Monday, January 9, 2012

कोंबडीचा नातेवाईक

कोंबडीचा नातेवाईक
   मुकरु एडका कोवा कधीही,केव्हाही आणि कुठेही कोंबडा-कोंबडी अँड किंबू(कांंेबडी आक्का लाडात आल्यावर आपल्या पिल्लाला म्हणजेच चिकनला किंबू या नावाने जवळ बोलावते.)फॅमिलीवर ताव मारु शकतो हे सत्य समस्त एटापल्लीवासियांना ठाऊक झालं होतं.सर्वसामान्य माणसांच्या घरी मूल जन्मतं तेव्हा ग्राईप वाटर दिलं जातं.पण मुकरुचं कुटुंब हे असामान्य, त्यामुळे मुकरु जन्मल्यावर त्याने पहिल्ंा टँव टँव केलं नि त्याच्या आज्जीनं त्याच्या तोंडांत ग्राईप वॉटरच्याएैवजी कोंबडीच्या तंगडीचं सूप टाकलं होतं.तेव्हापासूनच मुकरुच्या जिभेला कोबडीची चटक लागली.पुढे ही चटक त्याला चिटकली.कांेबडीची गोडी दिवसागणिक वाढतच गेली.
   मुकरु वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या बापानं एटापल्लीला कोंबडा+कोंबडी+किंबू पार्टी दिली होती.सुदैवानं म्हणा की कुदैवानं म्हणा तेव्हा बर्डफ्ल्यूचा वारा जोरात वाहत होता. त्यामुळे पोल्ट्री फार्मने एका कोंबडीवर चार पाच कोंबड्या मोफत ठेवल्या होत्या.त्यामुळे मुकरुच्या बापानं मोकळया ढाकळया हातानंच कोबडी फॅमिली गावाला खिलवली होती.जंग्योदिवीच्या मंदिराजवळ असलेल्या विहिरीतलं पवित्र पाणी सगळया कोंबड्यांवर टाकल्यानं बर्ड फ्लूचा इफेक्ट शून्यापेक्षाही खाली गेल्याचं ग्रामसेवकानं भोंग्याद्वारे गावात कळविण्याची चोख व्यवस्था केली होती.फुकटातली मोहाची,फुकटाचा चकना नि फुकटाची कोंबडी असा खासा बडा खाना-पिना असल्याने एटापल्लीच नव्हे तर आजूबाजूची इटूक-मिटूक गावेही मुकरुच्या पहिल्या वाढदिवासाची मेजवाणी झोडायला अतिउत्साहानं गोळा झाली होती.
   या समारंभात मुकरुने आख्खी एक कोंबडी फस्त केल्याचं कौतुक मुकरुचा बाप आाणि आज्जा ते गचकेपर्यंत सांगत होते.या कोंबडी पुराणावरुन मुकरुची  चिकन-इटिंग हिस्ट्री(अर्थातच कांंेबडी हादाडणे) अशी दैदिप्यमान असल्याचं लक्षात आलच असेल.
   मुकरु वयानं वाढत गेला आणि त्याच्या पोटात  दिवसागणिक कोंबडा+कोंबडी+किंबू जात राहिले.त्याची गणती करणही आता शक्य नाही. प्रसंग दु:खाचा असला काय नि आनंदाचा असला काय मुकरुला काहीच फरक पडत नसे.दु:खाच्या प्रसंगी तो कोंबडीवर अश्रू ढाळत ,हुंदके देत देत मोहाची घ्यायचा.मात्र आनंदाच्या प्रसंगी कोंबडी सोबत मोहाची आणि  दारु निर्मिती सम्राट आदरणीय विजय मल्यासाहेबांनी पाठवलेली रम घेत घेत पार्टी साजरी करायचा.
   मुकरु एटापल्लीचा सरंपच झाला नि त्याने रोजगार हमी योजनेतून कोंबडा+कोंबडी+किंबू फार्मच उघडला.या फार्ममधील पन्नास टक्के कोंबड्या सरपंचांना सरकारी कामासाठी भेटावयास येणाऱ्या पाहुण्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद त्याच्या ग्रामसेवकानं ग्रामसभेत एकमताने करुन घेतली होती.असं करताना त्यातला पाच टक्के वाटा आपल्याला मिळाला पायजेल असा अलिखित करार त्याने सरंपच मुकरु सोबत करुन घेतला.अपने बाप का कुछ नही जाता असं म्हणून मुकरुनं या करारास मान्यता दिली.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कोंबडा+कोंबडी+किंबू फार्ममधील फुकटातल्या कोंबडया दररोज सरपंच आणि ग्रामसेवकाच्या घरी येऊ लागल्या.महिन्या दोन महिन्यात एकदा मुकरु ग्रामसभेलाच फुकटात कोंबडी खिलवू लागला त्यामुळे गावकरीही खुष झाले.ग्रामपंचायतीच्या सदस्यांकडे तो उदार अंत:करणाने अधून मधून कोंबडया पाठवू लागला.त्यामुळे कोणतीच हाक ना बोंब होता कोंबडा+कोंबडी+किंबू फार्मची रोजगार हमी ..तुम्ही सुखी,आम्हीपण सुखी या तत्वावर जोरात सुरु राहिली..
