Saturday, August 24, 2013

खऱ्या अर्थाने..

खऱ्या अर्थाने..
    माईकचा शोध लागला नसता तर काय झाले असते? तसे काहीच झाले नसते. माईक नव्हता तेव्हा सभा ,बैठक होतच होत्या की! महाभारताच्या युध्दात माईक नसतानाही इकडचे सेनापती आणि तिकडचे सेनापती आपआपल्या बाजूंच्या सैनिकांना इन्स्ट्रक्शन देतच होते की! त्यामुळे माईकचा शोध लागला नसता तरी काहीच फरक झाला नसता..
    पण माईकचा शोध लागला नसता तर मायकेलांचा जन्मही झाला नसता.
    मायकेल म्हणजे दिसला माईक की चिकट त्याला नि सुरु कर हॅलो हॅलो माईक टेस्टिंग टेस्टिंग करणारे कलाकार.माईकमुळे हे कलाकार उदयास आले.माईक नसता तर  मायकेलांचा जन्मच झाला नसता . त्यामुळे वसुंधरा अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वांना मुकली असती. पण माईकच्या शोधाने ते टळलं.
    अनेकांना किक येण्यासाठी काहीबाही प्यावं खावं लागतं. पण मायकेलांना माईक दिसताच किक लागते. माईकचे हे अनोखे आणि अद्भूत वैशिष्ट्यच होय.
    माईक दिसताच भंदू आनि भगिनोंनो असे या मायकेलांच्या तोंडून माईक हाती येण्याच्या आधीच निघून जाते. जमलेले भंदू आणि भगिनी मग मायकेलकडे टक लावून बघू लागतात. मायकेल मग कार्यक्रमाचा इतिहास आणि भूगोल सांगता सांगता त्याने पाठ केलेला ज्योक,रटाळ झालेल्या एखाद्या खटारा गजलेची ओळ, लंडनाच्या इंग्रजाला मान खाली घालायला लावणाऱ्या एखाद्या लेखकाचे स्फुर्तिदायक इंग्रजी वाक्य मायकेलच्या तोंडून धबधब्यासारखे पडू लागतात.
    भंदू भगिनींची चुळबूळ चाललीय की कुरबूर चाललीय याची या मायकेला काहीच देणे घेणे नसते.मध्येच दोन चार टाळ्या वाजतात. मायकेला वाटते या टाळ्या त्याच्याच साठी आहेत. तो भंदू -भगिनिंनो असे आणखी त्वेषाने बोलत ,खऱ्या अर्थाने देशाचा विकास होण्यासाठी आपण साऱ्यांना त्याग केला पाहिजे, अशा टाईपचे वाक्य सफाईदारपणे फेकतो. देशाचा विकास हा त्यागाने नाही तर अर्थ कारणाने होतो.हे मायकेलला कळत नाही. तो खऱ्या अर्थानेच्या प्रेमात पडून देशप्रेमाच्या भाषणात तुंडुंब भिजतो. पाहूणे अजून यायचेत आणि मायकेलच्या हातातला माईक सुटत नाही.मध्येच हॅलो हॅलो टेस्टिंग करत ,घसा खाकरत, खऱ्या अर्थानेचा जप करत त्याची गाडी फुढे फुढे चाललीच असते.
    अशा वेळेला लोडशेडिंग होऊन माईक बंद पडले तरी मायकेलच्या उत्साहात जराही फरक पडत नाही. त्याचे उंच उडालेले विमान काही खऱ्या अर्थाने खाली येतच नाही. त्याला वाटते सभा त्याच्यासाठीच, बोलावण्यात आली आहे. लाईट गेले तरी माईक सुरुच आहे तो केवळ त्याच्या कौशल्यामुळे. आपल्या या कौशल्यावर मायकेल खुष होत राहतो. त्याची खुषी वरच्या वरच्या टप्प्यांवर जात राहते. तो बोलतो ते अर्थाला धरुन आहे की अर्थविहीन आहे याच्याशी त्याला काहीच देणे घेणे नसते. त्या कार्यक्रमापासून तो अमेरिकेच्या राजकारणापर्यंत ,देशाच्या गरिबी पासून ते अर्मत्य सेनांच्या अर्थशास्त्रापर्यंत, तेंडुलकरच्या विक्रमांपासून ते शाहरुख खानच्या तिसऱ्या पुत्ररत्नाबद्दल तो सुसाट बोलतच राहतो. मध्येच पॉज घेतो. घसा खाकरतो. डॉयलॉग बाजी करतो. कवितेची ओळ म्हणून दाखवतो. विनोदी किस्सा सांगतो. अमिरखान स्टाईलत उपदेशवजा एखादं शेर फेकतो.. अधून मधून एखादी टाळी मिळाली हा मायकेल खुष. गाडी पुन्हा सुसाट.
    तेव्हढ्यात पाहुणे आले आलेचा गलका आणि मायकेला आता आपले अवतार कार्य संपली असल्याची जाणीव होते तरी सुध्दा तो खऱ्या अर्थाने किल्ला लढवतच राहतो..पाहुण्यांचे भाषण सुरु होईपर्यंत आपले अवतार कार्य सुरु राहील हे त्याला खऱ्या अर्थाने चांगलेच ठाऊक असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्याच्या हातातील माईक काढून घेतले जात  नाही किंवा हिसकावून घेतले जात नाहीत किंवा प्रेमाने दे म्हणत नाहीत तोपर्यंत मायकल धो धो वाहतच राहतो..
    000
   


