Sunday, March 10, 2013

पाच कोटीचे मानधन-वास्तव आणि स्वप्न


पाच कोटीचे मानधन-वास्तव आणि स्वप्न
   पुस्तक लिहिण्यापूर्वीच पाच कोटी रुपयांचे मानधन अमीश त्रिवेदी या लेखकरावांना मिळणार,हे वृत्त कानावर पडले आणि मोरु बेशुध्द होता होता राहिला.
   गुंड्याभाऊ म्हणाले,ही लोणकढी फोक आहे.अशा फोका कुणीही ताणायला लागल्या तर फोकांची विश्वासहार्यता डब्ब्यात जायची.
   ही घाऊक भावाची फोक कां बरे आली असेल?
   जळवण्यासाठी?
   कुणाची रे?
   मराठी लेखकांची रे.
   कां बुवा?
   कारण त्यांना धन जवळजवळ मिळत नाही आणि मानही मोजकाच मिळतो.
   काहींना लाखात मानधन मिळाल्याचेही बोलले जाते.
   बोललेच जातेना?कुणीतरी हे बोलणे फॅक्ट आणि फिगर्सला धरुन आहेत का हे तपासले का? तपासले असतील तर त्याचे लेखा परीक्षण केले आहे का?
   म्हणजे रे काय?
   जोपर्यंत लेखापरीक्षण होत नाही,तोपर्यंत खर्च झाला की नाही हे कळत नाही.लेखापरीक्षण झाले म्हणून टू जी स्पेक्ट्रम विक्रीमध्ये अमूल-तमूक लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचं कळलं.तसंच लेखकाला लाखाचे मानधन दिल्याचं लेखापरीक्षण झाल्याचं आपल्यातरी कानावर आलेलंनाही.एकाही वृत्तपत्रानं हा मुद्दा लावून धरला नाही.
   खरेच की! लेखक हे सत्यवचनी असल्याचे त्यांना हा प्रश्न पडला नसावा.
   सत्यवचनाची परफेक्ट व्याख्या अजून कुणी करु शकलेलं नाही.सोइनुसार सत्य बदलू शकते,असं श्रीकृष्णानं अर्जूनाला भर रणांगणामध्ये सांगितल्याचं विसरलास कसे? त्यामुळेच तर धर्मवीर युधीष्ठरही,सोइप्रमाणे सत्य,या सिध्दांताला प्रमाणभूत माणून,नरो वा कुंजरोवा करता झाला.कुणी तरी महाभारताला,हा जय नावाचा इतिहास असल्याचे म्हंटले होते.माझ्या मते तो,सोईप्रमाणे सत्याचा इतिहास आहे.तेव्हा मराठी लेखकांना लाखाचे मानधन मिळते,हे सुध्दा सोईप्रमाणेच सत्य समजले पाहिजे.
   असे जर असेल तर मग लेखकाला पाच कोटी रुपये मानधन हे वृत्त कसे लोणकढी फोक राहू शकते.
   त्याचं कारण असे की,लेखकाला त्याने किती शब्दात लेख लिहिला हे आताआपर्यंत धड सांगता येत नव्हते.शब्दसंख्या मोजता मोजता त्यास फेफरे यायचे.पाच कोटी रुपये मोजता मोजता त्याचे फुफ्फूस फुस्स व्हायचे.लेखकराव शब्दप्रभू असतीलही पण गणित म्हंटले की होतात ना आडवे.
   घेताच आडवे!
   काय घेताच आडवे?असे म्हणणे बरे नव्हे.लेखकराव खुशवंतसिंग कधी आडवे झाल्याचे तू ऐकले आहेस का?लेखकराव विन्स्टन चर्चिल तिरडीवर जाण्यासाठी एकदाच आडवे झाले,पण त्याआधी कधीच नाही.घेतल्याने आडवे होतो, असे शेक्सपिअरला कुणी ऐकवले असते तर त्याने यावर कॉमेडी ऑफ हॉरर लिहिले असते.घेतल्याने नट आडवे होतात.लेखक तररीत होतात.टॉलस्टॉय आडवे झाले असते तर त्याच्या नावाची जपमाळ त्याच्यामृत्यूनंतर इतक्या वर्षांनी आपण ओढली असती का?
   पण हे सगळे लेखकराव मराठी नव्हते.
   पाच कोटी रुपयांच्या मानधनाचे स्वप्नही मराठी लेखक पाहू शकत नाही का? स्वप्न पाहायला अजून तरी बराक ओबामा यांनी बंदी घातलेली नाही.एखादा फतवा निघालेला नाही.स्वप्न ही खाजगी मालमत्ता आहे.त्याच्या उपयोग कसा करायचा किंवा करायचा नाही,याचे स्वातंत्र्य ज्याचे त्याने उपभोगायचे असते.
   तर मग,पाच कोटीचेच मानधन कशासाठी?मानधन दहा कोटीचेही राहू शकते ना.
   राहू शकते की?त्यासाठी कुणी अडवले आहे का लेखकरावांना?कुणीच नाही.मानधनाच्या स्वप्नावर कुणी जळण्याचं कारण नाही. इन्कमटॅक्सची धाडबिड पडण्याचीही भीती नाही.पाच कोटी रुपयांचे मानधन हे जरी मराठी लेखकरावांना स्वप्नवत वाटत असले तरी त्यापेक्षा जास्त रक्कमेच्या मानधानचे स्वप्न पाहण्याचा त्यांचा अधिकार अबाधित आहे.त्या अधिकारावर टाच मारण्याची कुणाची म्हणजे कुणाची सुध्दा अगदी आजच्या काळात तैमुरलंग किंवा चेंगिझखान असता तरी त्यांची हिम्मत झाली नसती.औरंगजेबानं तर तिकडे ढुंकूनही पाहिले नसते.पाच कोटी रुपये मानधनाच्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेच्या मानधनाचे स्वप्न पाहावयाचे की नाही याच विचारात गढून गेलेला मराठी लेखकराव बघून सम्राट रामदेवराय यांनी कपाळावर हात मारुन घेतला असता.सम्राट चंद्रगुप्तांनी गुरुदेव चाणक्यांना अर्थशास्त्राची सुधारित आवृत्ती लिहावयास सांगून ,स्वप्न वास्तव आणि (मराठी) लेखकाचा अधिकार,या विषयावरील 200 पृष्ठांचे परिशिष्ट लिहावयास सांगितले असते.तेव्हा पाच कोटी रुपयाच्या मानधनाच्या वृत्ताने हबकून,हडबडून जाऊन बेशुध्द होण्याची गरजच नाही.त्या अमीश त्रिवेदीला वास्तवात जरी पाच कोटी रुपयाचे मानधन मिळू घातले असेल तर मराठी लेखकांनी स्वप्नात दहा कोटीचे मानधन बघायलाच हवे.वास्तव आणि स्वप्नातील सीमारेषा जेव्हा कधी मिटेल तेव्हा मिटेल.पण मानधनाच्या आकड्याचा आनंद घ्यायला तोपर्यंत हरकत नसावी.हे स्वप्न वास्तवात येण्यासाठी दहा हजार वर्षाचा कालावधी लागू द्या.काळ हा हा म्हणता निघून जातो.1857 ते 1947 ते 2012 हा काळ बघा बघता निघून गेला,हे तर वास्तव आहे ना.वास्तवाला स्वीकारले की स्वप्नपूर्तीची आशा जिवंत राहीलच राहील..


No comments:

Post a Comment