Sunday, January 8, 2012

बीलची बिलिटेड साठी

बीलची बिलिटेड साठी
    एक
    परवा परवाच हिलरी क्लिंटन भारतात येऊन गेल्या.आता त्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री आहेत.मात्र काही वर्षापूर्वी त्या राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या सौभाग्यवती म्हणजेच फर्स्ट लेडी ऑॅफ अमेरिका म्हणून भारतात आल्या होत्या.तेव्हापासूनच बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांची आणि मुकरु एडका कोवाची मैत्री झाली.पुढे ती मैत्री घट् झाली.बिल क्लिंटन निवृत्त झाल्यावरही या मैत्रीत खंड पडला नाही.त्यांनी मोठ्या प्रेमाने ही मैत्री जोपासली.ब्रिटनचे राजपूत्र चार्ल्स यांच्यासाठी जसे मुंबईचे डबेवाले तसे बिल क्लिंटन साठी मुकरु एडका कोवा.
    शिवाय मुकरु,एटापल्ली सारख्या लहानशा गावाचा सरपंच होता.सत्ताधीश होता.सत्तेत असूनही त्याने सत्ता गेलेल्या बिल यांच्याशी मैत्री कायम ठेवली होती.याचे अप्रूप बिल आणि हिलरी वहिनी या दोघांनांही होते.त्यामुळेच हिलरी वहिनी जेव्हा कधी भारतात आल्या की त्या मुकरुला भेटल्याशिवाय जातच नसत.त्यासाठी त्या खास मुंबईत येत.तिथे मुकरुला बोलावून घेत.छान गप्पा टप्पा करीत.परवा सुध्दा त्यांनी तेच केलं.
    0000
    दोन
   
    हिलरी वहिनी आणि मुकरुच्या गप्पा चांगल्याच रंगल्या.या गप्पांमध्येच बिल क्लिंटन यांच्या साठीचा विषय निघाला.भारतात साठी कशी जोरदार कशी साजरी केली जाते,हे मुकरुने हिलरी वहिनींना सांगितलं.बिल भाऊंची साठी अमेरिकेत साजरी कशी झाली?हे त्याने विचारलं.पण अमेरिकेत अशी साठीबिठी कुणी साजरी करत नाही.आला दिवस तिथे साजरा केला जातो. परवा परवा हिलरी क्लिंटन भारतात येऊन गेल्या.आता त्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री आहेत.मात्र काही वर्षापूर्वी त्या राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या सौभाग्यवती म्हणजेच फर्स्ट लेडी ऑॅफ अमेरिका म्हणून भारतात आल्या होत्या.तेव्हापासूनच बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांची आणि मुकरु एडका कोवाची मैत्री झाली.पुढे ती मैत्री घट् झाली.बिल क्लिंटन निवृत्त झाल्यावरही या मैत्रीत खंड पडला नाही.त्यांनी मोठ्या प्रेमाने ही मैत्री जोपासली.ब्रिटनचे राजपूत्र चार्ल्स यांच्यासाठी जसे मुंबईचे डबेवाले तसे बिल क्लिंटन साठी मुकरु एडका कोवा.शिवाय मुकरु एटापल्ली सारख्या लहानशा गावाचा सरपंच होता.सत्ताधीश होता.सत्तेत असूनही त्याने सत्ता गेलेल्या बिल यांच्याशी मैत्री कायम ठेवली होती.याचे अप्रूप बिल आणि हिलरी वहिनी या दोघांनांही होते.त्यामुळेच हिलरी वहिनी जेव्हा कधी भारतात आल्या की त्या मुकरुला भेटल्याशिवाय जातच नसत.त्यासाठी त्या खास मुंबईत येत.तिथे मुकरुला बोलावून घेत.छान गप्पा टप्पा करीत.परवा सुध्दा त्यांनी तेच केलं.
