Monday, January 9, 2012

अमिताभच्या नातू व्टीटचे पडसाद

मित्रांनो ही गंमत गोष्ट लोकमत दिवाळी 2012 मध्ये प्रकाशित झाली आहे.ही गोष्ट लिहिली तेव्हा जस्ट अमिताभ अंकल यांनी,आपण लवकरच आजोबा होणार असं व्टीट केलं होतं.ते व्टीटच या कथेचं बीज.लोकमतच्या संपादकांना कथा भावली आणि हास्य कारंजे निर्माण करुन गेली.वाचकांची प्रतिसादही तस्साच फूल
टू फन,असाच आहे.
अमिताभच्या नातू व्टीटचे पडसाद
   एखाद्या घटनेचे पडसाद किती वेगवेगळे पडू शकतात.याचं प्रत्यंतर ,परवा ,आजोबा अमिताभ बच्चन यांनी जेव्हा व्टीट केलं की,त्यांची सुनबाई आता आई होणार.मी आजोबा होणार.अभिषेक बाप होणार.जया बच्चन आजी होणार.श्वेता बच्चन-नंदा आत्या होणार.या व्टीटची बातमी झाली.तेव्हा कळलं.
   कावळयाची नजर जशी भिरभिरत असते ,आपल्या खाद्याच्या शोधासाठी, तशी या बातमीच्या शोधासाठी पत्रकारांपासून सलमान खान पर्यंतची नजर अभिषेक आणि एैश्वर्या यांचं लग्न झाल्यापासून भिरभिरत होती.कावळयासारखीच.(काहींना ती गिधाडासारखी वाटली होती.)  या बातमीच्या पुड्या वांरवार सोडल्या गेल्या.इतरांकडूनच एैश्वर्या आई होणार ,हे जाहीर केलं गेलं.खात्रीची हमी दिली गेली.पण फुस्स.प्रारंभी अमिताभ आजोबा वैतागले.जया आजी तेव्हा अमरसिंग काकांच्या भजनी लागल्या असल्यानं कदाचित त्यांना इकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नसावा.अभिषेक म्हणाला की, जब भी होगा देखा जाएगा.एैश्वर्या सुध्दा काहीतरी असचं पुटपुटली.या पुटपुटण्यात तिने सातत्य ठेवलं.
   अमिताभ आजोबांच्या घरुन ,सोन्याची नाही तर चांदीची ,नाही तर लोखंडयाच्या पाळण्याची ऑर्डर काही दिली जातच नव्हती.त्यामुळे मग बातम्यांची फुस फुस सुरु झाली की ,काही तरी गडबड आहे.  फुसफुश्यांच्या फुसफुशी नुसार गडबड नंबर वन ही होती की,
* एैश्वर्याला आई होण्यात इंटरेस्टच नाही.
* गडबड नंबर दोन-अभिषेक हा बाप होण्यासच पात्र नाही.
* गडबड नंबर तीन -अमिताभ आजोबांनी अद्याप परवानगीच दिली नाही.
* गडबड नंबर चार-ग्रह तारे यांचं अद्याप ,एैश्वर्याच्या आई होण्यावर एकमत होत नाहीय.
* गडबड नंबर पाच- अमरसिंग काकांना या प्रकरणाकडे लक्षच द्यायला वेळ मिळाला नाही.
* गडबड नंबर सहा- जया आजीची मानसिक तयारी येणाऱ्या नातवाची शी धुण्याची अद्याप झालेली नाही.
   तर असे फुसफुसे बाहेर पडत राहिले.या फुसफुशांमध्ये काहीच दम नसल्याचं परवा अमिताभ आजोबांच्या व्टीटमुळे सिध्द झालं.आणि ही बातमी येताच त्याचे वेगवेगळे पडसाद उमटायला सुरुवात झाली.
0000
पडसाद एक
   बाळ बीच्या आगमनाची बातमी येताच,चॅनेल्सच्या रिपोटर्सची पळापळ सुरु झाली.एैश्वर्या आई किंवा मदर एैश्वर्याचं इव्हेंट करण्याची संधी चॅनेलवाल्यांना भेटली होती.त्यामुळे झाडून सारे चॅनेलवाले पळापळ करु लागले.
