Friday, July 27, 2012

कॉपी-बहादूर


कॉपी-बहादूर

   यंदा विविध परीक्षांच्या समयी कॉपीबहादुरांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलं होतं.तरी सुध्दा काहीशे किंवा काही हजार कॉपी बहादुरांनी पराक्रम गाजवल्याचं दिसून आलचं.या त्यांच्या पराक्रमाला सलाम ठोकायला हवा.पण तसं होत नाहीयना.कॉपी करणं म्हणजे कुकर्म,असं समजलं जातं.ते सुध्दा लहान सहान नाही तर फार मोठ्ठ.म्हणून कॉपी बहादुरांची बातमी मोठी होते.बिचारे बहादूर.

   अहो,कॉपी करणं म्हणजे,बाजरात गेलं नि घेतला भाजीपाला,किंवा मग घेतला कागद नि केलं ला नि ला की झाली कविता.इतकं सोप्प थोडचं आहे,कॉपी करणं. पामेला बोर्डेसनं हेलन किलरची कॉपी केली होती म्हणे.किंवा स्व.देवआनंद कुणा एका ग्रेगरी पॅकची कॉपी करायचं असं त्यांच्या  शेवटच्या श्वासापर्यंत सांगितलं गेलं.किंवा मग स्व.एम.एफ हुसन हे त्यांच्या घोड्याचीच कॉपी अखेरपर्यंत करत राहिले असं सांगितलं गेलं.किंवा मग बिपाशा बसू ही अँजेलिना ज्योलीची कॉपी,कपडयांपासून ते तंगड्या दाखवण्यापर्यंत करते असंही बोललं जातं. म्हणजे नेमकं या ग्रेट मंडळीनी काय केलं हे मात्र कुणी स्वयंस्पष्ट केलं नाही.याचा अर्थ कॉपी करणं म्हणजे काय,याची नीट व्याख्याच अद्याप कुणी करु शकलेलं नाही.

   यशस्वी कॉपी करणं हे यशस्वी जीवनाचा मूलमंत्र होय,असं थॉमस पेन या विचारवंतानं कां लिहून ठेवलं नाहीय,हा प्रश्न पडतो. त्यांचं हे असलं वचन आज सुवर्णाक्षरांनी जगात नोंदवलं गेलं असतं..अपवाद वगळता जगातील श्रेष्ठ आणि कनिष्ठ माणसं सुध्दा कॉपी बहादूर होती या धाडसी विधानाला महेश भट एका क्षणात पाठिंबा देतील आणि त्यावर एक तात्विक प्रवचन टाइम्समध्येही लिहू शकतील.एडिसन महान होताच,पण त्याने शोधलेल्या विद्यूतबल्बची कॉपी करुन ज्याने कारखाना काढला तो त्याच्यापेक्षा महान ठरला नि त्याच्यापेक्षा मोठा झाला.अर्जुनानं द्रोणाचार्याची कॉपी केली नि तो धर्नुविद्देत त्यांचा बाप ठरला.अश्वत्थाम्याला मात्र बापाच्या विद्येची धड कॉपी करता आली नाही नि ब्रम्हास्त्र प्रयोगाच्या वेळेला त्याचे पाय लटपटले.पुढे सर्वनाश झाला.महाभारतातला संजय हा सर्वकालिक श्रेष्ठ कॉपी बहादूर.इतकी सक्सेफूल कॉपी अद्याप कुणालाही करता आलेली नाही.मराठी आणि हिंदी साहित्यातल्या रहस्यकथा या कॉपीच्या अंतरंगातील एकाहून एक रम्य,मनमोहक आणि चित्तथरारक इतिहासाच्या साक्षिदार आहेत.बऱ्याच मराठी नाटकांची कॉपी माधव महानोर यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटल्या नव्हत्या.भप्पी लाहिरी या कॉपी-नररत्नाचं कौतुक करावं तितकं कमीच.कॉपीच्या बळावर भप्पी अनेक वर्षं आघाडीचा संगीतकार होता,या ऐतिहासिक नोंदिवर अनेकांचं एकमत झालेलं आहे.त्यांच्याच वारसा सध्या प्रीतम नावाचे संगीतकार चालवताहेत नि यशच्या झोपाळ्यावर त्यांच्या झुल्फ्यांसह

झुलताहेत.

   हिंदी चित्रपटसृष्टी ही कॉपीची हिरे-माणिक यांची खाणच होय.या सृष्टीतील कॉपीचा प्रवास चित्तथरारक आहे.हॉलीवूडच्या चित्रपटांची हिंदी चित्रपटसृष्टीनं कशी,कशी कॉपी केली यावर हजारेक ग्रंथ पाडता येऊ शकतातच.पण कालौघात हिंदी चित्रपटांनी आपल्याच चित्रपटांची कॉपी करण्याच्या पराक्रम केलाय .

   असं म्हणतात की,दिलीप कुमार यांनी ओमार शरीफ या परदेशी नटश्रेष्ठाची कॉपी केली नि ते अभिनय सम्राट बनले.अमिताभ बच्चन यांनी दिलीप कुमार यांची कॉपी केली नि ते सर्वकालिक सम्राट बनले.कॉपी प्रकरणातलं सुवर्ण प्रकरण उल्हासनगराचं आहेच की.कॉपीचं महत्व नाकारणं हे ताजमहालाचं सौंदर्य आणि अजिंठा वेरुळचं कवित्व नाकारण्या सारखंचं ठरतं.

   कॉपी बहादुरांची शान एखाद्या योध्यासारखीच असते.कॉपी करणं हे येरागबाळ्याचं काम नव्हे.त्याला सिंहाचं काळीज लागतं.वाघाचं ह्रदय लागतं.कॉपी बहादुरांना त्यांचं धाडसी कृत्य जीव मुठित धरुन पार पाडावं लागतं.पानितपावर मराठ्यांनी जीव मुठित धरुन अब्दालीवर आक्रमण केलं,या विधानाचं गांभिर्य ज्यांना कळेल त्यांनाच कॉपी बहादुरांच्या,जीव मुठित घेऊन कॉपी कृत्य करण्याचं महत्व कळेल.अशीच मंडळी कॉपी बहादुरांचं तोंडभरून कौतुक करतील.आणि ही कॉपी बहादूर मंडळी कशी खंदी राष्ट्रीय वीर आहेत याची खात्री पटून ते त्यांना दंडवत घालतील.

   000

No comments:

Post a Comment