Saturday, February 23, 2013

वा वा शी..


वा वा शी..
   घाईघाईत निघालोय देविच्या देवळात दर्शनाला नि रस्त्यावरच्याझाडाखालून जात असताना कावळेराव, चिमणीताई किंवा  कबुतरभाऊ  आपल्या डोक्यावर पचकले किंवा शि-ले तर आपला चेहरा बघण्यासारखा होतो.पाच पन्नास शिव्या आपल्या मुखी येऊन जातात.त्या गरिब बिच्चाऱ्या पक्षीगणांसाठी आपण निर्मल स्वच्छतागृह अभियान राबविलेले नाही.तसेच त्यांना कुठे,कधी आणि किती वाजता शी करायची याचेही प्रशिक्षण दिले नाही.हा आपला दोष आपण लक्षात घेेत नाही.
   पक्षांची अशी अवचित अंगा-खांद्यावर पडणारी शी किंवा झाडाखाली पडलेली शी ही आपल्यासाठी शिव शिव किंवा हर हर करणारी असते.आपणास कधीच दयाबुध्दीने त्याकडे बघता येत नाही.स्थितप्रज्ञालाच ते शक्य आहे.शी म्हणजे वेस्ट ही आपल्या डोक्यातली फिट्ट संकल्पना काही केल्या जात नाही.कारण पाच पंचेवीस हजार वर्षापासूनची तशीच या भूमिची शिकवण.पण ही संकल्पना आता बदलण्याची सुवर्णसंधी कोणत्याही क्षणी आपल्या दारी येऊ शकते.
   शी सुध्दा वावा असं म्हणवणारी असू शकतेच याची खात्री आपणास पटू शकते. कारण त्या दूरवरच्या देशी म्हणजेच समस्त इंडियन्ससाठी आदर्शवत असणाऱ्या अमेरिकेत पक्ष्यांची शी सध्या आदरणीय झाली आहे.कारण तेथील सुंदर ललनांच्या सौंदर्याला हजारेक चाँद-तारे आणि उपग्रह लावण्याचे अत्युत्तम टॉनिक या शीमध्ये असल्याचं अधिकृतपणे जाहीरही झालय.हॉलीवूडच्या तारका या 16 ते 66 वर्षांपर्यंत (मिस मॅडोना वय वर्षं 50 प्लस,मिसेस निकोल किडमन वय वर्षं 42 प्लस,कधी मिस आणि कधीतरी मिसेस जेनिफर ऑस्टिन वय वर्षं 40 प्लस,इत्यादी अनादी.)कायम हॉट-मादक आणि धकधक वाढवणाऱ्याच कां असतात याचं रहस्य पक्षांच्या या शीमध्ये दडलेलं असतं.त्यांच्या चंद्रासारख्या गोजऱ्या मुखडयावर त्या पक्षी-शी-ने तयार केलेला ब्युटी फेसपॅक लावतात.
   पक्ष्यांच्या शीची ही शक्ती अथवा अज्ञात महती आपल्याकडील पक्षीतज्ज्ञांना कां बरे एव्हाना ज्ञात झाली नसेल,हा गहन प्रश्न पडतो.आपल्याकडे अनंत काळपासून सारेच काही म्हणजेच उपग्रह ते अग्निबाण ते ऍ़टमबॉम्ब ते विमान .असल्याचे आपला दावा उभ्या जगाशी आहेच.पण पक्षी-शी-सौंदर्यवृध्दी शक्तीचा दावा अद्यापतरी एकाही ऐतिहासिक साधनांच्या अभ्यासकांनी केलेला नाही.ह्युएन त्संग चीनच्या कोणत्यातरी प्रांतातून निघून थेट चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरानामे तहसील असणाऱ्यामाणिकगढनामे गावी पोहचला. त्याने बऱ्याच बारिक बारिक गोष्टी आपल्या प्रवास वर्णनात लिहिल्या.पण त्यालाही असे काही आढळून आले नाही.बाबराने तुझुक बाबरी किंवा असेच काहीतरी आत्मचरित्र तिकडे उत्तरेत लिहिले,पश्चिमेत गाथासप्तशती लिहिली गेली,विजयनगरच्या साम्राज्याच्या अवशेषातही काही आढळले नाही.याचा अर्थ आपल्याकडे पक्षी-शी-सौंदर्यवर्धकाबद्लचे अज्ञान होते हे आपणासकट बैधनाथ-व्हीको टर्मेरिक-डाबर-बाबा रामदेव आयुर्वेद प्रॉडक्शन लिमिटड या साऱ्यांनीच मान्य करायला हवं.
   असो,सगळयांनाच सारचं काही ठाऊक असायला हवं हा काही नियम नाही.त्यात वावगं सुध्दा नाही.शिवाय इंडियनन्सची खात्री ही अमेरिकेतील पुराव्यांवर जास्त बसते.त्यामुळे पक्षी-शी-सौंदर्यशक्तीची महती ते आता इकडे चटकन स्वीकारतील नि इंडियन्स वूमेन सुध्दा ही नवी सौंदर्यघुटी आपल्या मुखचंद्रमेला लावून आणखी सौंदर्यशाली होतील..सगळयात महत्वाचे म्हणजे आपल्याकडील 40 प्लस पासून पुढे असणाऱ्या सौंदर्यवती (हेमाजी,सायराजी,मनिषा कोयरालाजी,माधुरीजी,आशा पारेखजी,माला सिन्हाजी,वहिदाजी,साधनाजी वगैरे आणि इत्यादी)यांच्या सौंदर्यांचा गुलाब हा कायमच  टवटवित असलेला आपणास दिसत राहील.तेव्हा आता तरी पदरी पडले नि पवित्र झाले या म्हणीच्या धर्तीवरच पक्षी-शी-डोकी पडली नि आरस्पानी सौंदर्यांचं गुपित भेटलं,असं आपणही म्हणत आनंदानं कोणताही किंतु-परंतु ठेवता दर्शन करु शकतो..

