Sunday, January 27, 2013

पाचवं स्पिरिट


पाचवं स्पिरिट
   मुंबईकरांच्या स्पिरीटबद्यल बरच काही बोललं जातं.विशेषत: मोठा घातपात - अपघाताचा प्रसंग घडल्यानंतर आणि गटारीच्या दुस-या दिवशी.(म्हणजे अमुक अमुक लाख लिटर्सचा फडशा पडला वगैरे वगैरे..)खरं तर हे दोन्ही स्पिरीट वेगवेगळे.पण स्पिरीटची ही सरळमिसळ गमतीदायकच.
   मुंबईकराचं तिसरं स्पिरीट हे बेस्टमध्ये आणि लोकलमध्ये दिसतं.वर्किंग डेजला मुंबईकर वेगळयाच स्पिरिटमध्ये बेस्ट किंवा लोकल पकडण्यासाठी सुसाट असतो.हे स्पिरिट डेव्हिलीश वृत्तीचं असतं.महाभारतीय अर्जुनाला ज्याप्रमाणे स्वयंवराच्यावेळी केवळ मासोळीचा डोळा दिसत होता,त्याचप्रमाणे थांब्यावर येणारी बेस्ट आणि फलाटावर येणाऱ्या लोकलमध्ये-प्रचंड गर्दी असली ,इतर प्रवासी लोंबकळत असले तरी काहीही करुन घुसणे आणि जागा पटकावणं एव्हढचं हे डेव्हिल स्पिरीट जाणतं.
   बेस्ट आणि लोकलच्या आतमध्ये आधीच बसून आलेल्यांचे स्पिरिट हे चौथ्या प्रकाराचे.त्यांचा भाव आणि आव हा नेपोलियन बोनापार्टसारखा किंवा राणी व्हिक्टोरियांसारखा म्हणजेच जगजेत्त्याचा असतो.तर किंचितसं उभं राहायला मिळालेल्यांच्या नजरेत कधी आपण नेपोलियन वा व्हिक्टोरिआ होऊ याची घाई दिसते.त्यांची भिरभिरती नजर ही घुबडासारखी 360 च्या अंशाने चौफेर फिरत राहते.काहींना बसण्याची संधी मिळते तेव्हा प्रत्यक्षातील नेपोलियन वा व्हिक्टोरिआला एखादे राज्य जिंकताना झाला नसेल इतका अत्यानंद झालेला असतो.
   या सगळयांमध्ये पाचवे स्पिरिट अदृष्यरित्या आपला प्रभाव पाडून असतं.सध्या बहुतेक सर्वजण गळयात ,पाठीमागे ,पोटासमोर किंवा हातात बऱ्यापैकी जाड अशी बॅग घेऊनच घरातून निघतो.पूर्वीही निघत असेल.पण त्या बॅगांची जाडी दिवसेंदिवस अमूक-तमूक शेटजींच्या पोटासारखीच वाढत चाललीय.जादूच्या पोतडीसारखं हे असतं.छत्री,पाण्याची बॉटल,लॅपटॉप,एखादे जाडजूड पुस्तक,एक दोन वृत्तपत्रे असा हा जामानिमा आणि बरच काही या पोतडीत असतं.
   बेस्ट किंवा लोकलच्या डब्यांमध्ये अमूक अमूक संख्येनं प्रवासी बसू शकतात,घुसू शकतात,उभे राहू शकतात.लोंबकळू शकतात.याचा भागाकार आणि गुणाकार प्रशासकीय पातळीवर  झाला असलाच पाहिजे.पण आहेस्ते आहेस्ते वाढत गेलेल्या प्रवाशांच्या या पोतडीच्या आकारावर मंथन झालेलं दिसत नाही.बेस्ट मध्ये 50 प्रवासी असतील तर त्यांच्या पोतडया आखणी 10 -12 जणांची जागा खातात की राव.बेस्ट आणि लोकल डब्याचा आकार आणि उकार मात्र गेल्या काही वर्षांत वाढलेला नाही.काही बसेस या आक्रसल्या.वळणवं सोपं जावं म्हणून छोट्याही झाल्या.गर्दीही वाढली आणि वाढता वाढता वाढे अशा पोतड्यांची भर पडली.
