Sunday, January 29, 2012

खुपते आणि दुखते मंडळींचा केबीआय रिपोर्ट

खुपते आणि दुखते मंडळींचा केबीआय रिपोर्ट
      खरं तर, भारतीय क्रिकेटचं काहीही (चांगलं-बरं-वाईट-अत्यंत वाईट) झाल्याचं टोनी ग्रेग पासून ग्रेग चॅपेल पर्यंत,रामनाथ पंढरीनाथ कुकडे पासून कुलवंत जानी पटियालावाले यांच्या पर्यंत कुणाला ना कुणाला तरी खुपतं आणि दुखतं सुध्दा. (तसं तर भारतीयांना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा म्हणजेच आनंदी आणि वाईट अशा सर्व प्रकारच्या कोणत्याही गोष्टींबद्दल असं खुपणं आणि दुखणं कमी-अधिक प्रमाणात होत असतं.भारताच्या भूमिचा तो कदाचित गुणधर्मच असावा.कारण यामधून मोठमोठे साधुपुरुष आणि साध्वी भगिनी सुध्दा सुटल्या नाहीत.विशेषत:कुंभमेळाा भरतो तेव्हा तर साधु- बाबांचं एकमेकांबद्दलचं खुपणं आणि दुखणं न्यूज इव्हेंटच बनूण जातं.)
      भारतीय क्रिकेटबाबत ज्यांना ज्यांना सतत खुपतं आणि दुखतं त्यांना भारतीय क्रिकेट हे बंगाली जादूसारखच प्रचंड गौडबंगाल असल्याचं वाटतं.
      भारतीय क्रिकेट संघाचा पराजय होतो तेव्हा आणि विजय होतो तेव्हा अशा दोन्ही वेळेला त्यांचं दुखणं आणि खुपणं सुरु होऊन जातं.हे दुखणं डोक्याचं असतं की लिव्हरचं असतं की पोटाचं असतं की पोटापाण्यासाठी असतं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं.
      या अशा डिफरंट -डिफरंट टाईपच्या दुखणे आणि खुपणे यामुळे वेस्टइंडिज येथे 2007 साली झालेल्या वन डे वर्ल्ड कप मध्ये भारतीय क्रिकेट संघाची  साखळी फेरितच फे फे आणि फे फे उडाल्यावर बऱ्याच जणांचं दुखणं इतकं वाढलं की,काहींना अपेंडिक्सचं ऑपरेशन करावं लागलं.तर काहींना न्युरोलॉजिस्टकडे जाऊन मेंदू तपासून घ्यावा लागला तर काहींना मोठ्या नंबरचा चष्मा लावाला लागला.तर काहींनी डझनाने झेंडू बाम घरी आणावे लागले.
इतके उपाय करुनही दुखणं काही कमी होईना तेव्हा मग या मंडळींनीच भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाची 57 कारणे शोधण्यासाठी,म्हणजेच होमिओपॅथी मध्ये जसे मूळ रोगाचा शोध घेवून नंतर साबुदान्याच्या गोळयांचा खुराक ठरवला जातो,तसे करायचं ठरवलं.याचा अर्थ असा की पराजयाच्या मुळापर्यंतच जाण्यासाठी या खुपते आणि दुखते मंडळींनी ठरवलं.असं मुळापर्यंत जाण्यासाठी तज्ज्ञ हवेत.ही तज्ज्ञता केबीआयकडे असल्याने केबीआयला पराजयाची कारणांचा शोध घेण्याचे कांट्रॅक्ट देण्यासाठी पुढाकार घेतला गेला. (हा काँट्रक्ट काहीशे कोटी रुपयांचा होता म्हणे.यामध्ये सर्व प्रकारच्या म्हणजेच साईबाबांच्या शिर्डी सफरी पासून ते तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठीच्या फ्री अँड फेअर सर्व्हिस चार्चेजसचा समावेश होता.या तथ्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नसावी कारण याविषयाच्या अनुषंगाने राडिया टेप्समध्ये काहीच प्रतिकूल आलेलं नाही.अमरसिंगजी यांनी ऑब्जेक्शन घेतलेले नाही. रामदेवबाबांच्या आंदोलनाच्या मूळ विषयसुचित सुध्दा या विषयाला हात लावण्यात आलेला नाहीय.शिवाय कोणत्याही प्रवचनात किंवा प्रेस कांफरंस मध्ये त्यांनी याविषयी चिंता व्यक्त केलेली नाही. या महानुभवांना हे खुपलं नाही.याचाच अर्थ जे बोलल्या गेलं किंवा जात आहे ते स्वच्छ,नितळ आणि पारदर्शक आहे ,रामायण काळातील गंगा नदिच्या पाण्याच्या प्रवाहासारखं.)
