Friday, July 27, 2012

दाल रोटी खावो ..प्रभु के गुण गावो


दाल रोटी खावो ..प्रभु के गुण गावो..

   सकाळी सकाळी टीव्ही चॅनेलच्या वार्ताहरानं खासदार श्रीमती रेखा यांचा बंगला गाठला.बंगल्याच्या आवारात प्रवेश करताच वार्ताहराच्या कर्णपटलावर दाल रोटी खाओ ,प्रभु के गुण गावो,हे भजन पडलं.त्याचेही हात नकळत जोडले गेले.प्रभुचं नामस्मरण करत करतच त्याने बंगल्यातील दिवाणखान्यात प्रवेश केला.

   रेखाजीच ते भजन गात होत्या.वार्ताहराला बघताच त्यांनी भजन गाण्याचं थांबवलं.त्यांनी त्याला बसायला सांगितलं.येण्याचं प्रयोजन विचारलं.

   आपलं अभिनंदन करायला आलोय रेखाजी.

   वा वा..सिंगापूरला झालेल्या आयफा अवॉर्ड कार्यक्रमात मी मस्त झक्कास दिसत होते नि ती श्रीदेवी भकास दिसत होती यासाठीच ना माझे अभिनंदन..थँक्यू व्हेरी मच..रेखाजी अत्यानंदानं म्हणाल्या.

   त्यासाठी नाही हो रेखाजी तुमचं अभिनंदन..

   मग कशासाठी,रेखाजी खटटू होत म्हणाल्या..उन्होने कुछ हमारे बारे ब्लॉगमे लिखा तो नही..

   नाही हो रेखाजी..

   मग फुकटाचं कशाला अभिनंदन करतो रे तू..नाराज होत रेखाजी म्हणाल्या..

   अहो,आता तुम्ही पीडीएस म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टिम कमिटवर नियुक्त झालात ना...त्यासाठी अभिनंदन..

   थँक्स हं,अरे आतापर्यंत एकहीजण मला याबद्दल बोलला नाही,कुणी एसएमएस पाठविला नाही..तूच पहिला अभिनंदन करणारा..मस्त वाटतय ..अरे माझी ती ड्रिम होती.डिस्ट्रिब्युशन करायचं..

   आँ,काय सांगता काय,रिपोर्टरनं अतिव आश्चर्यानं विचारलं..

   खरच रे,माझी फार वर्षाची इच्छा होती की आपणही डिस्ट्रीब्युटर व्हावं.या देशात महिला हिरॉईन होऊ शकते,आयटेम डान्सर होऊ शकते,पायलट होऊ शकते,इंजिनियर होऊ शकते,सीए होऊ शकते,सेक्रेटरी होऊ शकते,पोलीस होऊ शकते,मंत्री ,जिल्हा परिषद अध्यक्ष,सरपंच होऊ शकते,राज्यपाल होऊ शकते,चीअर लिडर होऊ शकते तर मग डिस्ट्रिब्युटर कां होऊ शकत नाही..आमच्या फिल्म इन्डस्ट्रिमध्ये एकही महिला डिस्ट्रिब्युटर नाही हो..100 वर्षात एकही झाली नाही.डोंच यू थिंक,बहुत ना इन्साफी है ये..म्हणूनच मला डिस्ट्रिब्युशन करायचं होतं.मोस्ट पॉवरफूल असतो तो.तुमच्या दांगड पेपर डिस्ट्रिब्युटर सारखा.डिस्ट्रिब्युटर किसिकोभी बना सकता हे और बिगाड भी सकता है.मी डिस्ट्रिब्युटर तेव्हाच झाले असते ना तर उनके सभी पिक्चरोका डिस्ट्रिब्युशन मीच केलं केलं असतं.सर्व पिक्चर हिट्ट करुन दाखवलं असते.पण त्यांच्या आणि माझ्याही नशिबात नव्हतं ना..म्हणून राहून गेलं.तिरुपतीच्या इच्छेपुढे आपण काय करणार..नाही का..

   पण,रेखाजी तेव्हा तुम्ही कां नाही डिस्ट्रिब्युटर होण्याचा प्रयत्न केलात..

   अरे,तेव्हा माझ्या सगळा वेळ स्टुडिओत नाचण्यात आणि स्टुडिओच्या बाहेर उनको न्याहाळण्यात गेला ना..पण बघ प्रभुच्या बंगल्यात देर आहे पण अंधेर नाही..मला अखेर न्याय मिळालायच..मी डिस्ट्रिब्युटर झालेच ना...तेव्हा जे जमलं नाही ते आता करुन दाखवीन.उनकी आनेवाले पिक्चरोका डिस्ट्रिब्युशन मैं लुंगी..

   पण,रेखाजी तुमच्या डोक्यात जे डिस्ट्रिब्युटशन आहे ना,ते हे नव्हे हो..

   मग,

   अहो,देशातल्या गरिबांना दाल रोटीचं डिस्ट्रिब्युशन कसं पारदर्शकपणं करायचं हे ठरवण्यासाठी ही समिती काम करते.आज तुमच्या बंगल्यात मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा तुम्ही दाल रोटी खाओ प्रभु के गुण गावो,हे भजन गात होतात ते बघून मला अत्यानंद झाला. आपण दाल रोटी खाता नि ते सुध्दा प्रभुचे नाव घेत घेत यासाठी खास अभिनंदन हं..फक्त त्यात सद्गुरुनाथ महाराज की जय म्हंटल की हे भजन सुफळ पूर्ण होईल..

   अरे, थांब मी काही बाबा दाल रोटी खात नाही हं..

   मग..मस्का पाव खाता की काय..

   नाही रे बाबा

   मग वडा पाव खाता..

   नाही रे

   मग झुणका भाकर..  

   नाही रे

   मग बेसन भात

   वो क्या होता है..

   आपल्या देशातील बहुसंख्य गरीब माणन्स हेच खातात नि प्रभुचं नाव घेतात.तुम्हाला ते कसं काही माहीत नाही.तुम्ही चित्रपटांमध्ये इतक्या गरिब मुलिच्या भूमिका केल्या.तेव्हा काय उपाशी राहत होतात की काय..

   तसं नाही रे..मी काय खात होते किंवा खाते हे माझं सिक्रेट आहे.

   सिक्रेट ..वार्ताहरानं आश्चर्यानं विचारलं.

   मग..अरे मी काय खाते हे जर कळलं तर मी फॉरएव्हर यंग कां दिसते आणि आजच्या हिरॉइन्सना कॉम्प्लेक्स देते हे कळेल ना साऱ्यांनाच म्हणून ते गुपित अजून मी कुणाला सांगितलं नाही.

   .के.भारतातले गरीब माणसं काय खातात,किती खातात याची तुम्हाला कल्पना आहे ना..

   नाही बुवा..पण त्याची काय गरज आहे.

   त्याशिवाय दाल रोटी के भाव कळणार नाही आणि तुम्ही समितीवर काम कसं करु शकणार इफिशिएंटली..

   त्यात काय मोठसं,अपने मनोजकुमार आहेत ना..त्यांना रोटी कपडा मकानचा दांडगा अनुभव आहे..त्यांची ट्यूशन लावून घेते की..

    धन्य धन्य..रिपोर्टर मनात म्हणाला..