   000
   या कोंबडी पुराणाला पुन्हा उजाळा देण्याचं कारण म्हणजे श्रीलंकेच्या क्रिकेट टिमने भारताचं फुस्स केलं. त्यादिवशी दु:खाचा भामरागड,नैराश्याचा हमालय आणि वेदनेचा सह्याद्रीे आपल्या डोक्यावर कोसळला असं मुकरुला वाटलं नि हे दु: हलकं करण्यासाठी त्याने कोंबडी पेटवली.मोहाची रिचवली.दोनचार दिवसात मुकरु या दु:खातून बाहेर पडला.तसे कारणही घडले.त्यामुळे मुकरुला पुन्हा कोंबडी पार्टी करण्याची संधी मिळाली.
    ज्या कोंबडीवर तो त्याची बायको सुखाबाईपेक्षा जरा जास्त प्रेम करतो त्या  कोंबडीचा जवळचा नातेवाईक कोण,याची खबरबात त्याला कळली.अमेरिकेत काहीच कामधंदा नसलेल्या एका सो-काल्ड संशोधकाने कोंबडीच्या नातेवाईकाचा शोध लावला होता.मुकरुच्या दिलात घुसलेल्या राणी मुखर्जीच्या फोटोजवळच ही बातमी पेपरात छापून आल्याने मुकरुची नजर त्या बातमीवर पडली.चिकनी प्लस चिकन असा हा हा मामला असल्यानं त्याच्या डोक्यात कोंबडीचा नातेवाईक कोण हा शोध डोक्यात फिट्ट बसला.
   कोबडीचा जवळचा नातेवाईक अर्थातच कोंबडा नव्हता.कोंबडीवर भारी प्रेम करणारा मुकरु कोंबडा दिसला की आंबट.. हेकड,वाकड चेहरा करायचा. जसंं एैश्वर्याशिवाय अभिषेकला शोभा येत नाही तसं कोंबड्याबिगर कोबडीले शोभा येत नाही. असं सुखाबाईनं पाचपन्नास वेळेला सांगितलं पण मुकरुचं मेरी मुर्गी की एकच टांग.दिसला कोंबडा की झाला त्याचा चेहरा आंबट.त्यामुळे कोंबडा हा कोंबडीचा सख्खा नातेवाईक असूनही मुकरुला ते मान्य नव्हतं.त्यामुळे कोंबडीचा जवळचा नातेवाईक कोण,हे कळल्यावर मुकरुला हर्षवायूच झाला.त्याने तडक जंग्योदविचं देऊळ गाठलं नि देवीच्या पायावर मस्तक ठेऊन कोंबडीचा जवळचा नातेवाईक शोधण्याची बुध्दी अमेरिकेतल्या शास्त्रज्ञाला दिल्याबद्यल देविचे आभार माणले.
   000
   शास्त्रज्ञ अमेरिकेतला..शोध लावला कोंबडीच्या नातेवाईकाचा..आणि एटापल्लीतला मुकरु आपले कां आभार माणतो हे जंग्योदेविला कळले नाही.तिला मुकरुच्या या वागण्याचं खुपच आश्चर्य वाटलं..देविला आपलं आश्चर्य लपवता आलं नाही..
   तुले काऊन बा एवढी खुसी झाली.ज्यंगोेदेविनं मुकरुला विचारलं.
   माय ,तुले तं मालूम असलं नं कोंबडीचा नातेवाईक कोन ते.
   कोन बा.
   माय डायनोसार नावाचा एक पक्षासारखा प्रानी व्होता.लय उंचा तगडा,त्याच्या फुढं आम्ही माणसं चिलटावाणीच.तू डोये बंद करुन 1 लक्स वर्षामागं जा,म्हनजे तुले डायनोसार दिसलं.समजा नाहीच दिसला मी तुले ज्युरासिक पार्क पार्ट एक पार्ट दोन दाखवतो.त्येच्यात डायनोसारची गोस्ट हाये.