   
    हिलरी वहिनी आणि मुकरुच्या गप्पा चांगल्याच रंगल्या.या गप्पांमध्येच बिल क्लिंटनच्या साठीचा विषय निघाला.आपल्याकडे साठी कशी जोरदार कशी साजरी केली जाते.हे मुकरुने हिलरी वहिनींना सांगितलं.बिल भाऊंची साठी अमेरिकेत साजरी कशी झाली,हे त्याने विचारल.पण अमेरिकेत अशी साठीबिठी कुणी साजरी करत नाही.आला दिवस ते साजरा करतात अशी माहिती हिलरी वहिंनींनी दिली.गप्पा टप्पा संपल्यावर मुकरुने हिलरी वहिनींचा निरोप घेतला.
    0000
    तीन
    मुंबईवरुन एटापल्लीपर्यंतच्या प्रवासात मुकरच्या डोक्यात बिल भाऊंच्या साठीचाच विषय घोळत होता.आता जरी बिल भाऊंकडे कोणतही पद नसलं तरी ते कधी काळी ते अमेरिकेन जनतेच्या मते जगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा इंस्पेक्टर जनरल ऑफ वर्ल्ड होतेच की नाही.एवढा मोठा माणूस,मग त्याची साठी करायलाच पाहिजे.आपल्याकडे टपराट आणि टिनपाट पुढऱ्यांची साठी दणक्यात साजरी होती.बिल भाऊसारख्या मोठ्या माणसांची आपणच साठी कां करु नये.यामुळे क्लिंटन आणि कोवा घराण्याचे संबंध आणखी दृढ होतील.आपल्या मैत्रीचाच दाखला जय-विरुपेक्षा लोक अधिक देतील.असं मुकरुचा आतला आवज बाहेरच्याला म्हणाला.आणि मुकरुने बिलची साठी करण्याचा निर्णय त्याने घेतला.
     0000
    चार
    एटापल्लीला आपल्या वाड्यावर पोहचल्या पोहचल्या मुकरु बिल भाऊंची साठी कशी साजरी करायची याच्या चितंन आणि मननाच्या कामाला लागला. अमेरिकेच्या जनतेला बिल भाऊंची साठी साजरी करावी वाटली नाही याचं त्याला अतिव दु: झालं. असं दु: झालं की मोहाची घेशिल गा बापू,असं त्याचा बाप त्याला मरणापूर्वी सांगून गेला होता.त्यामुळे बापाच्या या शेवटच्या शिकवणिचं मुकरु तंतोतत पालन करायचा.शिवाय मुकरु एमटीव्हीच्या जमान्यातील असल्याने  त्याने मोहाचीला नवा रसास्वाद दिला होता.मोहाची प्लस बकार्डी(मो प्लस ) असा दु:खावर उतारा करण्याचा फॉम्यूला एटापल्लीतल्या त्याच्या जवळच्या मित्रमंडळीत हिट अँड हॉट झाला होता.
    आपलं दु: हलकं करण्यासाठी तो या मित्रांनांही मोहाची प्लस बकार्डीच्या प्राशनाला बोलावत असे.त्यामुळे मुकरुला कायम कोणतं ना कोणतं दु: होऊ दे,असा नवसच त्याच्या एका मित्राने जंग्योदेविला केला होता.
    000
    पाच
    मोहाची प्लस बकार्डीचा रसास्वाद घेता घेता तो ट्रांस मध्ये गेला.बिलच्या साठीच्या दिवशी जरी आपण त्याला हॅपी बर्थ डे म्हणू शकलो नसलो तरी आता एटापल्लीच्या वतीने बिलचा नागरी सत्कार करायचा हे मुकरुला या ट्रांस मध्ये असतानाच सुचले.गूड आयडिया म्हणत त्याने स्वत:ची पाठ थोपटली.मो प्लस बचा आणखी एक पेग त्याने पोटात रिचवला.त्याला आता हलकं हलकं वाटू लागलं होतं.इतकं हलकं की विजय मल्यांच्या किंगफिशर विमानातच तो बसलाय नि निघालाय बिल भाऊला भेटायला थेट न्यूयॉर्ककडे.
