Sunday, April 8, 2012

दोन शत्रू-एक-हिचा आणि एक -माझा

दोन शत्रू-एक-हिचा आणि एक -माझा
   एक शत्रू हिचा
    बायकांचा सर्वात मोठा शत्रू कोण असं विचारलं तर तिच्या सासूबाईच या सर्वात मोठ्या शत्रू असल्याचं उत्तर मिळेल.(काही सुनांना आपल्या सासूबाई ,या लादेन सुध्दा वाटतात.)
    पण मला मात्र बायकांचा सर्वात मोठा शत्रू झुरळ वाटतो.त्यांचं आणि झुरळाचं जन्माजन्मांतराचं वैर असल्याची परिस्थीती घराघरात असते.अशी स्थिती केवळ तुमच्या माझ्या घरीच असेल असे नाही तर श्रीमती मिशेल बराक ओबामा,सौ.अंजली सचीन तेंडुलकर,सौ.गौरी शाहरुख खान आणि सौ.नीता मुकेश अंबाणी यांच्या घरीही हेच्च वैराचं नातं असल पाहिजे हे खात्रीपूर्वक मी सांगू शकतो.(या खात्रीची खात्री कुणीही या सर्वांच्या कॉमन फ्रेंड शोभा डे यांच्याकडून करु शकता,येनी टाईम.श्रीमती मिशेल ओबामा यांच्या शोभा डे फ्रेंड कधी झाल्या बॉ,हा प्रश्न मनी आला असेल तर तो सध्या बाजूला काढा.काही प्रश्नांची उत्तर मिळालेलीच बरी असतात.असं शोभा डेयांनीच मिसेस हिलेरी बिल क्लिंटन यांना मुंबई भेटित संगितलं हेतं.त्यामुळे त्यंानीमेनिका लेंंविंस्की प्रश्नाचं उत्तर मिळविण्याचा प्रयत्न केला नाही हे तुम्ही आम्ही जाणतोच.या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्याने बील आणि त्यांचा संसार टिकून राहिला,त्या परराष्ट्र मंत्री झाल्या आणि मोनिका ताई विस्मृतीत गेल्या..)
    झुरळासोबत,भगिनी मंडळाचं वैराचं नातं का निर्माण झालय हे सांगायला जगातील पहिली स्त्री इव्ह आणि तिची नातीन वा सुनबाई आज अस्तित्वात नाही.(कुणाकडे पत्ता असल्यास कृपया कळवावे).
    भविष्यकाळात कधीकाळी टाईम मशिनमधून इव्ह(ताई किंवा वहिनी किंवा मामी किंवा काकू) च्या काळात जाता आले तर,मी त्या भेटल्यावर जे प्रश्न विचारायचे ठरवलेय त्यात, पहिल्यांदा
    झुरळ कधी दिसला.त्याने त्यावेळी कोणता चावटपणा केला ,यांचा अग्रक्रमाने समावेश
    केला आहे.झुुरळाने कोणता व्रात्यपणा केला की ज्यामुळे इव्हजींच्या अंगावर शहारे आले.हे सुध्दा मी विचारणार आहे.
    खरे तर झुरळ हा एवढासा जीव .तो काय बरे चावटपणा करणार.खरे तर चावटपणा आदमने केला असेल नि त्याचवेळी तिथून जाणाऱ्या झुरळावर त्याने खापर फोडले असावे.अशी दाट शंका मला आहे.पण आदमच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या इव्हला तेव्हा फक्त
    झुरळ दिसला असावा.तिने तेव्हढेच लक्षात ठेवले.आदम सुटला आणि बिच्याऱ्या झुरळाला इव्हच्या शापाला बळी पडावे लागले. इव्हने त्याला शाप दिला असावा की तुला आयुष्यात कधीही,कोणतीही मिस,मिसेस किंवा मिस्ट्रेस आपलं म्हणणार नाही,तू दिसलास की त्या जोराने करतील ,तू नष्ट व्हावा म्हणून हर प्रकारे प्रयत्न करतील,नवस बोलतील,तुला शत्रू नंबर वन समजतील.तुझं आयुष्य मिझरेबल व्हावं यासाठी आपलं कसब पणाला लावतील.
