Tuesday, December 25, 2012

सल्ले आलेच पाहिजेत..त्यांनी खेळलेच पाहिजे


सल्ले आलेच पाहिजेत..त्यांनी खेळलेच पाहिजे
   देवाधीपती  इंद्रसेन महाराजांनी इंद्रनगरीचे प्रिसिंपल करस्पाँडंट नारदमुनी यांना तातडीनं बोलावणं धाडलं. अप्सरांच्या नयनी आणि नृत्यातच अधिक रस असलेल्या इंद्रसेनांना इकडच्या तिकडच्या न्यूजमध्ये फारसा रस कधी दिसत नसे.त्यामुळे इंद्रसेनांचा निरोप येताच नारदमुनींना आश्चर्य वाटलं. कोणती बातमी इंद्रसेनांना सांगावी याचा विचार त्यांच्या मनी घोळू लागला.इलियाना डिक्रूज असं ड्रॅक्युला सारखं नाव असलेल्या नव्या अप्सरेबद्यल त्यांना अवगत करावयाचे की मल्लिका शेरावत या अप्सरेनं सोज्वळ होण्याचा घेतलेल्या धक्कादायक निर्णयाचे होणारे परिणाम याबद्यल अवगत करावयाचे याचा मनाशी विचार करीत नारदमुनी इंद्रमहाली पोहचले.
   इंद्रसेन,दिवाणखान्यात अस्वस्थतेनं येरझाऱ्या घालत होते.नारदमुनींनी त्यांना नमस्कार केला.तरी त्यांचं नारदमुनींकडे लक्ष नव्हते.
   महाराज,कुमारी  रंभा यांना मलेरिया तर झाला नाही ना.. नारदमुनींनी संभाषण सुरु करावयाचे म्हणून, विचारलं.नारदांचं बोल कानी पडताच इंद्रसेनांनी येरझाऱ्या थांबवल्या.नारदमुनींकडे रोखून बघत म्हणाले, कुमारी रंभा,ठीकठाक आहेत.सध्या जलक्रीडेत दंग आहेत.पण तुम्हाला टॉयफाईड झाला नाही ना.कारण पृथ्वीतलावर काय घडतय याची खबरबात द्यायला आपण आला नाहीत गेल्या काही दिवसात.
   देवा,मी सुध्दा कुमारी रंभेसारखाच ठीकठाक आहे.आणि पृथ्वीतलावर सध्या सांगण्याजोगे काहीच घडलेलं नाही.
   नारदा ,उंटावरुन शेळी हाकू नका हो.
   समजलो नाही देवा.
   विष्णूच्या दरबारी बसून त्यांच्या महालाच्या खिडकीतून पृथ्वीतलावर बघणं म्हणजे रिपोर्टिंग करणं नव्हे.
   समजलो नाही देवा..
   रिपोर्टिंग ऑन स्पॉट करावयाचे असते.रामलीला मैदानावरील अण्णाजींच्या आंदोलनाच्या रिपोर्टिंगसाठी राजदीप सरदेसाई गेले होते की नाही..
   समजलो नाही देवा..
   तुम्हाला फक्त विष्णूंच्या मागेपुढे करावयाचे तेव्हढे सजमते.तेव्हढ्याच भांडवलावर तुम्ही प्रिसिंपल करस्पांडंटची जागा वर्षानुवर्षें अडवून बसला आहात..
   इंद्रसेनांचा पारा चढतच होता.हे बघून अत्यंत नम्रपणे नारदमुनी उत्तरले..देवा मी खरच सांगतोय की पृथ्वीतलावर आपणास सांगण्याइतके काहीही महत्वाचं घडलेलं नाही.
   नाही कसे म्हणता,उंच माझा झोका मधल्या लहान रमाबाई,मोठया झाल्या.मिशेल वहिनींनी ओबामा यांच्या सभेत उत्तम भाषण केलं.बील क्लिंटन यांच्या भाषणावर हिलरी वहिंनींनी,क्या बात है असे म्हणत टाळया वाजवल्या.या घटना तुम्हाला महत्वाच्या वाटल्या नाहीत मला सांगण्यासारख्या..
   या बातम्या सांगून आपला अमूल्य वेळ कां बरे वाया घालवायचा..
   याचा अर्थच असा की तुम्ही उंटावर बसून राहिल्यावर तुम्हाला शेळी दिसायची तरी कशी.ते जाऊ दे. सचीन तेंडुलकरांच्या बाबत पृथ्वीतलावर सध्या मार्गदर्शन आणि सल्याचे पीक आलेय,हे तुम्हाला ज्ञात कसे नाही?
   कसले सल्ले देवा?