000
दोन
आता हे केबीआय ,प्रकरण काय ते समजून घेऊ या.केबीआय हा (के फॉर )खऊट, (बी फॉर )ब्युरो,(आय फॉर )इंव्हेस्टिगेशन,याचा शॉर्ट फार्म.
      आता ,हे खऊट म्हणजे नेमके काय? हे समजून घेऊ या. तर (म्हणजे खतरनाक), (म्हणजे उच्चप्रशिक्षत), (म्हणजे टशन).याचा सोप्पा अर्थ असा की एकदमच फाडू आणि फाकडू मंडळी.एकदा एखादा असा शोध मोहिमेचा प्रोजेक्ट यांच्या हातात दिला की मग आपण केवळ बघत राहायचे.ही खऊट मंडळी हात घालतील तेथून डायनोसार काढतील.ते नाही जमले तर कोब्रा साप काढतील.कोब्रा साप नाही निघाला तर किमान विंचू तरी काढतीलच.गेला बाजार मुंगी आणि मुंगळा कुठेच गेले नाहीत.फक्त यांनी हात घालायचाच अवकाश.(चोलीके पिछे क्या है..च्या काळात हे खऊट, नव्हते.हे किती बरे झाले,नाही का ?एखाद्याने त्याचा शोध घेण्याचा कांंट्रॅक्ट दिला असता तर ..कल्पना करा..सुभाष घईला दहावेळा जुहू बीचच्या अरबी समुद्राच्या पाण्यात मुंडके डुबवावे लागले असते..आणि माधुरीचं ..तोबा तोबा..)
      केबीआय, केवळ हात घालण्यात एक्सपर्ट नाहीत तर ते कुठेही तोंड सुध्दा खुपसू शकतात.पाय घालू शकतात.त्यामुळे त्यांच्या हाताला किंवा तोंडाला किंवा पायाला काहीना काही लागतच लागतं.हे नव्यानं सांगायला नको.त्यांचा हा यूएसपी-युनिक सेलिंग पाँईट- बघूनच त्यांना वेस्ट इंडिज मधील वन डे वर्ल्ड कपनंतर भारताच्या पराभवाला कारणीभूत असलेल्या कारणांचा शोध घेण्यासाठी कांट्रॅक्ट देण्यात आला होता.त्यांनी अनेक कारणांचा विस्तृत आणि बारकाईने विचार केला होता.त्याचे विश्लेषण केले होते.मात्र सर्वाधिक महत्वाचं कारण दोन शब्दांवर थबकलं होतं.ते दोन शब्दाचं पराभवाचं कारण अचूक असल्याचे पुढे सिध्द झाले.ते दोन शब्द होते -ग्रेग चॅपेल.
000
तीन
      केबीआयची ही सूपर -ड्यूपर यशकथा ठाऊक असल्याने त्यानांच यंदा वन डे इंटरनॅशनल वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या,विजयाची कारणं शोधण्यासाठी काँट्रक्ट देण्याचा इरादा खुपते आणि दुखते मंडळींनी पक्का केला.
000
चार
      तुम्हाला वाटेल की ,वन डे वर्ल्ड कप भारताने कां जिंकला? हा कसा काय शोध मोहिमेचा विषय होऊ शकतो.हा विजय शोध मोहिमेचा विषय झाला कारण ,या विजयामुळे पोटात आणि डोक्यातही दुखणा-या मंडळींना या घटनेत टू-जी स्पेक्ट्रम दिसलं.