     असा काहिसा शाप इव्हने झुरळाला दिला असावा अशी माझी समजूत आहे किंवा गृहितक आहे.इव्हने इतका शिव्याशाप दिल्यावर झुरळ तरी कसा शंात बसेल,तोही जाता जाता किंवा मरता मरता पुटपुटला असेल की ,ईव्हाडे-ईव्हाडे बघच तू आता जरी मी तुझ्या बोलण्याने घायाळ होउुन काही क्षणाने मरणार असलो तरी माझे बलिदान असे वाया जाणार नाही.माझा रक्ताचा थेंब या पृथ्वीवर कायम राहील आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत
    झुरळे राहतील.जोपर्यंत या पृथ्वीवर तुझ्यासारख्या कपट-कामिनी बायका राहतील तो पर्यंत आम्ही तुमच्याशी चावटपणा ,व्रात्यपणा करत राहूच राहू.इव्हचा शाप आणि झुरळाचं हे काल्पनिक किंवा कदाचित सत्यही असलेलं प्रत्युत्तर(-जे टाईममशिन मधून भविष्यात कळू शकेल असं तथ्य-)आजही आपल्या प्रत्यंतरास येतं.
    झुरळं आणि बायकांचं द्वंद युध्द हे असं जे तेव्हा पासून सुरु झालं ते असं अद्याप सुरु आहे.
    माझं घरही त्याला अपवाद कसे राहणार. माझ्या आईला म्हणजेच हिच्या सासुबाईला अंगावर घेणारी ,लग्नानंतरच्या 15व्या वर्षात माझा मनीमँऊ करुन टाकणारी माझी बायको मात्र
    झुरळाला जाम घाबरते हे सांगताना मला कोण आनंद होतोय म्हणून सांगू(भारताला पाकिस्ताने हरविल्यानंतर प्रत्येक पाकिस्तान्याला जेव्हढा आनंद होत नसेल तेव्हढा हा आनंद असतो ,हे स्पष्ट करतो.कारण माझ्या आनंदाची तीव्रता आपल्या लक्षात यावी.)
    आमच्या आणि बहुतेक सर्वांच्याच घरात दोन ठिकाणी झुरळांचं वास्तव्य जास्त असतं.पहिलं म्हणजे बायकोचं साम्राज्य असलेलं स्वयंपाकघर आणि दुसरं म्हणजे शौचालय.दोन्ही ठिकाणी झुरळं तिच्यासाठी लादेन आणि हिटलर या दैत्यांची भूमिका बजावित असतात.
     लग्न झाल्यानंतर ही माझ्या घरी आल्यापासून 
    झुरळांनी सापासारखा तिच्यावर डूख धरलाय.त्यामुळे हर प्रकारे ती त्यांच्या नायनाटासाठी प्रयत्न करते हे ओघानेच आले.यामध्ये तिचा किती वेळ गेला हे तिलाच माहीत.टाईम इज मनी वगैरे हे वचन, झुरळ आक्रमणाबाबत सब
    झुठ असल्याचं तिने खणखणितपणे सिध्द केलेय.पण यासाठी माझे पाकिट किती खाली झालं असेल हे मात्र मलाही ठाऊक नाही.हिचा टाईम रुपी मनी झुरळांनी गटवला आणि माझा खराखुरा मनी घालवला.
