Wednesday, January 11, 2012

लिलोचं ह्रदय परिवर्तन

लिलोचं ह्रदय परिवर्तन

एक
      कालपरवा मला एक प्रश्न पडला.तो कदाचित मुर्खपणाचा असू शकतो.प्रश्न हा होता की,गांधी बाबा झालेच नसते,तर काय झालं असतं?
* कदाचित आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते,
* गांधी नावाचा चित्रपट निघाला नसता,
* माझे सत्याचे प्रयोग,हे पुस्तक लिहिले गेले नसते,
* सेवाग्रामचा आश्रम स्थापन झाला नसता,
* गांधी टोपी अस्तित्वात आली नसते ,अशी काही उत्तरे या प्रश्नाच्या अनुषंगानं देता येतील.या प्रश्नाच्या उत्तरात आणखी एक पैलू जोडला गेलाय .त्याचीच ही चित्तर कथा..
0000
      दोन
गांधी बाबा हे केवळ स्वातंत्र्य युध्दाची रणनीती ठरवत नसत.तर ते एकाच वेळेला अनेक गोष्टी करीत असत.आजच्या भाषेत मल्टी टास्कर होते.ते उत्तम संपादक होते.ते प्रचंड पत्रे लिहीत.ते त्यांच्या आश्रमांमध्ये अनेक प्रयोग करीत.ते सल्लागार म्हणून कार्य करीत.देशातील मोठ मोठी नेतेमंडळी त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत.त्यांनी चरखा संघाची स्थापना करुन एक नवी चळवळच उभी केली.शिवाय ते पॉझिटीव्ह थिंकर होते.त्यांनी प्रसंगपरत्वे जे चिंतन केले त्याचा फायदा तत्कालीन सर्वांनाच झाला. सध्याही तो अनेकांना होत आहे.पण त्यांच्या एका चिंतनाचा प्रभाव लिंडसे लोहान वर पडला आणि तिने 2011 मध्ये गांधी बाबांचे तत्व अंगिकारण्याचे जाहीर
केले.
000
तीन
ज्यांचं जनरल नॉलेज कमकुवत असेल त्यांना
ही लिंडसे लोहान कोण?असा प्रश्न  पडला असेल. कथेच्या नदीचा प्रवाह पुढे नेण्याआधी लिंडसे लोहान कोण,हे सांगणं आवश्यक ठरतं..
      तर..लिंडसे लोहान ही अमेरिकेतील असंख्य मदनिकेमधील एक मदनिका होय.प्यारसे उसे लिलो नामसे बुलाया जाता हेै.ती तशी वय वर्षे 20 मध्ये आहेच.मदनिका असल्याने फटाकडी असणे ओघानेच आले.शिवाय ती हॉलिवूडची हॉट नटी आहे.नटी असल्याने तिचे अनंत नखरेही आले.तिला अल्पावधतीच यश मिळाले.ऑस्कर नॉमिनेशन मिळाले.त्यामुळे लिलोला आभाळ ठेंगणे वाटू लागले.हे सगळं वय वर्षे 18च्या आधी घडलं.लिलो उधळली.गुण उधळू लागली.
      अमेरिकन नट्या गुण उधळतात तेव्हा खालील बाबी त्यांच्या बाबतीत घडतात.
1)प्लेबॉय(जगातील तमाम रसिक पुरुषांचं लाडकं मासिक) मासिकाच्या सेंटर स्प्रेडवर म्हणजे मधल्या पृष्ठांवर आपल्या अंग-गुणांचे यथाशक्ती दर्शन घडवितात.त्यानंतर हॉट-बेब ऑफ इअर ,असा गौरव या मदनिकेला प्राप्त होतो.किंबहुना असा गौरव प्राप्त व्हावा यासाठी प्ले बॉय च्या मध्यवर्ती पृष्ठावर आपली छबी कधी झळकते यासाठी या मदनिका देव पाण्यात घालून बसतात.नवस बोलतात.ज्यांनी संधी मिळते.त्यांची पुढे सोनं-हिरे-चांदी-प्लॅटिनम सारं काही होतं..