    मुकरुने डोळे मिटले होते.बिल भाऊ भेटेल आणि त्याला आपण कडकडून  मिठी मारु अशा कल्पनेत असतानाच मुकरुच्या वाड्यातील एका उंदिरानं त्याच्या पायाला चावा घेतला.त्यामुळे ओय ओय करत मुकरु किंगफिशर विमानातून खाली पडला. त्याच्या पोटातील मोहाची प्लस बकार्डी पातळ झाली.
    उंदिर त्याच्याकडे बघून मिशी हलवत होता. उंदऱ्या-भडव्या अशा शिव्या देऊन त्याला लाथ हाणावी अशी तीव्र इच्छा मुकरुला झाली.पण ही इच्छा त्याला दाबून टाकावी लागली.कारण त्याच्या बापानं मरताना आणखी एक सिक्रेट ओपन केलं होतं,ते म्हणजे उंदिर हाच त्यांचा कुलदैवत.त्यामुळे त्याला कधी त्रास देऊ नकोस की त्याला अंतर देऊ नकोस.त्यामुळे वाड्यात उंदरांनी उच्छाद मांडूनही एटापल्लीचा सरपंच असलेल्या मुकरुला काहीही करता येईना.तेव्हा समोर मिशी हलवत असलेला उंदिर बघितल्यावर त्याला डोळे मिटून मुकरुने दंडवत घातला.चुकलं माकलं असेल तर माफ कर.वाटल्यास दुस-याही पायालाही चाव असही तो म्हणाला.नो थँक्स,एवढच पुरे, असं काहीसं उंदिर म्हटल्याचं त्याला जाणवलं.त्याने डोळे उघडले.उंदिर तिथे नव्हताच.मुकरुने आपले डोके हालवले.मो प्लस जास्त तर झाली नाही ना म्हणून त्याने स्वत:लाच चिमटा घेतला.तो उंदराच्या चाव्यापेक्षा तिखट बसला,त्यामुळे मुकरु वेदनेनं विव्हळू लागला.तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपला हा कुलदैवत आपल्याला ठिकाणावर आणायलाच योग्य वेळी आला होता.बिल भाऊंचा नागरी सत्कार करण्याच्या एैतिहासिक निर्णयाला आपण मो प्लस च्या गुंगित विसरु नये म्हणूनच तो आपल्याला सावध करुन गेलेला दिसतो.मुकरुला त्याक्षणी बाप आणि कुलदैवत उंदिरही आठवला.त्याने दोघांनाही मनोभावे दंडवत घालून त्याने ग्रामसेवकाला मोबाईल लावला.
    000
    सहा
    ग्रामसेवक ताबडतोब वाड्यावर हजर झाला.मुकरुने त्याला आपली आयडिया सांगून रात्रीच ग्रामसभा बोलावण्याचा आदेश दिला.सरपंचाच्या आदेशाचे पालन करण्याचा धडा ग्रासेवकांना त्यांच्या प्रोबेशन पिरेड मध्ये शिकवला जात नसला तरी एटापल्लीच्या ग्रामसेवकाला सरंपच मुकरुने अनेक अर्थपूर्ण व्यवहारात पन्नासटक्केची भागिदारी दिल्यानं तो सरपंचाचे आदेश तळहातावर झेलायचा.
    मुकरुने सांगितल्यावर ग्रामसेवकाने रात्रीच्या ग्रामसभेची जोरदार तयारी केली.ग्रामपंचायतीच्या पटांगणात ग्रामसभा भरली.आख्खा गाव ग्रामसभेला गोळा झाला.एवढया तातडीनं ग्रामसभा सरपंचानं बोलावली याचा अर्थ कुणीतरी मोठा माणूस गचकला असावा अशी समजूत प्रत्येकानं करुन घेतली होती.त्यामुळे सुतकी चेहरे घेऊनच गावकरी ग्रामसभेला जमले.
    00
    सात
    ग्रामसभेच्या ठिकाणी आल्या आल्या मुकरुने आजची स्पेशल ग्रामसभा बोलाविण्याचा आपल्या हेतू सांगून टाकला.