    झुरळ मार मोहिमेत हिला किती वैताग आला असेल,त्यामुळे हिने झुरळांना किती शिव्या-शाप दिले असतील,त्यामुळे हिच्या रक्ताचं किती पाणी झालं असेल,हे सर्व संशोधनाचे विषय आहेत.असे संशोधन करुन त्यातून फारसे काही साध्य होईल हे काही संभवत नाही.(त्यामुळे पीएचडी करण्याची इच्छा असूनही हा विषय मी संशोधनासाठी घेतला नाही वा इतरांना सुचवला नाही.)कारण झुरळ काही कमी होत नाहीत हिचा वैतागही कमी होत नाही.या सगळया द्वंदात माझा सहभाग केवळ झुरळे मारणाऱ्या औषधांसाठी लागणाऱ्या खर्चापुरता मर्यादित राहिला आहे. (ऑफिस मधून घरी खटमल आणण्यासाठी तिने जसे मला जबबादार धरले आहे तसे अद्यापतरी
    झुरळाबाबत जबाबदार धरलेले नाही हे माझं आणि त्या झुरळांच नशिब.}
    झुरळ माझ्या वाटेला फारसे कधी गेले नाहीत.कधी गेलेच असतील तर झाडनीने वा झाडूने मारण्याचा मी फार मोठा पराक्रम गाजवला आहे.बकासुर आणि भीमाच्या द्वंदयुध्दात त्याने इतर चार पांडवांना गृहीतच धरले नव्हते त्याचप्रमाणे झुरळे आणि हिच्या द्वदांत तिने मला गृहीतच धरलेले नाही.हा माझा प्रश्न असून तो मी माझ्या पध्दतीनेच सोडवणार असे कदाचित माझ्या बायकोला वाटत असण्याची शक्यता आहे.
    फक्त अधून मधून आपल्या घरी झुरळं फार झालीत हो,असं ती सांगते तेव्हा मी आमच्या चार खोल्यांच्या फ्लॅटमध्ये इकडे तिकडे बघतो.दोन तीन
    झुरळाच्या वर
    झुरळं दिसत नाहीत.त्यातला एखादा शौचालयात तर दोन तीन गॅसच्या शेगडीच्या पाठिमागे असतात .हे दोन तीन झुरळंही तिला खूप वाटतात.मीही तिला होकार देतो.ती खूष होते.मी तिला दुसऱ्या दिवशी झुरळ मारण्याचं औषध आणण्याचं आश्वासन देतो.ती खूष होते.एखादे वेळेला गळयातही पडते.नेमका त्याचवेळी एखादं
    झुरळ माझ्या बर्म्यूडात शिरण्याचा प्र्रयत्न करतो.मी हिला बाजूला ढकलतो.बर्म्यूडा हलवू लागतो..हलवता हलवता झुरळाला शिव्यशाप देऊ लागतो..बायको तर तर झुरळावर जाम भडकून जाते..
    ऍ़डमच्या कुशित पहिल्यांदा इव्ह आल्यावर झुरळाने  त्या रोमँटिक क्षणात
    असाच बिब्बा घातला असला पाहिजे..त्यामुळेही कदाचित इव्ह त्याच्यावर भडकली असली पाहिजे..हे भडकणे माझ्या बायकोपर्यंत परंपरेने असे चालत आले आहे..
    000
    एक शत्रू माझा
    माझ्या घरी आवडत्या पाहुण्यासारखा अवचितपणे येणाऱ्या उधळीचा मी शंभर टक्के राग करतो.हा बिनबुलाये मेहमान ढेकणासारखा घरी कधी आणि कसा येतो हे मलातरी अद्यापपावेतो कळलेलं नाही (26/11ला कसाब आणि कंपनी मुंबईत कसे आले हे जसं कळलं नाही.)एक मात्र खरं की माझी बायको
    ,तुम्ही बेस्टच्या बसमधून किंवा लोकलमधून उधळी घेऊन आलात असं मला कधीच बोलली नाही.त्यामुळे मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे.
    ढेकणासारखी उधळीही तुम्ही बाहेरुनच आणता असा तिने लकडा लावला असता तर माझे जिणे मुश्किल झाले असते.
