Monday, January 2, 2012

एकाच पेपरच्या दोन प्रती आणि कसाब देशपांडे

  
एकाच पेपरच्या दोन प्रती आणि कसाब देशपांडे
   "आमच्या घरी आजकाल तीन-चार तरी पेपर येतात.हे सांगून मी काही माझी कॉलर टाईट करत नाहीय.कारण तुमच्या घरी सुध्दा चार पाच पेपर येऊ शकतात,याची मला जाणीव आहेच.अहो,आज काल पेपर घेणं फार सोप्प झालय ना.अनंत स्कीम्स काढल्या आहेत,पेपरवाल्यांनी.इतकी रक्कम आगावू द्या,पेपर वर्षभर पडत राहणार.बरं ही रक्कम फारच शुल्लक.ती सुध्दा पेपरवाले कां मागतात? हा सवाल मला खूप दिवस पडला होता.पण काही प्रश्न सोडवायचेच नसतात,असा,एसएससीला असल्यापासूनचा आमचा खाक्या आहे.याचा सिम्पल अर्थ असा की आम्हाला जे प्रश्न येत नाहीत ,ते आम्ही सोडवत नाहीत.अगदी युनिर्व्हसिटीच्या परीक्षेतही आम्ही आमचा हा खाक्या कायम ठेवला. "
   पेपरवाले मोफतच पेपर देण्याची स्कीम कां राबवत नाहीत.या प्रश्नाचं उत्तर मिळविण्याच्या भानगडित मी पडलो नाही. या प्रश्नाचं उत्तर मिळविण्यापेक्षा पेपरवाल्यांच्या स्कीम्सचा फायदा घेणं हे अधिक फायदेशिर असल्याचं आमच्या लक्षात आलं.कारण आम्ही जेव्हढे पैसे वर्षभराच्या वर्गणीसाठी देतो ,त्याच्या किमान सव्वापट रद्दीतून वसूल करता येतात,हे आमच्या लक्षात आलं.त्यामुळे एकाच पेपरची वर्गणी दोनदा आम्ही  भरली.
   शेजारच्या देशपांडयाने एकदा आमच्या या एका पेपरची दोन वर्गणी भरण्याच्या प्रकरणी आपलं नाक खुपसलं.तेव्हा आम्ही त्यांना एक पेपर माझा आणि एक पेपर माझ्या बायकोचा.असं बाणेदार उत्तर दिलं.बायकोसाठी स्वतंत्र पेपर घेणारा मी ,देशपांडेला महामूर्ख वाटलो.कारण देशपांडया स्वत:साठीही पेपर घेत नाही.
   महागाईचे कृष्णमेघ गडद झाले असताना,फक्त पेपरलाच स्वस्ताई कशी काय परवडू शकते.असा प्रश्न मला पडायला हवा होता.पण तो मला पडला नाही,त्यामुळे देशपांड्याला पडायचा प्रश्नच नव्हता.पानटपरीवरच्या पानापेक्षाही पेपर स्वस्तात मिळतो,हे त्याला अद्याप कळलेलं नाही.ते त्याला कळलं तरी तो पेपर घेणारच नाही.हा भाग अलाहिदा.काही पेपरवाल्यांनी एक पेपर घेतल्यास दुसरा मोफत अशी ,एक निकर घेतल्यास दुसरी मोफत,या स्टाईलनं विकायला सुरुवात केली आहे.हे ही देशपांड्याच्या कानावर नाही.समजा हे गेले असतं, तरी त्याने पेपर विकत घेतलाच नसता.त्याला एकावर एक वस्तू मोफत चालतं किंबहुना तो अशा स्कीमच्या शोधातच असतो.पण पेपर मात्र स्ट्रीक्टली नो नो.कारण त्याच्या एका बाजूला मी.दुसऱ्या बाजूला सोनकांबळे.आम्ही दोघेही पेपर घेणारे.एकावर एक फ्रीचाही फायदा घेऊन चार पाच पेपर घरी बोलावणारे.त्यामुळे देशपांड्याला फुकटात पेपर वाचायला मिळतो.त्याला नाही म्हणायची सोय नाही. "पेपरासारखी भुक्कड गोष्टही मोन्या म्हणजे मी आणि सोन्या म्हणजे सोनकांबळे देत नाही,फारच लेकाचे खडूस आणि फत्रूड , "असं देशपांड्या सोसायटीभर सांगत फिरणार.त्यामुळे भीक नको पण पेपर फुकटात बघ,अशी आम्हा दोघांचीही स्थिती.
