Saturday, January 14, 2012

चष्मा चोरिला

चष्मा चोरिला
      महात्मा गांधी यांचा चष्मा चोरिला गेल्याची घटना एैतिहासिकच होती.त्यामुळे ती लपून थोडिच राहणार होती.
      भूतल आणि इंद्रपुरीतील अधिकृत संवादक आणि समन्वयक श्री.नारदमुनिंना या चोरिची वार्ता त्यांच्या सोशल नेटवर्किंगचा प्रभावळीतून कळली.तेव्हा या घटनेचं महत्व लक्षात घेता,त्याचं रिपोर्टिंग तातडीनं राजाधिराज इंद्रदेवांना करणं आवश्यक वाटलं.बऱ्याच कालावधीनंतर इंद्रदेवांच्या सांगण्यासारखे वृत्त आल्याने ते आनंदले.आपण नेहमीप्रमाणेच डोळयात तेल घालून कार्यरत असल्याचं, यामुळे इंद्रदेवांना कळेल.हा अंतस्थ हेतुही ,इंद्रदेवांच्या भेटीमागे होता.त्यामुळे नारदमुनी लगबगीनं इंद्रपुरीतील इंद्रदेवाच्या राजमहालातील त्यांच्या कार्यालयात चोरीचं वार्तांकन करायला इंद्रदेवांच्या निवासी कार्यालयाकडे प्रस्थान करते झाले.
      इंद्रदेवांच्या निवासी निवासी कार्यालयात पोहचल्यावर ,नारदमुनींनी इंद्रदेवांच्या पीएंना आपण आल्याचं इंद्रदेवांना कळवा असं सांगितलं.पूर्व अपाँईंमेंट शिवाय इंद्रदेव भेटत नसल्याचं पीएने त्यांना स्पष्ट केलं.
      पूर्व अपॉईंटमेंट म्हणजे  काय?नारदमुनींनी पीएकडे पाहत आश्चर्यानं विचारलं.
      हे प्रकरण नवं आणि भलतच होतं.कारण याआधी असं कधी घडलं नव्हतं.नारदमुनी आले असं म्हंटल्यावर इंद्रदेवांचे स्वीय सहाय्यक धावत येत.त्यांचे चरण स्पर्श करत .त्यांचे आगत-स्वागत करीत आणि लगेच त्यांना इंद्रदेवांकडे घेऊन जात.हा नवा पीए जरा आगावूच दिसतो.याला नारदमुनींचं महत्व नाही असं दिसतय.नारदमुनी मनात म्हणाले.पण असं कसं शक्य होईल.इंद्रपुरीत एखाद्याला नारदमुनी माहीत नसणे म्हणजे भूतलावरील हिंंदुस्थान नामे देशी तिरुपती बालाजी माहीत नसण्यासारखं आहे.आपण कोण हे जर खरोखरच या पीएला माहीत नसेल तर,ही धक्कादायकच बाब समजायला हवी.हा आपल्यासाठी भीतीचा इषारा सुध्दा आहे.आपण कालप्रवाहात आता आऊट डेटेड तर झालो नाही ना,अशा चिंता नारदमुनींच्या मनात निर्माण झाली.हा चिंता जंतू जरा शांत करुन त्यांनी त्या पीएकडे निरखून बघितलं.त्या पीएला हे निरखून बघणं अजिबात आवडलं नाही.
      अहो मुनीमहाराज,मी काही निकोल किडमन ,जेनेफिर ऑस्टिन किंवा बार्बरा मोरी,सलमा हायक ,नाही असं निरखून बघायला.तो म्हणाला.
ही नावं नारदमुनींच्या पहिल्यांदाच कानावर पडत होती.त्यामुळे त्य्ंााच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले.त्यांनी पीएला आपली शंका विचारली,आपण ज्यांची नावं घेतलीत त्या कोणी नव्या अवतार आहेत का?
      इतक्या लाख वर्षाच्या त्यांच्या इंद्रपुरीतील वास्तव्यात निकोल किडमन, जेनेफिर ऑस्टिन किंवा बार्बरा मोरी,सलमा हायक ही नावं त्यांच्या कानावरुन गेली नव्हती.