   बरं मंग.
   तर असा हा लंबा,चौडा,तगडा,उडू भी सकनारा डायनोसार कोंबडीचा जवळचा नातेवाईक निघाला.
   असं का..पन तुले काऊन बा एवढी खुसी झाली.जंग्योदेविनं पुन्हा विचारलंं.
   आवो माय,मले ह्येच्यासाठी आनंद झाला का आता आपल्या किरकेट पटूयनं ह्यापुढं फक्त सकायी नास्ट्यात,दुपारच्या लंचमंधी आन नाईटच्या डिनरमंधी कोंबडीचं खाल्ली पायजेल.म्हनजे ते डायनोसारखे इस्ट्रांग व्हतील. जवा जवा मैदानात उतरतील तवा तवा डायनोसारची ताकत दाखवून दुसऱ्या संघाचा खुर्दा उडवतील.एटापल्लीची कोंबडी सचीनन खाल्ली की मंग तो डायनोसारवानीच धावून धावा काढनं.सौरभ डायनोसारवानी बॅट फिरवन.जहिरखान डायनोसारवानी धावून बॉलिंग करन.आन हरभजनसिंगले कायीच जमल नायी तं डायनोसार वानी दात विचकावून समोरच्याले मुतालेच लावन.मंग कोणाची हिम्मत राहील माय आपल्या इंडियाले हरवण्याची.असं म्हणून मुकरुने जंग्योदेविकडे बघितलं.जंग्योदेवी आपल्या हुषारीवर खुष होउुन कौतुकाने बघत असल्याचा भास मुकरुला झाला.
   म्हणजे आता तुमच्या किरकेटपटूयले कोंबड्याची गरज हाये मनना.जंग्योदेविनं विचारलं.
   कोंबडयाची नायी माय डायनोसारची.आजच्या जमान्यात डायनोसार कोठून भेटनार.आता त्याचा जवळचा नातेवायकाचा सोध लागलाच हाये.हा नातेवाईक मुबलक परमानात हाये.आपल्या गावात कोंबडा+कोंबडी+किंबूचा फार्मभी हाये. आता एकच फार्म हाये..लवकरच आख्खा भाम्रागडच कोंबडा+कोंबडी+किंबू फार्मात बदलवून टाकीन. डायनोसारच्या नातेवाईक असलेल्या कोंबड्या मी आपल्या किरकेटपटूले अर्ध्या किमतीत सप्रेम भेट पाठवत जाईन.देशासाठी मी एवढा त्याग करायले तयार हाये वो माय.प्रत्येक कोंबंडी मागं एक रुपया तुह्या दानपेटीत टाकत जाईन..फक्त आपल्या किरकेट पटयूनं कोंबडयाच खाल्या पायजेल हे एवढ तू सायबाच्या कानांमधी जावूनशान सांग..
   पन एटापल्लीच्या कोंबडा+कोंबडी+किंबू फार्मातल्याच कोंबड्या डायनोसारच्या नातेवाईक कस्यावरुन समजाच्या.जंग्योदेविनं विचारलं.आणि मुकरु विचारात पडला.कारण हा प्रश्न सगळयांनीच विचारलं असता. आता माहितीचा अधिकार जोरात वाजू लागल्याने शेंबडं पोरगही माहितीचा अदिकार अदिकार म्हणून शेंबूड मिरवू लागला होता.आपले विरोधक तर टपूनच बसले आहेत.मुकरुने जंग्योदेविकड बघितले.देविने डोळे मिटून घेतले होते.मुकरुनं मायवो म्हणून एकदा हाक मारुन बघितली पण.देवीनं काही प्रतिसाद दिला नाही.तेव्हा मुकरुने देविला साष्टांग दंडवत घातला नि त्याने घराचा रस्ता पकडला.
   आता कोंबडीचा नातेवाईक डायनोसार याचा पुरावा देण्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार संपूर्ण रस्ताभर तो करत होता.आणि डोक्याला करकर खाजवत होता.त्याचं असं हे कराकरा डोकं खाजवणं बघून एका जन कावून गा लय उवा झाल्या दिसते.डोस्कं धुत नायी का गा...अस म्हणाला.एरवी अशा काँमेट करणाऱ्याच्या थोबाडीत मुकरुने दोन चार ठेवून दिल्या असत्या पण आता  या क्षणाला त्याच्या डोक्यात कोंबडी डायनोसारचा नाच सुरु असल्याने त्याने डोक्यातल्या उवा काढणाऱ्याकडे लक्ष दिले नाही.आणि या विचारातच तो घरी पोहचला नि त्याने सुखाबाईला हाक मारली.