   नारदा,तुम्ही अलर्ट राहायला शिका,दररोज चार बदाम खा,डाबर च्यवनप्राश खा,रिव्हायटलच्या गोळया घ्या..
   होय देवा..
   सगळयांनी सल्ले दिले..मग मीच काय घोडे मारले..
   आपण हरिणांच मारता असे आम्ही ऐकून आहोत.
   हल्ली ते सुध्दा आम्ही करत नाही.
   पण,देवा आपणास काय सल्ला द्यावयाचा आहे,सचीन तेंडूलकर यांसी.
   माझा सल्ला नोंदवून घ्या..नारदा,सचीनराव तीन वेळा भोपळा फोडताही बाद झाले..
   क्या बात है..हा भोपळा पंजाबराव कृषी विद्यापीठानं की राहूरी कृषी विद्यपीठानं शोधलेला होता की आपल्या उद्यानातील होता...
   नारदा,तुमचं नॉलेज हे पहिलीतील पोरांपेक्षाही निम्न दर्जाचं आहे.त्याला सुध्दा सचीनरावांचा भोपळा ठाऊक असतो.तुम्ही मात्र अज्ञानाच्या मंगळरुपी खड्यातच आहात अजुनही.
   क्षमा असावी देवा..मी या खड्यातून बाहेर पडून पृथ्वीतलावरच्याच खड्यात कायम राहीन,अशी कबुली देतो तुम्हास..
   मला कबुली नको,माझा सल्ला सर्वदूर प्रसिध्द झाला पाहिजे..
   सांगा देवा मी टिपून घेतो.
   सचीनराव यांना सलग तीनदा भोपळा फोडता आलेला नाही हे बघून ,तेंडूलकर संपले,ते अजून संपायचे आहेत,ते 50 टक्केच संपले,ते अजून 40 टक्के शिल्लक आहेत.ते संपले की नाहीत, हे त्यांचे त्यांनाच ठरवू द्या.तेंडुलकर यांचे संपणे म्हणजे नेमके काय याची व्याखा करा,त्यांच्या संपण्याचा निर्णय निवड समितीला घेऊ देऊ नका,आपण संपलो हे त्यांनीच स्वत:ला सांगून सन्मानाने निवृत्त व्हावे ,ते संपले हे आपण ठरविणारे कोण,त्यांना आता बॉल नीट दिसत नाही त्यामुळे त्यांना भोपळा फोडता येत नाही..असे बरेच सल्ले आले नि येताहेत. कपीलदेव यांनी सल्ला दिला,देव आनंद इकडे आले नसते तर त्यांनीही सल्ला दिला असता,रमेश देवांनी सल्ला दिला असलाच पाहिजे.सगळी देव मंडळी जर सचीनरावांना सल्ला देत असेल देवाधीदेवांनी  कां बरे मागे राहावे..
   अगदी बरोबर.काय बरे तुमचा सल्ला आहे..
   कुणी तरी म्हणालं की ,सचीनरावांना बॉल निट दिसत नाही..माझा सल्ला आहे की त्यांनी त्यांचे डोळे वैद्यभूषण तात्यासाहेब लहाने यांच्याकडून तपासून घ्यावेत.त्यांची ओळखी नसेल तर आम्ही सांगू..अण्णाजींच्या मार्फत..
   ते कसे ..
    ते असे, वैद्यशिरोमणी लहाने हे अण्णाजींचे मित्र आहेत.आम्ही अण्णाजींना दृष्टांत देऊ..मग अण्णाजी स्टेटमेंट देतील.वैद्यरत्न लहाने हे सचीनरावांचे डोळे तपासतील नि त्यांना चष्मा देतील.चष्मा घालून जेव्हा सचीनराव मैदानावर येतील तेव्हा पुन्हा धावांचा पाऊस पाडतील..
   बॉल लागून चष्मा फुटला तर..
   पुन्हा काही काळ भोपळा फोडता येणार नाही त्यांना.मग पुन्हा सल्लागार आणि मार्गदर्शकांचे सल्ले सुरु होतील..हे चक्र असेच सुरु राहिले पाहिजे..त्यांनी मैदानावर येत राहिले पाहिजे आणि सल्लागारानीं सल्ले देत राहिलेच पाहिजे..
   हो देवा..
   होय काय?नारदा आमचा हा सल्ला इम्रान खान यांच्या कराचीतील पेपरपासून ते प्रिंस हॅरी यांच्या लंडन टाईम्स पासून ते मुकरु एडका कोवाच्या एटापल्ली बुद्रुक टाईम्स पर्यंत ठळकपणे प्रसिध्द झाला पाहिजे..
   होय देवा..