Saturday, August 18, 2012

केएटी-कॅट आणि सीएटी - कॅट


केएटी-कॅट आणि सीएटी - कॅट
   सल्लू (सलमान खान) भाय यांचं सीएटी कॅट म्हणजेच मांजरताईवरच्या (कथित) निर्व्याज्य प्रेमाची कहाणी परवाच प्रसिध्दी झाली.
   सल्लूभाय यांच्या कोणत्यातरी चित्रपट शुटिंगच्या वेळी या मांजरताई डुलतडुलत तिथे अवतरल्या.त्यांना बघून सल्लूभायच्या दिलातील प्रेमाच्या झऱ्याला पान्हा फुटला.त्यांनी मांजरताईंकडे बघितलं.मांजरताईंनी त्यांच्याकडे बघितलं.मांजरताईंना सल्लूभाय आपलाच वाटला आणि त्या सल्लूभायच्या अवतीभवती घुटमळू लागल्या.
   सल्लूभायनी त्यांना प्रेमानं मांडिवर घेतलं.शुटिंग को मारो गोली असं सांगून ते मांजरताईंशी गुलगुलू करित बसले.म्हणजे असं की,ते मांजरताईंशी बोलत होते आणि मांजरताई त्यांच्याकडे डोळे मिटून मान हलवित होत्या.मांजरताईंना सल्लूभायची भाषा कळत असावी,असा याचा अर्थ.हे दृष्य बघून सेटवरील मंडळींना आश्चर्य वाटलं.
   एव्हढं काय,सल्लूभाय इंटरेस्टिंग बोलताहेत बरं.एक जण म्हणाला.
   ते इश्कविश्कची शायरी तिला ऐकवित असतील.दुसरा म्हणाला.
   हम दिले दे चुके सनम,असं म्हणण्यापूर्वी पाच पन्नास वेळा विचार करावा लागतो,अन्यथा देवदास होण्याच्या दिशेने प्रवास सुरु होते गं बाई,असं कदाचित ते सांगत असतील,तिसरा म्हणाला.
   मैने प्यार किया परंतु वो बेवफा,हम आपके है कोन,असंच म्हणत राहिली.ते कां मला अजून कळलचं नाही.माझ्यासारखा दबंग बॉडीगार्ड कुणी भेटला असता का गं तिला,तुच सांग.असही कदाचित सांगत असले पाहिजेत सल्लूभाय,चौथा म्हणाला.
   कदाचित सल्लूभाय मांजरताईला बाजीराव मस्तानीची अमरप्रेमकथा सांगत असावेत.म्हणूनच बघ ना किती तन्मयतेने मांजरताई कान टवकारुन ऐकतय त्यांचं सांगणं.पाचवा म्हणाला.
   पण तिला काय माहीत बाजीराव कोण ते.
   बाजीराव सगळयांचा माहीतयरे.आपला -हाटी बाजीराव सिंघम.
   चल काहीतरीच काय,सहावा म्हणाला.
   बाजीराव सिंघमने मस्तानीवर कुठं इश्क केलं.ती तर कुणीतरी अग्रवाल होती दक्षिणेतील.
   ती या मांजरीच्या भावकीतील असेल ना.म्हणून ती इतकी इंटरेस्ट दाखवतेय बघ.
   सेटवरील मंडळीच्या अशा चर्चा सुरु असतानाच सल्लूभाय आणि मांजरताईंचं सुमंथन सुरुच होतं.मांजरताईने समाधीची पुढची स्टेप गाठल्याने तिला डुलकी आली.ते बघून सल्लूभायने तिला अतिव प्रेमानं कुरवाळलं नि तिचं किस्यु घेतलं.
   हा प्रसंग घडत असतानाच त्या ठिकाणी दुसऱ्या सेटवर चित्रीकरण करीत असलेल्या (केएटी)कॅट-रिना कैफ तिथे आल्या.सल्लूभायना अभिनयाचे टिप्स विचारायला.सीएटी-कॅट अशी सल्लूभायच्या कुशीत बघून केएटी-कॅट यांचं तोंड आंबलं.ते साऱ्यांनी बघितलं.केएटी-कॅट यांच्या मनी सीएटी-कॅट बद्यल असुया निर्माण झाली.सल्लूला या सीएटी-कॅटमध्ये रस-ना कसं काय दिसू शकतं,असा सवाल त्यांना पडला.त्या समोर उभ्या असूनही सल्लूभायने त्यांना बसा सुध्दा म्हंटलं नाही. त्यांनी केएटी-कॅट यांच्याकडे ढुंकूनही बघितले नाही.मांजरताईंशी बोलण्यातील त्यांची समाधी आता योगागुरुंच्या समाधी सारखीच वाटत होती.
   असेच काही क्षण गेले.केएटी-कॅट अस्वस्थ झाल्या.चुळबूळ करु लागल्या.सल्लूभाय आपल्याकडे लक्षच देत नाहीत ही कल्पनाच त्यांना सहन होईना.त्यांच्या रागाचा पार चढला.त्या पाय आपटीत निघून गेल्या.त्या पाय आपटण्याने मांजरताईची समाधी भंग पावली.त्यांनी मँव मँव सुरु केलं.त्या आवाजानं सल्लू भायचीही समाधी भंगली.मांजरताईनं त्यांच्याकडे गुर्रावून बघितलं.
   अरे,ही कोण बया माझ्या मांडीवर येऊन बसलीय असं म्हणत सल्लूभायने मांजरताईला जवळजवळ खालीच टाकलं.हे दृष्य चमत्कारिच होतं.आतापर्यंतचा प्रेम-रंग खरा की आताचा हा राग- रंग खरा,हेच सेटवरील मंडळींना कळेना.
   एक असिस्टंट डायरेक्टर सल्लूभायकडे धावत आले.सल्लू भाय त्याच्यावर ओरडले,अबे गधे इस बिल्ली को किसने आने दिया यहाँ.काम करते हो या सिर्फ खर्राटे ले तो हो.
   सल्लूभाय तुम्हीच या मांजरील जवळ घेतले हो.आम्ही हाकलत होतो.पण तुम्ही तिच्याशी पृथ्वीचं प्रेमगीत शेअर करु लागलात.आम्ही नंतर काहीच करु शकलो नाही.तो असिस्टंट डायरेक्टर कसा बसा म्हणाला.
   गधडया,मी या सीएटी-कॅट बरोबर गालीबच्या माडीवर नव्हतो तर केएटी कॅट-बरोबर होतो.कुठे गेली ती.सल्लू भाय म्हणाला.
   भाय,कॅटरिनाजी आल्या होत्या.पण तुमची या कॅटसोबतची आराधना बघून त्या तरातरा निघून गेल्या.
   निघून गेल्या..सल्लूभाय कसे बसे बोलले.
   सल्लूभायने मांडीवरुन ढकलेली मांजरताई तिथेच घुटमळत होती.ती कुजकट फिदकन हसल्याचं सल्लू भायला वाटलं.
   पुन्हा त्याच वेळेला केएटी-कॅट त्यासेटवर आल्या आणि सल्लू भायकडे बघताच तरातरा निघून गेल्या.सल्लू भाय बघतच राहिले.मांजरताई पुन्हा कुजकट हसल्याचं त्यांना वाटलं.केएटी-कॅट आणि सीएटी-कॅट मधील फरक आता तरी समजून घे रे बाबा,असं मांजरताईनं तिच्या भाषेत म्हंटलं नि तिनेही तिथून काढता पाय घेतला.
   000