चाखायला मिळतेय..मी तृप्त मनाने डोळे मिटले..मला नेहमी पाण्यात पाहणाऱ्यामाझ्या सावत्र भावाला कधी हे मी सांगेन आणि त्याच्या तोंडचे पाणी पळवेन असं मला झालय आता..
13
संध्याकाळ कधी झाली ते कळलच नाही..डोळयावरुन झोप जाण्याचे नाव घेईना..पण शाही बँडचा धमाडधम आवाज आला नि मला नाईलाजाने डोळे उघडावेच लागले.बघतो तर काय..माझ्या अवती भवती सैनिकांचा गराडा पडला होता नि बँडच्या सुरावर ते मला सॅल्यूट ठोकत होते. राणीसारख्या दिसणाऱ्या एका बाईने मला हातात घेतले नि माझे किस घेतले..उपस्थितांनी टाळयांचा गजर केला..सॅटनफोर्थने आता रेड वाईन माझ्या तोंडात टाकली..अलेक्झांडर ग्रेट या राजाने ही वाईन पिली असल्याचे तो माझ्या कानात म्हणाला..माझ्या पूर्वजांची नावं इतकी मोठी मोठी होती,याचं मला खूप आश्चर्य वाटलं..माझ्या आईने माझ नाव असं कां बरं ठेवलं नाही..हा प्रश्न मला पडला..
14
आतापर्यंत घडलेली एक गोष्ट घडली होती.सॅटनफोर्थ एकदा का माझ्या जवळून गेला की मग काचेच्या पॉटजवळ कुणीही राहत नसे..पण आज बंदुका घेतलेल्या सुरक्षा सैनिकांचा पहारा माझ्या पॉटभोवती पडला होता.हे सैनिक माझ्या सुरक्षेसाठी होते की त्यांच्या कैदेत मी पडलो होतो, हे काही मला कळेना..
15
आज पाचव्यांदा सॅटनफोर्थने माझ्याकडे दोन बॉल फेकले होते.एका बॉलला पकडून मी तोंडात टाकणार तोच त्याने मला बाहेर काढले. माझ्या पायात अडकलेला बॉल काढून घेतला..हा सॅटनफोर्थ माझ्या तोंडाकडे जाणारा बॉल प्रत्येक वेळी कां बरं काढून घेतो,हा सवाल पुन्हा मला पडला.याला स्वत:लाच तर ते बॉल खायला आवडत नसेल ना..कशाचे बनविले असतील ते बॉल?माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले.पण सॅटनफोर्थने टरटल-करी माझ्या समोर ठेऊन हे विचारचक्र मोडून टाकले...बॉलचे तो काही कां करेना ..आपल्यासाठी तो ज्याकाही डिशेश बनवून आणतो ,तेच सध्या तरी महत्वाचे..यूम्मी..
 16
सॅटनफोर्थ वाजत गाजतच संध्याकाळी माझ्याकडे मिरवणुकीने आला.सुरक्षा सैनिकांनी धडाधड सॅल्यूट ठोकले.ते माझ्यासाठी होते की सॅटनफोर्थसाठी हे काही मला कळले नाही. टीव्हीच्या कॅमेरांनी माझे डोळे दिपवून टाकले.हाच तो चमत्कारी बाबा..भविष्य सांगणारा..अव्दितीय,अद्भूत..दैवी..असं काहीसं ते टीव्हीवाले बोलत असल्याचे मला कळले..पण हा बाबा कोण आणि दैवी काय ..हे कुणासाठी ते बोलते होते,हा प्रश्न मला पडला..माझ्या मनासारख्या डिश बनवून आणणारा सॅटनफोर्थ हा माझ्यासाठी नक्किच दैवी पुरुष होता.पण चर्चा मात्र माझ्याकडे बघून होत होती.मी कसला बरे चमत्कार केला.या विचारातच मी डोळे मिटून घेतले.