    बील किंटन का फिंटनच्या साठीचा आपल्या गावाचा काय संब्ंाध..ग्रामसभेसाठी आलेल्या एका आजोबांनी विचारलं.
    बील किंटन आपल्या सरपंचाचा दोस्त हाये.ग्रामसेवकानं माहिती दिली.
    माहा दोस्त देवानंद हाये,त्याचा काऊन बा तुमी सोतकार का फोतकार करत.आजोबानं विचारलं.
    काऊन का ,तुमी सरंपच नायी ना.असं ग्रामसेवकाला बोलावसं वाटलं.पण नवा वाद नको म्हणून तो चूप बसला.बिलच्या साठीच्या नागरी सत्काराला एकमुखी पाठिंबा मिळत नाही असं दिसताच सरपंच मुकरुने माईक ताब्यात घेतला.तो गावकऱ्यांना म्हणाला..बिल माहा दोस्त असला तरी तो अमेरिकेचा राष्ट्रपती व्होता.
    कोनाचा पती होता जी..ग्रामसभेतल्या पन्नाशीच्या काकीनं विचारलं.
     अमेरिकेचा..
    होता, मनजे काय..आता नायी हाये का?
    नाही. तिकडे आठच वर्स राष्टपती राहता येते.
    मंग सोडचिठ्ठी का जी..हे तं बराबर नायी.असं बारबार सोडचिठ्ठी देनारा बिल तुमचा दोस्त आसो नायी तं फोस्त आसो. आपन कावून बा त्याचा सोतकार कराचा..?काकीनं पुन्हा सवाल केला.हा सवाल ग्रामसभेला चांगला पटल्याचं दिसलं.कारण हा सवाल संपल्याबरोबर सर्व गावकऱ्यांनी दे धूम टाळ्या वाजवल्या.
    000
    आठ
    राष्ट्रपती म्हणजे कोणाचा तरी नवरा अशी गावकऱ्यांची गैरसजूत झाल्याचे मुकरुच्या लक्षात आले.ही समजूत काढून टाकण्याचा त्याने आपल्यापरी बराच प्रयत्न केला.काहींना तो पटला तर काहिंना तो पटलाच नाही.बिलच्या नागरी सत्कारावरुन ग्रामसभेतच उभी फूट पडली.
    ग्रामपंचायतीतला विरोधी पक्ष नेता सखाराम कोडापे याने, दाल मे कुछ काला है, मुकरु बिल का दलाला है,अशी उर्त्स्फूत घोषणा द्यायला सुरुवात केली.घोषणेवर प्रतिघोषणा सुरु झाल्या.काही जण हमरीतुमरीवर आले.हे प्रकरण मारामारी पर्यंत पोहचण्याआधीच ग्रामसभा बरखास्त केलेली बरी असा शहाणपणाचा निर्णय घेऊन ग्रामसेवकाने ग्रामसभेची कार्यवाही स्थगीत केली.बील का दलाला हाय हाय अशा घोषणा देत विरोधी पक्षाचे नेते सखाराम कोडापेआणि त्याचे पाठिराखे निघून गेले.
    000
    नऊ
    बिलच्या साठीचा सत्कार करण्यासाठी एकमुखी पाठिंबा मिळत नसल्याचे दु: मुकरुला झाले.भैताड सालं गावं..असा वैताग व्यक्त करुन बिल वाड्यात आला नि पुन्हा मो प्लस चा रसास्वाद घेऊ लागला.तीन चार पेग झाले तरी दु: काही दूर होईना आणि हलकंही वाटेना.पाचवा पेग तोंडाला लावत असताना पुन्हा उंदराने त्याच्या डाव्यापायाच्या अंगठ्याला चावा घेतला.तोंडाजवळ पोहचलेला ग्लास हातातून निसटला..उंदऱ्या .भडव्या अशी शिवी मुकरुच्या तोंडातून बाहेर पडता पडता राहिली. त्याला बाप आठवला.त्याच बरोबर उंदीर हाच कोवा घरण्याचा कुलदैवत असल्याचेही आठवले.त्याने दोघांनाही पुन्हा दंडवत घातला.पायाला वेदना होतच होत्या.तो डोळे मिटून बसला.