   ...
   सुखाबाई धावत धावत बाहेर आली.
   बोंबलाले का झालं बा..ती मुकरुवर खेकसली.
   मुकरुने तिला प्रेमानं जवळ बसवलं.आणि आतापर्यंतचा सगळा इतिहास सांगितला.तोंडाजवळ आलेला घास कसा जंग्योदेविच्या प्रश्नांनं दूर गेला हे समजावलं.
   मुकरुची बायको त्याच्या सोबत राहून राहून त्याच्या पेक्षा हुषार झाली होती.तिने डोळे मिटले.काही क्षण विचार केला.डोळे उघडले नि मुकरुला म्हणाली.द्या टाळी.
   मुकरुने टाळी दिली.
   आपनच पुरावा देऊ सक्तो जी ..सुखाबाई म्हणाली.
   कसा काय..मुकरु डोळे फाडत विचारता झाला.
   हे बगा.. डायनोसार कैक सालापापसून भामरागडातच राहाचा..याच्याबाबत कोनाचच अजूनतरी दुमत झाल नायी.तो हिथ राहाचा.त्याले लय पोट्ठे बाट्टे झाल्ते.त्यानं लय वर्स सुखान सांेसार बिंसार केला..तो बुढा झाला.जसा तुमचा बुढा-बाप गचकला तसा डायनोसार बुढा होऊन गचकला.मनूनच अजूनसुध्दा त्याचे सांगाडे हिकडे तिकडे सापडतात.आता या डायनोसारचा एक भाऊ कंधी काळी बारामतीजवळ असलेल्या सह्याद्री का फयाद्री डांेगरावर गेल्ता.जशी शिवाजी महाराजाची एक गादी साताऱ्याले झाली.एक गादी कोल्लापुरात झाली.तशी डायनोसारची एक गादी एटापल्लीत झाली एक गादी बारामतीत झाली.आता बारामती मनल्यावर सायेबाचा इश्वासच बसनारच.डायनोसाराचा भाऊ हिकडून तिकडे गेला बारामतची कोंबडी हिकडं एटापल्लीत आल्ली.मनजे हिकडूनचा आन् तिकडूनचा पाहुण्याचा संबंध मनजेज टू वे रिलेसन हाये हे आपोआप सिध्दच होते.आन् ते काय मनत्यात इव्होलूशन का फिवोलूशन ते घडलं,नं त्येच्यात डायनासार हळू हळू कांेबडीवानी झाला फुढं कोंबडीच झाला..त्यामुळे एटापल्लीची कोंबडी डायनोसारच्या जवळच्या नातेवाईक हायेत हे सिध्द कराचं काम आपन आपल्या कॉलेचच्या हितीहासाच्या सरतापे मास्तराले सांगू.तो लिवल सोंडो बुद्रूक टाईम्स मंधी..मंग कोन तरी बंबईतला टाईम्सवाला उचलन सरतपाचे संसोधन..त्याले एक कोंबडी एक मोहाचीचा खंबा देल्ला का सारं काही तो करते.तुमाले तं मालूम हाये..एकदा का बंबईच्या टाईम्समंधी हे संसोधन छापून आलं का किरकेट बोर्डाले भी कोनतीच अडचन जाची नायी एटापल्लीच्या कोंबडी फार्मर्ैमधल्या कोंबडयांची ऑर्डर द्यायले..सुखाबाई एका दमात बोलून गेली.
   आन् समजा सायबाच्या किरेकट बोरडानं ऑर्डर देल्ली नायी तं..सुखाबाईच्या बोलणं संपल्यावर मुकरुने विचारलं.
   नाायी तं नायी..आवो आता त्या कपिल का फपिलदेवानं आनखी एक किरकेट बोरडं काढला हाये..सायेबाच्या इरोधात...त्याले आपन सांगूनं तुह्या बोरडातले किरेकटपटू जर डायनोसारचे नातेवायीक असलेली कोंबडी हररोज खातीन तं तुहाच बोरडं इस्ट्राँग व्हईल.. दुसऱ्या बोरडाचं फुस्स व्हईल.कपिल देव आपल्याले ऑर्डरी द्यायले एका तंगडीवर तयार व्हईल बगा..
   बायकोच्या या हुषारीच्या बोलण्याकडे मुकरु आवासून बघतच राहिला.


  



No comments:

Post a Comment