   तर मुद्या देशपांड्याला ,एकाच पेपरच्या दोन प्रती घेतो,हे जेव्हा मी सांगितलं.तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला.त्यातला एक पेपर माझा,एक पेपर बायकोचा म्हंटल्यावर भूकपांनतर जमीन जशी हादरते तसा तो हादरला.बायकोसाठी स्वतंत्र पेपर,असं म्हंटल्यावर मी घरात नवी बाई किंवा माझ्या बायकोची सवत तर आणली नाही ना,असही त्याला वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी तसेच होते.
   माझ्या घरी एकाच पेपरच्या दोन प्रती येतात ही बातमी देशपांडेनं लगबगीनं सोसायटीत पसरवली.तुम्ही म्हणाला यात काय आला डोंबल्याचा बातमीचा विषय.पण सूर्याखाली असलेली प्रत्येक गोष्ट बातमीचा विषय होउु शकते.असं कुणी तरी विद्वानानं सांगून ठेवलयं.त्या म्हणण्याचा प्रत्यय ,माझ्या घरी येणाऱ्या एकाच पेपरच्या दोन प्रतिच्या देशपांडेकृत बातमीमुळे आला.
   आमच्या सोसायटीचं  स्वत:चं  न्यूज चॅनेल असतं तर ही बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणूनही लागली असती.आमच्या सोसायटीचं एफएम चॅनेल असतं तर कदाचित सेकंदा-सेकंदाला रेडियो जॉकी या बातमीला दळत बसला असता.असं काहीही नसताना सुध्दा माझ्याघरी येणाऱ्या,एकाच पेपरच्या दोन प्रती ,ही बातमी हॉटकेक सारखी सोसायटीतल्या प्रत्येक फ्लॅट मध्ये पोहचली.
   यावर सर्वसामान्य प्रतिक्रिया होती की, "मानसिंगेला म्हणजे मला ,बाहेरची कमाई बरीच चालू दिसतेय बर का.त्याच्याशिवाय का,हे शक्य आहे. "
   आता एकाच पेपरच्या दोन प्रती घेण्यासाठी कशाला हवी बाहेरची कमाई.सगळयांना फक्त बाहेरच्या कमाईचा,बाहेरख्यालीपणाच सुचत असल्यानं त्यांना जिथे तिथे तसचं दिसतं.औरंगजेबाला,संताजी धनाजी जिथे तिथे दिसत असे ,असं इतिसाहात कुणीतरी खरडवून ठेवलय.त्याचाच हा आधुनिक प्रकार.
   दुसरी प्रतिक्रीया होती, "मानसिंगे स्वत:ला ओव्हरस्मार्ट समजतो.त्याचा हा परिणाम.स्वत:मुकेश अंबाणी सुध्दा एकाच पेपरच्या देान प्रती घेत नसणार.हा काय मुकेश अंबाणीचा बाप लागून गेला की काय? "या प्रतिक्रियेवर मी काय प्रतिक्रिया देणार बरं.
   मुकेश अंबाणीचा बाप धिरुभाई अंबाणी होता ,हे सुध्दा प्रतिक्रिया देणाऱ्याला ठाऊक नसावं? प्रतिक्रियाकार पेपर वाचत नाही ना,त्याचा हा परिणाम.दुसरं असं की,हा प्रतिक्रिया देणारा बहाद्दर मुकेश अंबाणीच्या घरी कधी गेला होता,त्याचं पेपर वाचन बघायाला.मुकेश अंबाणी पेपर तरी वाचतो का?हाही मुद्दा आहेच.इंटरनेटवर सर्व पेपर सक्काळी सक्काळी फुकटात वाचण्याची सोय झाली असताना,मुकेश अंबाणीसारखा,पैसा पैसा जमवून अब्जाधिश झालेला व्यक्ती कशासाठी पेपरसाठी खर्च करणार?हे नको कळायला,त्या प्रतिक्रिया देणा-याला.आणखी एक मुद्दा असा की एकाच पेपरच्या दोन प्रती घेतल्यानं मी ओव्हरस्मार्ट कसा काय झालो बुवा.मी ओव्हरकोट बद्दल एैकलं होतं.ओव्हरस्मार्ट बद्दलही एैकलं आहे.त्याचा अर्थ जरा जास्तच आगावूपणा करणारा स्मार्ट.म्हणजे तुम्ही मुळात स्मार्ट पाहिजे ना.मी स्मार्ट आहे काय?याचा तरी आधी त्या प्रतिक्रियाकर्त्याने शोध घ्यायला हवा ना.मी स्मार्ट असतो तर कारकून कसा झालो असतो.मी सलमानखान सारखा चित्रपटात नसतो का हिरो झालो.शिवाय,सलमानखान स्मार्ट असूनही तो पेपर वाचतच असेल काय?हाही प्रश्नच नाही का?