2)लिंगरी म्हणजेच महिला-हॉट बेब ऑफ इअरचा गौरव प्राप्त झाला की अंर्तवस्त्राच्या जाहिरातींमध्ये मॉडेल
म्हणून त्यांना करारबद्द करण्यासाठी या कंपन्या तयारच असतात.या मदनिकांना तेच हवं असतं.कारण अंर्तवस्त्राच्या जाहिरातींमध्ये काम करणं म्हणजे आपलं हॉटनेस कूलली मार्केटमध्ये आणणं.चर्चेत आणणं.
3)लिंगरीची जाहिरात प्रसिध्द झाली की हॉलिवूडच्या सी ग्रेड चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागतात.या क्षणासाठी या मदनिका आसुसलेल्या असतात.
4)मादकता-सेक्सिता-अभिनयता वगैरे टॅलेंट जरा जास्त असेल तर बी ग्रेड ते एक ग्रेड चित्रपटांमध्ये त्यांना संधी मिळू लागते.
 5)अशी संधी मिळते तेव्हा मग अशा मदनिकांसाठी  आभाळ ठेंगणे होतं.ठेंगणं आभाळ नि अवती भवती मधाळ पुरुषांची सोबत.मग काय विचारता,या मदनिका अनेक पुरुषांशी डेटिंग करतात.म्हणजे प्रणय -बाजी सुरु करतात.
6)या प्रणय बाजीचा कंटाळा आला की संबधित पुरषाला टाटा करतात.हा पुरुष मग त्यांचा कायम स्वरुपी गुड फ्रेंड होतो.
7)ही प्रणय बाजी सुरु करण्याआधी त्या स्मोकिंग करायला लागतात. मग चैन स्मोकर होतात.मग सिगारेटच्या एैवजी काही  बाही स्मोक करायला लागतात.या काही बाही मध्ये अर्थातच जगातले यच्चयावत मादक पदार्थ असतात.शिवाय हॉलिवूडवाल्यांसाठी स्पेशल पदार्थही असतात.
8)सगळया प्रकारची दारु ढोसतात नि रात्रभर पार्टी करुन दंगामस्ती करतात.
9)त्यांच्या कांतीवरील मर्यादित कपडयांची बटन मध्येच कुठल्यातरी फंक्शनला तुटते नि तो ड्रेस झर्रदिशी खाली येतो.तिथे चटकन फोटोग्रॉफर प्रगटतो.नि ते छायाचित्र क्षणात नेट-फेसबूक -यू ट्यूबवगैरेच्या मार्गाने जगभर पोहचते.
10)प्रणय लिला करण्यासाठी त्यांना एका वेळी एक किंवा दोन पुरुष लागतात शिवाय एक किंवा दोन गर्लफ्रेंडही लागतात.
11)अशी चव बदलवित राहणे ही फॅशन नव्हे तर प्रयोग असतो.मुक्त जीवन जगण्याचा.
12)कदाचित पुरुष किंवा गर्ल फ्रेंड बरोबर लग्न उरकले जाते.
12)लग्न म्हणजे वर्ष दोन वर्षात किंवा त्याआधीही मोडण्यासाठी पाद्र्यांच्या साक्षिने केलेला करार आणि मित्रमंडळीना यथेच्छ दारु पाजण्यासाठी  त्यानंतर गोंधळ करण्यासाठी केलेला समारंभ असल्याने लग्न मोडले जाते.ते मोडल्याचा आनंद दारु पिऊन साजरा केला जातो.
13)दारु पिऊन,प्रचंड नशाबाजी करुन गाडी चालवून अपघात केले जातात.
14)त्यासाठी अशा मदनिकांना अमेरिकेतील न्यायालयं दयामाया दाखवता शिक्षा सुनावतात.
15)ही शिक्षा भोगण्यासाठी रिहॅबिलीटेशन म्हणजेच पुनर्वसन केंद्रात या
मदनिकेला पाठविले जाते.