   रिपोर्टसनी सर्वप्रथम सलमान खान यांना गाठलं.त्यांनी दंडूके त्यांच्या समोर नेलं आणि प्रतिक्रिया विचारायला सुरुवात केली.सलमान खानमधला चुलबूल पांडे चुळबूळ करु लागला.पण प्रतिक्रिया देणं तर भागच होत..काहीच बोललं नाही तर त्याचा दुसरा अर्थ निघाला असता..
   प्रतिक्रियेसाठी सलमानने तोंड उघडले नि म्हणाला की,क्या करे..
   म्हणजे काय सर,चॅनेलवाल्याने विचारलं..
   जो होना चाहिए वो होही गया है.
   म्हणजे काय सर,
   कली थी गली मे,भवरा ले गया बागमे,इधर देखा उधर देखा.आगे जो होना चाहिऐ वो होही गया.
   सर,आपण प्रतिक्रिया द्या ,कविता करु नका.महाराष्ट्रात कवितांचं पीक हे भाताच्या पिकापेक्षा जास्त येतं.त्यात पुन्हा भर नको.
   हीच माझी प्रतिक्रिया.मेरे स्टाईल की.पसंद है तो ले लो नही तो फुटो.सलमान सर जोरात म्हणाले.
   सलमान सर मधला रॉबिनहूड पांडे बाहेर पडला तर तो आपलं बेहाल करेल ,हे लक्षात येताच,चॅनेल वाल्यांनी त्यांचा निरोप घेतला.एैश्वर्या आई होणार ही बातमी आल्यापासून सलमान खानला काहीच कळेनासं झालंय. तो कविता करायला लागलाय,अशी ब्रेकिंग न्यूज ,दोनचार चॅनेलवाल्यांनी देऊन टाकली.
0000
   चॅनेलवाल्यांनी मग अमरसिंग यांना गाठलं.ते नेहमीच एैश्वर्याला बहू असच म्हणत.
   सर,तुमची प्रतिक्रिया काय,चॅनेलवाले म्हणाले.
   प्रतिक्रिया द्यायला लागतं काय यार?काहीच नाही ना.पण माझी काही तत्व आहेत.ही तत्व मी पाळत आलो म्हणूनच इथपर्यंत पोहचलोय.इतिहास त्याला साक्षी आहे.तेव्हा प्रतिक्रिया देतांना त्याचा आगापिछा खूप महत्वाचा असतो.नाही तर अर्थाचा अनर्थ व्हायचा.शिवाय सध्या माझी प्रकृती पण बरी नसते.मला आता सिंगापूरला जायचय तब्येत दाखवाला.रजनीकांत ज्या हॉस्पिटमध्ये भरती होते ना,तिथेच मी ट्रिटमेंटसाठी निघालोय बघा..
   प्रतिक्रिया सर,
   देऊ या की,घाई कशाला..प्रतिक्रिया येईलच की..वेट फॉर माय व्टीटर..असं अमरसिंग बालले. चहा खारी देऊन चॅनेलवाल्यांना अमरसिंगांनी निरोप दिला.
   अमरसिंग यांची नाराजी कायम.दोस्तान्यातला कडवटपणा कायम, अशी,ब्रेकिंग न्यूज काही चॅनेलवर झळकली.
0000
   चॅनेल वाल्यांनी राणी मुखर्जीला गाठलं.प्रतिक्रिया विचारली.
   मला कशाला विचारता,ती गुश्यात म्हणाली.ज्याने हे कृत्य केलं त्याला जाऊन विचारा की..
    याचा अर्थ,तुम्हाला एैश्वर्याचं आई होणं ,आवडलेलं नाही.असं समजायचं का मॅडम.
   छी..
   कोण,एैश्वर्या की..
   नाही हो,हा झुरळ बघा तुमच्या दंडुक्याजवळचा,तो बघून मला मळमळ व्हायला लागलयं.म्हणून छी..
   बरं,पण प्रतिक्रिया द्या ना..
   काजोल ताईला विचारुन सांगितलं तर चालणार नाही का?
   त्यांना कशासाठी विचारायचं?
   मोठ्या बहिणिला विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही ,अशी मला माझ्या पिताजिंनी शिकवण दिली आहे.
   पण काजोल ताई तर तुमच्याशी बोलतच नाही म्हणतात.
   हो का.मग त्या जेव्हा माझ्याशी बोलतील तेव्हा मग मी प्रतिक्रिया देईन की..असं बोलून राणी मुखर्जीने चॅनेल वाल्यांना निरोप दिला.