Thursday, August 15, 2013

घरची भजी आणि हॉटेलची भजी-एक शोध-एक अन्वयार्थ

घरची भजी आणि हॉटेलची भजी-एक शोध-एक अन्वयार्थ
      दुपारी मस्त पाऊस पडत होता. भाऊसाहेब रावसाहेबांना म्हणाले, चला रामभरोसेत. झक्कास भजी मिळते तिथे.
      भाऊसाहेबांच्या ऑफरला रावसाहेबांनी नाकारणं शक्यच नव्हतं. कारण भाऊसाहेबांच्या ऑफरी बिग बाझारी स्टायलिच्या असत. म्हणेज एकावर पाच फुकट-बिकट. रावसाहेब नोकरित आल्यावर याच भाऊसाहेबांनी त्यांना ही बिकट वाट सोपी करुन दाखवली होती. त्यामुळे भाऊसाहेब बोले नि रावसाहेब हाले. तिकडे नो आर्ग्यूमेन्ट. तेव्हा भजी म्हंटल्यावर रावसाहेबांची नसलेली भूक प्रज्वलित झाली. फुकटात-बिकटात हे सारच चालतं. यात पोट-बिट बिघडलं तरी पुन्हा भाऊसाहेबच डॉक्टरकडे नेण्यास कार्यतप्तर. औषधही तेच घेणार नि बिलही तेच देणार. म्हणजे इथेही फुकटात-बिकटातच . तेव्हा रावसाहेबांना तशी काही चिंता नव्हतीच.
      भाऊसाहेब सोबत असताना सर्व चिंता अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसमध्ये नेऊन ठेवायच्या असतात याचं ज्ञान त्यांना नोकरीच्या तिसऱ्याच महिन्यात उत्तमरित्या आलं होतं.
      आता हे भाऊसाहेबांना जमत कसं हे मात्र विचारायचं नाही. तसा अलिखत नियम सम्राट अकबरानेच केला होता म्हणे . तो नियम कोणत्याही बादशाही-पादशाही - राजेशाही-निजामशाही-इमादशाही-लोकशाहीने बदवलला नाही.
      भाऊसाहेब-रावसाहेबांची जोडी वीरु-जयपेक्षाही घट्ट होती. याचा अर्थ रावसाहेब भाऊसाहेबांसाठी मदारीवाला बंदर नव्हते हे सुध्दा तितकेच खरे. मात्र या रावसाहेबांना भजी म्हंटली की त्यांचे बंदर झाल्याशिवाय राहतच नसे. त्यामुळे रावसाहेब भाऊसाहेबांसोबत रामभरोसेत अतिव आनंदानेच आले.
      भाऊसाहेबांनी दोन प्लेट कांद्याभज्यांची ऑर्डर दिली.पाच मिनिटात छोटूने दोन प्लेट गरमागरम भजी दोघ्यांच्या पुढ्यात ठेवले.