      एखादा पराजय घडतो तेव्हा त्यात घातपात होऊ शकतो.कधी हा घातपात नकळत होतो तर कधी घडवून होतो.हे आता दिसूनच आले आहे.पण यशामध्ये त्याहून अधिक अपघात होऊ शकतात, असं दुखऱ्या आणि खुपऱ्या मंडळींना सारखं वाटतं राहतं.त्यामुळे कुणाला पुरस्कार मिळाला,कुणी विद्यापीठात पहिलं आलं ,कुणी एखादी स्पर्धा जिंकली,कुणाचं पुस्तक विद्यापीठात लागलं,कुणाचा लेख वर्तमानपत्रात छापून आला,मंगळवारी सिध्दीविनायकाच्या दर्शनासाठी दोन मिनिटात थेट गाभारा गाठता आला,मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारलं,तरी यात त्यांना घात आणि अपघात दिसतोच दिसतो.मग ते या घात आणि अपघाताची कारणं शोधू लागतात.
      त्यामुळे भारताच्या वन डे वर्ल्ड कप मधील विजयाचा या मंडळींना आनंद झाला नाही.हा विजय भारतीय खेळाडुंनी मेहनतीने आणि कौशल्याने ,मिळवला हे कारण फसवं असू शकतं,असं त्यांना वाटतं.त्यामुळे भारताचा  हा विजय म्हणजे घात आणि अपघातच असला पाहिजे ,अशी त्यांची धारणा झाली आहे.
      ही आपली धारण पक्की करणे आणि ती जगापुढे आणणे या उदात्त हेतूनेच त्यांनी केबीआयला कांट्रॅक्ट दिला.
000
पाच
हे कांट्रॅक्ट देण्याचं आणखी एक कारण याच काळात घडत होतं ,ते म्हणजे टू जी आणि लगेचच थ्री जी स्पेक्ट्रम घोटाळयातला सीड मनी.तो इतका मोठा होता की स्वीस बँकेच्या खात्यात टाकून आणि तिरुपती आणि त्याच्या श्रेणितल्या सर्व देवस्थानांच्या हुंडित टाकूनही उरलेल्याचं करायचं काय,असा प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असतानाच भारत वन डे चॅम्पीयन बनला . आणि त्या मग या शिलकेचं काय करायचं याचंही उत्तर सापडलं.भारताच्या विजयाच्या कारणांच्या शोधासाठी केबीआयला कांट्रॅक्ट देण्यामध्ये या उत्तराचं बिज दडलेलं आहे,ते असं.
000
सहा
केबीआयला या कांट्रॅक्टसाठी भरपूर मोठी फी मिळाली.म्हणजे किती तर त्यांनी केबीआय एअर लाईन्स,केबीआय इंफ्रास्ट्रक्चर,केबीआय मोशन पिक्चर कंपनी,केबीआय रिऍ़लिटी,केबीआय पतपेढी,केबीआय वडापाव चैन,केबीआय मल्टीप्लेक्स,केबीआय मॉल्स,केबीआय म्युझिक, ते केबीआय टीव्ही चॅनेल अशा उद्योगांची मालिकाच उघडण्याचा मनोदय हा कांट्रॅक्ट मिळताच,केबीआयच्या डायरेक्टर जनरल यांनी डायरेक्टली बोलून दाखवला.
000
सात
सर्व करार मदार झाल्यावर केबीआय टीम भारताच्या वन डे वर्ल्ड कप विजयाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आपल्या सर्व आयुधांनिशी सज्ज झाली .
      त्यांनी त्यांच्या मोडस ऑपरेंडी प्रमाणे हात-पाय हलवायला सुरुवात केली. वन डे क्रिकेट इंटरनॅशनल वर्ल्ड कप मध्ये भारताच्या विजयाची कारणं शोधायला त्यांना फार वेळ लागला नाही.हे विशेष.या कारणांचे विश्लेषण करण्यासाठी कॉम्पुटरमध्ये प्रोग्रॅम फीड केलेच होते.यू कॅन विन असं सांगणा-या शिवखेरा पासून ते,मी विजेता होणारच असं सांगणा-या उमेश कनव्हलीकर यांनी सांगून ठेवलेल्या
सक्सेस म्हणजेच विजयाचे फंडे, प्रोग्रॅम मध्ये टाकण्यात आले.त्यामुळे विश्लेषण गतिनं झालं.ते तार्किक दृष्ट्या योग्य असल्याचं शिक्कामोर्तब इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कडून करुन घेतलं गेलं.
      केबीआयचा हा अहवाल गुप्त ठेवायचा की उघड करायचा ,याचा खल ,खुपते आणि दुखते मंडळींच्या वरिष्ठ पातळीवर करण्यात आला.