   राणी मुखर्जी सैर भैर ,अशी ब्रेकिंग न्यूज चॅनेल्स वर चालू लागली.
0000
   मनेका गांधी यांना एका चॅनेलवाल्याने गाठलेच.गांधी-बच्चन कुटुंबाचे पूर्विचे संबंध लक्षात घेता ,मनेका ताई नक्किच प्रतिक्रिया देतील अशी त्या रिपोर्टरला खात्री होती.त्याने माईक मनेका ताईच्या समोर नेला.तेव्हा त्या हसल्या.नि म्हणाल्या.कधी कधी प्रतिक्रिया नं देणंच शहाणपणाचं असतं.
   म्हणजे हो काय ताई..
   त्याचं काय की मला चित्रपट बघायला आवडत नाही.तेव्हा चित्रपटांविषयी अधिकारवाणिनं बोलणं जरा अवघडच आहे नाही का?
   एैश्वर्या, हा चित्रपट नाही ताई.
   ते मला कसं माहीत?तुम्ही पण सांगितलं नाहीत नाही.होमवर्क शुड बी परफेक्ट, असं महात्मा गांधी म्हणायचे.तेव्हा होमवर्क परफेक्ट करुन या नि मग आपण प्रतिक्रिया देऊ की.त्यात काय मोठसं.असं बोलून मनेका ताई निघून गेल्या.
   आँ,रिपोर्टने आँ वासला.आता होमवर्क परफेक्ट करायचा म्हणजे काय करायचं?हे त्याला कळेना.त्याचं कंफ्युजन झालं.त्यामुळे त्याला ब्रेकिंग न्यूज देता आलीच नाही.
0000
   शाहरुख खान कडे चॅनेलवाले पोहचले तेव्हा तो म्हणाला की,चला आता डॉन चारची मला चिंता उरली नाही.न्यू बेबी वुईल बी परफेक्ट डॉन एडिशन नंबर फोर इन 2025.
   शाहरुख खान किती दूरवरचा विचार करतो.हे चॅनेलवाल्यांच्या लक्षात आलं.ब्रेकिंग न्यूज तर त्यांना भेटलीच होती.बेबी बी-डॉन 4,अशी बातमी सर्वत्र झळकली.
0000
   सैफअली खान कडे रिपोटर्स मंडळी प्रतिक्रिया विचारायला जेव्हा गेली ,तेव्हा तो म्हणाला,की मला मुलगा झाला तेव्हा ,कां नाही गेलात प्रतिक्रिया विचारायला इतरांकडे.मी नाही देणार जा तुम्हाला प्रतिक्रिया.माझं पण काही स्टेटस आहे की नाही, या इंडस्ट्रीत.
   सैफअलीखानचं हे बोलणं एैकून चॅनेलवाल्यांनी डोक्यावर हात मारुन घेतला.
000
   हेमामालिनी यांच्याकडे जेव्हा चॅनेलवाल्यांनी प्रतिक्रिया विचारली,तेव्हा निश्वास सोडून त्या म्हणाल्या,काश 22 वर्षापूर्वी हे जर घडलं असतं तर मी अमितीजींना इशासाठी त्याला प्रपोज केलं असतंा ना..जाऊ द्या.नशिब इशाचं..
   चॅनेलवाल्यांना हेमाजींचं दु: लक्षात आलं.त्यांना आणखी दु: होऊ नये म्हणून त्यांनी हेमाजींचा निरोप घेतला.
0000
पडसाद दोन
   एैश्वर्याच्या आई होण्याची बातमी येताच,यश चोप्रांनी तातडीनं यशराज कंपनीच्या डायरेक्टर्सची मिटिंग बोलावली.बच्चन ब्रांडचा बोलबाला मार्केटमध्ये असल्यानं आपल्या कंपनीनं ही संधी सुध्दा सोडता कामा नये.बच्चन की बहु को बच्चा,असा चित्रपट आताच प्लान करा.कथा लिहा,पटकथा तयार करा.संगीत तयार ठेवा.ऍ़क्चूएल मे,बच्चन की बहू को बच्चा होताच,आपण 8 दिवसाचं शेड्यूल करुन चित्रपट मार्केट मध्ये आणू.पब्लिकची उत्सुकता खूप वाढलेली आहे.आपला चित्रपट धो धो धावेल..यशजी म्हणाले.
