Sunday, January 27, 2013

संस्कृत-वंस्कृत


संस्कृत-वंस्कृत
   देवाधीदेव इंद्रसेन महाराजांना खूप दिवसांपासून एका सवालाने फार बैचेन केले होते.गेल्या काही समयापासून स्वर्गामध्ये उत्तमोत्तम मनुष्य प्राण्यांचे येणे उत्तरोत्तर कमी कमी होत चालले होते.हे असे कां व्हावे,हे त्यांना कळेना.असेच जर होत राहिले तर कालांतराने स्वर्गाचे महत्वच लोप पावावयाचे.स्वर्गाची व्हॅल्यू ऍ़डिशन उत्तमोत्तम मनुष्यप्राण्यामुळेच झाल्याचे,इतर देवांना कळले नसले तरी इंद्रसेन महाराजांना ते पक्के ठाऊक होते.
   ही व्हॅल्यू ऍ़डशिन झाल्यानेच विष्णू भगवान,महादेव शंकर भगवान,श्रीराम,श्री कृष्ण या सारखे प्राचीन आणि श्रीगजानन,श्री व्यंकटेश यासारख्या जनरेशन नेक्स्ट मधीलप्लस प्लस ,श्रेणितल्या देवांनी स्वर्गाकडे पाठ फिरवली तरी,स्वर्गाचे महत्त्व आबाधित राहिले होते.ते तसे राहिल्यानेच आपली सत्ता आणि मत्ता कायम राहिल्याचे इंद्रसेन महाराज जाणून होते.
   मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,याचा उच्चार भूतली तिन्ही त्रिकाळ,कलियुगातही होत असल्याचे त्यांना ठाऊक होते.द्वापारयुग लोटले,त्रेतायुग लोटले,जुरॅसिक वगैरे सारखे युगही काळात पोटात गडप झाले.कलियुग अवतले.मुंगीच्या पावलाने कां होईना ते सुध्दा अंतर्धान पावत आहे.पण स्वर्गाचे महत्व मात्र भूतली टिकूनच राहिले.असे असले तरी उत्तमोत्तम नरश्रेष्ठ आणि रणरागिणी यांना कां बरे स्वर्गाकडे पाठ फिरवावीसी वाटली असेल?हे प्रमाण असेच जर वाढत राहिले तर स्वर्गाचे महत्त्व धुळीस मिळेल नि त्याच बरोबर आपणही.इंद्रसेन महाराज या विचारांनी त्रस्त झाले.
   असे कां बरे होत असावे,यावरचे उत्तर कदाचित भूतल भ्रमणाचा अधिकृत कंत्राट मिळालेल्या श्री नारदेश्वरांना ठाऊक असू शकेल,असे इंद्रसेन महाराजांना वाटून त्यांनी नारदेश्वरांना बोलावणे धाडले.नारदेश्वर धावतच इंद्रसेन महाराजांच्या दरबारी दाखल झाले.इकडच्या तिकडच्या आणि हवापाण्याच्या गप्प झाल्यावर इंद्रसेन महाराजांनी थेट विषयालाच हात घातला.असले प्रश्न आपणास कां बरे पडत नाही,असे नारदमुनींना वाटले.भूतलावर काश्मिर नामे स्वर्गात   नेहमीच जाणे येणे असल्याने कदाचित आपणास आपला स्वर्ग,घर की मुर्गी दाल बराबर या उक्तीप्रमाणे वाटत असावा म्हणूनही कदाचित आपण इकडे लक्ष दिले नसावे.असे नारदेश्वरांनी स्वत:ला समजावले.
   इंद्रसेन महाराजांची चिंता खरोखरच चिंताजनकच होती,हे त्यांच्या लक्षात आले.त्यामुळे ते तात्काळ विचारमग्न झाले.काही क्षणानंतर त्यांना या समस्येचे उत्तर मिळाल्यासारखे वाटले.इंद्रसेन महाराज तर नारदेश्वर कधी आपले मुखकमल उघडतात याची वाट बघत होते.अशी वाट त्यांनी इंद्राणिंसाठी सुध्दा बघितली नव्हती.त्यामुळे नारदेश्वरांच्या ओठांची हालचाल सुरु होताच त्यांना अवर्णनीय आनंद झाला.असा आनंद त्यांना पहिल्यांदाच त्यांच्या  दरबारी सुश्री रंभाजी आणि सुश्री मेनकाजी आपली नृत्यकला पेश केली,तेव्हा झाला होता.
   नारदेश्वरा,आम्ही आतुर झालो आहोत,उत्तर ऐकन्यास.
   इंद्रसेन महाराज असे अधिर होऊ नका.आम्हास थोडे थोडे काही तरी सुचू लागलेय.
   काय बरे..
   ही भाषिक समस्या वाटते महाराज..
   म्हणजे,आम्ही समजलो नाही नारदेश्वरा..
   महाराज,कलीयुगातील साप्रंतकालीन भूतलावरील उत्तमोत्तम नरपुंगवे आणि रणरागिणींना स्वर्गाची अधिकृत भाषा संस्कृतचे ज्ञान यथातथाच आहे.10वीच्या परीक्षेत 100पैकी 100गुण मिळविण्यापुरती संस्कृत उरलीय.एकदाची दहावी संपली की संस्कृत विस्मृतित गेली.इथे स्वर्गात यावयाचे म्हणजे आपली भाषा यायला नको का?इथे यायचे नि मुके बनूण राहावयाचे ,हे काही मनुष्यप्राण्यास चालावयाचे नाही. स्वर्गही नको नि संस्कृतही नको ,म्हणून मनुष्यप्राण्याने इकडे पाठ फिरवलेली दिसते.
   आता काय बरे करावे..इंद्रसेन महाराज अतिरिक्त काळजीच्या सुरात बोलले.
   चार आठवडयात कामचलावू संस्कृत,हा शिकवणी वर्ग काढू या ,महाराज आपण..मनुष्य प्राणीच काय इतरही प्राणी इथे आले तर त्यांना इथे संवाद करण्यासाठी अजिबातच अडचण जावयाची नाही.
   पण असे शक्य आहे का हो नाददेश्वरा..
   होय इंद्रेसन महाराज,अहो भूतली,नुकतीच वसुंधरा कन्यका सौ.श्रीदेवी बोनी कपूर यांना इंग्लिश नामक भाषा येत नसतानाही,त्या हीच भाषा बोलणाऱ्या भूतलावरील अमेरिका नामक प्रांती गेल्या.तिथे त्यांनी चार आठवडयात इंग्लिश शिकण्याची शिकवणी लावली नि त्यांनी इंग्लिश भाषेत उत्तम भाषण केलं..त्यांना इंग्लिश शिकवणी वर्गासाठी फी भरावी लागली होती.स्वर्गात आपण संस्कृतची शिकवणी फ्री देऊ ..
   पण हे मनुष्य प्राण्यास कसे बरे कळणार नारदेश्वरा..
   इंद्रसेन महाराज,त्याची काळजी करु नका.़वसुंधरा कन्या गौरी शिंदे यांना आपण संस्कृत-वंस्कृत नामक चित्रपट काढायला सांगू की.त्याच्या मानधनापोटी त्यांची आणि त्यांच्या बारा पिढयासांठी आपण स्वर्गातला भूखंड अतिरिक्त एफएसआयसह  आणि टीडीआर ब्रम्हांडात कुठेही वापरता येईल या सवलतीसह,आरक्षित करुन देऊ..कसे?
   उत्तम..इंद्रसेन महाराज ,नारदेश्वरांना टाळी देत प्रसन्नमुद्रेने उद्गारले.

No comments:

Post a Comment