Saturday, January 21, 2012

एक फाईल प्रवासाला निघाली

एक फाईल प्रवासाला निघाली
   विनायकराव कारेमोरे यांच्या हुषारी बद्यल कुणालाच संशय नव्हता.मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत असणा-या विनायकारावांची डिमांड सर्व सचिवांकडे फार मोठी होती.त्याचं कारण म्हणजे विनायकरावांचा कोणत्याही फाईलकडे बघण्याचा प्रॅक्टिकल दृष्टिकोन.त्यांच्याकडे आलेली फाईल मंत्री महोदय किंवा सचिव यांना पाहिजे तशी रंगविण्यात ..रांगवण्यात आणि अनेकदा दौडवण्यात किंवा गरज भासेल तेव्हा झोपवण्यात त्यांच्या पेनची बरेाबरी गेल्या पंचेवीस वर्षात कुणी करु शकलेलं नव्हतं.
   000
      सचिवांचे रिमार्क्स हे मंत्र्यांच्या इच्छेशी सुसंगत नसतील आणि मंत्री महोदयांना ही विसंगती  आपला स्वाभिमान आणि सन्मान यांना जराही ठेच पोहचू देता दूर करायची असल्यास ते विनायकरांवाना बोलावून घेत.राष्ट्र-महाराष्ट्र आणि समाजाचे व्यापक हीत लक्षात ठेऊन फाईल क्लियर करण्यास विनायरावांना सांगितलं जाई.विनायकराव सुध्दा ही इच्छा शिरसांवद्द माणून फाईल ओके कशी होईल यासाठी स्वत:च्या सामाजिक न्यायाच्या सद्सदविवेक बुध्दीला बरोबर जागृत करत.लालफितीचा अडसर दूर केल्याच्या आनंदात  संबंधित लाभार्थ्यांच्या यादित खास बाब म्हणून विनायकरावांचा समावेश केला जायचा.असं वर्षानुवर्ष सुरु होतं.विनायकरावांची ही ख्याती त्यांना प्रशासकीय कौशल्याच्या दृष्टिने हॉट प्रॉपर्टी करुन गेली होती.हे नव्यानं सांगायचं म्हणजे वांगं कसं सोन्याचा बटाटा झाला असं सांगण्यासारखं ठरतं.
      000
   विनायकरावांच्या प्रगतीची घोडदौड अशी हुसेन यांच्या घोड्यासारखी नव्हे पण त्यांचा माधुरी दीक्षितवरील घोडाचित्र विकत घेण्या येण्याइतपत होत राहिली.हुसेनचा माधुरी-घोडा चित्र त्यांच्या दिवाणखान्यात ज्या महिन्यात लटकले त्यानंतर दोनच महिन्यात त्यांचा शासकीय निवासस्थानासमोर पेजारोही हलू - डुलू लागली.
      000
   खात्याचे सचिव साहेब परदेशात प्रशिक्षणाला गेल्यानं कायम फायलिंगच्या गराडयात अडकलेल्या आणि आकंठ बुडालेल्या विनायरावांना आज निवांत भेटला होता.मंत्रालयातील आपल्या दालनात स्वस्थ बसून ते टेबलाखाली लावलेल्या गावाकडील महाराजांच्या तसबिरीकडे एकाग्रचित्तानं बघत होते.या महाराजांच्या कपादृष्टिमुळे आपण मंत्रालयातील मंत्री ते सचिव अशा दोन ध्रुवांना सांधणारा स्ट्रांग पूल बनू शकलो असा त्यांचा ठाम विश्वास होता.त्यामुळेच दरवर्षी ते एकदातरी महाराजांच्या मठ दर्शनासाठी जाणे चुकवित नसत.महाराजांचा मोठा भक्त मठात आल्याने मठही दसरा-दिवाळीच्या आनंदात न्हाऊन जायचा.या मठाचे यूनिक सेलिंग पाईंट विनायकराव कधी झाले हे त्यांना सुध्दा कळलं नाही.
