Sunday, April 1, 2012

औषध नको पण डॉक्टर आवर

औषध नको पण डॉक्टर आवर
"औषध नको पण डॉक्टर आवर",असं म्हणण्याची पाळी भोळेसाहेबांवर आली आहे.भोळेसाहेबांना लहानपणापासूनच औषधांचा तिटकारा.आजारी पडल्यावर शक्यतो ते औषध घेण्याचं टाळायचे.घरगुती उपायांनी आजार बरा होतो का हे बघायचे.प्रकरण फार हाताबाहेर गेलं तरच त्यांची पावलं डॉक्टरकडे वळायची.लग्नानंतर या परिस्थितीत थोडा बदल झाला.श्रीमती भोळेवहिनी भोळेसाहेबांच्या तब्येतिची फार काळजी घ्यायच्या.भोळेसाहेबांनी साधी शिंक दिली तरी ते भोळेवहिनींना मोठ्या आजाराचं लक्षण वाटायचं.आणि मग त्या डॉक्टरकडे कां जात नाही कां जात नाही अशी भूनभून भोळेसाहेबांंंंंंच्या पाठिमागे लावायच्या.त्यांचा भाऊ डॉक्टर असल्याने त्याच्याकडेच आपल्या यजमानांनी जायला हवं कारण तो शहरातला सर्वात हुशार डॉक्टर असल्याचं पालुपद प्रत्येक आजाराच्या वेळी भोळेसाहेबांना एैकावं लागायचं.साळयाच्या या कौतुकानं भोळेसाहेबांचे कान विटले .त्यामुळे पुढे पुढे ते बायकोच्या कटकटीला कटविण्यासाठी शिंक आली की औषध घ्यायला मेव्हण्याकडे जाउु लागले.
    बहिणिचा नवरा पेशंट म्हणून ज्या दिवशी  साळयाकडे यायचा त्यादिवशी त्याचं डॉक्टरी ज्ञान अधिकच सखोल व्हायचं.त्यामुळे भोळेसाहेबांना या गोळया देउ की ते इंजेक्शन देउ की ते सायरप देउअशी त्याची अवस्था व्हायची.किरकोळ आजारासाठीही तो त्यांना पाच-पंचेवीस गोळया खायला लावायचाच.या गोळया मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हने नॉट फार सोल्ड असं सांगून दिलेल्या असल्याने तो त्या भोळेसाहेबांना बिनधास्त आणि बेधडकपणे  द्यायचा.फुकटात गोळया मिळत असल्याने भोळेसाहेबही हो नाही करत या गोळयांना पोटात ढकलायचे.शिवाय मेडिकल रिअंबर्समेंटसाठी मेव्हण्याकडून ओषध/इंजेक्शनं यासाठीचं वाढीव बिल घ्यायचे.हा (त्यांच्या बायकोला अद्याप माहीत नसलेला)फायदा सोडला तर भोळेसाहेबांना आजार,औषध,डॉक्टर कधीच आवडले नाहीत.बायकोच्या भावाच्या रुपाने घरात डॉक्टरचा प्रवेश झाला असला तरी आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचं नाही असं त्यांनी मनोमन त्यामुळेच ठरवलं होतं.
    पण जे ठरवलं ते त्यांच्या आयुष्यात कधीच झालं नाही.त्यांनी लग्न करायचच ठरवलं नव्हतं.समजा तशी वेळ आलीच तर ते राहत असलेल्या कॉलिनतल्या हेमा किंवा मालीनी या दोघींपैकी एकिशीच लग्न करीन अशी प्रतिज्ञा केली होती.पण ही प्रतिज्ञा त्यांना बासनात गुंडाळून ठेवावी लागली.कारण हेमा आणि मालिनी या दोघींनीही वयात येताच होणाऱ्या नवऱ्यांना आपल्या आईबाबांकडे इंट्रोड्यूस केलं आणि यथावकाश सौभाग्यवती बणून कॉलनीतून निघून गेल्या.(या हेमा आणि मालिनी  ऐवजी अय्यरांची हेमामालीनी मिळाली तर बहार होईल असं स्वप्न भोळेसाहेबांना त्यांच्या तरुणपणी पडायचं.पण तिचा पत्ता तेव्हा मिळाल्याने तिला आणि तिच्या आईकडे स्वत:ची ऑफर देता आली नाही.नाही तर कदाचित धमेंद्र देवल यांच्याऐवजी भोळेसाहेबांच्या नावाचं मंगळसूत्र  हेमामालीनी अय्यर यांच्या गळयात आज लटकताना दिसलं असतं.)कॉलनितल्या हेमा आणि मालिनी या दोघींनी आपल्या ऐवजी इतरांना आपलसं करावं याचं बरचं दु: भोळेसाहेबांना झालं.असलं दु: दूर करण्याचा खात्रीचा मार्ग म्हणजे बोहल्यावर चढणं हा असल्याचं त्यांचे गुरुमहाराज सोंगेपाटीश्वर यांनी सांगितल्याने भोळेसाहेब बोहल्यावर चढले.