   तिसरी प्रतिक्रिया होती,"मानसिंगेच्या घरी भानगड हाय."एकाच पेपरच्या दोन प्रती घेतल्यानं,भानगड कशी काय होऊ शकेल?ही प्रतिक्रिया देणाऱ्याला सुचवायचं होतं की,मानसिंगे आणि त्याच्या कुटुंबाचं अजिबात पटत नाहीय.ते केवळ नावाला एकत्र राहतात.भांडणाची सुरुवात सुप्रभातीपासूनच होऊ नये म्हणून एकाच पेपरच्या दोन प्रती ते घेतात.
   लग्नानंतरच्या पहिल्या वर्षानंतर कुणाचं तरी शंभर टक्के पटतं का हो आजच्या काळात.तेव्हाच्या काळात राजेश खन्ना आणि डिंपलच पटलं नव्हतं.आम्ही तर सामान्य पामर.भांडयाला भांडं लागणारच नाही का?पण याचा अर्थ आमच्यामध्ये केवळ भांडणापुरताच संबंध उरलाय असं म्हणणं हा दुष्टपणा झाला.त्याला काय माहिती की आमचा संबंध भांडणा एव्हढाच भांडी घासणं,भाजी चिरण्ंां,भाजीपाला आणनं,भाडे (इलेक्ट्रीक,टेलिफोन इत्यादी)भरणं,भेळ खाणं,भेजा फ्राय करणं,भजन म्हणणं,भायखळयाला जाणं,भरत जाधवसाठी सहीला जाणं,अशा अनेक +(रताड) गोष्टींसाठीही अद्याप उरलेला आहे ते.
   एक प्रतिक्रिया अशी होती की,"मानसिंगे चमचेगिरी फार करतो.म्हणून त्याच्या बॉसचाही पेपर तोच घेतो."आता मी चमचेगिरी करतो की नाही,हा वादाचा मुद्दा आहे.कारण चमचेगिरीची व्याख्या ना ऑक्सफर्डवाल्यांनी केलीय ना कोकाटेंनी ना चाऊसने .आपलं हित बघून सरळ नाकानं काम करणारा सुध्दा चमचेगिरीच्या कॅटेगिरीत येऊ शकतो की नाही.गल्लित तिस्मारखाँन असलेला थोर पुरुष दिल्लीत चमचेगिरीचा आदर्श पुरुष होतोच की.पण त्या थोर पुरुषाला ते मान्य होईल का? चमचेगिरीची स्वयंस्पष्ट व्याखा नसण्याचा हा परिणाम.त्यामुळे संबंधित प्रतिक्रियाधारकाने कशाच्या आधारावर आम्हाला त्या कॅटेगरीत बसवलं,हे कळत नाही.त्यामुळे त्याच्यावर आमच्या बदनामीचा खटलाच  दाखला करायचा,असं आमच्या मनानं पक्कं  घेतलं आहे.
   साहेबासाठी मी पेपर घेतो,अशी दंतकथा आमच्या सोसायटीत पसरली आहे,हे बॉसला कळलं तर आमचा खिमा नाही करणार?आमचा बॉस म्हणजे काही सोसायटीचा सचीव नव्हे.आमचा बॉस स्व:ताच्या खिशातून पैसे खर्च करुन पेपर विकत घेतही नसेल.पण साहेबानं पैसे खर्च कराययलाच हवे असाही काही नियम नाही.पैसै खर्च करता त्याला सर्वच काही विनासायास मिळतं ना.पेपरसारखी चिल्लर वस्तू दुसरी कोणती बरं राहू शकेल.प्रतिक्रिया सुध्दा चिल्लरच्या पलिकडे देऊ शकत नाहीत  ही मंडळी,याचाच मला जास्त विषाद वाटला.