      मुनीमहाराज,एव्हढं आँ वासन्याचं कारण नाही.निकोल किडमन , जेनेफिर ऑस्टिन किंवा बार्बरा मोरी,सलमा हायक कोणी देवी बिवी नाहीत की नव्या अवतार सुध्दा नाहीत तर ज्या भूतलावर भ्रमंतीचं होलसोल कांट्रॅक्ट आपण घेतलत ना त्या भूतलावरील या  सुंदर सुंदर ललना आहेत.या ललना दिसल्या की भूतलावरील लोकांच्या ह्रदयाची धडकन वाढते.या सुंदर ललनांना भूतलावरील माणसं न्याहळत बसतात.तसे तुम्ही मला न्याहळत होते.म्हणून मी टोकलं.भूतलावरील दोस्तान्याचंं बग तुम्हला चावलय की काय?तो पीए,रहस्यमयरित्या हसत हसत म्हणाला.
      नारदमुनींना हा दुसरा धक्का होता.
      भूतलावरचा दोस्ताना बग ,म्हणजे रे काय?नारदमुनींनी आश्चर्यानं विचारलं.
      मुनी महाराज,दोस्ताना बग म्हणजे जॉन इब्राहम आणि अभिषेक बच्चन किंवा शाहरुख खान आणि सैफ अली खान ,यांच्यामध्ये असलेलं नसलेलं नातं..पीएने माहिती पुरवली.
      कोण ही मंडळी?नारदांनी पुन्हा प्रश्न केला.पीएचं बोलनं एैकून त्यांना आश्चर्याचे धक्यावर धक्के बसत होते.यामुळे आपल्या ह्रदयाची धडधड तर बंद होईल ना,असंही त्यांना वाटू लागलं.
      मुनी महाराज ,तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी काही नवनीत अपेक्षित गाईड नाही की चाटे कोचिंग क्लासेच्या नोटस् नाहीत.ही उत्तर हवी असतील तर भूतलावर जा.आणि करण जोहरला भेटा.तो सांगेल दोस्ताना बग म्हणजे काय ते.टॉम क्रूजला भेटा तो सांगेल निकोल किडमन कोण ती?ब्रॅड पिटला भेटा,तो सांगेल जेनिफर ऑनिस्टन कोण ती?गुलशन ग्रोव्हरला भेटा,तो सांगेल सलमा हायक कोण ती?एैश्वर्या रॉयला भेटा ,ती सांगेल अभिषेक बच्चन कोण तो?बिपाशा बसूला भेटा,ती सांगेल जॉन अब्राहम कोण ते?सलमान खानला भेटा,तो सांगेल शाहरुख कोण तो?करीना कपूरला भेटा ती सांगेल सैफ अली खान कोण तो?पीए,म्हणाला.
      भूतलावर जा ,असं पीएने नारदमुनींना सांगताच,ते कोणत्या कामासाठी इंद्रदेवांना भेटायला आले होते,याचं स्मरण त्यांना झालं.
      अहो,मी आताच हा असा भूतलावरुन आलोय.इंद्रदेवांना महत्वाचं रिपोटिर्ंग करायचं आहे.त्यांना निरोप द्या ,मी आल्याचं.नारदमुनी म्हणाले.
      मुनीमहाराज,मी तुम्हाला मघाच सांगितलं ना की प्रॉयर अपाँईंमेंटशिवाय इंद्रदेव सर भेटणार नाहीत ते.तुमची अपाँईमंेट आहे  का?
      नाही.
      मग ,इंद्रदेव सर आता तुम्हाला भेटणार नाहीत.तुम्ही आल्याचं त्यांना आम्ही कळवू.ते तुम्हाला वेळ देतील.ते आम्ही तुम्हाला कळवू.तुमचा सेल नंबर द्या बघू.पीए म्हणाला.
