Sunday, April 29, 2012

चोर,संशोधन की प्रियकर ?


चोर,संशोधन की प्रियकर ?

 पुलंच्या घरी चोरांनी कां बरे दरोडा टाकला असेल,असा प्रश्न रमाकांत गोपाळराव देशपांडे कवठेकर-बुद्रुक(आरजीडीके-बी) यांना पडला.ते दक्षिण मुंबईत शोभा डे यांच्या सदनिकेच्या बाजूलाच राहतात.(हे आरजीडीके-बी ,कर सल्लागार आहेत.त्यामुळे लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न असल्याने ते दक्षिण मुंबईत शोभा डे यांच्याच बाजूच्या सदनिकेत राहू शकतात.)त्यांना चिंताग्रस्त झाल्याचे बघून सौ.रश्मी रमाकांत देशापंडे यांनी त्यांना विचारलच.

             अहो चिंता कशाला करताहात एवढी.

             आरजीडीके यांनी वर्तमानपत्रातील पु.लं.देशपांडे यांच्या घरी झालेल्या चोरीच्या बातमीकडे सौंचं लक्ष वेधलं.

             यात कसलं आलय चिंतेच कारण?

            चिंतेचं कारण यासाठी की चोरांनी पु..देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला.इथे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुल देशपांडे राहायचे अशी पाटी दारावरवर लिहिली असताना सुध्दा चोरांनी पु.लंच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. कां बरं ,हा प्रश्न मला पडलाय.त्याची चिंता माझ्या चेहऱ्यावर दिसतेय. आरजीडीके-बी म्हणाले.

            मी सांगू का कारणं त्याची?

            व्हाट.. आरजीडीके-बी जोराने ओरडले.तू कशी काय सांगू शकतेस कारणं?तू सुपारी दिली होतीस काय त्यांना?

             काहीतरीच काय हो .. मी फक्त तुम्हाला नि सासूबाईंनाच सुपारी देऊ शकते.मामंजी असते तर त्यांनाही दिली असती.

            बरं बरं..तू जर या चोरांना सुपारी दिली नाहीस,तर मग तू कशी काय कारणं सांगू शकतेस ?

            कां बरं,देशपांडेंच्या बायकोला तेव्हढी तर अक्कल हवीच ना..की नको?या प्रश्नाचं आधी उत्तर द्या मग मी कारणं सांगते.

             टॅक्समधील किचकट प्रश्न सोडणा-या आरजीडीके-बी यांना हा प्रश्न जरा टिकलीश वाटला.अशावेळी ते होकारार्थी आणि नकारार्थी यांच्या मधील मान हलवायचे.आताही त्यांनी तेच केल म्हणाले सांग बरं कारण..

              पुल देशपांडे हे कोण आहेत..सौ देशपांडे यांनी प्रतिप्रश्न केला.

             महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व.

             इथेच तर खरी गोम आहेना..

              ती कशी?

             अहो,महाराष्ट्रात इतकी व्यक्तीमत्व होती आणि आहेत. अंबाणी आहेत,रमेशदेव आहेत,दादा कोंडके होते.अमीर खान आहे.सचीन तेंडूलकर आहे.एटापल्लीचे सरपंच मुकरु एडका कोवा आहेत.माझे सासरे कैलासवासी गोपाळराव कृष्णराव देशपांडे कवठेकर होते.पण पुलच कां लाडके आहेत?हा प्रश्न चोरांना पडला असू शकतो.

            अगं बाई या यादित तू माझ्या वडिलांचा कां समावेश केला?

             अहो ते माझे सासरे आहेत.

             मग काय झालं ..ते आमच्या देशपांडे कुटुंबियात 6 टक्के सुध्दा लाडके नव्हते तर महाराष्ट्राचे कधीपासून झाले..

मी लाडके कुठं म्हंटलं,थोरामोठ्यांची यादी दिली हो...त्यात मांमजींचाही समावेश केला.तुम्ही म्हणता तर मागे घेते त्याचं नाव.

            बरं बरं..पुढे सांगा..

             इतकी सगळी मंडळी लाडक्या व्यक्तिमत्वाच्या पदवीस पात्र असताना एकटेच पुल कां? हा प्रश्न पडून त्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी मंडळी पुलंच्या घरी शिरली असावी .मला तर वाटतं की ते चोर नव्हतेच.ते संशोधक असले पाहिजेत.

             संशोधक कसे काय?

एखादा प्रश्नाच्या उत्तराचा शोध जो घेतो तो संशोधक असं माझ्या गुरुजींनी शिकवलं होतं.

            अशा संशोधनासाठी गुपचूप रात्रीच्या अंधारात जाण्याची गरज काय मग?

             अहो रात्रीच्या निरव शांततेतच प्रतिभा खुलते.फुलते.एकाग्रिचत्तेची पातळी हाय होते.असं सिध्द झालय ना.म्हणून त्यांनी रात्रीची निवड केली असावी.

            पण पुलंच्या रिकाम्या घरात कसा काय त्यांना शोध लागला असता.

            रिकामं म्हणजे हो काय..काहीच नसनं.म्हणजे शून्य..या विश्वाचा शोध शून्यातूनच लागला ना.संशोधक,साहित्यिक ,लिओर्नादी व्हींची,एम.एफ हुसेन,एसडी बर्मन,हिमेश रेशमिया ही मंडळी जेव्हा शून्यात हरवून जायची किंवा जातात,तेव्हाच्या प्रतिभेला नवे पंख फुटायचे किंवा फुटतत म्हणजे नवं काहीतरी त्यांच्या हाती लागयाचं किंवा लागतं.

             म्हणजे तुला असं म्हणायचं की ते चोर नव्हते.

             त्यांना चोर म्हणून हिणवू नका..अहो प्रेयसीच्या घरी रात्रीच्या निरव शांततेत प्रियकर गेला तर ती काय चोरी ठरते.

             म्हणजे पुलंच्या घरात शिरलेली मंडळी तुला प्रियकरासमान वाटते.

             पुलंच्या साहित्याच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते प्रियकर राहू शकत नाही का? प्रियकारनं असं प्रेयसिच्या घरी जाणं हे धाडस असतं.त्यातं थ्रिल असतं.ते अनुभवण्यासाठी सुध्दा ही मंडळी गेली असू शकतात,पु.लंच्या घरी.तुम्ही माझ्यावर प्रेम केलं होतं.पण तुम्ही रात्री तर सोडा दिवसाढवळयाही मला भेटण्याच धाडस दाखवू शकला नाहीत ना..सौ देशपांडेनी बाँब्मगोळा टाकला.

            एका देशपांडे यांच्या घरच्या चोरीची चर्चा दुसऱ्या देशपांडेंच्या बुळेपणावर पोहचण्याची शक्यता दिसतातच आरजेडीके यांनी चर्चेवरच पडदा टाकला.
...