   पाचवी प्रतिक्रिया होती, "मानसिंगे हा दुसऱ्या घरासाठी हे असं करत असला पाहिजे. "ही प्रतिक्रिया अनाकलनीय होती.एका कारकुनाला एक घर नीट सांभाळता येणं जिथं कठीण कर्म,तिथे तो दुसऱ्या घराचं स्वप्न पाहायला शाहरुख खान थोडाच लागून गेलाय.प्रतिक्रिया देताना सुध्दा लोक कॉमनसेन्स कां बरं वापरत नाहीत? "
   सोसायटीच्या बहुतेक सदस्यांना एकाच पेपरच्या दोन प्रति विकत घेण्यामध्ये काळेबेरं असल्याचं वाटलं हे वरील प्रतिक्रियांवरुन दिसून येतं.या मंडळींचा या दोनवर आक्षेप कां बरं असावा?याचं आश्चर्य मला वाटत.ंं कारण आपल्या देशाचं अद्याप चीन झालं नसल्यानं हम दो हमारे दो असा नारा अधिकृतपणे दिलाच जातो की नाही.हे या मंडळींनी लक्षात घेतलेलं नाही .कुणाच्या घरी दोन फ्रिज असतात.कुणाच्या घरी दोन टीव्ही असतात.कुणाच्या घरी दोन बेडरुम्स असतात.धमेंद्र सारख्या पुरुषश्रेष्ठाला दोन बायकाही राहू शकतात. गरज नसताना दोन दोन गाडया असतातच की नाही.(यात आणखी दोन चार गाडयांची भर घालणाऱ्यास लई भारी समजलं जातं.त्याच्याकडे कौतुकानं,बघितलं जातं.तो त्याचा पराक्रम समजला जातो.)असं असताना आमच्या घरी एकाच पेपरच्या दोन दोन प्रती येण्यामागं काय काळेबेरं राहू शकेल?
   या काळेबेरेचा शोध घेण्याचं आमच्या सोसायटीच्या काही सदस्यांनी ठरवलं.अध्यक्ष आणि सचिवांना त्यांनी त्यासाठी भरीस घातलं.सोसायटीची सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली.आमच्याकडे येणाऱ्या एकाच पेपरच्या दोन प्रतिची चर्चा या बैठकित खमंगपणे करण्यात आली.देशपांडयासह प्रतिक्रिया देणारे सारेच जण या बैठकीला उपस्थित होते.आम्हाला विशेषत्वानं बोलावणं धाडण्यात आलं होतं.
   सोसायटीच्या काही सदस्यांनी पेपर घेणं घेणं हा प्रत्येक सदस्याचा व्यक्तिगत प्रश्न असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला."एक पेपर घेतला तर चालू शकतो हो,पण एकाच पेपरच्या दोन प्रती,म्हणजे संशयाला जागा आहे.जिथे जिथे संशयला जागा असेल त्या सर्व जागांवर बारिक लक्ष ठेवण्याचं सरकारचचं सांगणं आहे.तेव्हा आपण मानसिंगेच्या या संशयास्पद वागणुकीवर लक्ष ठेवणं काहीच चूक नाही."एका सदस्यांनं तर्क मांडला.
   "या अतिरिक्त पेपरचा उपयोग मानसिंगे काय करतो?तो जरी म्हणत असला की एक त्याच्यासाठी आणि एक बायकोसाठी.यावर विश्वास कसा ठेवायचा?तो दुसरा पेपर कसाबसाठी असेल तर? आजच्या काळात कुणाचेही पाळं-मुळं कुठंही जावू शकतात." तिसरा सदस्य म्हणाला.
   ही कसाबी थिअरी कुणाच्या फारशी पचनी पडली नाही. "मानसिंगे एक नंबरचा बुळा असल्यानं तो कसाब-फसाबच्या भानगडित पडणारच नाही. "असं माझ्या बुळेपणाची शंभर टक्के खात्री असलेला माझा विरोधक म्हणाला.