17
सॅटनफोर्थने सहाव्यांदा जेव्हा दोन बॉल माझ्या पुढ्यात टाकले..तेव्हा मी ठरवले,आता आपण काहीच करायचं नाही..हा दोनच बॉल कां टाकतो,तीन बॉल कां टाकत नाही..मला बॉल  कां खाऊ देत नाही..या प्रश्नाचं उत्तरही तो देत नाही..फक्त आयुष्यात जे खायला मिळालं नाही ते मात्र खायला देतो.सध्यातरी तेच महत्वाचं आहे..आजचा क्षण ..आजचा दिवस महत्वाचा..समुद्रात कोण,कधी,कसा हल्ला करुन आपला जीव घेईल याचा नेम नाही.इथे तर दिवसागणिक आपली बडदास्त वाढतच चाललीय..कशाला बाकिच्या गोष्टींची चिंता करायची..असं मला वाटलं नि मी एक बॉल पकडला..तो नेहमीप्रमाणे तोडाकडे नेण्याएैवजी सॅटनफोर्थकडे अलगद फेकला..त्यामुळे सॅटनफोर्थ माझ्याकडे वासून बघू लागला..माझ्या या कृतिने तो मेस्मेराईज्ड-विस्मयचकित झाला होता..
18
सॅटनफोर्थचे ते बघणे मला अद्यापही आठवत आहे.मी एखादी जादू बिदू तर केली नाही ना,अशी चमत्कारिक भावना त्याच्या डोळयात दिसत होती..खरचं असं काही घडलं होतं का..
19
सॅटनफोर्थने आज बॉल आणले नाहीत..त्याने आज मला माझ्या पॉट मधून काढून एका सजवलेल्या घोडागाडीमध्ये ठेवलेल्या पॉट मध्ये ठेवले.तो स्वत:घोडागाडित बसला..माझी मोठी मिरवणूक निघाली..रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक गोळा झाले होते.ते पॉल बाबांचा जयजयकार करत होते.आमच्या घोडागाडीवर फुलांचा वर्षाव करीत होते.घोडागाडीतून लोकांचे अभिवादन स्वीकारता स्वीकारता सॅटनफोर्थ माझ्या मुखात रेड वाईन टाकत होता..ती अलेक्झांडर ग्रेट किंवा नेपोलियन ग्रेटने पिली होती की जॉर्ज वाशिग्टनने पिली होती, हे त्याने माझ्या कानात सांगितले नाही.मात्र वाईनच्या त्या सौख्यात मी रममाण आणि गुंग होऊन गेल्याने मला ती मिरवणूक कधी संपली मी माझ्या मूळ पॉटमध्ये कधी आलो हे सुध्दा कळले नाही.
20
सॅटनफोर्थने सातव्यांदा दोन बॉल माझ्याकडे भिरकावले.याची थोडी गंमत करावी का,असं एक क्षण मला वाटून गेले..त्यामुळे कधी एका बॉलकडे तर कधी दुसऱ्या बॉलकडे मी पावलं नेऊ लागताच..सॅटनफोर्थच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते.एकदा तर त्याचा चेहरा इतका पडला की मला त्याची दयाच आली.त्यामुळे मी हा खेळ सोडून एक बॉल पकडला नि त्याच्याकडे भिरकावला.हे बघून त्याच्या डोळयात अश्रू आले.त्याने दोन्ही हात जोडून माझे आभार माणले.वर आकाशाकडे बघत देवाचेही आभार माणले..हे चाललय तरी काय,मी सुध्दा वर बघत दिसणाऱ्या देवाला प्रश्न केला..
21
या बॉलचं रहस्य काय असावं हे अद्याप मला कळलेलं नाही..पण त्यात काहीतर नक्कीच दडलेलं असलं पाहिजेच,त्याशिवाय का तो सॅटनफोर्थ त्या बॉल्सवर डोळा ठेऊन असतो.त्यात पानघोडे तर नसावेत ना..अहाहा..पानघोडे आपली आवडती डिश..खूप दिवस झाले ती खायलाच मिळाली नाही..असा भलताच विचार माझ्या मनात आला..
