Thursday, January 12, 2012

गाढवाचं नशीब,क्लिओपात्रा आणि मिसेस माधुरीचा उद्योग

गाढवाचं नशीब,क्लिओपात्रा आणि मिसेस माधुरीचा उद्योग   एक बातमी आली ,परवाच.बातमी गाढवाची होती.आता या बातमीचं एवढं कौतुक काय,नाही का?आता गाढवाचंीही  बातमी होते,याचा अर्थ,जगातील बातम्यांचे विषय संपले की काय?अहो मल्लिका शेरावत शिंकली तरी बातमी होऊ शकते किंवा राखी सावंतच्या प्रत्येक पचकण्याची बातमी होऊ शकते.तर गाढवाची कां होऊ नये?याचा अर्थ, आम्हाला त्या दोघिंना गाढवांच्या पंक्तित बसवायचे नाही हो.बिच्चाऱ्या गाढवालाच वाईट वाटायचे.मुद्दा हाच की गाढवाची सुध्दा बातमी होऊ शकते,याला या दोघींचाच कशाला,शक्तिकपूरचाही आधार आहेच ना.
   गाढवाची बातमी असली तरी ती उत्तम बातमी आहे.विशेषत:सौभाग्यवती माधुरी दीक्षित नेने ते सौभाग्यवती एैश्वर्या रॉय बच्चन यांच्या पावलावर पाऊल टाकून संसार करणाऱ्या यच्चयावत भगिनीमंडळासाठी आणि झिरो फिगर ठेवण्याचा आदर्श (घोटाळा नव्हेे.पण डॉक्टरांचं म्हणणं पडतं की झिरो फिगर हा घोटाळाच आहे.कारण झिरो म्हणजे शून्य.याचा अर्थ अदृष्य होणे.काही ललना,झिरो फिगर करता करता या जगाच्या रंगमंचावरुन अदृष्य होतात हा भाग अलाहिदा.)वन्स अपॉन ए टाईम करीना - (शाहीद) kapur आणि सध्यकालीन करीना (सैफ अली खान ) क pooर - या कुठे अदृष्य झाल्या.उलट त्यांचं सौदंर्य खुलवणारं रुपडं आणखी दृष्य झालं,नाही का?
   तर त्या तिकडे हॉलिवूडच्या अधिकृत कुमारी आणि अनधिकृत सौभाग्यवती अँजेलिना ज्योली-ब्रॅड पिट यांचंही झिरो फिगरचं आदर्श उदाहरण जगासमोर आहेच .त्यामुळे झिरो फिगर ही संकल्पनाच आदर्श नाही..त्यामुळे यात घोटाळाच आहे.चला जिथे आदर्श आहे तिथे घोटाळा हे समिकरण पक्कच समजायचं.आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणार गुरुजी आणि बाईंनी अनादर्श शैक्षणिक वा सामाजिक कार्य केलंच नाही हे ते सुध्दा ठामपणे सांगू शकणार नाहीत.)
   विषयांतर झाले असले तरी मुद्दा असा की,झिरो फिगरचा ,सौ/कु करीना कप्पूर यांचा आदर्श ठेवणाऱ्या तरुणिंसाठी गाढवाची बातमी ही वाळवंटातील हिरवळीसारखी आहे.गाढवाच्या या बातमीतला अर्थ असा की गाढवाचं दूध ललनांना शेप आणि साईज मध्ये ठेवण्यासाठी एकदम झक्कास.(टूनटूनच्या काळात हे संशोधन कां बरे झाले नाही.)म्हणजे फूल प्रुफ.असं लंडनच्या डांकी ब्रीड सोसायटीचं संशोधन आहे.