Sunday, February 17, 2013

सारे काही आठ दिवसात ,पण..


सारे काही आठ दिवसात ,पण..
   रामराव,शामरावांचे मित्र.गोमाजीराव,शामरावांचे मित्र.गोमाजीराव सरकारी ऑफिसर.कार्यक्षम वगैरे.त्यांच्याकडील फाइलची मुव्हमेन्ट पटपट होते,असा त्यांचा लौकिक.पण रामरावांना काही हा अनुभव आला नाही.त्यांचं एक बारिकसं आणि भुरकं कामही महिन्याभरापासून रेंगाळलं होतं.कारण गोमाजीरावांना वेळच भेटत नव्हता.ही बैठक,ती बैठक,असं त्यांचा पीए रामरावांना सांगायचा.पण कशाची बैठक हे मात्र त्यास सांगता येईना.माहितीच्या अधिकारात विचारायचं म्हणजे एक महिन्याची निश्चिंती.तेही रामारावांनी करुन बघितलं.माहिती उपलब्ध नाही असं उत्तर मिळालं.
   आपल्या भुरक्या कामाचं नशिबच फुटकं असल्याचं रामरावांच्या लक्षात आलं.त्यांनी आपल्या एका ज्योतिष मित्राकडून या भुरक्या कामाची प्रश्नकुंडली काढून पाहिली.ही कुंडली काढली तेव्हा सर्व ग्रह आणि उपग्रह हे वक्री  झाले होते.याची वाईट दृष्टी त्याच्यावर पडली होती.त्याची काळी छाया याच्या घरावर पडली होती.त्यामुळे काम जरी भुरकं असलं तरी ते होण्यासाठी अडथळयांची शर्यत पार पाडवीच लागेल.असं ज्योतिषमित्रानं सांगितलं.ग्रह शांती केली तर वक्री ग्रह सरळ नाही का होणार,असे रामरावांनी विचारलं.ज्योतिषमित्राने प्रश्नकुंडली काळजीपूर्वक तपासली.ज्योतिषमित्र म्हणाले,एक अदृष्य ग्रह तुमचा प्रश्न सोडविण्याचा आड येताना दिसतोय.हा ग्रह आकाशतला नसून या पृथ्वीतलावरील आहे.त्यामुळे या ग्रहाची शांती कशी करावयाची हे मज सांगता येणार नाही.
   मग मी काय करु हो,प्रश्न तिथे उत्तर,अडथळा तिथे मार्ग असतोच ना.रामराव काकुळतीने म्हणाले.पण ज्योतिषमित्र असमर्थता दर्शवून निघून गेले.
   आपल्या भूरक्या कामाची चिंता कशी मिटवायची या विवंचनेत असताना एके दिवशी रामराव,शामरावांना त्याच सरकारी ऑफिसात भेटले.रामरावांची चिंता शामरावांनी हेरली.रामारावांनी सारं वर्णन केलं.
   हात्तिच्या,इतका लहानसा प्रॉब्लेम.मी गोम्याला सांगतोना.क्षणात प्रश्न निकालात काढेल, असं बोलून शामरावांनी, रामरावांना गोमाजीरावांच्या दालनात नेलं.
   गोमाजीरावांच्या शिपायीरावांना शामराव हे परिचित असल्यानं त्याने अडवलं नाही.शामरावांची वट बघून रामराव हरखून गेले.दालनात गोमाजीराव एका फाईलच्या स्टडीमध्ये गुंग होते.शामरावांनी गोमाजीरावांची समाधी भंग केली.गोमाजीरावांनी दोघांना बसायला सांगितले.चहा मागवला.शामरावांनी,आतापर्यंत आपल्या दोस्ताला या भुरक्या कामासाठी कसा मनस्ताप सहन करावा लागला हे सांगितलं.
   ते ऐकून गोमाजीरावांचं ह्रदय द्रवलं.आधीच आपली भेट झाली असती तर बरं झालं असतं. ते म्हणाले.
   आपण खुपदा येऊन गेलो,पण आपली भेट होऊ शकली नाही.असं रामराव गोमाजीरावांना म्हणाले.गोमाजीरावांनी शिपायीराव आणि पीएराव यांना शिव्या हासडल्या.त्यांच्यामुळे आपल्याला बट्टा लागतो.हे सांगण्यास ते विसरले नाहीत.तुम्ही उद्या या तुमचे काम लगेच करतो.डोण्ट वरी.असं त्यांनी आश्वासन दिलं.चहा घेऊन शामराव आणि रामराव दालनाच्या बाहेर पडले.