      हा खल सुरु असतानाच, हा अहवाल आमच्या हाती सापडला.त्याचं कारण आमचं नशिब त्या क्षणी बलवत्तर होतं.ग्रहदशा उत्तम होती.सर्व ग्रह आप-आपल्या घरात मस्त मजेत होते.कुणीही एकमेकांकडे वक्री दृष्टिने बघत नव्हते.त्यामुळेच आमचं नशिब त्या दिवशी आमच्यावर मेहरबान झालं. तो दिवस आमचा होता.
      प्रचंड खलबतीनंतर,या अहवालावर अंतिम निर्णय घेण्यासाठी तो श्रीयुत बराक ओबामा यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय खुपते आणि दुखते मंडळींनी घेतला.(हा अहवाल भारताच्या राष्ट्रपती यांच्याकडे किंवा फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष सारकोजी किंवा पाकिस्तानचे राष्ट्रपती यांच्याकडे किंवा श्रीलंकेचे राष्ट्रपती राजापक्षा यांच्याकडे किंवा बांगला देशाचे राष्ट्रपती यांच्याकडे किंवा  राजीव शुक्ला ते राजदीप सरदेसाई यांच्याकडे,विजय मल्ल्या-शाहरुख खान-निता अंबाणी यांच्याकडे जाता थेट ओबामांकडे कसा गेला?हा महत्चाचा प्रश्न आहे.या प्रश्नाचं उत्तर खूप व्यामिश्र आहे.भारतीय क्रिकेट संघाचा विजय आणि ओबामांचा काय संबंध,असा दुसरा प्रश्न निर्माण होऊ शकतो.पण काही प्रश्नांकडे डोळेझाकच करायची असते.एखादा अहवाल इकडे गेला काय नि तिकडे गेला काय?त्यामुळे काही सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी डोकदुखी झालेली महागाई कमी होत नाही.शिवाय ओबामा पडले इंस्पेक्टर जनरल ऑफ वर्ल्ड. असं अमेरिका समजते.अर्धे अधिक जग त्यावर मान डोलवते.भारतातही या त्यांच्या समजण्याला सर आँखो पे ठेवणारे अमेरिकेच्या लोकसंख्येएवढे लोक आहेतच. तेव्हा असले काही प्रश्न पडले तर शांत बसायचं. उत्तर मागायच्या भानगित पडलो तर प्रश्नकर्त्यांचा कधी लादेन होईल हे सांगता यायचं नाही.
      त्यामुळेच ओबामा आणि क्रिकेटचा काय सबंध,हा प्रश्न अप्रस्तुत ठरतो.ठरत नसेल तर आपण ठरवून टाकू.  कारण मग तसं पाहू जाता,अंबानी आणि क्रिकेटचा काय संबंध ,सुनील शेट्टी आणि अभिनयाचा काय संबंध,हिमेश रेशमीया आणि गायनाचा काय संबंध ,कॅटरिना कैफ आणि नृत्याचा काय संबंध,लालू प्रसाद आणि गांभीर्याचा काय संबंध,रजनीकांत आणि लॉजिकचा काय संबंध,जयललीता आणि सौजन्याचा काय संबंध ,हे प्रश्न विचारले का कुणी आतापर्यंत..कारण हे प्रश्न प्रस्तुत समयी अप्रस्तुत आहेत.काही प्रश्न काळपेटीत टाकून दिले की,आनंदी गोपाळ होता येतं ..दोन्ही बाजूंना..)
0000
आठ
      श्रीयुत  ओबामांकडे असे असंख्य अहवाल जगभरातून दररोज येतच असतात.हा अहवाल त्यांच्या टेबलावर येऊन पडला.इतर कामे हातावेगळी करुन ओबामा तो अहवाल आता उघडायला घेणार,तोच त्यांचे संरक्षण मंत्री लॅपटॉप घेऊन त्यांच्या रुममध्ये पळतपळतच आले.नि त्याने तो नेटला जोडला.नेट, थेट आटोबाबादला पोहचलं.तिथे चित्तथरारक लादेन एपिसोड सुरु होता.झालं.ओबामांनी हाती घेतलेला तो अहवाल बाजूला टाकला.तोच क्षण महत्चाचा ठरला.कारण त्याक्षणानंतरच हा तथाकथित गुप्त अहवाल आमच्या पर्यंत पोहचला.(तो कसा याची चित्तर कथा आम्ही जे.के. रौलिंग यांना सांगितलीय.हे सारं हॅरी पॉटरच्या नव्या आवृत्तीत देण्याचा विचार त्या करतातहेत..ते यथावकाश आपल्यापर्यंत येईलच.)