      000
   सतत यशाच्या मनोऱ्यावर झुलणाऱ्या विनायकरावांवर कुणाची तरी कृपादृष्टी असावी याविषयी त्यांच्या खात्यातील इतर विभागातील सहकाऱ्यांशी खात्री होती.त्यामुळे ही कृपादृष्टी कुणाची यावर ते बारीक लक्ष ठेउुन होते.हे लक्ष त्यांना त्यांच्या लक्षापर्यंत पोहचविण्यास सक्सेसफूल ठरलं.विनायकराव भक्तिभावानं जाणाऱ्या महाराजांच्या मठाचा मार्ग त्यांनाही कळला.त्यामुळे लवकरच कक्ष अधिकारी ते सह सचिवांपर्यंतचा भक्ती प्रवाह मठापर्यंत विस्तारित झाला.काही सचीव महोदयही पुढील प्रमोशन ते पोस्टिंग याबाबत रिस्क नको म्हणून मठ दर्शनार्थी झाले.
      000
   महाराजांचे मठ असणारे गाव आडोशाला असल्याने तिथे नेहमी जाणे जरा अडचणिचे होते.त्यामुळे मठाचे उपकेंद्र मुंबईला उघडण्याची कल्पना विनायकरावांना सुचली.शिवाय मंुबईत उपकेंद्र होणं म्हणजे मठाला ग्लोबल चेहरा प्राप्त करुन देणे हाही हेतू होताच.शिवाय भविष्यात त्याचा विस्तार लंडन-टोकियो-पॅरिस ते न्यूयॉर्कपर्यंत करणं हे मुंबईच्या उप-केंद्रामुळे सोप्प ठरलं असतं याची खात्री विनायकरावांना होती.महाराजांच्या ग्लोबल मठाचं मॅनेजिंग डायरेक्टर हे पद त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीत उपकेंद्र मंुबईत उघण्याचा निर्धारच त्यांनी केला.
      000
   उपकेंद्रासाठी मोक्याची जागा मिळवणं हा प्रॉब्लेम ठरणार नाही याची विनायकरावांना खात्री होती.मंुबईत मोक्याच्या जागा कुठे कुठे आहेत हे त्यांच्या मंत्रालयातील नगर विकास खात्यातील आणि जिल्हाधिकारी कार्यातील मित्रंाना ठाऊक होतं.कागदावर असलेली जागा मित्रांनी त्यांना प्रत्यक्ष दाखवली.त्यानंतर निवेदन लिहिलं गेलं.प्रस्ताव तयार केला गेला.या प्रस्तावात कोणतीही त्रुटी राहू नये याची डोळयात तेल घालून विनायकरावांनी काळजी घेतली होती.प्रस्तावावर मंत्री महोदयांची सही झाली. अशा परिपूर्ण प्रस्तावाची फाईल बनवली गेली.उत्तम मुहूर्त शोधून फाईलला पुढच्या प्रवासासाठी संबधितांकडे पाठविण्यात आले.आपले काम यूँव होईल याबद्दल विनायकरांवाच्या मनात जराही शंका नव्हती.
      000
      खरं तर फाईलचा प्रवास स्मुथली व्हायला हवा की नाही.
      पण झाले विपरित.
   विनायकरावांसारख्या प्रॅक्टिकल उपसचिवांशी संबधित  फाईल,महाराजांच्या मठाच्या जागेचा विषय, अनेकांच्या श्रध्देचा प्रश्न या फाईलशी निगडित असूनही फाईल मंुबई-पुणे एक्सप्रेसवे या गुळगुळीत रस्त्यावरुन धावता  एटापल्लीतल्या आदिवासी पाडयातील खडबडित रस्त्यावरुन चालू लागली.गुळगुळीत रस्त्यावरुन गाडी किमान 80 किलोमीटर आणि कपाळमोक्ष करुन मोक्षधामाला पोहचू शकेल अशा वेगाने धावते.मात्र पाड्यातील खडबडित रस्त्यावरुन गाडी 20 किलोमीटरच्या वेगानेही पुढे जात नाही. रस्त्यावरील खड्डे,उडालेली गिट्टी,रस्त्यावरचा धुराळा यामुळे गाडी स्पीडच घेत नाही.ती मध्येच गचके खायला लागते.पेशंस असेल तर पुढे सरकण्याची हिंम्मत दाखवता येते. अन्यथा प्रवास तिथल्या तिथेच घुटमळत राहतो.
   विनायरावांच्या फाईलचं नेमकं असच झालं.
   फाईल खडबडित रस्त्याला लागली.