      सेल नंबर?ही काय भानगड नवी?नारदांना पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला.हे नवे नवे शब्द,हा पीए उच्चारतो आणि आपली भंबेरी उडते.हे सारं भीतीदायकच आहे.इतक्या लाख वर्षात असं कधी घडलं नव्हतं.आपण कालप्रवाहात खूप खूप मागे तर राहिलो नाही ना.आपल्या अस्तित्वासाठी ही धोक्याचीे चिन्हे आहेत .सावध व्हायला हवं आपण.नारदमुनीं स्वत:शीच बोलले.भानावर येत त्यांनी पुन्हा विचारलं ,ही सेल नंबरची भानगड काय आहे बरं.
      मुनी महाराज,तुम्हाला आम्ही सांगितलेल्या सगळया गोष्टी आश्चर्यचकित कां करतात?पीए ने नाराज होत विचारलं.
      अहो,तुम्ही नाराज होऊ नका.आश्चर्य वाटण्याचं कारण की निकोल किडमन,सलमा हायक,जेनिफर ऑस्टिन  ,दोस्ताना बग आणि आता सेल नंबर याचा कधी उल्लेख इंद्रदेवांच्या कार्यालयात झाल्याचं एैकिवात नाही.तुम्हाला सुध्दा मी पहिल्यांदा बघतो आहे.कोण तुम्ही?नारदमुनी सारवासारव करीत म्हणाले.
      मी,हर्षद मेहता.पीए ने उत्तर दिलं.
      कुठल्या देवाची शाखा?असं नारदांनी पुन्हा आश्चर्यानं विचारलं.कारण मेहता नावाचं एकही देवकूळ त्यांनी एैकलेलं नव्हतं.
      मुनी महाराज, पुन्हा असे आश्चर्यचकित होऊ नका.माझी कोणतीही शाखा नाही.
      मग तुम्ही इथे कसे आलात?
      अहो,मला इंद्रदेवांनी नियुक्त केलं आहे.त्यांचा पीए म्हणून.
      त्यांना तुम्ही कुठे बरे भेटलात.नारदांनी विचारलं.
      भूतलावर.पीए बोलला.
      इंद्रदेव, पृथ्वीतलावर कधी गेले होते?ते सुध्दा मला कळवताच.नारदमुनी अविश्वसनीय स्वरात म्हणाले.कारण याआधी असं कधी झालं नव्हतं.भूतलावरचं कोणत्याही देवाचं जाणं येणं हे आपल्याच मार्गदर्शनाखाली होत होतं.इंद्रदेवांनी मला सांगताच कसा काय भूतलाचा दौरा केला.भूतलावर मार्गदर्शन करायला त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणजे दुसरा नारद तर तयार केला नाही ना ?अशी शंका नारदमुनींच्या मनात आली.ही शंका नव्हती तर ती आपल्या उपयुक्ततेवरचं प्रश्नचिन्हच होतं ,हे त्यांच्या लक्षात यायला लागलं होतं.पण त्यांचं मन हे तथ्य स्वीकारायला तयार होईना.ते काही क्षण बोललेच नाहीत.कारण पीएने त्यांना निरुत्तर करुन सोडलं होतं.नादरमुनी काहीच बोलत नाही हे बघून पीएने त्यांना त्यांचा सेल नंबर पुन्हा विचारला.
      अहो,इंद्रदेव कधी गेले होते ,भूतलावर.नारदांनी कापऱ्या आवाजात पुन्हा विचारलं.पीए ने सेल नंबर विचारल्याचं ते विसरुन गेले.आपण विचारतो एक आणि नारदमुनी बोलतात वेगळच,हे बघून पीए चिडलाच शेवटी.चिडून म्हणाला-
      तिसमार खाँन पिक्चर लागला ना तेव्हा,इंद्रदेव गेले होते,भूतलावर.
      हे काय नवं झेंगट..हा आणखी एक मोठा धक्का होता,नारद मुनिंना.
      झेंगट नाही हो मुनी महाराज.तिसमार खान हा पिक्चर आहे.   त्यात कतरीना कैफ आहे.इंद्रदेवांना तिचा डॉन्स खूप आवडतो.तो बघण्यासाठी ते गेले होते,भूतलावर.पीएने चिडून माहिती दिली.