   "अहो आजच्या काळात जे दिसतं,ते तसं असतंच असं समजायचं नसतं.त्यामुळेच आपली फसवणूक होते की नाही.नित्यानंद स्वामी बघा ना.वरुन वरुन देवपुरुष.पण प्रत्यक्षात तुमच्या आमच्या सारखाच स्खलन पुरुष.तसंच मानसिंगेचं राहू शकतं.दुसरी प्रत तो कसाबलाच देत असला पाहिजे. "असं आग्रही प्रतिपादन केलं गेलं.
   "पण मानसिंगे ,ही दुसरी प्रत कशाला बरं  देत असेल कसाबला? "
   "कशाला म्हणजे ?कसाबला पेपर बॉम्ब बनवायला. "
   "बापरे बाप. "सदस्य एका दमात म्हणाले.त्यांचा तो दमदार आवाज एैकून माझा दम जातो की काय असं मला वाटू लागलं.
   "एकदा का पेपर बॉब्म तयार झाले की तो सर्व मुंबईभर पेरणार. "आणखी एक सदस्य म्हणाला.
   "अहो तो कसा पेरणार?तो तर तुरुंगात आहे ना. "
   "त्याने कशाला बाहेर पडायला हवं.मानसिंगे सारखे मुर्ख माणसं असतातच की मदतीला.पण या म्ूार्ख मानसिंगेला कळायला नको का ते. "
   "अहो त्याला तरी कुठे ठाव असणारं ते.पण तुम्हाला कसं बरं कळलं की कसाब पेपरबाम्ब बनवून मुंबईभर पेरणार ते."एकाने  सवाल उपस्थित केला.या सवालाने तो सदस्य जरा सावरासावर करु लागला.   
   "म्हणजे असं घडू शकतं,असं मला म्हणायचं होतं.कारण दररोजच्या पेपरचं तो करणार तरी काय?शिवाय जेलमध्ये शी स्वच्छ करायला पेपर नाही तर पाणी लागतं"अशी अमूल्य माहिती त्याने पुरवली.
   "मानसिंगे कसाही असला तरी तो कसाब-फिसाब पर्यंत जाणं शक्य नाही"असं शेवटी बहुमत झालं.आणि माझी कसाबच्या तावडीतून सुटका झाली.
   पण प्रश्न इथे संपला नाही.कारण पुन्हा चर्चा मूळ मुद्यावरच आलीहोती.मानसिंगे कशासाठी एकाच पेरच्या दोन प्रति घेतो ते. "या प्रश्नाची तड नाही लागली तर आपल्या सोसायटीला धोका उत्पन्न होऊ शकतो. "असं एकानं निदर्शनास आणलं.
   "या धोक्यापासून आपला बचाव करण्यासाठी मानसिंगेलाच सांगाना एका पेपरची एकच प्रत घ्यायला.तसा ठराव करु या.हा ठराव त्याला मान्य नसेल,तर त्याला सोसायटीतून हाकलून लावू या"एकजण म्हणाला.
   "पण सोसायटीच्या बायलॉजमध्ये एखाद्याला हाकलून लावण्यासाठी हे कारण नमूद नाही.त्यासाठी बायलॉज बदलावे लागतील. "सचिवांनी स्पष्ट केलं.
   आमच्याकडे येणाऱ्या एकाच पेपरच्या दोन प्रतिच्या प्रश्नाचं करायचं काय?यावर सोसायटीच्या सदस्यांचं एकमत होईना.त्यामुळे काही सदस्य हमरीतुमरीवर आले.अध्यक्ष आणि सचिवांना त्यांनी धमकावलं सुध्दा.आमच्याकडे येणाऱ्या  दोन प्रतिमध्ये बहुतेक सर्वांनाच रहस्य वाटू लागलं होतं.हॅरी पॉटरने व्हाल्डेमोटरचं  रहस्य उलगडलं होतं.पण माझ्या कडे येणाऱ्या एकाच पेपरच्या दोन प्रतिच्या रहस्याच्या मुळापर्यंत त्यांना पोहचताच येईना.