   यशजी नेहमीच काळाच्या पुढं बघतात आणि म्हणूनच यशाचे धनी होतात.असं एक डायरेक्टर दुसऱ्याच्या कानात म्हणाला.यश राज कंपनी,बच्चन की बहु को बच्चा,या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सज्ज झाली.
0000
पडसाद तीन
   एैश्वर्याच्या आई होण्याची बातमी,सचिनच्याही घरी पेाहचलीच होती.अंजली वहिनी ही बातमी एैकून आनंदल्याच.तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता.हे बघून सचिनला राहवलंच नाही.त्याने विचारलं,
   तुला गं ,कसला एवढा आनंद झालाय..
   अहो,मी जरा वेगळा विचार करतेय..
   एैश्वर्या आई होणार,यात कसला आलाय वेगळा विचार.तू असा विचार करतेस,हे अमिताभ अंकलला कळलं तर ते नाराज होतील ना..
   अहो ,नाराज कशाला होतील,उलट माझा विचार कळला तर ते नाचायला लागतील.
   असा कोणता बरे तुझा विचार ,सचिनने उत्सुकतेनं विचारलं.
   अहो आता माझी काळजी मिटलीय.
   तुला गं कसली आलीय काळजी.
   अहो,अर्जून आता मोठा होतोय ना.सोळा वर्षांनी त्याचं लग्न करावं लागेल आपल्याला..त्यासाठी सुंदर,सुशील,सुकन्या शोधण्याचा प्रश्न येईल आपल्यापुढे.एैश्वर्याला मुलगी झाली तर आपण तिलाच सुनबाई करुन टाकू या ना..
   अंजली वहिनींच्या मनातले हे विचार एैकून हसावं की हसू नये या विचारात सचिन गढून गेला.
0000
पडसाद चार
   एैश्वर्या आणि अभिषेक यांच्या कुंडलित अमूक ग्रह तमूक घरात शिरल्यानं ,बरीच गडबड होण्याची शक्यता असल्याचंा अभी-ऍ़शच्या लग्नसमयी सांगण्यात आलं होतं.आपलं घर सोडून दुसऱ्या घरात शिरलेल्या या भैय्याग्रहांचा शोध देशातल्या वेगवेगळया भविष्यकर्त्यांनी लावला.काहिंनी स्वत:हून हे काम करुन आपली सेवा-सर्विस-अमिताभ यांच्या चरणी अर्पण केली.या सेवेचं कोणतेही चार्जेस लागल्यानं ही सेवा अमिताभ यांनी आनंदानं स्वीकारली होती.मात्र काही खासमखास भविष्यवेत्त्यांकडे ते स्वत:अभी-ऍ़शची पत्रिका घेऊन गेले.तेव्हा दोघांच्याही पत्रिकेतील घरातील ग्रहांचा गोंधळ हा लादेन आणि गडाफी यांच्या एकत्रित गोंधळापेक्षा मोठा सिरिएस असल्याचं, या खासमखास भविष्यवेत्यांनी सांगितलं.या सेवेचं चार्जेस अमिताभ यांना द्यावे लागले.नसते दिले तर ग्रहांनी पत्रिकेच्या घरात लादेन-गडाफी सोबत सद्दाम हुसेन हा फॅक्टर ऍ़ड करुन ,अनाकलनीय गोंधळ घातला असता.हे त्यांना ठाऊक होतं.तर मुद्दा असा की अमिताभ यांचा भविष्य सांगणाऱ्यांवर रेखाजींच्या प्लॅटोनिक प्रेमापेक्षा अधिक विश्वास असल्यानं,बाळाच्या आगमनाची बातमी कळताच ,मोफत सेवा देणारे आणि विकत सेवा देणारे भविष्यवक्ते कार्यरत झाले.
* बाळ-बी, जन्माच्या आधी सुध्दा कुंडली मांडता येणं शक्य असल्याचं त्यांनी अधोरेखित केलय.
*  प्रश्न कुंडलीद्वारेही पत्रिका तयार करता येते.
* अमिताभ,यांनी ज्या मिनिट आणि सेंकदाला बाळाच्या आगमना बाबत व्टीट केलं,त्या क्षणावर आधारीत सुध्दा ग्रहांचं स्थान लक्षात घेउुन पत्रिका तयार करता येऊ शकते.