000
चार
      तर उपरोक्त सर्व भानगडी केलेली महिला म्हणजेच अमेरिकन नटी अशी व्याखा करायला हरकत नाही.या व्याखेत ही लिलो परफेक्ट बसते.वरच्या सर्व भानगडी 18 वर्षाच्या आतच ती करती झाल्याने ती जगप्रसिध्द होण्याला कितीसा वेळ लागणार.जनरेशन नेक्स्ट तर तिच्या प्रेमातच आहे.म्हणजे जे या जनरेशन नेक्स्टला करता येत नाही ते ही यूँव करते आणि करतच राहते.
      --पोलीस तिला पकडतात.
      --तुरुंगात टाकतात.
      --न्यायालयात खटला चालतो.
      --न्यायाधीश शिक्षा ठोठावतात.
      --शिक्षा संपली की पुन्हा तिचे धुमशान सुरुच.
      --पुन्हा पोलीस-तुरुंग -न्यायालय-शिक्षा.
      --चक्र सुरुच.
      --मौजच मौज.
      --पुन्हा तेच.
      --आता रिहॅबिलीटेशन केंद्रात.
--सुधारणेसाठी.
--तिथे मग स्पेशल ट्रीटमेंट वगैरे.
      --इतर सामान्यांचा त्याला विरोध.
      --त्याची बातमी.
      --आणि या साऱ्याला अमाप प्रसिध्दी.
000
पाच
      तर अशी ही मदनिका लिलो या चक्रात सापडली.हे दुष्ट चक्र असूनही ती सापडत राहिली.एैन ज्वानित तिचा रंगीत-संगीत काळ असा एकांतवासात जाउु लागला.
-लिलो ही गॉन केस असल्याचे मिडीया लिहू लागली.
-लिलो कॅन डाईड एनी टाईम असं तिची मदर म्हणाली.
-तू तिला चांगले संस्कार शिकवलेस नाही म्हणून असं घडतय..फादर म्हणाला.
-माझा फादरच माझ्या या गडबड-गोंधळाला जबाबदार आहे-लिलो म्हणाली.
-लिलो इज मॅड-फादर म्हणाला.
-माझा फादर ,फादर म्हणून घेण्याचा लायक नाही.तो माझ्या संपत्तीवर डोळा ठेऊन आहे-लिलो म्हणाली.
      असा हा फॅमिली ड्रॉमा रंगू लागला.जगभरात पोहचला.पोलीस-तुरुंग-न्यायालय-शिक्षा-रिहॅबिलिटेशन केंद्र-वकील या चक्रात लिलोचे काही कोटी रुपये खर्ची पडले.हॉलिवूड स्टँडर्डने लिलो गरीब झाली.काहींच्या मते ती दारिद्रय रेषेखाली पोहचली.तिला तिचे राहते घर विकावे लागले.
      चित्रपटात ,म्युझिक व्हीडीयोत,जाहिरातीत काम द्या काम द्या अशी भीक लिलोला (पण यासाठी डोण्ट से बिच्चारी.एबीसीएलचं जहाज पुरतं बुडालं तेव्हा अमिताभ नव्हते कां म्हणाले ,याला त्याला  की काम द्या काम द्या. म्हणून..लिलोच्या जगातलं वागणं हे असचं असतं..)
मागावी लागली.अशा कथा प्रसृत झाल्या.लिलो बद्दल सहानुभूती निर्माण झाली.
0000
सहा
लिलोला दृष्टांत
      माझी चूक झाली.आता बाई मी पुन्हा असं करणार नाही,ती मिडीया जवळ म्हणाली.आता मी नवं आयुष्य जगणार.कारण मला नवा दृष्टांत झालाय.असही ती म्हणाली.हा दृष्टांत लिलोला झाला तो गांधी-बाबांमुळे.
      गांधीबाबांचे एक वचन आहे की,तुमचा उद्याचा कालावधी हा आजच्या तुमच्या कर्तव्य आणि कर्मावर अवलंबून आहे.उद्याचा जन्म आजवर अवलंबून आहे.तो उत्तम -उत्कृष्ठ हवा असेल तर आज तुम्ही स्पॉटलेस वागायला हवं.