      श्रीयूत ओबामा,हे चित्तथरारक  लादेन एपिसोडमध्ये दंग झाल्यानेच हे शक्य होऊ शकलं हे प्रामाणिकपणे कबूल करायलाच हवं.लादेन एपिसोड संपेपर्यंत या अहवालाची पायरेटेड कॉपी तयार झाली.मूळ प्रत पुन्हा ओबामांच्या टेबलवर ठेवली गेली..
      आता जबाबदारी आमच्यावर पडलीय..हा अहवाल फोडण्याची नव्हे.तर वाचण्याची.ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडली.ते केल्यावर लक्षात आलं की हा अहवाल गुप्त ठेवण्यात कोणतही पाँईंट नाही.ज्या खुपते आणि दुखते मंडळींनी केबीआयकडे हा अहवाल तयार करण्याचे काम सोपवले होते ,खरं तर त्यांनीच हा अहवाल ,उघड करायला हरकत नव्हती.श्रेयाचे लाडू त्यांना खाता आले असते,पण त्यांनी ती संधी हुकवली.ती संधी आम्हाला मिळाली.आमचे ग्रह त्यासाठी प्रसन्न होते,हे सांगितलेलच आहे.
      आम्ही हा अहवाल उघड करण्याचं आखणी एक कारण म्हणजे  ,खुद्द केबीआयच होतं.त्यांनी हा अहवाल जरी खुपते आणि दुखते मंडळींना दिला असला तो ओबामांकडे गेला असला तरी एक कॉपी त्यांच्याकडेही असणारच की.मग अहवालाला पाय फुटण्याचा हा एक मार्ग होताच.केबीआय हा अहवाल विकीलिक्सला देऊ शकतो.एकदा अहवाल विकीलिक्सकडे गेला की तो उघड झालाच समजायचंं.हे आम्ही बरोबर ओळखल.या काळात आम्ही दररोज पाण्यात बुडवलेल्या चार चार बदामा नित्यनेमानं भक्षण  करत असल्याने आमची बुध्दी तेज झाली होती आणि विचार करण्याची गती चौपट झाली होती. तेव्हा हा अहवाल कुठून तरी ,केव्हा तरी बाहेर येण्याआधीच आपणच तो मुक्त कां करु नये.असं आमचं मन म्हणालं.हे म्हणणं आम्हाला एखाद्या कवितेसारखं सुंदर वाटलं आणि त्यामुळेच आमच्या हाती आलेला केबीआयचा अहवाल आम्ही इन लार्जर इंटरेस्ट(रेट)मध्ये मुक्त केला..
000
नऊ
      या अहवालात ,वन डे क्रिकेट वर्ल्डकप मधील भारताला विजय कां मिळाला याची कारणमीमंासा पुढील प्रमाणे होती.
ज्येष्ठ खेळाडूंची लग्न
1.भारताचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनिने आपला कूल-नेस घालवून हॉट-नेस प्राप्त करुन घेण्यासाठी, विश्वचषकाच्या सहा महिने आधी लग्न केलं.या लग्नामुळे त्याच्या बंगल्यात विजयलक्ष्मी आली.तो हॉट झाल्याने त्याची बॅट हातोडा होउुन अंतिम सामन्यात दे दणादण करती झाली.भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा हा एक्स फॅक्टर होय.
2.युवराजसिंग हा मुळात हॉट असल्याने विश्वचषकाच्या आधी लग्न केल्यास आणखी हॉटर होण्याची शक्यता होती.ही दुहेरी उष्णता घातक ठरण्याचीच शक्यता अधिक होती.कोणत्याही क्षणी उष्माघाताचा फटका बसायचा.ही शक्यता त्याच्याच लक्षात आली त्यामुळे या काळात लग्न करण्याचा निर्णय त्याने घेतला.शिवाय यामुळे  त्याच्या एकाग्रतेला भंग करणारी मेनका-उर्वशी मंदाकीनी-दीपिका-किम-प्रीटी त्याच्या बंगल्यात आली नाही.भारतीय संघाच्या विजयाचा हा वाय फॅक्टर ठरला.