      याचा अर्थ असा समजायचा की मेनका,रंभा ,उर्वशी यांच्यात इंद्रदेवांना रस उरलेला नाही.त्या म्हाताऱ्या झाल्या काय ?त्यांना इंद्रदेवांनी सक्तिच्या रजेवर तर पाठवलं नाही ना?एैकावं ते नवलचं.प्रश्नाची सरबत्तीच नारदमुनींच्या मुखातून निघाली.
      हा म्हातारा आपला अमूल्य वेळ उगाचच खातोय,हे लक्षात आल्याने पीए आता खूपच चिडला आणि तो म्हणाला--
      अहो,मुनी महाराज मेनका,उर्वशी,रंभा यांना इंद्रदेवांनी एलटीसीवर पाठवलय.
      म्हणजे काय?नारदमुनींनी हे एैकून धसकाच घेतला.एलटीसी ही आणखी एक नवी भानगड त्यांच्या कर्णपटलावर पडली होती.
      सरकारी खर्चाने प्रवासाची सुट्टी दिलीय,इंद्रदेव सरांनी.पीए म्हणाला.त्याची सहनशक्ती आता संपत आली होती.
      कुठे गेल्यात त्या?नारदमुनींनी पुढचा प्रश्न केला.आपल्या प्रश्नांमुळे पीए वैतागलेला असल्याचं दिसूनही ते आशाळभूतपणे प्रश्न विचारतच होते.
      हॉलिवूड ,बॉलिवूड आणि,कॉलीवूडमध्ये  मुनी महाराज .तुम्ही नसत्या चौकशी कां करताहात.तुमच्या पिकल्या पानांकडे बघून मी चूप बसलोय ,आतापर्यंत.याचा अर्थ तुम्ही वेगळाच घेतलाय.तो पीए आवाज चढवून म्हणाला.त्याच्या सहनशिलतेचा आता पुरता कडेलोट झाला होता.
      अहो,असे रागावू नका.इतकी शेकडो वर्ष मी इथे येतोय ,पण आजच्या सारखी वागणूक मला कधी मिळाली नव्हती.असं वातावरण इथं कधी मी बघितलं नव्हतं.त्यामुळे मला धक्केवर धक्के बसताहेत.नारदमुनी कसेबसे बोलले.
      मुनी महाराज,काळ बदलत असतो.तसं आपल्याही बदलायला हवं.इंद्रदेव सरांनी काळाची पावलं ओळखली.तुम्ही मात्र परवाच्याच काळातच अजून आहात.वर्तमानात या.उद्याचा काळ आणखी वेगळा असेल.पीए म्हणाला.आता त्याला नारदमुनींची दया यायला लागली होती.
      म्हणजे काय?
      मुनी महाराज ,उद्या इथे मी नसेन.पीए निर्विकार चेहऱ्यानं म्हणाला.
      मग इथे कोण असतील,आणि तुम्ही जाणार कुठं?नारदांनी अविश्वनीय स्वरात विचारलं.
      इथं, उद्या असतील,करीम लाला.पीए ,मिश्किलपणे हसत म्हणाला.
      ऍ़ं,एवढेच फक्त नारदमुनी यावर बोलू शकले.त्यंाना फक्त भोवळ येण्याचीच शिल्लक राहिली होती.
      त्यामुळे ते मटकन खाली बसले.पीएने शिपायला त्यांना पेप्सी कोला द्यायला सांगितलं.
      पेप्सीकोलाचा रंग बघून अमृताचा रंग कसा काय बदलला, याचं त्यांना महद्आश्चर्य वाटलं.काही क्षण त्यांनी ग्लास तसाच हाती ठेवला.तेव्हा पीए म्हणाला,
      मुनी महाराज, बिनधोक प्या.ही पेप्सी आहे.अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडूलकर ही पेप्सीच पितात.
      म्हणजे हे अमृत नाही तर?नारदांनी शिव शिव म्हणत ,पेप्सीचा हाती असलेला ग्लास खाली ठेवला.पटकन.