      लिलोच्या वाचनात हे वचन आलं नि तिच्या डोक्यात सूर्यप्रकाश पडला. गॉड,मी काय करत होते..मला माझच कळत नव्हतं.पण गांधी बाबांनी मला दिशा दाखवली.गॉड, मी सुधारणार..मी पूर्वीची लिलो राहणार नाही.मी आजचा दिवस स्पॉटलेस राहील असच वागेन..कारण उद्याचा दिवस मला गोल्डन करायचाय..
00000
सात
      लिलोचं हे कथन गेल्याच आठवडयात सर्व जगभरात प्रसृत झालं.भारतीय इंग्रजी वृत्तपत्रांनी लिलोच्या मादक छबीसह ते ठळपणे छापलं.गांधी बाबांनी या देशाच्या कोट्यावधी लोकांना दिशा-दिग्दर्शन केलं.ते आता लिलोसाठी मार्गदर्शक ठरताहेत.आपल्याकडे गांधीबाबा फक्त  तसबिरीपुरते मर्यादित झाले असताना तिकडे अमेरिकेत लिलोच्या ह्रदयात ते विराजमान झाले आहेत.
000
आठ
लिलोचे अभिनंदन
      लिलोला ही सद्बुध्दी सुचल्याबद्दल तिचे मी फेसबूकवर अभिनंदन केले.
      तो संवाद असा होता-
      लिलो-थँक्स
      मी-लिलो तुझ्या आतापर्यंतच्या अनुभवांवर आधारित पुस्तक लिही यार.
      लिलो-नो नो.सत्य सांगणं मला परवडणार नाही बाबा.अनेकांची लफडी बाहेर येतील.
माझंही ,आणखी भलतचं रुपडं बाहेर पडायचं.नो..नो काही गोष्टी अंधारातच राहिल्या तर आपला प्रकाश काळवंडत नाही..
      मी-तू,सत्याचे प्रयोग नावाचा ग्रंथ वाचला नाहीस काय?
      लिलो-नाही बुवा.कुणी लिहिलाय?
      मी-गांधी बाबा.       लिलो-कोण ते?या प्रश्नावर आमचा फेसबुकी संवाद थांबला.
000
नऊ
      लिलोच्या प्रश्नाचं उत्तर देण्याएैवजी, माझे सत्याचे प्रयोग,हे पुस्तक तिला मेल केलं.हा ग्रंथ वाचल्यावर लिलो सुध्दा, माय एक्सपेरिमेंटस वुईथ ट्रुथ ,असा एखादा ग्रंथ लिहील आणि तो लगेच फेसबूकवर येईल,असा मला विश्वास आहे.
      वेट अँड वॉच.
000000
लिलोचा ()( )मेल
      लिलोने ,
      माय एक्सपेरीमेंटस वुईथ ट्रुथ हे पुस्तक वाचले काय?
      हे पुस्तक वाचल्यावर तिच्या मनात कोणते भावतरंग उमटले असतील?
      हे भावतरंग तिचे ह्रदय परिवर्तन करण्यास यशस्वी ठरले असतील काय?
      असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील.मलाही पडले.त्यामुळे लिलोच्या उत्तराची मी वाट बघू लागलो.तो दिवस सुध्दा उगवलाच.
      त्यादिवशी लिलोचा इमेल आला.
      इमेल मध्ये काय होतं.. ?
      लिलोने सुरुवात अशी केली..
      माय डिअर सुशु.(देवाची कृपा तिने सु-शी असे संबोधले नाही.)पुस्तक मिळाले.वाचून मस्त वाटलं.म्हणजे कसं वाटलं हे तू विचारु नकोस.मस्त इज मस्त.तो तुमचा महेश मांजरेकर नाही का म्हणत ,एखादा परफार्मंस त्याला आवडला की..मस्त मस्त..तसं हे मस्त..सॉरी फॉर डिटेल डिस्क्रीप्शन..पण मस्तला दुसरा पर्यायी शब्द नाही.
      आता पुस्तकावर माझं निरीक्षण सांगते..इट इज वंडरफूल.