    लोकलच्या डब्यात या पोतडया ठेवायला व्यवथा असली तरी ती किती पोतड्यांना पुरेशी ठरणार? म्हणजेच एका डब्यात 200 प्रवासी असतील तर पोतडया आणखी 25 - 35-45 प्रवाशांच्या जागेवर अवैधरित्या आपले बस्तान बसवतात.मोकळ्या जागेत झोपडया कधी वसतात हे जसे कधीच कळत नाही,तसच हेही आपल्या डोक्यावरुन जातं.
   पोतड्या सांभाळत उभं राहणं,हिमालय किंवा विंध्यपर्वतावर ऋषीमुनींच्या एका पायावर उभं राहून तपश्चर्या करण्यापेक्षाही कठिण कर्म असतं.या कठिण कर्माला,बसलेला नेपोलियन बोनापार्ट नामक कर्ता-पुरुष किंवा राणी व्हिक्टोरिआ नामक कर्मणी-प्रयोग आणखी बिकट करतात.कारण त्यांच्या हाताला,खांद्याला,चुकून डोक्याला पोतडी लागणार नाही याची काळजी वाहावी लागते.एका हाताने वरची दांडी धरण्याची काळजी नि दुसरी ही.ही कसरत करत असताना बस किंवा लोकलच्या हलण्याडुलण्यामुळे पोतडीचा धक्का आसनस्थ नेपोलियन किंवा व्हिक्टोरिआला लागतोच. बस कां हलली?ड्रायव्हरने ब्रेक कां जोराने दाबला?खड्डा मध्ये कां आला?असा जाब विचारण्याची तसदी आसनस्थ मान्यवर क्चचित घेतात.हे आसनस्थ हिज हायनेस किंवा हर हायनेस अशावेळी उभ्या असलेल्या प्रवाशांकडे तुच्छतेने बघतात.त्यांच्या डोळयातले भाव हे अव्ययीप्रयोगाच्या पलिकडचे असतात.पोतडी घेतलेला उभा प्रवासी  आपल्याच नशिबी कां ,दुसरीकडे कां नाही असे भाव त्यांच्या नजरेत येतात..सकाळी निघताना किमान आजचं भविष्य टीव्हीवर बघितलं असतं तर बर झालं असतं,असही त्यांना वाटण्याची शक्यता असते. उभ्या असणाऱ्याने दुसरा हात सोडून स्वत:च्या डोक्यावर पोतडी ठेवावी आणि डोंबाऱ्याच्या खेळातील मुलीसारखं बॅलन्स सांभाळावं असंही,हर आणि हीज हायनेसला वाटतं.उभ्या पामरांना त्यांच्या शाळेत आणि घरी एटिकेटस आणि मॅनर्स शिकवण्यात आलेले नाहीत,असं आसनस्थ मान्यवरांना वाटतं.(हर आणि हिज यांच्या रिसपेक्टिव्ह शिव्यांसह )कहाँ कहाँसे आते है,हा फिल्मी डॉयलॉग त्यांच्या मेंदूत उमटण्याचीही शक्यता असते.त्या गर्दीत,एटिकेट मॅनर्स पाळत डोंबाऱ्याच्या मुलासारखं बॅलन्स सांभाळणं हे उभ्या पामरला कसं बर शक्य होणार?त्यामुळे उभा असलेला आणि थोडं व्यवस्थित उभे राहण्यासाठी धडपडणारा प्रवासी आपल्याजवळील पोतडीचा नि आपला काहीच संबंधच नाही अस समजून किल्ला लढवत राहतो.आसनस्थ मान्यवर हे या उभ्या पामराकडे बघून किंचित दातओठ खातात.त्यातील भाव हे खाऊ की गिळू असे असतात.आपल्या ढोपराने ढकलतात.काही मान्यवर ,दिखता नही क्या पासून सुरु होणाऱ्या शिव्याचं मौक्तिकं बाहेर काढतात. तिरकस आणि तुच्छतेनं बघू लागतात.हे बघणं असतं म्हारक्या म्हशीसारखं.फक्त नसतात ती दोन शिंग.म्हारकी म्हस तिरक्या नजरेनं बघत कधी समोरच्याला ढूस लगावेल हे सांगता येत नाही.तसच हे बेस्ट आणि लोकलच्या डब्यातलं अदृष्य स्वरुपातलं (पाचवं) म्हैस स्पिरिट...
   0000