    लग्न झालं त्यावेळी भोळेसाहेबांच्या बायकोचा भाऊ बारावीला होता.बारावीनंतर त्याने एमबीबीएसला प्रवेश घेतला आणि यथावकाश डॉक्टर झाला.भाऊजींच्या रुपाने त्याला आपल्या औषधीज्ञानाची चाचणी घेण्यासाठी फुकटातील प्रयोगशाळा मिळाली.त्यामुळेच हळूहळू भोळेसाहेबांना औषधांबद्यल नॉशिया आला..खर तर त्यांना या घरगुती डॉक्टरला आपल्या जीवनातूनच हद्यपार करावयाचे होते.पण यामुळे बायकोने घरातून हद्यपार करण्याची भीती होती.नाईलाजाने भोळेसाहेबांना हा बुक्क्यांचा सहन करणं भाग पडलं.
    या अत्याचाराचा बदला म्हणूनच त्यांनी ठरवलं की आपल्या मुलाला डॉक्टर करायचच नाही.पण जे ठरवलं ते घडत नसतं याचा प्रत्यय पुन्हा एकदा भोळेसाहेबांना आला.त्यांच्या मुलाला गणिताचा अभ्यास कधीच जीव तोडून करावा वाटला नाही.पण जीवशास्त्राचं गणित मात्र त्याच्या डोक्यात पक्क बसलं.बारावीनंतर मेडिकलला जायचच अशी घोषणा त्याने केली.व्हाट नॉन्सेन्स..असं कितीतरी जोराने भोळेसाहेब म्हणाले.त्यांना चिरंजीवांचा भयंकर राग आला.बी कूल नाहीतर तुमचं ब्लडप्रेशर कूल होऊन तुम्हाला पॅरिलिसीसचा स्ट्रोक बसू शकतो असं चिरंजीवानं सांगितलं..मामा मदतीला होताच.मुलगा डॉक्टरकीचच शिक्षण घेणार हे भोळेसाहेबांच्या बायकोने निश्चित केलं.बायको,मुलगा आणि साळा यांच्या एकमुखी निर्णायामुळे भोळेसाहेबांना तीन विरुध्द एक असा हा सामना हरावा लागला.
    पुन्हा एक डॉक्टर आपल्या डोक्यावर बसणार या चिंतेनं त्यांच्या डोक्यावरचे केस हळू हळू जायला लागले.अमिताभचं स्ट्राँग रिकंमडेशन असलेल्या नवरत्न तेलाच्या पाचशे बॉटल्स डोक्यावर ओतुनही नवे केस उगवले नाहीत.
    मुलगासुध्दा यथावकाश डॉक्टर झाला.आपला डॉक्टर मामा हाच त्याचा आदर्श असल्याने त्याने आपल्या वैद्यकीय कौशल्याचे प्रयोग भोळेसाहेबांवरच सुरु केले.भोळेसाहेबांच्या रुपाने फुकटात हक्काची प्रयोगशाळा मिळाली.एखाद्या आजाराची किंचितशीही चाहूल लागली की मुलगा औषधांच्या विविध कॉम्बिनेशन ट्राय करायचा.याचे काही साईड इफेक्टस् झालेच तर मामा मदतीला धावून यायचा.तो त्याच्या पध्दतीने पाच पंचेवीस गोळयांचा मारा करायचा.मुलगा डॉक्टर झाल्यानंतर गोळया,टॅबलेटस्,विटॅमिन्स,सायरप याशिवाय भोळेसाहेबांचा एकही दिवस गेला नाही..