      म्हणजे ते वाचनीय आहेच.यात शंकाच नाही.हे माझं म्हणणं मी तपासून घेण्यासाठी पुस्तकाची प्रिंट लाईन बघितली. माय गॉड,असच माझ्या मुखातून बाहेर आलं ,कारण माझ्या हातातलं पुस्तक हे 76 वी आवृत्ती होती.डोंच्यू यू थिंक धिस इज वंडर फूल.पुस्तक इतकी विकतात.हे मला ठाऊकच नव्हतं.ब्रिटनी स्पीअर्स आणि मायकेल जॅक्सनच्या रेकार्डस आमच्याकडे आणि हिमेश रेशमीयाच्या रेकार्डस तुमच्याकडे एवढया विकल्या जातात,एव्हढच माझं नॉलेज होतं.पण या पुस्तकानं माझ्या नॉलेजमध्ये वृध्दी केली.थॅक्स फॉर दॅट सुशु.(या पुस्तकाच्या इतक्या आवृत्या निघाल्या हे मला सुध्दा कुठे ठाऊक होतं..थँक्स लिलो.)झक्कास की नाही  हे सारं.
      तो तुमचा अनिल कपूर सध्या आमच्या हॉलिवूडमध्ये खूप काम करतो ना..तेव्हा तो,सारखं सारखं झक्कास झक्कास करत असतो.आय थिंक या पुस्तकासाठी झक्कास इज परफेक्ट वर्णन ठरतं.झक्कास शब्दाचा शोध लावल्याबद्दल अनिल कपूरला एखादा अवार्ड देता येईल का बघ. @ ..अवार्ड बद्दल मी लिहिलेय नाही का..
      मला म्हणायच होतं की या पुस्तकाला खूप सारे अवार्ड मिळाले असतील.बूकर मिळालं का.नोबल तर नक्कीच असेल.आणि तुमच्याकडचा ज्ञानपीठ..यू नो,आय नो ,ज्ञानपीठ पुरस्कार.ते कसं ते विचारशीलच.म्हणूनच सांगते.. सोप्प आहे रे बाबा.गो टू गूगल..यू गेट एव्हरीथिंग..हा..हा..जाऊ दे विनोद बाजूला.पण या पुस्तकाला मिळालं असेलच नाही का
ज्ञानपीठ पुरस्कार.म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हंटल की पुस्तक रिडेबल म्हणजेच वाचनीय आहे.अशी फक्त हॅरी पॉटर सिरीजची पुस्तकं होती म्हणतात.म्हणतात कारण ऍ़क्च्युएली मी ती वाचली नाहीत ना..कारण आय वाज बिझी वुईथ सो मेनी थिंग्स(लिलोला म्हणायच आहे की ती दारु-सिगारेट-रोमांस-ड्रग्ज-लग्न-काडीमोड-पुन्हा लग्न-तुरुंग, वगैरे या सोमेनी थिग्ज मध्ये बिझी होती.)
      रिडेबल याचा डिक्शनरितला अर्थ असा की एकदा पुस्तक हातात घेतलं की ते वाचून पूर्ण झाल्याशिवाय खालीच ठेवायचं नाही.किंवा ठेवलं जात नाही.त्याला वाचनीय म्हणतात.नाही तर सलमान रश्दीची पुस्तकं. ती शोचनीय असतात..असं एका समिक्षकानं लिहिलेलं मला गुगलवर दिसलं होतं.मुद्दा असा की हे पुस्तक फंटास्टिक आहे.