   हे संशोधन करताना या सोसायटीच्या संशोधकांना, किमान दोन हजार वर्षापूर्वी होऊन गेलेल्या क्लिओपात्रा नामक राणिच्या सौदंर्याचं गुपित सापडलं.त्यानुसार,ही सौंदर्याची खान असलेली राणी नियमित गाढवाचं दुध प्यायची असं लिहलेलं त्यांना दिसलय.(काही लेखकांच्या मते या राणिच्या सौंदर्याचं रहस्य हे त्यांच्या स्नान प्रक्रियेत होतं.कारण त्या गाढवाच्या दुधाने आंघोळ करत.यावर काहींची अशी शंका आहे की,राणीच्या आंघोळीसाठी बाढटबभर दररोज गाढवाचं दूध त्या कुठून आणत असतील? एवढे दुधाळू गाढवं,365 दिवस उपलब्ध असतील का?शिवाय ती राणी असल्याने एकदाच आंघोळ करुन कसे चालणार?दुसऱ्यांदा आंघोळीसाठी बाथटब भरुन दूध,तात्काळ कुठून आणणार?या प्रश्नाचंी उत्तरे काही मिळू शकत नाही.एवढे मात्र खरे की राजा राणींच्या इच्छेसाठी काहीही घडू शकतं ना.क्लिओपात्राला आंघोळीसाठी वाघिणीची दूध लागलं असतं तर,तेही उपलब्ध झालं असतं.)
   मॅडम क्लिओपात्रा ,या तेव्हा लाखात देखण्या होत्या.रुपवान होत्या.त्यामुळेच त्यांच्याशी लग्न करण्याची तत्कालीन ब-याच राजे -महाराजे यांची सुप्त इच्छा असायची.क्लिओपात्राने आपल्याच नावाचे कुंकू लावावे म्हणून  ही राजे मंडळी हमरीतुमरीवर येऊन युध्द बिध्द करायचे.हा संघर्ष शेक्सपिअर साहेबांना नाटकासाठी बीज देणारा ठरला.क्लिओपात्रेवरचं त्यांचं नाटक अजरामर ठरलय.तिच्यासारखं.
   पुरातन क्लिओपात्रेवर आधारीत एका सिनेमात तिची भूमिका एलिजाबेट टेलर या 9 वेळा सौभाग्यवती झालेल्या आणि शेवटी कुमारीच राहिलेल्या ललनेनं केली होती.त्या मात्र खरोखरच्या सौदर्याच्या पुतळी होत्याच.त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बघण्याची संधी 21 व्या शतकातल्या रसिकांना 2010 पर्यंत मिळाली.त्या गाढवाचं दूध प्यायच्या का?याचा शोध डाँकी ब्रिड सोसायटीनं घेतला नाही.पण एलिजाबेथ ,इंद्राच्या दरबारी या पृथ्वीतलावरुन कायमस्वरुपी निघून गेल्या,तेव्हा पृथ्वीतलावरचं त्यांच वास्तव्य 88 वर्षांच झालं होतं.त्यांना  लग्न करण्याच्या शौकासोबतच मदिरेचा मनोसक्त आनंद घेणे हाही शौक होता.लग्न करण्याचा शौक त्यांनी पुढे सोडून दिला.पण मदिरेला सोडले नाही.तरी सुध्दा त्या शेवटच्या श्वासापर्यंत आजच्या काळातील डेफिनेशन प्रमाणे,हॉटच होत्या यावर सगळया पुरुषांचं एकमत झालं.एलिजाबेथ प्राशन करीत असलेली मदिरा ही गाढवाच्या दुधापासून तर तयार केली जात नव्हती ना.अशी एक साधार शंका आता व्यक्त करता येते.(आजच्या आधुनिक तंत्राच्या काळात ज्वारी ,बाजरी,केळं,पेरु,अंगूर आणि असंख्य वस्तूंपासून मदिरा निर्मिती करता येऊ शकते तर गाढवाच्या दुधापासून सुध्दा मदिरा निर्मिती होऊ शकतेच की.)