    आता घरात दोन डॉक्टर झाल्याने यापुढे कोणत्याही परिस्थितीत तिसरा डॉक्टर निर्माण होऊ दयायचा नाही असा पण भोळेसाहेबांनी मनात केला.त्यासाठी कुलदैवतेला नवस बोलला.पण हा नवस काही फळला नाही.कारण मुलासाठी मामाने डॅाक्टर झालेल्या मुलीचं प्रपोजल आणलं.तिचे वडील मोठं हॉस्पिटल टाकून देण्यासाठी तयार होते.मुलालाही ती आणि तिला मुलगा पसंत होता.हे प्रपोजल भोळेसाहेबांसमोर आलं तेव्हा किल्लारी मध्ये भूकंप झाल्यानंतर तेथील भूमीला जेवढा हादरा बसला नसेल तेवढा त्यांना बसला. ते अवाक झाले.त्यांचं ब्लड प्रेशर हाय झालं.आपल्यावर हाय खाण्याची पाळी येते की काय असंही भोळेसाहेबांना वाटलं.मेहुण्याने त्यांना पटकन आपल्या हॉस्पिटल मध्ये ऍ़डमिट केलं.झोपेचं इंजेक्शन दिलं..
    "डोण्ट वरी पप्पा,मी आहे ना.."असा मंजूळ आवाज भोळेसाहेबांच्या कानावर पडला..त्यांनी डोळे उघडले..
    "ही डॉक्टर संगीता.."मुलाने मंजूळ आवाजात बोलण्याऱ्या मुलीची ओळख भोळेसाहेबांना करुन दिली..
    "तुमची होणारी सून"मामाने ओळखपूर्ण केली.
    "कशी नक्षत्रासारखी आहे,नाही का हो.."अशी प्रतिक्रिया देउुन भोळेवहिनींनी परिचयाचं वर्तुळ पूर्ण केलं.
    "हे बघा पप्पा.तुम्ही कसलही टेन्शन घेऊ नका..मी तुम्हाला गोळया देते.त्या घेतल्या की बरं वाटेल.दोन तासात तुम्ही घरी जाऊ शकाल.."डॉ. संगीता त्यांची नाडी तपासत म्हणाली..तिने आता भोळेसाहेबांचा ताबा घेतला होता.डॉक्टर असेलेला साळा आणि मुलाने समाधानाचा सुस्कारा टाकला.
    "यासुध्दा गोळया त्यांना दुपारी दे.."साळयाने डॉ संगीताला सजेस्ट केलं.
    "मामा ही एक गोळी दुपारी दिली तर ते स्पीडीली रिकव्हर होतील."मुलगा म्हणाला.मामाने भाच्याकडे कौतुकानं बघितलं.मग तीनही डॉक्टरांनी आपआपल्या ज्ञानकौशल्यानुसार भोळेसाहेबांना औषधं दिली. भावी सासऱ्याला आपण काय पटकन बरं केलं याचं समाधान डॉ.संगीतानं मिळवलं.    लवकरच ती भोळेसाहेबांची सून म्हणून त्यांच्या घरात प्रवेश करती झाली.   घरीच तीन तीन डॉक्टर असल्याने आता माझं काहीच काम उरलं नाही असं भोळे वहिनींनी डिक्लेअर करुन टाकलय.त्यामुळे त्या काहीही  एैकण्याच्या मनस्थितीतच नसतात.
    भोळेसाहेबांचा आता कुणीच वाली उरलेला नाही.औषध नको पण डॉक्टर आवर असं म्हणत म्हणत एक वर्ष निघून गेलं..सुनबाईला दिवस गेल्याची गोड बातमी भोळेवहिनींनी त्यांना नुकतीच दिली...भोळेसाहेबांचा चेहरा एकदम उजळला..येणाऱ्या नातू किंवा नातीला डॉक्टर होऊ द्यायचच नाही असं त्यांनी पुन्हा एकदा मनोमन ठरवून टाकलंय..
000

No comments:

Post a Comment