* किंवा ऍ़शने अभिला ज्या दिवशी नि ज्या क्षणाला ही बातमी दिली असेल,तेव्हाच्या ग्रहदशेवरुन सुध्दा पत्रिका तयार करता येऊ शकते,
* किंवा अभीने ,अमिताभ यांना ज्या क्षणाला ही गोड गडबड सांगितली असेल,त्या क्षणांवर आधारित सुध्दा पत्रिका तयार करता येते.
   हे भविष्यकर्त्यांना माहीत असल्याने ती मंडळी जमून आणि कसून पत्रिका तयार करण्याच्या कार्याला लागली .तसे निरोपही अमिताभ यांच्यापर्यंत पोहचले गेले.बाळाची पत्रिका तयार करण्याचं काम सुरु झाल्याचं बघून चॅनेल्सवाल्यांना आणखी हर्ष झाला,कारण त्यांना चर्चासत्रासाठी विषय मिळाला.
000
पडसाद पाच
   अभी-ऍ़शच्या लग्नसमयी पत्रिकेतील ग्रहांच्या या घरातून त्या घरात झालेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेले प्रश्न-समस्या सोडविता येतात ,हे भविष्यवेत्यांनी सांगितलं होतं.तेव्हा अभी-ऍ़शने तीर्थयात्रा पर्यटन केले.त्या पर्यटनामुळे जुन्या स्थानांना नवी झळाळी मिळाली तर नव्या स्थानांना ग्लॅमर मिळालं.
   कुणाचा पायगुण कसा असतो,हे दिसून आले.ग्रह शांतीसाठी या तीर्थपर्यटनाला गेलेल्या अभी-ऍ़श मुळे बऱ्याच तीर्थांचं नशीब पालटलंा.उपेक्षित आणि दुर्लक्षित तीर्थांकडे इतरांचे लक्ष गेलं.आमचे इथे अभीऍ़श दर्शनाला आले होते ,एव्हढीच काय ती पाटी लावायची या तीर्थांनी ठेवली होती.आता बाळ-बीच्या पत्रिकेत ग्रहांनीही या घरातून त्या घरात अतिक्रमण करण्याचा खेळ मांडल्याचे दिसून आले तर पुन्हा अभी-ऍ़श,अमिताभ-जया प्लस नवं बाळ ,तीर्थ पर्यटनाला निघतील.त्यामुळे जुन्यांना नवी झळाळी,नव्यांना ऍ़डशिनल ग्लॅमर मिळेल.हे बघून पर्यटकांचा किंवा भक्तंाचा लोंढा येईल.मंदिरांच्या उत्पन्नात वाढ होईल.पत्रिकेतील ग्रह ताऱ्यांच्या खेळातून समृध्दीची पवित्र नदी मंदिराच्या तिजोरित वाहू लागेल.या कल्पनाविश्वात देशातील अनेक मंदिरांची विश्वस्त मंडळी रममाण झाली.
0000
पडसाद सहा
   अभी-ऍ़शला बाळ होणार असल्याचं कळताच ,मुशर्रफ यांना खूपच आनंद झाला.जेव्हा पासून त्यांना पाकिस्तानच्या अध्यक्षपदावर पाणी सोडून परदेशात परागंदा व्हावं लागलं होतं,तेव्हापासून ते दु:खीच होते.आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यातून निघून गेले होते.त्यामुळे बाळ बीच्या आगमनाच्या वृत्ताने त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा आनंद निर्माण झाला.
   आता प्रश्न पडतो की,त्यांना इतका आनंद होण्याचं कारण काय?हा प्रश्न एके दिवशी मुशर्रफ भाभींनी त्यांना विचारला.
   तेव्हा ते म्हणाले,खरच की,मला एव्हढा आंनद होण्याचं कारण तरी काय?अभीऍ़श माझ्या नात्यातले ना गोत्यातले.तरी असं कां?आपल्या स्वभावात तर काही बदल झाला नाही ना.अशी शंका त्यांना आली.आपला जन्म जरी हिंदुस्थानातल्या दिल्लीत झाला असला, त्या नात्याने अतिमाभ हे आपले देश-भाऊ असले त्या-नात्याने अभीऍ़शचं होणारं बाळ हा आपला नातू किंवा नातीण असली तरी,आता आपले हिंदुस्थानशी सख्य नाही.आपण पाकिस्तानचे सर्वेसर्वा राहिलेलो आहोत.आपल्यासाठी हिंदुस्थान शत्रू.शत्रूच्या देशात भाऊ असला तरी काय झाले.तोही शत्रूच.भावाच्या मुलाला होणारं बाळही शत्रूच.हीच थिअरी आपल्याला ठाऊक आहे.मग या थिअरीत हे पाणी शिरलच कसं?कसं?त्यांनी स्वत:लाच प्रश्न केला.