   अंज्येलिना ज्योली या सारख्या आफ्रिकेत जातात .आफ्रिकेतील सिंह आणि गाढवं हे दोघेही एकदम हाय क्लास समजले जातात.आमचा असा तर्क आहे की कुमारी ज्योली या आफ्रिकन गाढवाच्या दुधाचं प्राशनच करायला जात असल्या पाहिजे.त्यामुळेच त्यांचं सौंदर्य सगळी लफडी करुनही ठां असतं आणि जगातल्या पुरुषांच्या ह्रदयाची शिकार करत असतं.
   तेव्हा डांकी ब्रीडिंग सोसायटीच्या संशोधकांनी क्लिओपात्रा यांच्या सौंदर्याचं शोधून काढलेलं रहस्य हे खरचं असलं पाहिजे.आपण,त्यावर विश्वास ठेवायलाच हवं.गाढवाच्या दुधात ,गाय किंवा म्हशीच्या दुधापेक्षा ओमेगा 3 हे तेल आणि कॅलशियमचं प्रमाण हे अधिक असतं.गायीचं दूध घेणाऱ्या ललनांचं वजन हे वाढतच जातं.मात्र गाढवाचं दूध पिलं की वजन वाढण्याचा प्रश्नच उदभवत नाही.या दुधात अत्यल्प मेद असतं.त्यामुळे ह्रदयाला धक्का पोहचण्याचा प्रश्नच येत नाही.बॉडी ,शेप आणि साईज मध्ये राहून पुरुषांच्या ह्रदयाला मात्र धक्का देता येतो. या दुधात असणाऱ्या मायटोकांड्रिया नावाच्या सुक्ष्म बॅक्ट्रिया या दुधाचं रुपांतर वेगानं एनजीर् ड्रिंकमध्ये करतात,असं या संशोधकांना आढळून आलय.त्यामुळे हेच दूध सुंदर फिगर साठी मस्ट.अशी ही बातमी.
   0000000
   बातमी गाढवाची असली तरी त्यातला हा एक्स फॅक्टर सगळया मोहित करणाराच ठरला.
   000
   आमच्या बायकोनं जशी ही बातमी वाचली तशीच तिकडे अमेरिकेत संसार थाटणाऱ्या मिसेस माधुरी(या माधुरी म्हणजे आमच्या सौ.ची मावस बहीण.) यांनीही वाचली.ही बातमी वाचून त्यांनी गाढवा सारखं ओरडणं तेवढचं बाकी ठेवलं.बाकी गाढव जे जे काही करतो ते ते त्यांनी सारं सारं काही केलं.या सौ माधुरीचा नवरा डॉ.श्रीराम.त्याने माधुरीचं हे असं गाढवपण बघितलं आणि त्यांचं ब्लड प्रेशर तपासलं.हार्ट बिट तपासलं.सारचं नार्मल असल्यानं त्यांनी मिसेस माधुरीला हॉस्पिटल मध्ये भरती केलं नाही.माधुरी ,ही स्व.हुसेनच्या आणि स्व.हुसेन,हे माधुरीचे कलेच्या पातळीवर दिवाने होते.(मिसेस माधुरी म्हणजे माझी साळी ही पंढरपुरची.स्व.हुसेन हेही पंढरपूरचे.त्याचं घर आणि माधुरीच्या आई बाबांचं घर एकाच मोहल्यात.माधुरी लहानपणापासूच उत्तम नर्तिका.पंढरपुरातील महाविद्यालयाच्या विश्वात तर ती नंबर वनच होती.एकदा गॅदरिंगच्या उद्घाटनला हुसेन आले होते.त्यांच्या समोर माधुरीने नृत्य केलं.ते नृत्य बघून हुसेन त्या नृत्याच्या प्रेमात पडले.त्यांनी माधुरीची आस्थेने भेट घेतली.तिचं चित्र रेखाटलं.पुढे हे संबंध कलेच्या पातळीवर दृढ आणि सुदृढ झाले.)