22
समोर बघतो तो काय,सॅटनफोर्थ पानघोड्याच्या 9 डिशेस घेउुन उभा..या माणसाला आपल्या मनातील कळतं तरी कस?हा प्रश्नाने मला हैरान केले. हा इसम नक्किच जादूगार असला पाहिजे..किंवा हॅरी पॉटरचा बाप असला पाहिजे.त्याशिवाय का त्याला आपल्या मनातलं कळू शकतं..ही जादू अशीच तुझ्याकडे राहू दे रे बाबा.असं मनात म्हणत असतानाच सॅटनफोर्थने पुन्हा रेड वाईन माझ्या मुखात टाकली.पाचव्या जॉर्ज या सम्राटाला ती भारी आवडाची असं तो माझ्या कानात पुटपुटला.
 23
माझ्या लाडाला आता काही अंतच राहिला नव्हता..मला बघायला येणाऱ्यांची गर्दी वाढतच होती.माझ्या भोवती असणाऱ्या सुरक्षा सैनिकांची तारांबळ उडत होती.या सैनिकांमध्ये आणखी वाढ झाली होती.फोटोग्रॉफर,कॅमेरामन यांची दरवळ तर विचारुच नका..त्यांच्या कॅमेराच्या प्रकाशाने माझी झोप मोड झाली होती..माझी प्रायव्हेसी नाहिशी झाली होती.सतत माझा जयजयकार सुरु होता.पण हे सारं कशासाठी,हे मात्र मला कळत नव्हतं..
24
आठव्यांदा जेव्हा सॅटनफोर्थने माझ्या पुढ्यात बॉल टाकले तेव्हा ते बॉल उचलण्यात माझ्यात त्राण उरला नव्हता.खरं तर आता हा बॉल-बॉलचा खेळ खेळण्याचा मला कंटाळा आला होता.पण कंटाळा केला तर सॅटनफोर्थ आपली बडदास्त ठेवणार नाही,ही भीतीही वाटत होती.त्यामुळे इच्छा नसतानाही मी बळेबळेच एक बॉल पकडला नि त्याच्याकडे फेकला..त्याने माझ्याकडे जेलीफिशची डिश सरकवली..बॉलच्या आड आपल्या आवडीच्या डिश दडललेल्या असल्याचं परत एकदा स्पष्ट झालं होतं.
25
संध्याकाळी सॅटनफोर्थ धावतच आला आणि त्याने मला मिठी मारली.माझ्या पायांचे काटे त्याला रुतत असले तरी त्याने मिठी सोडली नाही..बॉल नेल्यावर हा काही तासानंतर माझ्याशी असा अत्यानंदाने कां वागतो हे कोडे कधी बरे सुटेल?.असं काहीसं माझ्या मनात जेव्हा जेव्हा येतं त्याच क्षणाला सॅटनफोर्थ माझ्यापुढे माझी आवडती डिश ठेवतो.त्यामुळे ते प्रश्न मग बाजूलाच राहतात.त्याने आता मला क्रोकोडाईल बटर क्रीम ही डिश दिली..पहिला घास पोटात जाताच मी सॅटनफोर्थसाठी जय-हो केलं.
26
आज काहीच घडलं नाही..सॅटनफोर्थ..माझ्याकडे कौतुकाने बघत बसला होता...मला भेटणाऱ्यांची संख्या,अबब,किती वाढली होती..सुरक्षा सैनिकांनी रांगा लावल्या होत्या...सगळयांच्या चेहऱ्यांवरुन माझ्यासाठी कौतुकाचे भाव ओसंडून जात होते.पंतप्रधान,राष्ट्रपती किंवा कोणतातरी राजा ,मला बघायला आला होता..हे कौतुक कशासाठी बरं,हे मात्र सॅटनफोर्थने अद्याप सांगितलं नव्हतं.