   000
   ही फाईल गुळगुळीत रस्त्यावर आणण्यासाठी विनायकराव आपले सोर्स आणि रिसोर्स वापरु लागले.पण खडबडित रस्त्यावरुन फाईल गुळगुळीत रस्त्यावर येईचना.इतक्या वर्षाचा प्रॅक्टिकलचा स्वानुभव असुनही विनायकराव हतबल झाले.महाराजांच्या मठाला जागा देण्यास विरोध कुणाचा असण्याचा प्रश्नच नव्हता.पण जागा राखीव होती.अशी जागा अराखिव करणं नियमात बसत नव्हतं.कक्ष अधिकाऱ्यानंे फाईल मध्ये हाच नियम कोट केला. अवर सचिवानं त्यावर मोहर लावली. उपसचिवानेही महाराजंाचं भक्तिभावानं स्मरण करुन आपलं काही कोट(कोटी)कल्याण हेातं का हे बघितलं.पण तसे काही नियम-उपनियमात बसत नाही हे लक्षात येताच त्यांनी ही फाईल अभ्यासासाठी आपल्या जवळ महिनाभर ठेऊन घेतली.
      000
   महिना उलटल्यावर विनायरावांनी संबधित उपसचिव साहेबांना टच केले,तेव्हा आपल्या(स्टडी)टेबलाखाली ठेवलेली फाईल चर्चा असा शेरा लिहून या उपसचिवाने अवर सचिवांकडे पाठवली.फाईलचा प्रवास असा पुढच्या दिशेने म्हणजे सचिवांकडे होण्याएैवजी ती आणखी एक घर मागे मागे गेली.चर्चा शेरा बघितल्यावर अवर सचिव गालात हसले. त्यांनी मनातल्या मनात सखोल चर्चा करुन फाईल कपाटात ठेऊन दिली.
      000
   विनायकरावांचा प्रॅक्टिकल जीव तीळ तीळ तुटू लागला. हेच काय फळ मम तपाला असं त्यांनी एक हजार वेळा स्वत:ला विचारलं.सरकारी सेवकांना नोकरशहा हे नामाभिधान ज्या प्रज्ञावंताला सुचलं त्याचं त्यांना या परिस्थितीतही कौतुक वाटले.नोकर असुनही शहा असणारे अपने मर्जी के मालिक राहू शकतात आणि फाईलच्या मूव्हमेंट वर भीमसेनाची गदा आणू शकतात अस विश्लेषण त्यांच्या डोक्यात सुरु झालं.पण स्वत:च्याही मनात असणारा शहा सुध्दा अनेकदा असाच वागून अनेक फाईलचा पत्ता काटत होता  नि काही फाईल्सची पतंग उडवत होता ,हे त्यांना आठवल्यानं या तर्क दुष्ट खरं तर मनाला अवघडून टाकणाऱ्या विश्लेषणात विनायकराव फार अडकले नाहीत.
      000
   अवर सचिवाला त्यांनी फाईल विषयी काही दिवसांनी आठवण करून दिली.महाराजांच्या मठाचे उपकेंद्र मुंबईत होणं हे कसं पुण्याचं काम असल्याचं प्रवचनचं दिलं.
   ते सगळं ठीक आहे साहेब ,पण नियमात बसत नसताना पुण्य कसं पदरात पाडून घेणार.नियम मोडला तर पापच लागणार नाही का?असं पाप महाराजांना सुध्दा खपणार नाही.असा रोकडा सवाल अवर सचिवानं केला.त्याने जीआर सुध्दा दाखवला.
   जीआररुपी नागीण नेमक्या वेळीच अंडर सेक्रेटरींच्या मदतीला कां येते? कां ही मंडळी प्रॅक्टिकल अप्रोच घेत नाही?विनायकरावांना प्रश्न पडला.
   त्यांच्या पुढे आलेल्या अशा समस्या आणि प्रश्न ते चुटकीसरशी सोडवत.
   जीआरचा अर्क कसा काढायचा हे तर आपल्याच हाती असतं. जीआरमधील अर्थ इंटरप्रीट केला की पुरे.उपसचिव त्यावर कोंबडा मारणार,सचिव कोंबडी बसवणार.याच कोंबडीचा अंडा प्रधान सचीव उबवणार.पण असं आपल्या फाईलच्या वेळेला कां हेात नाहीय.महाराजांचा मठ याच जागेवर झाला तर त्यांचे आशीर्वाद केवळ आपल्याच मिळणार नाही तर ज्यांचा हातभार लागला त्यांचीही समृध्दी वृध्दिंगत होईलच.विनायकराव डोक्यावर हात ठेऊन विचार मग्न झाले.