   हे  सारं काही डॉ.श्रीराम यांना ठाऊक होते.त्यामुळे मिसेस माधुरीचं हे आताचं वागणं कलापातळीवरचं,हुसेन इफेक्ट असू शकतं.असा आडाखा बांधत ते हॉस्पिटल मध्ये निघून गेले.
   मिसेस माधुरीला वाटलं होतं,आपला नवरा,काय हा गाढवपणा चाललाय,हे तरी विचारेल.पण त्याने तसं काहीच केलं नाही.त्यामुळे त्या खट्ट झाल्या. रात्री नवरा घरी आल्यावर दिल की बात सांगू ,त्याला,असं स्वत:ला समजावत त्या कंम्पुटरवर थेट बसल्या.गाढवाच्या दुधाची बातमी वाचल्यामुळे मनात उमटलेलं भाव- तरंग त्यांनी लिहून काढले.
   0000
   गाढवाच्या दुधाच्या बातमीमध्ये मिसेस माधुरीला इंडस्ट्री दिसली होती.
   त्यांच्या समोर फिगर झिरोची फॅड समोर आली.भारतातच 50 टक्के महिलांना झिरो फिगर म्हणजे शेप आणि साईज मध्ये राहण आवडतं .त्यासाठी त्या काहीही करतात नि करु शकतात.
   बॉलिवूड आणि टॉलिवूडमधल्या तारका लग्न झाल्या की काही काळातच अशा सुटतात  की विचारु नका.त्यामुळे त्यांना पुन्हा शेपमध्ये येण्यासाठी काही बाही करावं वाटतं.पण त्या तशा पुन्हा झिरो फिगर मध्ये येतच नाहीत.
   काही काही सौभाग्यवतींचं सुख इतकं ओसंडून वाहतं की,त्यांचं गव्हाचं पोत होतं तरी त्यांच्या ते लक्षात येतच नाही.मग पुरुष मंडळी बाहेरच्या झिरो फिगरसाठी काही हजार किंवा लाख फिगर असलेली रक्कम मोजतात.
   अशा या सर्व कॅटेगरितील भगिनींसाठी ,गाढवाचं दूध -खात्रीचा हुकमी मार्ग नाही का होणार? गाढवाच्या दुधाचं प्रॉडक्शन.वाव.गायी म्हशीचं जसं गोकूळ दूध.तसं गाढवाचं झीकूल दूध(झी म्हणजे झिरो फिगर).डांकी मिल्क,प्रोडूस्ड बाय माधुरीज इंडस्ट्री..इंडस्ट्रीचा विस्तार इंडिया ते युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका.
   000
   गाढवाच्या दुधाची बातमी वाचल्यावर मिसेस माधुरीच्या मनात उमटेलेलं हे तरंग,असे कॉम्पुटरवर उतरले.त्यांना डाँकी मिल्क प्रॉडक्शनची कल्पना सुचली होती.एखाद्या उद्योगाची उभारणी करण्यासाठी अशी फंडू आयडियाच कामी पडते.अशीच कल्पना बिल गेटसला सूचली,धिरुभाईंना सूचली,नारायण मूर्तिंना सूचली.और वो कहाँसे कहाँ गये.मी मात्र लग्न करुन पंढरपुरातून लॉस एंजेलिसला आले.आता मात्र कहाँसे कहॉ जाना है.गाढवाचं दूध ही संधी घेऊन आलीय.मिसेस माधुरी स्वत:शीच बोलल्या.
   000
   डॉ.श्रीराम संध्याकाळी ,हॉस्पिटलमधून परत आल्यावर त्यांनी सकाळचा हुसेन कलाविष्कार कशासाठी होता,हे विचारलं.कारण हा सवाल त्यांना दिवसभर छळत होताच.