   आपल्या मनामध्ये असणारी ही थिअरी बदलविण्यासाठी हिंदुस्थानच्या सीआयडी आणि रॉ या गुप्तहेर संस्थांनी कॅम्पुटर चिप्स तर आपल्या मेंदूत टाकले नाही ना,अशी एक शंका त्यांना वाटली.ही शंका त्यांनी चुटकीसरशी बाजूला ढकलली.कारण त्यांच्या पर्यंत पोहचणं फक्त ओसामा बीन लादेनलाच शक्य होतं.अशा बंदोबस्तात ते राहत होते.पण ओसामाचं विमान वरती गेल्यानं आता ती शक्यताच नव्हती.मग असं झालं तरी कसं?या प्रश्नानं मुशर्रफ स्वत:च्या मनाला कुरतडवून घेऊ लागले.
   कोणे एके काळी असलेला आपला लष्कर प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष कमकुवत बनलाय ,हे आपल्या देशबांधवांना कळलं तर ते आपल्याला पुढच्या निवडणुकीत उभेच राहू देणार नाहीत.
आपल्याला पुन्हा पाकिस्तानात परतू सुध्दा देणार नाहीत.अशा विचारचक्रात मुशर्रफ गुंतून गेले.
   आपल्या मनाला हे असं हळवं करणारं कारण शोधूनच काढलं पाहिजे,आता स्वस्थ बसणं नाही.याचा निर्धार करुन ते झपाट्याने कामाला लागले.त्यांनी आपल्या सगळया अभ्यासिकेची उलथा पालथ केली.तेव्हा तिथे असलेल्या बेडवरील उशी खाली त्यांना विनोबा समग्र वाडं.मय दिसलं.त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.विनोबांच्या जय जगत् या संकल्पनेच्या आवरणाखालीच त्यांचा मेंदू सध्या कार्यरत होता.त्यातूनच ही भानगड निर्माण झाली.खरं कारण कळताच ,त्यांना हायसं वाटलं.विनोबांचं  समग्र वाड.मय त्यांनी लगेच कपाटात सगळयात खाली ठेऊन दिलं.आणि हिटलर यांंच  मेन कॉम्फ चरित्र वाचायला घेतलं...
000
पडसाद सात
   अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा हे टेक्नो सेवी असल्याने ते सर्व प्रमुख व्टीटर आणि ब्लॉग फॉलो करतात.त्यामुळे अमिताभ यांनी बाळ-बी च्या आगमनाबाबत लिहिलेला व्टीट त्यांनी वाचला.त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.पुढच्या क्षणाला त्यांनी,अमिताभ ग्रँड पाचे हार्दिक अभिनंदन,असं व्टीट केलं.
   बराक ओबामा हे अमिताभचे दुरचे किंवा जवळचे नातेवाईक नसूनही त्यांना आनंद व्हावा,ही चमत्कारिक गोष्ट आहे.शिवाय त्यांनी विनोबा समग्र वाड.मय पण वाचलं नव्हतं.मग असं कसं झालं?