    अर्ध्या गावाचा विरोध असला तरी बिलचा नागरी सत्कार घडवून आणायचाच याचा त्याने निर्धार केला.
    000
    दहा
    त्याने ग्रामसेवकला बोलावलं.ग्राम सडक योजनेचा किती निधी आपल्याकडे आहे अशी त्याला विचारणा केली.या निधीतून दहा हजार साडी चोळी विकत घेण्याचे फर्मान त्याने सोडले.
    रस्त्याचं का कराचं जी..ग्रामसेवकानं लांबोळा चेहरा करत विचारलं.
    रस्ता केला व्होता.दोन दिवसानं नक्सलवाद्यायनं उखडून टाकला असं कळवून देऊ पंचायत जिल्हा परिशदेले..व्होत्याचं नव्हतं कराले का लागते गा लोकस्याहीत.तुले तं माह्यापेक्साही चांगलं ठाऊक हाये.मुकरु म्हणाला.मुकरुच्या हुषारीचं ग्रामसेवकला कौतुक वाटलं.रस्ता झाला नाही म्हणून काय झालं.साडीचोळीद्वारे काही टक्क्यांच्या समृध्दीचा रस्ता तर  आपल्यासाठी निर्माण झाला,असं ग्रामसेवकाला वाटून त्याने मुकरुचा निरोप घेतला.
    000
    अकरा
    दोन दिवसात मुकरुकडे दहाहजार साड्याचोळया ग्रामसेवकानं आणून दिल्या.एटापल्ली ग्राम विकास समितिच्या आपल्या सदस्यांना मुकरुनं बोलावलं.त्यांना आपला प्लान समजावून सांगितला. कोणत्याही परिस्थितीत बिलच्या साठीचा भव्य कार्यक्रम आपण करायचाच हे त्याने कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं.
    गावकऱ्यांचं मन वळविण्यासाठी गावातल्या प्रत्येक बाईला आपला कार्यकर्ता साडी चोळी नेऊन देईल.अशी त्याने योजना समजावून सांगितली.बिलची साठी..घ्या चोळी साडी..असा नारा त्याने दिला.या नाऱ्याचे बॅनर्स तयार करण्यात आले.एटापल्ली ग्राम विकास समितीचा मोर्चा धुमधडाक्यात निघाला.मुकरु मोर्च्याच्या अग्रभागी होता.बिलची साठी.. घ्या चोळी साडी, या घोषणेनं गाव दुमदुमून गेला.मोर्चाचा पहिला पाडाव विरोधी पक्षाचे नेते सखाराम कोडापे यांच्या घरी पडला.त्याच्या घरी पोहचता क्षणीच मुकरुने खडया आवाजात कोडापेच्या बायकोला वयनी म्हणून हाक मारली.
    वयनी दारातून बाहेर आल्या.
    पाया पडतोजी तुमच्या असं म्हणून मुकरुने वयनीच्या पाया पडून त्यांच्या हातात साडी चोळी दिली.बिलनं पाठवली जी.त्यानं सांगितलं..बिल भौच्या सत्काराले जरुर येजाजी,असं सांगून मुकरुचा मोर्चा पुढे सरकला.
    000
    साडी चोळीची मात्रा चांगलीच लागू पडली.ना नात्यातला का गोत्यातला. तरीबी बिलने आपली आठवण ठेऊन साडीचोळी पाठवली.बिलचं देव भलं करो.असंच एटापल्लीतली प्रत्येक भगिनी म्हणू लागली.बिलच्या सत्कारासाठी असलेला बायकांचा विरोध मावळला.बायकांना साडी चोळी पाठवणारा बिल आपल्याला नक्कीच पँट शर्ट पाठवेल असं वाटून पुरुषांनीही आपला विरोध बाजूला सारला आणि बिलच्या सत्कारासाठी आख्खी एटापल्ली एक झाली.