   उद्या रामराव येतील त्यांनी चटकन आत सोडायचं,असं शामरावांनी शिपायीरावांना गोमाराजीरावांच्या दालनातून बाहेर पडताना त्याला सांगितलं.
   साहेब,तुम्ही सांगितलं म्हणजे आमच्या सरांनीच सांगितल्या सारखच आहे.उद्या या साहेबांना दहा वाजताच यायला सांगा.आल्या आल्या त्यांना सोडतो आतमध्ये.शिपायीराव बोलले.
   रामराव दुसऱ्या दिवशी बरोबर दहा वाजता पोहचले.शिपायीरावांनी त्यांना गोमाजीरावांच्या दालनात सोडलं.गोमाजीरावांनी त्यांचं हसून स्वागत केलं.प्रश्न समजून घेतला.आठ दिवसात तुमचे काम झाल्याचेच समजा असं सांगून त्यांना निरोप दिला.आठदिवसांनी रामराव,गोमाजीरावांना भेटले.गोमाजीरावांनी त्यांचं हसून स्वागत केलं.रामारावांच्या कामाची फाइल मागवल्याचं गोमाजीरावांनी रामरावांना सांगितलं.आठ दिवसात सारं काही कळेल असं बोलून त्यांनी रामरावांना निरोप दिला.आठ दिवसांनी रामरावांनी गोमाजीरावांची भेट घेतली.गोमाजीरावांनी त्यांचं हसून स्वागत केलं.फाइलचा अभ्यास सुरु असून तो आठ दिवसात संपेल नि तुमचं काम होईल, असं सांगून त्यांनी रामरावांचा निरोप दिला. पुढच्या आठ दिवसांनी रामरावांनी गोमाजीरावांची भेट घेतली.तेव्हा त्यांनी रामरावांचं उभे राहून स्वागत केले.अभ्यास पूर्ण झाला असून फाइल माझ्याकडेच ठेवली आहे,असं गोमाजीरावांनी फाइलकडे बोट दाखवत रामारावांना सांगितले.रामरावांचा चेहरा उजळला.
   मग आज होणार ना सर माझे काम,रामरावांनी अधिरतेनं विचारलं.
   व्हायलाच पाहिजे.पण फाइलमध्ये एक जीआर जोडलेला नव्हता.तो जोडायला सांगितला आहे.आठदिवसात होऊन जाईल सारं.गोमाजीराव म्हणाले.रामरावांच्या उजळलेल्या चेहऱ्यावर अमावस्येची काजळी पसरली.
   काळजी करु नका हो.मी आहे ना,तुमचे काम होणार म्हणजे होणारच.आठ दिवसांनी या,असं बोलून गोमाजीरावांनी रामरावांना निरोप दिला.हताश झालेल्या रामरावांनी अखेर शामरावांना गाठलं.त्यांना सारं काही विदित केलं.शामरावांनी गोमाजीरावाला शिव्या हासडल्या.
   काम कां होत नाही,हे आपण स्वत: बघून घेतो.असं शामरावांनी,रामरावाला सांगितलं.त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी गोमाजीरावांना भेटले.थेट विषयालाच हात घातला.
   अरे काम झालेच आहे.ही बघ फाईल.शामरावांना गोमाजीराव म्हणाले.
   मग घोडे अडलं कुठे?
   गांधीदर्शन झालं नाही ना.अद्याप.
   विनोबा दर्शन नाही का चालणार गोमाजीराव..रामरावांचं बोलणे ऐकून गोमाजीरावांनी कप्पाळावर हात मारुन घेतला.सामान्य ज्ञानाचा असा अंधार असेल तर,अज्ञानाच्या डोही गंटागळया खाणं आलंच.गोमाजीराव बोलले.आणि त्यांनी रामरावांना निरोप दिला.
   गांधी दर्शन घडण्यासाठी शामरावांनी स्वखर्चाने माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक शामरावांनी,रामरावांना घेऊन दिले आहे...