   हे असं झालं कारण,ओबामा हे दूरदृष्टिचे नेते आहेत.ते या क्षणात सुध्दा उद्याचं बघतात.अध्यक्षपदाची त्यांची एक टर्म संपत आलेली आहे.दुसऱ्या टर्मला ते पुन्हा उभे राहणार आहेत.अमेरिकेत भारतीय नागरिकांची संख्या बरीच वाढलीय.त्यात बरेच मतदार सुध्दा आहेत.मूळ अमेरिकनपेक्षा भारतीय मतदार, मतदान हे पवित्र कार्य आहे,असं अजूनही बऱ्यापैकी समजतात.त्यामुळे ते मतदानाच्या दिवशी रांगा लावतात.हे ओबामांना चांगलच ठाऊक आहे.त्यामुळे दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेचा राष्ट्रपती म्हणून निवडून यायचं असेल तर भारतीय नागरिकंानी आपल्याला जास्तित मतदान करणं आवश्यक आहे.या भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी अमिताभ-अभीऍ़शचा उपयोग करता येईल.त्यांना प्रचारासाठी बोलावता येईल.भारतातले राजकारणी जसे निवडणुकीच्या काळात चित्रपट हिरो-हिरोईन्सना प्रचारासाठी बोलवात, मतदारांना आकर्षित करतात,तसच आपल्यालाही करता येईल.असा दूरदृष्टिचा विचार ओबामांच्या डोक्यात होता.त्याशिवाय ,भविष्यात मिसेस ओबामा किंवा आपल्या पोरिंपैकी कुणी निवडणुकीला उभं राहिलं तर त्यांच्याही प्रचारासाठी अभीएशला बोलवता येईल.हेही त्यांच्या लक्षात आलं.त्यासाठी आतापासून नेटवर्किंग करणं गरजेचं होतं.त्यासाठी मार्ग सापडत नव्हता.मात्र बाळ बीच्या आगमनाच्या व्टीटरने हा मार्ग त्यांना दिसला.बाळ-बीच्या बारशाला आपण नक्कीच मुंबईला येऊ,असही त्यांनी पुढच्या क्षणाला व्टीट केलं..आपली बाजू भक्कम झाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं.
0000
पडसाद आठ
   अमिताभ फॅमिली ही अनिल अंबाणीची फास्ट फ्रेंड.त्यामुळे बाळाच्या आगमनाच्या बातमीनं, अनिल भाई आणि टीना भाभीला आनंद होणंा, स्वाभाविकच होतं.
   व्टीटरवर बाळाच्या आगमनाची बातमी अनिल भाईंनी वाचली ,तेव्हा त्यांचे डोळे लकाकले.या घटनेत त्यांना नवी बिझिनेस अर्पाच्युनिटी दिसली.गेल्या काही वर्षात या ना त्या कारणानं त्यांच्या ताब्यातील सर्व रिलायन्स कंपन्यांनी मान खाली टाकायला सुरुवात केली होती.या कंपन्यांनी मान वर करावी,म्हणून अनिल भाई जिवाचं रान करत होते.मुंबई मॅरेथान मध्ये धावधाव धावत होते.पण उपयोग काहीच होत नव्हता.एकिकडे मुकेश भाईंच्या रिलायन्सची घोडदौड सुरु असताना आपल्या घोडयाचं खेचर व्हावं ,तेही ऍ़क्सिडेंट मध्ये दोन पाय तुटल्याप्रमाणं,याचं अनिलभाईंना राहून राहून वाईट वाटायचं.कोटयावधी रुपये मोजून त्यांनी फायनांस प्लानर आणले,कंट्रोलर आणले,मॅनेजर्स आणले.पण घोडा काही पुढे सरकेनाच.त्यामुळे त्यांची चिंता वाढतच गेली.या चिंतेमुळे त्यांच्या डोक्यावरील केस विरळे झाले.टीना भाभीचं वजन घटलं.आता करावं तरी काय?हा सवाल दोघांनाही सतावत होता.बाळाच्या आगमनाच्या बातमीनं अनिल भाई सुखावले.कारण अभिऍ़शच्या बाळाचं येणं ,ही काही साधी सुध्दी बाब नव्हती.फर्स्ट फॅमीली ऑफ बॉलिवूडच्या घराच्या वारसदाराचं ते आगमन होतं.घटना एैतिहासिक होती.या एैतिहासिक घटनेला एनकॅश केलं,तर मोठ्ठी लॉटरी लागू शकली असती.हा इव्हेंट सगळया जगभर पोहचविल्यास जाहिराती आणि प्रायोजकांकडून लाखो करोडो रुपये मिळू शकले असते.असं विचारचक्र त्यांच्या मनात वेगानं फिरु लागलं. त्यासाठी रिलायन्स इव्हेंट अँड एंटरटेंमेंट कंपनीची तातडीने स्थापना करणं गरजेचं होतं.ते तसं काही अवघड नव्हतं.रिलायन्सच्या अनेक कंपन्यांपैकी एका कंपनीचं नाव एका रात्रीत बदलवता आलंं असतं.ऑफिसची कार्यालयं मुंबईपासून न्युयार्क  पर्यंत होती. या कार्यालयात शेकडयानं माणसं सुध्दा काम करत होतीच.म्हणजे सारं काही इन-प्लेस होतं.