   "आपल्या देशात घटनेनं व्यक्तिस्वातत्र्य ंदिलं आहे.त्यामध्ये हे करता येईल नि ते करता येणार नाही,अशी स्पष्टता आहे.पण एकाच पेपरच्या दोन प्रती घेऊ नये अस कुठही नोंदवलेलं नाही"हे मी सोसायटीच्या निदर्शनास आणलं.
   "हा खोटा बोलतोय",देशपांड्या तिथेच कोकलला.घटना दाखवा म्हणाला.आता ही घटना मी आणणार तरी कुठून.पण मलाही चेव चढला आणि मी तिथेच त्याला फटकारले,
   "देशपांड्या.तुझं म्हणणं खरं करुन दाखवायचं असेल तर तू आण ना घटना.माझं म्हणणं खोट असेल तर मला दोन खेटरं मारुन घेइन आणि तुझं म्हणणं खरं निघालं तुला दोन खेटरं मारीन"देशपांड्याला याचं काहीच वाटलं नाही.त्याचा चेहरा खेटरं मारल्यासारखा होईल असं मला वाटलं होतं.पण तसं काहीच झालं नाही.तो ताडकन उठला नि म्हणाला.
   "गुन्हेगारानचं आपण निर्दोष असल्याचं सिध्द करायचं असतं.समजल का?कसाबला सुध्दा त्याचं निर्दोषत्व सिध्द करण्याची संधी दिलीच की नाही आपण.मग तू कोण लागून गेला आहेस एवढा शहनशहा. "देशपांडेचा तर्क सोसायटीच्या सदस्यांचा पचनी पडल्याचं दिसलं.
   देशपांड्यानं पुन्हा एकदा मला कसाबच्या लाईनत अलगद आणून सोडलं..मात्र काही सदस्यांना देशपांडेतला खुटीउपाडपणा लक्षात आलाच.त्यांनी देशपांडेलाच सुनावलं.
   "देशपांड्या तुला एक पेपर विकत घ्यायचा म्हंटलं तर तुझ्या पँटिला भोकं पडल्याचं कारण सांगत,फिरतोस आणि याच्या त्याच्या घरी घुसतो पेपरवाचण्यासाठी..जसा कसाब मुंबईत घुसला होता ना.तसाच."कुणी तरी म्हणालं.
   "एखाद्याचा घरात घुसतो तो कसाब"अशी नवी व्याख्या तिथं जन्माला आली.देशपांडे कसाब बनून  सोसायटीतल्या प्रत्येकाच्या घरी कधीकधी ना कधी घुसला होता.त्यामुळे या व्याखेचं सर्वांनी टाळया वाजवून स्वागत केलं.
   माझ्याकडे येणाऱ्या एकाच पेपरच्या दोन प्रतींवरची चर्चा ऍ़केडमिक होईल अशी माझी अपेक्षा होती.
  
   "मानसिंगे कारकून असूनही वाचनसंस्कृतिला चालना देतो ,एका प्रती एैवजी दोन प्रती घेऊन पेपरवाल्यांना श्रीमंत करतो.पेपरवाले श्रीमंत झाल्याने पेपर वाटणारे,पेपर विक्रीचे एजन्सी घेणारे,पेपर मध्ये काम करणारे शिपाई ते संपादक ते व्यवस्थापक वर्गाला उत्तम पगार देण्यासाठी हातभार लावतो,अशी समाजवादी चर्चा होईल.अशी अपेक्षा होती.पण ही चर्चा ,घुसतो तो कसाब ,या व्याख्येला जन्म देऊन संपली. "झालं ते बरचं झालं असच मला वाटलं.
   सभा तशी अनिर्नित संपली.माझ्या विरुध्द सभेत बोलणाऱ्यांनी माझं अभिनंदन केलं.देशपांड्याची घुसखोरी माझ्याकडे येणाऱ्या एकाच पेपरच्या दोन प्रतिंमुळे अशी चव्हाट्यावर आणता आली,याचा आंनद साऱ्यानंाच झाला होता.
   देशपांड्यांनं  कधीचाच पोबारा केला होता..
   000
   सुरेश वांदिले
   वाय 1/15,शासयकीय वसाहत
   वांद्र पूर्व
   मुंबई 51

  

No comments:

Post a Comment