      पुन्हा पुन्हा मला असच वाटतं की पुस्तक असावं तर असं.आयडियल.पुस्तक कसं असावं ,हे एखाद्या नवोदित लेखकाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी हे पुस्तक प्रयोगशाळाच आहे की.ग्रेट ग्रेट..माझं मलाच कौतुक वाटू लागलय.कारण यू नो..एक्सपेरिमेंटस हे प्रयोगशाळेत करतात. या पुस्तकाच्या नावातच एक्सपेरिमंेट आहे.बघ उत्तम पुस्तक हाती आलं की आपली प्रतिभासुध्दा कशी बहरते आणि खुलते सुध्दा.हे पुस्तक उत्तम श्रेणीपासून सुरु होते आणि अत्युकृष्ठ श्रेणीपर्यंत जाते.न्यूयॉर्क टाईम्सच्या पुस्तक परीक्षणाच्या कॉलम मध्ये उत्कृष्ठ पुस्तकाला चार स्टार देतात.मी माझ्या वतीने आणखी एक वाढवून या पुस्तकालासाठी फाईव्ह स्टार करते.फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जी शांतता असते तशी शांतता या पुस्तकाच्या वाचनासाठी ,चिंतनासाठी आणि त्यानंतरच्या मननासाठी आवश्यक आहे.तेव्हाच त्याचा खरा अर्थ कळू शकतो.हे जरी खरं असलं तरी त्यामुळे मी या पुस्तकाला फाईव्ह स्टार दिले नाहीत.हे तू लक्षात घे.पुस्तक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आहेच कारण ते तू पाठवले आहेस.भारतातून जे येतं ते असंच असतं.यू नो..यूवर एैश्वर्या  रॉय(च्या मायला ही कधी माझी झाली.)तिच्या क्वालिटीवर हॉलिवूड फिदा आहे ना.त्यामुळेच मला वाटू लागलय की पुस्तक असावं तर हे अस्सं.आजपर्यंत असं पुस्तक मी बघितलले नाही.हे कबूल करायला मला अजिबात संकोच नाही.कर नाही तर डर कशाला.पण आता हे पुस्तक माझ्या हातात आलेय.त्यामुळे मी तर भारावूनच गेले आहे.मला अलिबाबाची गुहा मिळाल्यासारखी वाटते.रिऍ़लिटी मध्ये अशी काही गुहा आहे की नाही हे मला माहीत नाही..पण असली तर ती या पुस्तकासारखीच असली पाहिजे.संपन्न आणि समृध्द.हे पुस्तक तुमच्या मनाला संपन्न आणि समृध्द करतं.हीच या पुस्तकाची स्टेंग्थ आहे.ही स्ट्रेंग्थ आपल्याला पहिल्याच शब्दात जाणवते आणि पुढे मग आपण त्याप्रभावातून बाहेरच पडत नाही.आमच्या हॉलिवूडवर मर्लिन मन्रोचा प्रभाव आहे ना.तसाच.म्हणजे मी काही तिला बघितले नाही.कारण माझा जन्म झाला तेव्हा तिचा मृत्यू होऊन 15 वर्षै झाली होती.पण पुढे मी 16 वर्षाची झाली तेव्हा फ्रॉक वर नेणाऱ्या मर्लिनच्या जगप्रसिध्द पोजचं रिमेक मी केलं होतं.त्यामुळे ती मला माहीत झाली.तेव्हा कळलं की तिचा प्रभाव असा असा आहे.या पुस्तकाचाही प्रभाव असा असा आहे ,हे मला हे पुस्तक हातात घेतल्यावर जाणवलं.यू नो..प्रभाव का?कारण शब्दांवर हुकूमत.म्हणजे इकडचा तिकडे शब्द नाही.चपखल.जबदस्तच.मघापासनं हा शब्द आठवत होते की समथिंग मिसिंग इन माय वर्णन ऑफ बूक..जबरदस्त हा एकच शब्द चोख बसतो.माईंड ब्लांेईंग हा आताचा नवा शब्द झालाय.त्याला जबरदस्तची सरच नाही.अशी पुस्तके शतकातून एकदाच कधी तरी होतात.पण तू हे मला कळवलं नाहीस की हे पुस्तक कोणत्या शतकातलं आहेत.ते कळव बरं का..लवकरच..वाट बघतेय..तुझीच लिलो..सुशू..
000
दहा
      इथे लिलोने मेल संपवला.पुस्तक कोणत्या शतकातलं आहे हे विचारुन लिलोने
माझी विकेटच घेतली.
लिलोचा सत्या..