   त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा संबधित सचिवांनाकडे वळवला.त्यांना महाराजांची महती सांगितली.विस्तारित केंद्राची उपयुक्तता पटवून दिली.या उपकेंद्राला ग्लोबल होण्याची कशी क्षमता आहे हे त्यांनी सचिवांना पटवून दिलं.सचिव साहेबांनी मास्टर ऑफ इंटरनॅशल बिझिनेस या विषयावर पीएचडी केली असल्याने त्यांना ग्लोबलायझेनची महती चांगलीच ठाऊक होती त्यामुळे त्यांनी फाईल पॉझिटिव्ह करतो म्हणून विनायकरावांना आश्वासन दिलं.
   000
   सचिवांवर विश्वास ठेऊन विनायकरावांनी फाईल मुव्ह करण्यासाठी अवर सचिव आणि उपसचिवांना हलवले आणि डुलवले.तेव्हा ती फाईल नियमानुसार शक्य नाही,या शेऱ्यांसह सचिवांकडे गेली.हा शेरा बघितल्यावर सचिवांचा आनंद गगनात मावेना.त्यांनी विनायकरावांना तात्काळ बोलावलं. शेरा दाखवला.डोण्टवरी पूर्ण अभ्यास करुन नक्कीच मार्ग काढतो, असे पॉझिटिव्ह उत्तर दिले. अभ्यास आणि मार्ग काढतो असे दोन शब्द विनायकरावांच्या मेंदूत कोरले गेले.सचिव साहेब अभ्यास करणार म्हणजे नेमकं काय करणार,हा प्रश्न विनायकरावांनी स्वत:ला विचारला.सचिवांच्या पॉझिटिव्ह उत्तराने मात्र विनायकराव निगेटिव्ह झाले.महाराजांनीच चमत्कार केला तर आता मठासाठी जागा मिळू शकेल असं त्यंाना वाटलं.
      000
   सचिव साहेब विनायकरावांना दिलेल्या शब्दाला जागले.त्यांनी फाईलीतील विषयाच्या अनुषंगाने सर्व पैलूंचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला.तज्ज्ञ समितीत राज्यातील 25 मान्यवरांचा समावेश करण्याचं ठरलं. निर्णय देण्यासाठी समितीला सहा महिन्याचा कालावधी देण्यात आला. विनायकरावांना बोलावून त्यांना सचिव साहेबांनी ही  माहिती दिली.या समितीचे सदस्य सचिव म्हणून विनायरावांची नियुक्ती करण्यात आली.
      000
   मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी या समितीची यादी पाठविण्यात आली.मंत्रीमंडळाने समितितील नावांविषयी आक्षेप घेतला.यादी सर्व समावेशक नसल्याचं स्पष्ट केलं. समाजातील सर्वघटकांना स्थान मिळेल अशी यादी बनवा.महिना दोन महिने लागले तरी चालेल असे आदेश सचिवांना दिले गेले.सर्वसमावेशक म्हणजे काय या प्रश्नाचे मात्र उत्तर कुणीच दिले नाही. मंत्रिमंडळाची बैठक संपल्यावर प्रत्येक मंत्र्याकडून 8 ते 10 नावे समितीसाठी सुचवण्यात आली.एका साध्या समितीसाठी 300च्या आसपास नाव रिकमंड झाल्याचे बघून सचिवांना धक्काच बसला.
      000
   फाईल मूव्ह झाल्यापासून आता एक वर्षाचा काळ लोटलाय.समितिची स्थापना अद्याप होऊ शकली नाही.
   केाणत्याही 25 नावांवर  बहुमत होत नाहीय.प्रश्न आहे त्याच ठिकाणी आहे.
   मठाच्या विस्तार कंेद्रासाठी आपण मंुबईत जागा मिळवून देऊ शकत नाही याचं शल्य विनायकरावांना टोचत आहे.मठाला ग्लोबल करण्याचं आपलं स्वप्न असं गोल गोल फिरत राहील ही कल्पनाच विनायकरावांना सहन होत नाहीय.
   सचिवांना अनेक कामे करावयाची असल्याने तेही हा इश्यूच पॉझिटिव्हली विसरुन गेले आहेत..
   000

No comments:

Post a Comment