   मिसेस माधुरींना हा प्रश्न अपेक्षित होता.त्यामुळे त्यांनी काँम्पुटरवरुन प्रिंट काढून ठेवली होती.ती त्यांनी डॉक्टरांच्या हातात सोपवली.ती वाचता गायीच्या दुधापासून तयार केलेला चहाचा घूट डॉ.श्रीराम यांच्या मुखाबाहेर पडला..
   याचा अर्थ ,आपल्या नवऱ्याला ही आयडीया पटली नाही, हे मिसेस माधुरींंनी बरोबर ताडले.
   गुड आयडिया.डॉक्टर म्हणाले आणि मिसेस माधुरी उडल्याच.आपण समजतो तेव्हढे हे मिस्टर गाढव नाहीत तर,त्या स्वत:शीच म्हणाला.आणि मधूर हसल्या.
   पण ही आयडिया प्रत्यक्षात कशी उतरवायची,डार्लिंग.डॉक्टरांनी विचारलं.
    सोप्प आहे.
   कसं.
   गाढवं घ्यायची.खूप सारी.
   त्यांना कुठे ठेवणार आपण.
   त्यासाठी जागा घेऊ की.
   मिसेस माधुरी,इंडस्ट्री स्थापन्यासाठी मोठी जागा लागते.
   ओबामांना सांगू की.
   ओबामा म्हणजे तुला पंढरपूरचा तुमच्या वार्डातील नगरसेवक वाटतात की काय?तुम्हाला.म्हणे त्यांना सांगणार?
   अहो,मल्लिका शेरावत त्यांना चांगली ओळखते.तिला मी सांगेन ना..
   पण मल्लिका शेरावत नावाच्या ज्या कुणी आहेत,  त्यांनी तुम्हाला ओळखलं पाहिजेत ना..
   तेही आहे म्हणा..एक आयडिया आहे.प्रतिभाताई आहेत ना.त्या इंडियाच्या प्रेसिडंेट आहेत.ओबामा इकडचे प्रेसिडेंट.त्यांना सांगू या की.
   प्रतिभाताई कशासाठी सांगतील ओबामांना..
   माझ्यासाठी..म्हणजे वूमेन्स एम्पावरमेंटसाठीची ही संधी असल्याचं मी त्यांना सांगेन.वूमेन्स एम्पावरमेंटसाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.त्या नक्किच मला मदत करतील.शिवाय हर हायनेस क्विन ऑफ ग्रेट ब्रिटन ,एलिजाबेथ मार्फत पण ओबामा पर्यंत पोहचू शकू .
   ते कसं.
   सोप्प आहे.
   कसं ते सांगा,मिसेस माधुरी.
   अहो प्रिसं चार्लस हा मुंबईच्या डबेवाल्यांचा खास दोस्त आहे.या डबेवाल्याचे सेक्रेटरी ,पंढरपुरचे वारकरी.ते मला चांगले ओळखतात.त्यांच्या मार्फत प्रिंस चार्ल्स टू राणी एलिजाबेथ टू ओबामा..वाव ..शिवाय या बोलण्याबोलण्यात एक नवी आयडीयापण सुचली.डाँकी मिल्कची होलसेल डिस्ट्रुब्युशनची एजन्सी मुंबईत डबेवाल्यांच्या असोशिएशनला आणि लंडनला प्रींस चार्लसच्या सुनबाईंच्या नावे देता येईल की.शिवाय ओबामांना सर्विस चार्चेस हवे असतील तर मिशेल वहिनींना वाश्गिंटनसाठी एजन्सी देऊ.दाम करी काम असं म्हणतात ते उगाच नव्हे.
   मिसेस माधुरीचं बोलणं एैकून,त्यांच्या आयडियेची उड्डाण खूप दूरवर पोहचल्याचे ,डॉक्टरांच्या लक्षात आले.
   मग मी जाऊ का पुढे.मिसेस माधुरींनी डॉक्टरांना विचारलं.