3.हरभजन सिंगाच्या आईने  त्याला विश्वचषकाच्या सहा महिने आधीच शिवाजी महाराजांचे चरित्र वाचून दाखवले होते.या चरित्रातला सिंहगड एपिसोड त्या माऊलीने हरभजनसिंगाच्या मनावर बिंबवला. आधी लगीन कोंडण्याचे मग रायबयाचे,हे एैतिहासिक वाक्य हरभजनच्या मनावर बिंबवले. तुझे अगर ग्रेट -व्रेट बनना है तो.इस वाक्य को याद करते रह.बस्स.अशी ती माऊली हरभजनला म्हणत राहिली.त्याचा पॉझिटिव्ह परिणाम झाला.विश्वचषकाच्या आधी सौभाग्यवती सरदारीन आणण्याचा बेत भज्जीने रद्द केला.भारतीय संघाच्या विजयाचा हा झेड फॅक्टर ठरला.
4.झहीर खानने, लग्न करण्याचं जवळ जवळ निश्चित केलं होतं.पण त्याचे अब्बाजान,मांजरी सारखे आडवे गेले.झहीर,अभी तो बच्चा हेै जी ,असं त्याच्या अब्बाजाननी पुण्यात इशा श्रावणीच्या मातोश्रीला सांगून टाकलं.झहीर वयात येईपर्यंत थांबण्याची तयारी इशाच्या मातोश्रींनी दाखवली.
झहीरची विकेट घरीच अशी पडली.त्यामुळे लग्नाचा विचार त्याला डोक्यातून काढून टाकावा लागला.हा विचार त्याच्या डोक्यातून गेल्याने केवळ चेंडू कसा वळवायचा याचेच विचार त्याच्या डोक्यात वळू लागलं.भारतीय संघाच्या विजयाचा हा झेड प्लस फॅक्टर ठरला.
5.विश्वचषकाच्या सहा महिने आधी गौतम गंभीरला त्याचे गुरुवर्य म्हणाले की,वत्सा तू गौतम आहेसच.तुला गंभीर व्हायचं असेल तर स्थितप्रज्ञ व्हावे लागेल.त्यासाठी मिस- मायांच्या मोहपासून दूर राहावे लागेल.
      या मंत्राचा जप करता करता आणि त्यावर चिंतन,मनन करता करता ,गौतम गंभीर ,शादी की बात गंभीरपणे विसरुनच गेला.त्याला त्याची बॅट म्हणजे मोहमयी मेनका वाटू लागली.त्याचा परिणाम वेगवेगळया सामन्यांमध्ये दिसून आला.भारतीय संघाच्या विजयाचा हा फॅक्टर ठरला.
6.विरेंद्र सेहवाग-क्रिजवर बॅटिंग साठी बॉलर समोर उभा असताना समोर बॉल आला की आपले लग्न झाले आहे,हे सेहवाग विसरुन जायचा.हे विसरणं त्याच्यासाठी फायद्याचं ठरलं.कारण आपण लग्नच केलं नसताना,मग करायचं तरी काय,असं त्याला वाटायचं.शादी नही किया तो क्या हुवा,बॉलर को तो ठोक सकता हॅूं, असं तो स्वत:लाच सांगायचा नि बॉलरवर तुटून पडायचा.भारतीय संघाच्या विजयाचा हा एम फॅक्टर ठरला. (ज्या मॅच मध्ये आपण लग्न केल्याचं सेहवाग विसरला नाही, तेव्हा तो घसरला.हे दिसून आले.)
7.सचीन तेंडूलकरचे दशकभरापूर्वी झालेलं लग्न भारतीय संघाच्या विजयात महत्वाचा हातभार लावून गेलं.त्याची गृहलक्ष्मी त्याच्या पत्रिकेतील भाग्याच्या स्थानावर विश्वचष्काच्या काळात पक्की ठाण मांडून बसली होती.ही मांड इतकी पक्की होती की इतर घरातील ग्रहांना भाग्यस्थानावर वाकडी वाट करण्याची याकाळात हिंम्मत होऊ शकली नाही.भारतीय संघाच्या विजयाचा हा सॉलिड फॅक्टर ठरला.