    000
    बारा
    हे तं करप्सन हाये..लोकायचा माईंड करप्ट केला मुकरुने..अशी प्रतिक्रिया सखराम कोडापेनं एटापल्ली बुद्रुक टाईम्सकडे नोंदवली.ही प्रतिक्रीया छापून आल्यावर गावातल्या सगळया भगिनींनी एटापल्ली बुद्रुक टाईम्सवर मोर्चा काढला.कोडापेच्या घरावरही मोर्चा गेला.
    हाय हाय हाय हायच्या घोषणा देणाऱ्या मोर्चात आपली बायकोही सामील झाली हे बघून कोडापे बेशुध्दच झाला.
    000
    सखाराम कोडापेमुळे आपला पँट शर्टचा मोका हुकेल असं गावातल्या पुरुष मंडळींना वाटलं.हे काही बराबर नाही.सोताले काय साला हरिचंद्राचा अवतार समजतो का?अशी प्रतिक्रिया देत एटापल्ली ग्राम विकास सभा आणि एटापल्ली ग्राम विकास मंचच्या पुरुष सदस्यांनी एकत्ररित्या एटापल्ली बुद्रुक टाईम्स आणि सखाराम कोडापेच्या घरावर मोर्चा काढला.या मोर्चात आपल्या पक्षाची नेते मंडळी आणि कार्यकर्ते सामील झाल्याचे बघून सखाराम दुसऱ्यांदा बेशुध्द पडला.
    00
    साडीचोळीची कल्पना इतकी रंग भरेल हे मुकरुलाही वाटले नाही.एका साडीचोळीने त्याने विरोधी पक्षाला भूईसपाट करुन टाकले होते.
    000
    तेरा
    सगळया देशात दुफळीचं वातावरण असताना एटापल्ली गावातच एकता आणि एकात्मतेचं वातावरण कसं काय निर्माण झालं असावं,याचं आश्चर्य मुंबई आणि दिल्लीच्या सरकारला वाटलं.धिस इज समथींग स्ट्रेंज,असं घडू कसं शकतं. सचिव, गृहमंत्र्यांना म्हणाले.
    घडू शकतं काय म्हणता..असं घडलेलं आहे.त्याचे रिपोर्टस आपल्याकडे आले आहेत. गावच्या सरपंचाने ही कमाल घडवून आणली आहे.एकता आणि एकात्मतेसाठी विरोध असणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बायकोनेही या नेत्याच्या विरोधात मोर्चा काढल्याचे आपल्या रिपोर्टात नोंदवण्यात आलं आहे.गृहमंत्र्यांनी सचिवांना माहिती दिली.
    धिस इज स्ट्रेंज.
    सचिव साहेब हे प्रत्यक्ष घडलं आहे..
    एकता आणि एकात्मतेचा फार्म्युला शोधून काढणाऱ्या सरपंचाला आपण दिल्लीत बोलावून त्याचा सल्ला घ्यायला हवा.मंत्री म्हणाले.त्यांनी त्यांच्या सचिवांना एटापल्लीत जावून सरपंच मुकरुला सन्मानाने आणण्याचे आदेश दिले.
    0000
    चौदा
    मुकरुला अनपेक्षित असलेली ही घडामोड घडली होती.बिल भाऊंच्या साठीच्या सत्काराची कल्पना आपल्या राष्ट्रीय पातळीवर नेईल असा त्याने कधीही विचार केला नव्हता. ग्राम सडक योजना ज्या भल्या व्यक्तिच्या डोक्यातून निघाली त्याचे मुकरुने मनातल्या मनात हजारवेळा आभार माणले.तो सचिवांसह दिल्लीला निघाला.