      तुम्ही म्हणाल,या लिंडसे लोहानला कां एवढे चिटकून बसलात .(एवढे कुठे भाग्य आपले..)कुठे आपले सिंधुदुर्ग आणि कुठे तिचं सॅनफ्रँसिस्को.असं असताना ती कां काळयावर पांढरी होते..हा तसा व्हॅलिड प्रश्न आहे.पण काय करणार,जेव्हापासून लिलोेला गांधीबाबा यांचा साक्षात्कार झाला.तेव्हापासून तिच्यावर ट्रॅक ठेवणं भागच पडतय ना.शिवाय भारतीय मिडियानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर बरं झालं असतं की नाही.पण ते अमेरिकेतल्या मिडियापेक्षाही लिलोच्या प्रेमात जास्तच पडलेय. लिलोचं तिकडे हिस्स झालं की इकडे फिस्स होतं.त्यामुळे लिलो सारखी सारखी नयनीच शिरते.
      तिला महिन्याभरापूर्वी गांधीबाबांचा साक्षात्कार झाला. मी तसं तसं त्यांच्या सारख वागणार वगैरे ती चिवचिवली.त्याचा गाजावाजा झाला की.पण महिन्याभरताच तिला बाबांचा विसर पडला.
000
अकरा
      त्याचं असं घडलं..की ती परवा एका ज्वेलरीच्या दुकानात गेली होती.संपूर्ण दुकान फिरुन झाल्यावर तिला एक सुंदरसा नेकलेस आवडला.सुंदर तरुणिंना नेकलेस आवडणार नाही तर काय ,पुरुषांना आवडणार की काळ्या कुत्रिला आवडणार.तिला हा नेकलेस आवडला आणि तो विकत घेण्याचा तिचा विचार पक्का झाला..तिने पर्स मध्ये हात घातला.हा नेकलेस विकत घेण्या इतपत तिच्याकडे डॉलर्सच नव्हते.इकडे डॅालर नाही नि तिकडे तर नेकलेस.म्हणजे आपल्याकडच्या ,इकडे आड तिकडे विहीर सारखं.लिलोच ती.तिने विहीरीत उडी घ्यायचं मनोमन पक्क केलं. आणि घेतली की उडी.ग्रेट..किती ही साहसी.या उडितून तिच्या हाती आला तो तिला आवडलेला नेकलेस.. लिलो मोहरली.फक्त ती डान्स करायची तेव्हढी राहिली तेव्हा..पण तिचा आनंद हा क्षणभरच टिकला..कारण तिच्या साहसाला म्हणजे विहीरीत उडी मारण्याला ज्वेलरीच्या दुकानातल्या कॅमेराने टिपले.
      त्या कॅमेराला ते काही साहस-बिहस वाटले नाही.तर त्याला ती चोरी वाटली..यू नो..चोरी..म्हणजेच लिलोने चोरी केली ..असं तो कॅमेरा शोर मचवू लागला.सुरक्षा रक्षक धावले नि लिलोला पकडले.झालं..चोर लिलो,अशी ब्रेकिंग न्यूज जगावर आदळली.भारतातही इंग्रजी पेपरांच्या नदीतून मार्ग काढीत भाषिक पेपरात जहाजासारखी फिरली.हे वाचून तुम्हाला वाईट वाटणार की नाही..नाही वाटलं तरी काहीच फरक पडत नाही कारण लिलो ही काही आपली साळी वा मेव्हणी नाही.
000
बारा
      लिलोचे ग्रह फिरले हे यावरुन जरी दिसून येतं .पण आपण लक्षात घ्यायला हवं की ,चोरी लिलोने केली होती.ती काही कुणी शामा-श्रीदेवीने केली नाही..लिलो म्हणजे ऑस्कर विनर वगैरे ..तिला काही इंर्म्पाटंस आहे की नाही..हे त्या अमेरिकन दुकानातल्या स्पाय कॅमेराला नको का कळायला..त्याला नाही कळलं ते..पण दुकानाच्या मालकाला तर कळायला हवं.
