Saturday, March 23, 2013

मौत इश्क की मस्ती है, हयात इश्क की होशियारी है


मौत इश्क की मस्ती है,
                                हयात इश्क की होशियारी है                 
  नारदेश्वरा,चाललं तरी काय वसुंधरेच्या सुपुत्रांचं?देवाधीदेव इंद्रसेनमहाराज,भ्रमणध्वनीवरुन नारदांना म्हणाले.
  सारे वाकड्यातच चालले आहे ,त्यांचे देवा.
  म्हणजे काय नारदेश्वरा ?
  वाकड्यात म्हणजेच सरळ.शब्दांचे अर्थ सारखे बदलवत असतात,वसुंधरेची सुपुत्रं.
  पण त्यामुळे आमच्या जीवाची घालमेल होते.
  काही विपरित घडलं की काय?
  तुम्ही त्वरीत महाली या.सारे तुम्हास सांगतो.
  इंद्रसेनांच्या आदेशानुसार नारदेश्वर महाली दाखल झाले.ते महाली येताच इंद्रसेनांनी काही कागदपत्रं त्यांच्या पुढ्यात टाकली.
  बघा वसुंधरेच्या सुपुत्रांचं कारस्थान.
  तुम्हाला पदच्युत करण्यासाठी त्यांनी नरकासुराला रसद पोहचविण्याची तयारी दर्शवली की,श्रीयूत रावण यांना नवी आयुधे आणि नवी दहा मुखे देण्याची तयारी त्यांनी केली.वाकड्यात जाण्याची वसुंधरेच्या सुपुत्रांची क्षमता अफलातून आहे.
  आम्हांसी ते सुध्दा चालले असते.आभासी चक्रवर्ती सम्राट राहणं नकोसे झालेय.
  असं काही बोलू नये देवा.सारं काही भास आणि आभास असतं असं नाही का प्रजापिता ब्रम्हदेव सांगून गेले एकदा.तेव्हा जे आहे ते तर सोडायचं नसतं.पण जे नाही,मात्र ते आहे असं समजलं जातं,ते तर कधीच सोडायचं नसतं.
  हे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी आपण ऍ़रिस्टॉटल,प्लुटो आणि चाणक्यांना बोलावूच कधीतरी,सध्या आमच्या जीवाची घालमेल वाढवणाऱ्या या वृत्ताकडे बघा आणि खरं काय ते सांगा.इंद्रसेन दिवाणखाण्यात येरझाऱ्या करीत म्हणाले.या येरझाऱ्यामुळे त्यांना धाप लागली.नारदेश्वरांनी कागदपत्रे बघितली.त्यांच्याही ह्रदयाचं ठोके वाढू लागले.इंद्रसेनांनी ते बरोबर ओळखलं.
  बघितलं ना,तुमचंही तेच होतय.
  बरोबर आहे तुमचं महाराज.वसुंधरेच्या सुपुत्रांच्या मेंदुमध्ये संशोधन करण्याचा डॉयनोसार सारखा उड्या मारत राहतो.कधी साप वळवळ करत असतात.तर कधी घुबड आपली मान 360 च्या कोनातून फिरवत असतो.प्रजापिता ब्रम्हांची चूक झाली तेव्हा.वसुंधरेच्या सुपुत्रांना त्याने मेंदूच द्यायला नको होता.
  त्याची चर्चा आता नको.वसुंधरेच्या सुपुत्रांच्या मेंदुत डॉयनासॉर वळवळला नि हे नवं संशोधन बाहेर पडलं आता.काय तर म्हणे ,तुम्ही जेव्हा प्रेयसिला,मनमोहिनी किती गं सुंदर दिसतेस तू.काश्मिरमधील गुलाबांच्या फुलासारखी,अशोक वनातील मोगऱ्यासारखी असं म्हणून तिच्या गालांवर,तिच्या माथ्यावर,तिच्या ओठांवर हलकसं चुंबन देता,ते प्रत्येकवेळी खरच असतं असं नाही.म्हणजे आम्ही इंद्राणीस जेव्हा प्रेमानं असं काही म्हणतो ते प्रत्येकवेळा खरं नसतं.किंवा इंद्राणी आमच्यासाठी अशा भावना व्यक्त करतात तेव्हा सुध्दा वास्तव वेगळचं असतं.अमूर्त प्रेम नसतचं मुळी,हे वसुंधरेच्या सुपुत्रांच्या नव्या संशोधानाचं सार.नारदेश्वरा,ते काही नाही.तुम्ही ताबडतोब,लैला-मजनू,रोमिओ -ज्युलिएट,सोनी-महिवाल,देवदास पारो,अनारकली-सलिम,तोता-मैना,शहाजहान-मुमताज महल,आदम-इव्ह,राधा-गोविंद आणि श्रीमान गंधर्व आणि श्रीमती गंधर्व यांची लाय डिटेक्टर टेस्ट घ्या.पाण्यात दूध मिसळलं की दुधातच पाणी टाकलय की पाण्यालाच दूध म्हंटलं जातं का,हे सिध्द करुन वसुंधरेच्या सुपुत्रांच्या मुखी फेका.न्यायमूर्ती महादेव रानडे आणि रामशास्त्री प्रभुणे यांच्यापुढे ही चाळणी करा.