   वावा.अनिल भाई मनाशी म्हणाले.आता आपली प्रगती मुकेश भाईच काय टाटाभाई सुध्दा रोखू शकत नाही.बाळ बीचा जन्म ते पाच वर्षापर्यंतचं त्याचं कलेकलेनं वाढणं,हे सारं काही जगात लाईव्ह नेणारी इव्हेंट कंपनी आपल्या मालकीची असल्यानं आपली चांदीच चांदी होणार होती.दु:खाचा काळोख जाऊन समृध्दीचा सूर्य आपल्या रिलायन्सवर उगवणार .एक चिमुकलं बाळ किती मोठं काम करुन जातं,अनिल भाई स्वत:लाच म्हणाले.ते ध्यानस्थ झाले.शिवनामाचा जप करु लागले.
000
पडसाद नऊ
   अभीऍ़शच्या बाळाची बातमी व्टीट होताच,जाहिरातदार मंडळींची क्रिएटीव्हीटीची पतंग उंच उंच उडू लागली.जाहिरातदारांना आतापावेतो,वेगवेगळया प्रकारातील जाहिराती करण्यासाठी स्टार्स मिळत होते.पण लहान बाळांच्या जाहिरातींसाठी मात्र स्टार बाळ मिळतच नव्हतं.काजोल ताईंच्या मनात तसं कधी आलं नाही.शाहरुख भाई आपल्याच प्रेमात असल्यानंा त्याची दोन्ही बाळं कधी मोठी झाली,हे त्यांनाही कळलं नाही.माधुरीताईंची बाळं अमेरिकेत असल्यानं त्यांनाही संधी नव्हती.अमिरदादाची मुलं खूपच मोठी असल्यानं तोही मार्ग खंुटला होता.सलमानभाईंचं अंगण अद्याप कोरडचं असल्यानं तिकडे वाट करण्यात काहीच अर्थ नव्हता.त्यामुळे स्टार बाळ नसण्याची खंत जाहिरातदारांना होती.त्यामुळेच जे बाळ मिळेल,त्याच्या मदतिने ते जाहिराती करत होते.पण त्यात चार्म नव्हता.ग्लॅमर नव्हता.त्यामुळेच अभीऍ़शच्या बाळाच्या आगमनाच्या बातमीनेे जाहिरातदार सुखावले.त्यांना हवा असलेला हक्काचा स्टार बाळ मिळणार होता.शिवाय अमिताभ-अभी-ऍ़श आणि बाळ असं फॅमिली पॅकेजही मिळणं शक्य होतं.सोने पे सुहागा ,म्हणतात ते असं..
000
पडसाद दहा
   सर्वत्र असे पडसाद उमटले असताना,अमिताभ यांच्या घरी सुध्दा वेगळं वातावरण निर्माण झालंच होतं.त्यात आनंद होता नि चिंताही होती.
   आनंदाचं कारण स्वाभाविक होतंच.पण चिंता कशाची..
   जयाजी म्हणाल्या-बाळाची शि-सू कोण स्वच्छ करणार..
   अमिताभ म्हणाले-मी करीन की.
   जया-अहो ते एक दिवसाचं काम नाही.खूप दिवस ते करावं लागतं.
   अमिताभ-डोण्ट वरी.नातवासाठी ते सॅक्रि फाईस करीन की मी.
   जया-गुड.आजोबा असावा तर असा.
   जयाजींनी अमिताभ यांना शाबासकी दिली आणि त्या कामाला निघून गेल्या.तेव्हा अमिताभ यांच्या लक्षात आलं की आपण काही तरी वेगळचं बोलून गेलो.ते जरा चपापले.पण लगेच सावरले.त्यांनी नेट सुरु केलं.बाळाची काळजी घेण्याचे उपाय,असं गुगल मध्ये टाकलं.त्यातून असंख्य पृष्ठ बाहेर आली.सध्या अमिताभ त्याचं वाचन करताहेत.त्यांना परफेक्ट आजोबा व्हायचय ना.
   जयाजी,येणाऱ्या नातवासाठी स्वेटर विणत बसल्या आहेत.
   ऍ़शला चिचेंचे डोहाळे लागले आहेत,ही चिंच आणायची कुठून या चिंतेत अभी आहे..
000
सुरेश वांदिले
  

No comments:

Post a Comment