   गो अहेड.पण पुढे गेल्यावर गाढवाच्या लाथा बसणार याची काळजी घ्या,असं बोलून आणि गालातल्या गालात हसत,पेशंटला बघायला डॉक्टर निघून गेले.
   000
   डॉक्टरांचा होकार मिळाल्याने मिसेस माधुरींना हुरुप चढला.त्या उत्साहाने कामाला लागल्या.प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांनी तयार केला.
   कागदावर रिपोर्ट करणं वेगळं आणि प्रत्यक्ष उद्योग स्थापन वेगळं.उद्योग स्थापन कसा करायचं याचं मार्गदर्शन जमदेशजी टाटा किंवा धिरुभाई करु शकले असते.पण ते आता हयात नाहीत.अनिल किंवा मुकेश अंबाणी किंवा रतन टाटा असे मार्गदर्शन करु शकत नाहीत.कारण त्यांनी उद्योग स्थापले नाहीत तर असेलेले उद्योग वाढवले.काय करायचं आता?मिसेस माधुरींनी स्वत:लाच विचारलं.
   डोण्ट वरी.तुम्हीच तुमच्याच उद्योगाच्या धिरुभाई व्हा.तुमची मुलं या उद्योगाचा विस्तार करतील.ठेच लागल्याशिवाय अडथळा असल्याचं कळत नाही.ठेच खा.पुढे जा.मिसेस माधुरीचं मन उत्तरलं.या उत्तरानं त्यांच्या हुरुप द्वीगुणित झाला.
   000
   पुढे काय झालं असेल?
   प्रेसिंडेंट प्रतिभा ताई प्रेसिडंेट ओबामांशी बोलल्या असतील काय?..डोण्ट नो.
   डब्बेवाला टू प्रींस चार्लस टू राणी एलिजाबेथ टू ओबामा ही लिंक लागली असेल काय?डोण्ट नो..
   काय झालं,ते गुलदस्त्यातच आहे.कारण मिसेस माधुरिंना अमेरिकेत काही जागा मिळाली नाही.हेच फक्त सत्य आहे.
   त्यामुळे मिसेस माधुरी निराश झाल्या काय?
   छे.
   कारण,त्यांनी आपल्या पर्स मध्ये धिरुभाईंचा आणि श्री.श्री रवीशंकरांचा फोटो ठेवला होता.धिरुभाई प्लस श्री श्री रविशंकर हे पॉझिटीव्ह थिंकिंगची डेडली कॉम्बिशिन.त्यामुळे उत्साहावर पाणी फिरु देण्यास मिसेस माधुरी यांचं मनच तयार होईना.
   नवऱ्याचं हसू मात्र स्मितापासून वाढू लागलं होतं..तिकडे दुर्लक्ष करणचं श्रेयस्कर समजून मिसेस माधुरींनी हे चंद्रकलेप्रमाणं वाढणारं नवऱ्याचं ,हसणं स्पोर्टिंगली घेतलं.
   000
   डाँकी मिल्क प्रॉडक्शन कागदावरुन पुढे सरकेना.तेव्हा किती दिवस स्पोर्टिंगली राहायचं हा प्रश्न निर्माण झाला.जागा नाही म्हणून अमेरिकेतील बँकांनी ,फायनांसचा पुरवठा करण्यासाठी केलेला अर्जही फेटाळला.
   सगळीकडे असा अंधार दाटून आला असतानाच,एक आशेचा किरण मिसेस माधुरींना दिसला.मुंबईच्या गोरेगावात म्हशिचे गोठे आहेत.तसेच गोठे गाढवासाठी सुध्दा आपल्याला मिळवता येतील.मुंबई ,आपलं सासरं. विलेपार्लेपासून गोरेगाव जवळच.आपल्या सासरच्या घराच्या नजिकच.मराठी मुलगीच्या मदतीला सरकार पासून मेधा पाटकर,शबाना आजमी आँटी ,दिलीप कुमार अंकल,संजू बाबा मार्फत खासदार प्रीया दिदी दत्त,येतीलच की?त्यांच्या मनात आलं.(मिसेस माधुरी,यांचे सासरे ,हे विलेपार्लेतील नगरसेवक.या ना त्या कारणाने वरील मंडळी यांच्या घरी आणि त्यांचं वरील मंडळीच्या घरी जाणं येणं होतं.त्यामुळेच माधुरी ही या सर्वांच्या परिचयाची होती.)