      अमृत ब्रँड पेप्सी तयार करण्यासाठी आपण विजय मल्याला सांगू कधीतरी.सध्या ही पेप्सीच प्या.बरं वाटेल तुम्हाला.इंद्रदेव सरांच्या अपाँईमंेटसाठी तुमचं नाव नोंदवून घ्या,बरं वाटलं की.इंद्रदेव सरांन वेळ दिला की ,तुम्हाला आम्ही कळवू लगेच.पीए आता दयाबुध्दीने बोलला.नारदमुनींची अवस्था बघून पीएला खरोखरच त्यांंच्या बद्दल सहानुभूती वाटायला लागली होती.
      अहो,पण माझं काम फारच महत्वाचं आहे.ते जर आता इंद्रदेवांना कळलं नाही तर अनर्थ व्हायचा.पेप्सिचा घोट घेत घेत नारदमुनी कसेबसे बोलले.
      तुम्ही काही काळजी करु नका मुनी महाराज.हे ब्रम्हांड अर्थ आणि अनर्थाच्या पलिकडे निघून गेलं आहे.अर्थ शोधण्याच्या भानगडित पडू नये.कारण ही भानगड अनर्थाच्या पर्वतावर आपल्याला नेते.खाली असते एक महाप्रचंड दरी.त्या दरित कोसळलो तर होतो कपाळमोक्ष.नव्हे.आपण शिल्लकच राहत नाही.काळाच्या पोटात आपण आणि दरीतील कोल्हे,लांडगे यांच्या पोटात आपले शरीर.पीए तत्वचिंतकाच्या भूमिकेत शिरुन,नारदमुनिंना समजावू लागला.
      हे तत्वज्ञान कुठे बरे शिकलात आपण?नारदमुनींनी थकलेल्या आवाजात विचारलं.आजपर्यंत या कार्यालयातला एकही स्वीय सहाय्यक असं तात्विक बोलला नव्हता.हे आपल्याला समजावणं आहे की फुटवणं आहे,हा प्रश्न त्यांना पडला होता.
      मुनी महाराज,हे तत्वज्ञान जी..कुलकणींंच्या महाविद्यालयात,शिकलो मी.पीए चिडून म्हणाला.
      मुनी महाराज,तुम्ही नसते,फालतू,बकवास,निरर्थक,संदर्भशून्य प्रश्न विचारुन माझा वेळ कां खर्ची घालता आहात.आता तुम्ही इथून गेला नाही तर नाईलाजाने मला कमांडो बोलावावे लागतील.
      कोण आहेत ते?नारदमुनींनी भीत भीत विचारलं.
      ते आहेत इंद्रदेव सरांचे अंगरक्षक.तुम्हाला धक्के मारुन हाकलतील इथून.तुमची शोभा नको म्हणून आणि तुमच्या पिकल्या केसांचा आदर म्हणून मी त्यांना अद्याप बोलावले नाही.पीए आता चढ्या आवाजात बोलला.
      अहो, मी कोण हे तुम्ही ओळखलेलं नाही.नारदमुनी आता थोडे संतप्त झाले होते.
      मुनी महाराज तुम्ही कुणही का असेना?मी इंद्रदेवांचा पीए आहे.हा पीए म्हणजे बराक ओबामांच्या पीए सारखाच.सर्वशक्तिमान.मला ओलांडून तुम्ही इंद्रदेव सरांकडे जावू शकणार नाहीत.पीए आणखी जोराने म्हणाला.
      हा माझा अपमान आहे?नारदमुनी कसेबसे उठत म्हणाले.उठता उठता ,त्यांच्या हातून पेप्सीचा ग्लास खाली पडला.
      मुनी महाराज,मानपानाच्या गोष्टी ,तुमच्या सारख्या पिकल्या पानानं करणं बरोबर नाही.आम्ही तुम्हाला समजावून सांगत असताना ,तुम्ही नसते प्रश्न विचारुन माझा वेळ खाताहात.नसत्या चौकशा करण्याचा चोंबडेपणा तुम्ही करता नि वरुन अपमान झाला म्हणता.मुनी महाराज तुम्ही आजच्या काळात जगा.भूतकाळातून बाहेर या ,चटकन.आम्ही तुमचा अपमान केलेला नाही.तुम्ही वेळ घेता इंद्रदेव सरांना भेटणे हाच मोठा गुन्हा आहे.इंद्रदेव सरांनी ठरवलं तर या गुन्ह्याची शिक्षा सुध्दा तुम्हाला देतील.पण तुमच्या पिकल्या केसांचा आदर ठेवतो म्हणून तुमचं हे असभ्य वागणं मी इंद्रदेव सरांच्या कानावर टाकणार नाही.चला निघा आता.पीए करडया आवाजात नारदमुनींकडे तिरकस बघत म्हणाला.