    बिलच्या साठीचा सत्काराच्या आयडीयेनंतर आपल्या सरपंचाला दिल्लीत बोलावलं गेलं, याचं गाववाल्यांना भलतच अप्रूप वाटलं.मुकरु जैसा नेता पहले हुवा नही और चांद सुरज असेपर्यंत पुढे होणार नाही असे बॅनर्स एटापल्लीतच नव्हे तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातही लागले.गडचिरोली जिल्हा परिषेदला आपल्या जिल्ह्यातल्या सरपंचाचा गौरव म्हणजेच आपलाच गौरव वाटला. मुकरु दिल्लीवरुन परतल्याबरोबर जिल्ह्याच्या मुख्यालयी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय सत्कार करण्याचा  जिल्हा परिषदेने ठराव केला.हा ठराव एकमुखाने पास झाला.मुकरुसाठी ही दुधात साखर होती.सरपंच ते जिल्हापरिषेदेच्या अध्यक्षपदाकडे जाणारा मार्ग सुकर होत असल्याचं त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.त्याने बिलला मनोमन दंडवत घातला.
    000
    पंधरा
    गृहमंत्रालयातील सचिवांनी मुकरुला सन्मानानं दिल्लीला नेलं.दिल्लीत साउुथ ब्लॉकमध्ये गृहमंत्र्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं.एकता आणि एकात्मतेचा असा आविष्कार घडवून आणणाऱ्या मुकरु सारख्या नेत्यांची देशाला आत्यंतिक गरज असून असे दहा वीस नेते जरी निर्माण झाले तर राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेसाठी शासनाला कोट्यावधी रुपये खर्च करण्याची गरज भासणार नाही.असं त्यांनी मुकरुला सांगितलं.मुकरुचं, एटापल्ली मॉडेल ऑफ एकता आणि एकात्मता,संपूर्ण देशात लागू करण्याचा आपला मानस असल्याचे ते म्हणाले.कौतुक एैकून मुकरु हरखून गेला.त्याने एकाच वेळेस जंग्योदेवी,त्याचा स्वर्गीय बाप,कुलदैवत उंदीरस्वामी आणि बिलचे कृतज्ञापूर्वक स्मरण केले.
    000
    सोळा
    गृहमंत्र्यांनी मुकरुची भेट पंतप्रधांनासोबत घडवून आणली.त्यांना मुकरुच्या पराक्रमाबद्यल आधीच ब्रिफ करण्यात आलं होतं.
    पंतप्रधानांनी मुकरुची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.लगे रहो मुन्नाभाईसारखच त्यांनी दटे रहो मुकरुभाई,असा सल्ला दिला.होल नेशन इज प्राऊड ऑफ यू असंही सांगायला ते विसरले नाहीत.
    तुमच्या या पराक्रमावर आम्ही खुष असल्याने तुम्हाला काय हवं असल्यास ते नि:संकोच मागा. असं ते म्हणाले.
    गावातल्या एकता आणि एकत्मेसाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या साडीचोळीचा मार्ग ग्राम सकड योजनेतून गेल्याचं त्याच्या लक्षात होतं.हा मार्ग आपल्याला इतर अशाच पवित्र कामी सत्कारणी लावता येईल हे लक्षात घेऊन त्याने ग्राम सडक योजने अंतर्गत  एटापल्लीसाठी वाढीव निधी देण्याची मागणी पंतप्रधानांच केली.
    पंतप्रधानांनी आपल्या सचिवांकडे बघितलं.
    एखाद्या गावाला स्वतंत्र निधी देता येणं नियमात बसत नाही.आपण निधी देतो.संबधित गावाची जिल्हापरिषद त्या निधीचं वाटप करतं.असा नियमावर बोट ठेवणारा खुलासा सचिवांनी केला.पंतप्रधान काही सेकंद विचारमग्न झाले.मुकरुला तर त्यांनी शब्द दिला होता.आता काय करायचं?त्यांनी डोळे उघडले आणि पीएम मदत निधीचं चेकबूक आणायला सचिवांना सांगितलं.या मदत निधीतून आम्ही तुला खास बाब म्हणून निधी मंजूर करत आहोत, असं सांगून त्यांनी चेकवर आकडा लिहिला.सचिवांनी चेकवर सही करुन मुकरुकडे तो सुपूर्द केला.चेक हातात पडल्यावर मुकरु धन्य धन्य झाला.