      लिलोसारख्या विशीतल्या पोरिटोरींना नटण्याची ,मुरडण्याची हौस असतेच की.पेारगी अमेरिकेतली असो की ऑॅफ्रिकेतली की मंगळावरची,ओबामांची असो की अंबाणींची,डब्बेवाल्यांची असो की अमिताभची ..दागिणे घालून नटणे हा त्यांचा जन्मसिध्द अधिकारच असतो.भारतात हा अधिकार ब्रम्हदेवाने आणि अमेरिकेत ख्रिस्ताने दिलेला असतो.तो अधिकार या तरुणी गाजवतच असतात.
त्यात गैर ते काय? असतात.या अधिकारप्राप्तीसाठी वाट्टेल ते करु शकतात.अधिकार प्राप्तीसाठी काहीही करण्याचं स्वातंत्र्य जार्ज वाश्गिंटन ,माओ,लेनिन वगैरे मंडळींनी भूतकाळात घेतलं होतचं की..लिलोनेदुसरं काय केलं बरे..तिच्या अधिकारावर अतिक्रमण करणारा कॅमेराचा निषेध करावा तेव्हढा कमीच की नाही.अमेरिकेन्स सारखे स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असतात असं सांगितलं जातं आणि आपण एैकत असतो तरी सुध्दा ते लिलोच्या बाबत मात्र अपवाद करीत आहेत.ही मानवी हक्काची पायमल्ली सुध्दा ठरु शकते.पण हे त्यांना सांगणार कोण.एखादे वेळेस वाघाच्या गळयात घंटा बांधता येईल.पण सापाच्या गळयात कशी बांधणार.
000
तेरा
तर सध्या लिलोला चोर ठरविल्याने ती दु:खात आकंठ बुडाली  असेल म्हणून मी तिला भ्रमणध्वनी केला.
-लिलो ,वाचून दु: झाले..तुझ्यावरच संकटाची मालिका कां कोसळावी गं..
-संकट ..कसले संकट..
-तुझ्यावरील चोरीचा आरोप गं..
-व्हॉट आरोप..
-नेकलेस चोरिचा गं..
-आरोप कुठाय तो..
-मग..
-सत्य आहे ते..
-व्हॉट..
-एस्स..
-अगं पण हे सत्याचे प्रयोग कशासाठी..किती बदनामी होते त्यामुळे..किती दु: होतं तुझ्या चाहत्यांना.
-व्हॉट नॉन्सेस.
-म्हणजे गं बाई..
-चाहत्यांनी दु: करण्यासारखं काय आहे त्यात.
-काहीच नाही का गं..
-नो नो नथिंग..
-आणि बदनामी..
-कसली बदनामी..
-ही बदनामी पण नाही
-नो नो ..
-म्हणजे तुला काहीच कसं वाटत नाही..
-वाटत की..
-वाईट वाटतं ना..
-नाही डॉर्लिंग. वाईट नाही..मस्त वाटतं..
-ते कसं काय.
-चोरी करायला करेज म्हणजे हिम्मत लागते..ते एक साहसच असतं..
-चोरी आणि साहस..
-एस्स.और तो और ,चोरी केल्यावर ती आपणच केली हे सांगायला आत्मविश्वास लागतो..
-आत्मविश्वास..लिलो तू कोणत्या जगात आहेस गं..
-मी सत्याच्या जगात आहे.हे माझे सत्याचे प्रयोग आहेत..गांधीबाबांनी दाखविलेल्या मार्गावरुन मला खरोखरच चालता येतं की नाही हे मला बघायचं होतं.परवाचा माझा मेल विसरुन जा..मी आता डिफरंट लिलो आहे..आय ऍ़म नॉट चोर..सत्याच्या प्रयोगाचा हा एपिसोड मी घडवून आणला आणि तो सुपर हिटट झाला..
-बरं बाई..असं बोलून मी भ्रमणध्वनी बंद केला..
      लिलो ही सत्याच्या विश्वात अशी रममाण होईल.याची कल्पना मी स्वप्नातही करु शकलो नसतो.
      मला रामगोपाल वर्माचा सत्या आठवला नि मी त्याची डीव्हीडी शोधू लागलो.
000
सुरेश वांदिले
वाय1/15,शासकीय वसाहत,वांद्रे पूर्व मुंबई 51

No comments:

Post a Comment