0000
      आतून इंद्रदेव सरांचा फोन आलाय.मी माझ्या कामाला लागतोय..तुम्ही निघा आता इथून,अशी नारदांना शेवटचं बजावून,पीएने इंटर कॉम उचलला.
      इंद्रदेव सरांनी ,पीएला एक  महत्वाचा फोन जोडून द्यायला सांगितला होता.पीएने फोन नंबर फिरवलां.पलिकडून आवाज येताच
त्याने हॅलो केले.पीएने इंद्रदेव सरांना फोन जोडून दिला.दोन मिनिटांनी फोन डिसकनेक्ट झाला.तेव्हा पुन्हा एकदा पीएचे लक्ष नारदांकडे गेले.
      अहो,तुम्ही अजून गेला नाहीत.तुम्हाला वारंवार सांगूनही कळत नाही का की इंद्र देव सर,पूर्व वेळ घेतल्याशिवाय कुणालाही भेटतच नाही म्हणून.आणि आता तर नाहीच नाही .कारण त्यांना भेटायला महात्मा गांधी येताहेत.तेच आता बोलत होते इंद्रदेव सरांशी.पीए बोलला.
      अहो,महात्मा गांधी बद्दलच मी सांगायला आलो होतो.पण तुम्ही माझं म्हणणं एैकूनच घेत नव्हते,नारदमुनी बोलले.हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का होता.त्यांच्या छातीची धडधड जोराने वाढली होती.
      महात्मा गंाधीं बद्दल विनोबा भावे यांनी आधीच इंद्रदेव सरांना ब्रीफ केलं आहे.
      अँ..नारद एव्हढच बोलू शकले.
अँ काय,मुनी महाराज.एवढा मोठा माणूस भेटायला येणार म्हणजे त्याविषयी सर्व माहिती जाणून घ्यायला नको का? इंद्रदेव सर, या बाबत फार पर्टिक्युलर आहेत   अहो,पण मला महात्मा गांधी बद्दल जे सांगायचं होतं ते थोडचं विनोबा भावे जे कोण आहेत,ते सांगू शकतील...नारदमुनी कसेबसे बोलले.या घडामोडीवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.
      जे,विनोबा भावे सांगणार त्याच्या पलिकडे तुम्ही नवं काय सांगणार मुनी महाराज.कुत्सित हसत पीए म्हणाला.
      अहो, महात्मा गांधींचा चष्मा चोरिला गेला.हे मला इंद्रदेवांना सांगायचं होतं.थकलेल्या सुरात नारदमुनी म्हणाले.
      हात्तीच्या.पीए खोखो हसत म्हणाला
      हात्तीच्या म्हणजे?
      मुनी महाराज ,किती शिळी बातमी आहे ही.अहो,ती कधीचीच इंद्रदेव सरांना, कळलीय.
      कशी काय?नवीन नारद तर जन्माला आला नाही ना..नारद कसे बोलले.आता आपण कोणत्याही क्षणी कायमचे कोसळू ,याची त्यांना खात्रीच वाटायला लागली.
      नवीन कशाला हवा.हा बघा नवा सॅमसंगचा एलसीडी टीव्ही.पीएने टीव्हीकडे नारदांचे लक्ष वेधले.त्याने रिमोटने टीव्ही सुरु केला.स्टार माझा लावला.त्यावर महात्मा गांधी यांचा चष्मा चोरिला गेला,हीच बातमी सांगितली जात होती.
      हे यंत्र आहे की चमत्कार.
      मुनी महाराज ,हे इंद्रदेव सरांचे डोळे आणि कान आहे.भूतलावर आणि ब्रम्हांडात काय घडलं,काय बिघडलय, याची बित्तंबातमी त्यांना क्षणात कळतं.कुणी येऊन सांगण्याची गरज उरलीय नाही आता. नाही.पीएच्या कुत्सित हसण्याला आता टवाळकीची किनार आली होती.