   या आदेशाचं पालन करण्याचं नारदेश्वरांच्या जीवावर आलं.पण वसुंधरा भ्रमंतीच्या कायमस्वरुपी कंत्राटावर गंडांतर येऊ नये म्हणून ते कामास लागले.
  इंद्रसेनांनी सांगितलेल्या प्रत्येकाकडे ते गेले.कुणीही लाय डिटेक्टर टेस्टसाठी तयार झाले नाही.
  कर नाही तर डर कशाला,असं सांगून त्यांना समजावण्याचा प्रयत्न नारदेश्वरांनी केला.इंद्रप्रस्थातून हाकलून देण्याच्या कारवाईला तोंड द्यावे लागेल अशी धमकी दिली.तरीही कुणी बधेना.आता काय करावं बरं या चिंतेनं नारदेश्वरांचा चेहरा काळवंडला.ते ग्लानी येऊन पडले.आदम आणि रोमिओने त्यांना उचलून सफरचंदाच्या बागेत नेले.झाडाच्या सावलित त्यांना निजवून ते दोघे निघून गेले.नारदेश्वरांनी काही क्षणानंतर डोळे उघडले ,तेव्हा हातात अमृताचं प्याला घेऊन उभी असलेली लैला त्यांना दिसली.तिने मोठ्या प्रेमानं तो प्याला नारदांच्या हाती सोपवला.दोन घूट उदरी गेल्याने नारदेश्वरांना हायसे वाटले.
  तू,इतकी प्रेमळ असताना लाय डिटेक्टर टेस्ट करण्यास का गं घाबरेतस बाळा,नारदेश्वरांनी लैलाला विचारलं.
  मुनीश्वर,घाबरायचं कशाला. खऱ्याची सत्यता कशासाठी तपासायची.
  म्हणजे गं काय ?
  मुनीश्वर,आकंठ प्रेमात बुडालेल्या दोन जीवांना प्रेमाचा इजहार करताना खोट बोलावच लागतं.मी तर 1 लाख 99 हजार 345 कोटी
वेळ खोटी बोललेय मजनुशी.
  काय सांगतेस काय,त्याला कसे हे कळले नाही.आणि तरीसुध्दा तुमची प्रेम कहानी अमर-बिमर कशी गं बाळे.
  मजनूसुध्दा 2 लाख कोटी वेळा माझ्याशी खोट बोलला.
  तुम्हा दोघांना ठाऊक होतं ते.
  अलबत,आम्हा दोघानांच काय,रोमियो-ज्युलिएट,आदम-इव्ह,तोता-मैना या साऱ्यांनाच ठाऊक होतं ते.खऱ्या इष्काचा इजहार दिवस रात्र केल्यास कंटाळा नाही का यायचा.मग हा कंटाळा घालवण्यासाठी झूठ बोलणं,खोटं चुंबन देणं, खोटं आलिंगन देणं,खोटी स्तुती करणं,खोट्या प्रेमाच्या आणाभाका घेणं आलच.खोटं बोललं की प्रेमिकेचं नि प्रियकराचंही समाधान.म्हणजे फसवणुकीच्या तणावापासून मुक्ती.प्रेमकथेचे रंग गडद करायला पुन्हा मोकळे.
  म्हणजे फसवणुक करताहात हे एकमेकांना माहीत असूनही तणावापासून मुक्ती,हे सारचं धक्कादायक आहे लैला बिटिया.
  मुनिश्वरा,इष्क हे भास आणि आभासमधील अदृष्य पातळीवर असतं.इंद्रसेनांना सांगा की,
  आलम मे जो कुछ है,इश्क का जहूर है/
  आग सोजे-इश्क है,पानी रफ्तारे-इश्क है//
  खाक करारे-इश्क है,हवा इज्तिारारे-इश्क है/
  मौत इश्क की मस्ती है,हयात इश्क की होशियारी है//
  लैलाचं हे बोल ऐकून नारदेश्वरांना सफरचंदाच्या बागेत पुन्हा ग्लानी आली..