27
आता मात्र मला खूप थकवा जाणवत आहे.ही राजेशाही बडदास्त नकोशी वाटतेय..हे सारं चाललय तरी काय हे कळलं असतं तर तेवढचं समाधान वाटलं असतं.पण ते समाधान सुध्दा मला सॅटनफोर्थ देत नव्हता..मला राजासारखी ट्रिटमेंट देण्यात येत होती पण,प्रत्यक्षात मात्र मला गुलाम असल्यासारखेच वाटत होते..
28
सॅटनफोर्थ 9 व्यांदा जेव्हा माझ्याकडे दोन बॉल घेऊन आला तेव्हा माझा चेहरा पडला होता.माझ्या अंगातलं त्राण गेलं होतं.पाय उचलत नव्हते.त्याने बॉल माझ्याकडे सरकवल्यावर मी काहीच हालचाल केली नाही.संथ पडून राहिलो..सॅटनफोर्थचा चेहरा पडला..दिनवाना झाला..आता शेवटचच,मी मनात म्हणालो.जणू काही माझं बोलणं त्याला कळलं असावं असं समजून त्याने मान डोलावली..मी मोठ्या कष्टाने एक बॉल उचलून त्याच्याकडे सरकवला..आतापर्यंत चेहरा पाडून माझ्याकडे दिनवाण्या नजरेने बघणाऱ्या सॅटनफोर्थचा चेहरा बॉल हाती येताच गुलाब पुष्पासारखा खुलला..क्षणही दवडता त्याने बॉल घेऊन धूम ठोकली..
29
आता  यापुढे सॅटनफोर्थने कितीही दिनवाण्या चेहऱ्याने बघितले तरी आपण बॉल उचलायचा नाही,हे मी मनोमन ठरवून टाकले..
30
आज एक दिवस झाला..सॅटनफोर्थ आला नाही..त्याने परवा दिलेली डिश संपून गेली होती.पोटात कावळे ओरडायला लागले होते..सॅटनफोर्थ कधी येणार तू रे बाबा,असं मी सारखा म्हणू लागलो..माझे डोळे त्याच्या येण्याकडे लागले.
31
सॅटनफोर्थ दिवसभर आलाच नाही.मी भूकेने व्याकूळ होऊन गेलो.
32
सॅटनफोर्थच्या पावलांची ओळख मला झाल्याने तो येत असल्याचे मी ताडले..खरोखरच सॅटनफोर्थच होता तो.मोठ्या खुषित होता..त्याने आल्या आल्या मला मोठ्याने थँक्स म्हंटले..आणि तो निघून गेला..
33
बस्स..
34
चार दिवस झाले आता.सॅटनफोर्थचे दर्शन नाही.मला चुकल्याचुकल्यासारखे वाटत आहे.माझी राजेशाही बडदास्त कमी होत आहे.पूर्वी सारखं हवी ती डिश मिळत नाहीय..कौतुक करणाऱ्यांची संख्या कमी झालीय..या मोठ्या फाईव्ह स्टार पॉट मधून मला पुन्हा समुद्रात सोडणार अशी चर्चा सुरु आहे.
35
या कल्पनेनेच माझी झोप उडालीय..समुद्रात मी आणि माझा पाठलाग करणारा शार्क...माझ्या नशिबात शेवटी हेच लिहिलेलं दिसतय..

36
आज माझ्यात डायरी सुध्दा लिहिण्याची शक्ती उरली नाही. सॅटनफोर्थ गेले काही दिवस आलाच नव्हता.त्यामुळे बॉलबॉलचा खेळही होत नव्हता.खान्यापिण्याचे वांदेच होत होते.गर्दी ओसरली होती..आता यापुढे मी लिहू शकेन असं वाटत नाही..हाता पायात काही त्राणच राहिलनेल नाही..
37
गरज सरो नि वैद्य मरो ,ही म्हण माझ्या बाबतित खरी ठरतेय की काय,असं मला आता वाटू लागलय..
000