      म्हणजे माझी गरज संपली म्हणायची की काय?नारदमुनी पटकन खाली बसत म्हणाले.आता त्यांचा तोल जावू लागला होता.
      तुमची गरज खरोखरीच होती का?हाच खरा प्रश्न आहे मुनी महाराज.काही जणांना अशी हवा बनवायची सवय असते.आणि त्या हवेत ते स्वत:ला उडत ठेवतात.हा हवामहाल फार काळ टिकत नाही.तुमचेही तसेच झाले.महात्मा गांधी यांचा चष्मा चोरिला गेला ,ही शिळी बातमी देऊन तुम्ही इंद्र देव सरांचा अमूल्य वेळ वाया घालवला असता.असा वेळ वाया घालवणे त्यांना अजिबात पसंत नाही.बरे झाले तुम्ही त्यांच्या पर्यंत ही शिळी बातमी सांगण्यासाठी पोहचला नाहीत ते. अन्यथा त्यांनी तुम्हाला मुसोलिनीच्या ताब्यात दिले असते.पीए म्हणाला..
      त्याने काय झाले असते?काहीच कळून नारदमुनी सपाट चेहऱ्याने म्हणाले.
      मुसोलिनीने तुम्हाला चंगेज खानच्या ताब्यात दिले असते.
      आणि त्याने केलं असतं..
      मुनीमहाराज त्याने काय केले असते हे सांगणे कठिण आहे.कदाचित उकळत्या तेलाच्या कढईत टाकले असते.कदाचित ज्वालामुखित फेकून दिले असते,कदाचित गिळून टाकले असते.
      म्हणजे इंद्रदेवांच्या दरबारी राक्षससुध्दा..
      मुनी महाराज काळ बदलला की राक्षस आणि देवाच्या व्याख्याही बदलतात.राक्षसाचादेव कधी होतो नि देवाचा राक्षस ,हे कळत नाही.इंद्रदेव सरांना हे अचूक कळतं .म्हणून ते राजे..कळलं.चला निघा आता.
      पण इंद्र देवांना माझं भेटण आवश्यक आहे हो.नारदमुनी गयावया करत म्हणाले.
      मुनी महाराज, ज्या कारणांसाठी तुम्हाला भेटायचं होतं ,ते आधीच इंद्रदेव सरांना कळलय ना.शिवाय आता महात्मा गांधीच भेटायला येताहेत म्हंटल्यावर संपलच की सारं.पीएने नारदमुनींना निर्वाणिचं सांगितलं.
      इथे आपली डाळ शिजणार नाही.हे नारदमुनींच्या ध्यानात आलं.ते कसे बसे उठले.त्यांना हुंदका येत होता.तो त्यांनी कसा बसा थांबवला.आणि ते माघारी परतले.
      000
      नारदमुनी महाली परतले.मंचकावर बसले.सेवकांनी थंड पाणी दिलं आणि सोबत एक खलिता दिला.खलिता इंद्रदेवांकडून आला होता.
      तो खलित बघून नारदमुनींना हायसे वाटले.इंद्राच्या पीएला आपलं महत्व वाटत नसेल पण इंद्रदेवाला आपलं महत्व नक्किच ठाऊकाय.म्हणूनच त्याने हा खलिता पाठवलाय.हे त्यांनी ओळखलं. पीएने केला अपमान त्यांनी गिळून टाकला.आणि त्यांनी खलिता उघडला.
      इंद्र देवांचे व्यक्तिगत पत्र होते ते.पत्रात त्यांनी नारदमुनींनी आता स्वेच्छा निवृत्ती घ्यावी अशी विनंती केली होती..हा विचार पक्का होईपर्यंत एलटीसी मंजूर करण्यात येत असल्याचं त्यांनी ठळकपणे नमूद केले होते..
सुरेश वांदिले.
वाय 1/15 ,शासकीय वसाहत वांद्रे पूर्व मंुबई 51
ekank@hotmail.com


No comments:

Post a Comment