   आपण आपली आयडिया जिवंत ठेवली ,या अंधाऱ्या काळात.याचा अभिमान मिसेस माधुरिंना अभिमान वाटला.
   त्यांनी डाँकी मिल्क प्रॉडक्शनचा दुसरा एपिसोड मुंबईत करण्याचा बेत नवऱ्याला सांगितला.
   गो अहेड.अस ते न हसताच म्हणाले.गाढवाची लाथ बसणार नाही,अशी कमेंट मात्र त्यांनी यावेळी केली नाही.
   000
   पुढ, मिसेस माधुरींचं मुंबईकडे प्रयाण झालं.
   मराठी मुलगी उद्योजिका बनू पाहते,याचं कोण कौतुक शोभा डे यांनी केलं.शबाना आजमी यांनी आशीर्वाद दिले.मेधा पाटकर यांची भेटच झाली नाही .त्यामुळे त्यांनी काय केलं.हे कळलं नाही.दिलीप कुमार साहेबांनी, सीएम ला फोन लावला.संजू बाबा थ्रू खासदार प्रिया दत्त कनेक्शनचा प्रयत्न झाला.पण गोरेगावातल्या म्हशीच्या गोठयासारखीच जागा गाढवाच्या गोठयांसाठी भेटावी म्हणून केलेले प्रयत्न फळास आले नाहीत.हा काय गाढवपणा चाललाय,असा शिळा सवाल पुन्हा पुन्हा विचारला गेला.
   000
   तिकडेही नकार घंटा,इकडेही नकार घंटा.हे अनपेक्षित होतं.जागेशिवाय गाढव नाहीत.गाढवांशिवाय मिल्क इंडस्ट्री नाही.म्हणजे पुन्हा सारं काही कागदावरच.
   मुंबईतल्या महिला मंडळाच्या अध्यक्षांच्या आणि स्वयंसहाय्यता गटाच्या भेटी माधुरींनी भेटी घेतल्या. धारावीत कुठे जागा मिळते,का,हे तपासलं.पण कागदावरची इंडस्ट्री पुढे सरकण्याचं नावच घेईना.गाढवाचं मोठेपणा कळायला मंंंुबईचा शहाणपणा कमी पडतोय..हे मिसेस माधुरीच्या मनाने अधोरेखित केलं.
   त्यांनी परतीचं तिकिट काढण्याचं जवळ जवळ पक्क केलं.न मारताही गाढवाची लाथ बसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.आपला नवरा तसं कां म्हणले.हे त्यांना कळलं.त्यांनी डाँकी मिल्क प्रॉडक्शनची आयडिया लिहिलेला कागद पर्स मधून बाहेर काढला नि त्याचे तुकडे करणार तोच त्यांचं मन म्हणालं ,थांब शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सोडायचे नसतात.ट्राय लास्ट ऑप्शन..
   कोणता बरे?
   मायावती बहेन.त्यांचं मन उत्तरलं.
   व्हाट..
   जिसका कोई नही उसका सहारा मायावती बहेन.मन पुन्हा म्हणालं.
   खरंच..
   प्रयत्न करायला काय जातं.
   करेक्ट..
   असा संवाद,मिसेस माधुरींनी स्वता:शीच साधला.मनात काही आराखडे बांधले.