      अशी कुरकुरित भजी आपल्या बायकांना कां करता येत नसावे हो, रावसाहेबांनी भाऊसाहेबांना विचारलं. कुरकुरित भजी हॉटेलातच. घरी फक्त बायकोचं बोलणं तेव्हढं कुरकुरित.मॉलमध्ये फक्त कुरकुरे चिप्स. हा हा हा भाऊसाहेबांनी त्यानांच समजेल असा (पांचट) विनोद केला .फुकट-बिकट भज्याला जागण्यासाठी रावसाहेबांना हा हा करावे लागले.
      हॉटेलमधीलच भजी कुरकुरे कां होतात ,याचा शोध घ्यायलाच हवा गडे. रावसाहेब पुन्हा मूळ मुद्यावर आले. भाऊसाहेबांनाही त्यांचं म्हणनं पटलं. हा शोध घेणं अत्यावश्यक असल्याच त्यांनाही वाटू लागलं होतं. कारण त्यांच्या बायकोला तर भजेच बनवता येत न्हवते. कुरकुरे भजे  अफगानिस्तानातच राहिले. त्यामुळे रावसाहेबांच्या प्रपोजलला भाऊसाहेबांनी पाठिंबा दिला. घरची (नॉट-सो कुरकुरित) भजी आणि हॉटेल (हॉट-सो-कुरकुरित) ची भजी-एक शोध-एक अन्वयार्थ, समकालीन वास्तवाचे सत्यशोधन..हा संशोधनाचा विषय रावसाहेबांना सुचला सुध्दा.
      पीएचडी करण्याचे त्यांचे स्वप्न होतेच. हे स्वप्न मरण्यापूर्वी पूर्ण करणार() असा त्यांचा पण होता. आतापर्यंत त्यांना विषय सूचत नव्हता. व्यासमुनिंनी सारे काही लिहून ठेवले होते. त्यामुळे विषयांचा ठणठणपाळ होता. विषय नाही म्हणून संशोधानाला सुरुवात नाही,असे रावसाहेबांच्या बाबतीत इतकी वर्षं होत होते. पण आज अचानक त्यांना संशोधनाचा विषय सापडला.
      ऑर्किमेडिजला तो स्नानगृहात उघडाबंब असताना कोणतातरी शोध सापडला तेव्हा तो युरेका युरेका ओरडतच भोंगळाच बाहेर धावत सुटला होता. रावसाहेबांना हॉटेलमध्ये भज्यावर ताव मारताना विषय सापडला होता. त्यांनाही कुरेका कुरेका असे ओरडत बाहेर जाऊन नाचायची इच्छा होत होती पण ते आर्किमेडिजच्या ऐवजी रावसाहेब होते ना. त्यामुळे पंचाईत झाली. पण त्यांनी मनातल्या मनात युरेका अरे कुरेका, असे म्हणून त्यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी छोटूला थाटात हाक मारली आणि तो येताच पुन्हा दोन प्लेट कुरकुरित भज्याची ऑर्डरही दिली. याचे बिल आपणच देणार हे त्यांनी जाहीर करुन टाकले. भाऊसाहेबांना हा धक्का मानवणारा होता.. पण हॉटेलातील कुरकुऱ्या भज्यांचे रहस्य शोधण्यासाठी त्यांनी हा धक्का मोठ्या धिराने आणि साहसाने सहन केला..
    000