    दिल्लीत जंग्योदेवीचं मंदिर असतं तर तिथेच जाउुन त्याने नारळं फोडला असता.पण असं मंदिर नसल्याने एटापल्लीला गेल्यावरच त्याला आपला भक्तिभाव व्यक्त करता येणार होता.या विचाराने तो हळवा झाला.त्याने पंतप्रधानांना वाकून नमस्कार केला.गृहमंत्र्यांनाही वाकून नमस्कार केला.
    मुकरुला सन्मानाने एटापल्लीला खास विमानाने पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
    000
    सतरा
    नागपुरात उतरल्यावर विमानतळावरुन मुकरुने सर्वात आधी रेमंडचं दुकान गाठलं.गावातल्या सर्व पुरुष मंडळींना पुरेल इतके पँट पिस आणि शर्ट पिस घेतले.
     त्याने ग्रामसेवकाला बोलावून ठेवलेच होते.
    पेमेंट कुठून जी..त्याने मुकरुच्या कानात विचारलं.
    मुकरुने त्याला पीएम मदत निधीचा चेक दाखवला.
    ग्रामसेवकाच्या डोळयातून आपल्या सरपंचाबद्यलचं कौतुक ओसंडून वाहू लागलं.
    000
    अठरा
    दिल्ली गाजवून मुकरुची स्वारी एटापल्लीत पोहचली. एटापल्ली विकासमोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरी जाउुन पुरुष मंडळींना पँट पिस आणि शर्ट पिस दिला.
    बीलच्या साठीला विरोध करणाऱ्या गावच्या विरोधी पक्ष नेते सखाराम कोडापेंचा सर्वांनी एकमुखाने निषेध केला.मात्र मुकरुने त्याला माफ करुन स्वत: त्याच्या घरी जाऊन पँट आणि शर्ट पिस दिला.
    000
    आपली चूक झाल्याचे कोडापेने कबूल केले.पुन्हा ग्रामसभा बोलावण्याचा आग्रह धरला.या आग्रहाचा मान राखण्यासाठी मुकरुने ग्रामसभा बोलावली.
    यात सखाराम कोडापेने तोंड फाटेस्तोवर मुकरुची स्तुती करुन मुकरुच आजन्म एटापल्ली ग्रामपंचायतीचा सरपंच राहावा असा ठराव मांडला.तो ठराव एकमतानं मंजूर झालाच पण मुकरुचा पोरगाही आपोआपच सरंपच होईल अशीही  दुरुस्ती ग्रामसभेने सुचवली.तिही मान्य झाली.
    00
    एकणोवीस
    बील भाऊंची साठी आपल्यासाठी इतकी भाग्यशाली ठरेल याची जराही कल्पना केलेला मुकरु तर भारावूनच गेला.ग्रामसभा संपल्यावर त्याने थेट ज्यंगोदेविच्ंा मंदिर गाठलं.देवीच्या पायावर मस्तक ठेवलंं.देवीला तो म्हणाला
    बीलची साठी अशीच दरवर्षी आली तर नागरी सत्कार करत करत मी थेट जिल्हापरिषदेच्या आणि पुढे मुंबईच्या सिहांसनावर बसू शकेन देवी..तेव्हा तू बीलची साठी दरवर्षीच येउु दे..त्याला यावर्षीही साठीचा आणि पुढचे अनेक वर्षे साठीचाच ठेव...तू असं जर केलं ना तर तुझं मंदिर मी न्यूर्याक आणि वाश्गिंटनला बांधीन.असा नवस मुकरुनं ठेवला.मस्तक वर  करुन देविच्या डोळयाकडे बघितलं.देविचे डोळे चमकल्यासारखे झाले..मुकरुला कौल मिळाला होता.
000
    मंदिरातून बाहेर पडल्या पडल्या बील भाऊंच्या साठीच्या नागरी सत्काराचं निमंत्रण देण्यासाठी तो परमप्रिय मित्र बिल भाऊ आणि हिलरी वहिनींना भ्रमणध्वनी करु लागला..
    0000
    सुरेश वांदिले
   वाय 1/15 शासकीय वसाहत वांद्रे पूर्व
   मंुबई 51
   9324973947

No comments:

Post a Comment