   000
   मिसेस माधुरींनी मायावती बहेनच्या ऑफिसशी संपर्क साधला.महत्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रातील भगिनी आपल्याला भेटू इच्छितात असा निरोप मायावती बहेनजींना द्या.असं मिसेस माधुरींनी त्यांच्या पीएला सांगितला.इलेक्शन पिरेडमध्येच माधुरी ,बहेनजींना भेटू इच्छितात.हा सुवर्ण योग असल्याचं त्या पेालिटिकली करेक्ट पीएने बरोबर ओळखले.शिवाय बीजेपीकडे हेमामालिनी ,काँग्रेसकडे शिल्पा शेट्टी,सपाकडे जयाप्रदा आहेत.बसपाकडे कुणीच नाही.(यावरुन पीए साहेब काहीतरी वेगळेच समजले,असं लक्षात येतं.)बहेनजी खुष होतील.पीए स्वत:शीच म्हणाला.त्याने प्रायॅरिटीने मिसेस माधुरी आणि बहेनजीची मिटींग फिक्स केली.
   मिसेस माधुरिंना निरोप मिळाला.त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमललं.
   000
   मिसेस माधुरींना,बहेनजींनी त्यांच्या बंगल्यातच बोलावलं असल्यानं त्या अलाहाबाद विमानतळावरुन थेट सीएम बंगल्यातच गेल्या.
   बहेनजींनी त्यांचं इतकं मनापासून स्वागत केलं.विचारपूस केली की,त्या फुले बाबा आणि सावित्रीबाईचंही हालहवाल विचारतील की काय अशी भीती मिसेस माधुरींना वाटली.पण बहेनजींना कुणाला काय विचारावं? कसं विचारावं? हे सारंच छान छान ठाऊक होतं.
   चहा पाणी झाल्यावर बहेनजींनी येण्याचं आणि मिटींगचं प्रयोजन विचारलं.
   मिसेस माधुरींनी त्यांना आपल्या डाँकी मिल्क प्रॉडक्शनची कल्पना विस्तारांन सांगितली.
   बहेनजींनी डोळे मिटले आणि क्षणात डोळे उघडून म्हणाल्या.
   डन..
   मिसेस माधुरींना धक्काच बसला.इतका तडकाफडकी निर्णय घेणाऱ्या बहेनजींचा त्यांना अतिव आदर वाटला.
   त्यांच, कोणत्या शब्दात आभार माणायचे,असे मिसेस माधुरींना झाले.
   माझे आभार माणू नका.गाढवाचे माना.सोशल जस्टिस की बात,आप समज लो.प्राण्यांमध्ये गाढव हा गावाकुसाबाहेरचा .त्याच्यावर शतकानुशतके अन्याय-अत्याचार केला जात आहे.वाघाचं काय कौडकौतुक चालललय.गाय,बैल,म्हैस तर पूजनीयच आहेत.गाढवानचं काय घोड मारलं.त्यालाही न्याय मिळालाच पाहिजे.त्यालाही इतर प्राण्यांच्या बरोबरच स्थान मिळालं पाहिजे.
   ये मै नही करुंगी तो कोन करेगा..ही संधी गाढवानं दिली.तुमच्यामुळे मला मिळाली.तुमचेच आभार कसे मानावे हेच मला कळत नाही.असं बोलून बहेनजींनी मिसेस माधुरीचं हातात हात घेउुन आभार माणले.
   त्यांनी पीएला सांगितलं की , उत्तर प्रदेश इंडस्ट्रिएल डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टरशी मिटींग लगेच लावा नि मिसेस माधुरिंचा प्रोजेक्ट तात्काळ मार्गी लावण्याचा निरोप द्या.नव्हे आदेश द्या.
   असं सांगून मायावती बहेन ,पुढच्या मिटिंगसाठी निघून गेल्या.
   मिसेस माधुरींसाठी हे सारं स्वप्न वतच होतं.
सुरेश वांदिले
वाय 1/15 शायकीय  वसाहत,वांद्रे पूर्व मुबई 51
9324973947
  
   000
  
  
   

No comments:

Post a Comment