0000
यंग खेळाडूंच्या मैत्रिणी
1.इशांत शर्माची मैत्रिण त्याला म्हणाली,
      इशू जरा आधी आपले केस नीट कर नि मग प्रेम कर.
      यावर इशू म्हणाला,अगं  हट,केसांची झुल्फे माझ्यासाठी लकी चार्म आहेत.त्या लकी चार्मला तू हटव म्हणतेस.मी तुलाच हटवतो,माझ्या दिलातून.मनातून.डोळयातून .तू नही तो और सही.असं म्हणून विश्वचषकाच्या सहा महिने आधीच त्याने मैत्रिणीला फाटयावर मारले.नि मग तो बॉल कसा स्टँम्पवरच टाकता येईल याची प्रॅक्टिस करता झाला.
2.विराट कोहली साठी ऑल गर्लफ्रेंडस ऑर एनर्जी बुस्टर्स होत्या.पठ्याचा तिकडे एक डोळा असला तरी बॅटवर बॉल घेताना मात्र तो प्रियतमांकडे बघणंच सोडून द्यायचा.जणू काही तिच्याशी देणं घेणंच नाही.बॅटवर बॉल आला की याचं दोन्ही डोळयांनी लक्ष फक्त त्या बॉलकडेच..अर्जूनासारखं..विजयाचा हा व्ही फॅक्टर ठरला.
3.मुनाफ पटेल म्हणाला,गर्लफ्रेंड-व्रेंेड क्या होती है यार,मुझे कुछ पताही नही.हेच एक वाक्य वर्ल्ड कपच्या आधी तो सर्वांना एैकवायचा नि पचकन थुंकून मैदानावर पळायचा.बॉलिंग प्रॅक्टिस करायला.भारतीय संघाच्या विजयाचा हा आर फॅक्टर ठरला.
4.पियूश चावलाचं मन त्याला म्हणालं, की ,बच्चू,प्रीया बावरीकडे लक्ष देऊ नकोस ,अन्यथा आई बाबांपेक्षा,धोनीच ढुंगणावर लाथ मारायचा.पियुषनं मनाचं एैकलं.विश्वचषकाच्या काळात त्याने मैत्रिणींच्या नावाने,बुरा मत सुनो-बुरा मत देखो-बुरा मत बोलो,या तत्वाचे तंतोतंत पालन केले.भारतीय संघाच्या विजयाचा हा ,डी फॅक्टर ठरला.
00000
दहा
तिरुपती बालाजी
भारत वर्ल्ड जिंकावा यासाठी अनेकांनी आपले देव पाण्यात घालून ठेवले होते.अनेकांनी नवस बोलले होते.हे नवस म्हणजे नवस-टार्गेट पूर्ण करण्याची संधी होती.ही संधी चार वर्षांनीच एकदा येते.हे तिरुपतीसह
या श्रेणितल्या समस्त देव-भगवान मंडळींना ठाऊक होतं.त्यामुळे यावेळी भक्तांना नाराज करायचच नाही असा एकमुखी ठराव त्यांनी विश्वचषकाच्या आधी इंद्रपुरीत झालेल्या स्पेशल बैठकित घेतला होता.
      भक्तांच्या नवसाला पावलं की भक्त आनदांने दान पेटिसाठी आपले हात आणि पाकिट सैल करतात.हे त्यांना एवढया वर्षाच्या अनुभवाने उत्तमरित्या ठाऊक झालं होतं.त्यामुळे तिरुपती सह समस्त भगवानांनी वेगवेगळया सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी पराजयाचे जे काही क्षण येऊ घातले होते,ते वरच्या वर पळवले नि त्यांचे रुपांतर विजयाच्या फॅक्टर मध्ये केले.(डोळयांसमारे आणा बघू तो शेवटचा सामना..)भारताच्या विजयातला हा -वन फॅक्टर होता.नवसाला देव पावले.हुंडी भरली.टार्गेट पूर्ण झालं.देव खुष.भक्त खुश.
000
अकरा
केबीआयचा हा अहवाल ओबामांच्याकडून बाहेर कसा पडला यावर सध्या खुपते आणि दुखते मंडळींचं चर्वितचर्वण सुरु आहे.
      परवा कुणी तरी ओबामांना याबाबात छेडलं असता,ते म्हणाले की,इतने बडे व्हाईट हाऊसमे एैसी छोटी छोटी घटनाए होतीही है..उसमे क्या है..
0000