    ढेकूण आणि उधळी हे माझ्या नावडत्या यादित टॉपवर असले तरी मी उधळीला या यादित ढेकणाच्या वर क्रमांक देतो.कारण उधळीने माझ्या कपाटातील बरीच महत्वाची कागदपत्रे आणि पुस्तके खाऊन फस्त केली.दरवाजा फस्त केला असता तरी मला एवढं वाईट वाटलं नसतं.पण कागदपत्रांचा वार मला जिव्हारी लागलाय.त्यातही माझ्या पहिल्या प्रेमाची मी लिहिलेली पण पाठविण्याचं धाडस करु शकलेली प्रेमपत्रे उधळींनी स्वाहा केली.तारुण्यात असताना जमवलेली जिनत अमानची सत्यम शिवम सुंदरमची  आणि बो डेरेकची टेन मधील दुर्मिळ चित्रेही स्वाहा केली.त्यामुळे उधळी म्हंटली की माझा पारा चढलाच म्हणून समजा.
    त्यामुळे घरी उधळी लागली असं जेव्हा आठ दहा महिन्यातून एकदा बायको सांगते तेव्हा माझा पुरुषार्थ जागतोच.खरे तर त्यावेळी माझ्यातले रघुनाथराव पेशवे जिवंत होतात.मी घोडयावर मांड टाकून अटकेपारची तयारी करु लागतो किंवा एखादा पट्टेदार वाघ घरी शिरला असून त्याच्याशी आपल्या फ्रिस्टाईल मुकाबला करुन त्याला जेरबंद करायचाय असं मला वाटतं आणि माझे बाहू फुरफरु लागतात.
    ढेकूण मारण्याच्या मोहिमेत बायको आघाडीवर असते आणि मी तिला असिस्ट करत असतो.पण उधळीसोबतच्या संघर्षात मी एकटाच मैदानात उतरतो.खरं तर मीच या संघर्षाची तुतारी फुंकतो.त्यावेळी मला फक्त उधळीच दिसते.बायको-मुलं कुणी सुध्दा मला दिसत नाही.उधळीसोबतच्या या संघर्षात बायकोचा सहभाग घेत नसल्याबद्दल तिची जरा सुध्दा तक्रार नसते.उलट ती खुष असते.शिवाय नवरा असावा तर असा, उधळी मारण्यासाठी एका पायावर दोन्ही हातावर तयार असणारा असे कौतुकाचे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटतात.
    उधळी मारण्यासाठी पेस्ट कंट्रोल पासून तर अनेक उपलब्ध औषधांचा मी वापर करतो.उधळी लागलेली जागा खरवडून काढतो.ते करताना उधळीचे जंतू मरतात.त्याचे मला समाधान वाटते.आनंदही होतो.माझा पराक्रम त्याक्षणी सार्थकी लागल्याचे दिसते.बायको आणि मुलगी माझ्या या पराक्रमावर खुष होतात.बायको एक्स्ट्रा कडक चहा करुन देते.मुलगी डोक्याला मालीश करुन देते.
    उधळी घरी येणाचा हा साईड इफेक्ट माझ्यासाठी आनंददायी असतो.असे हे गेली अनेक वर्षे चालू आहे.उधळीच्या जंतंुना यमसदनी पाठविण्याच्या क्रमात तसा फरक पडलेला नाही.सहा सात महिने ते वर्षे-दोन वर्ष उधळीविना निघून जातात.त्यांची आठवणही येत नाही.पण अचानक एके दिवशी उधळीचे जंतू पुस्तकांच्या कपाटात किंवा शौचालयाच्या दरवाज्याजवळ दिसू लागतात.बायकोच्या आधी माझंच लक्ष तिकडे जातं.बायको काहीच बोलत नाही.उधळीरुपी अहमदशहा अब्दालीने पुन्हा एकदा आमच्या घरी आक्रमण केलं असतं.तो त्याच्या सैनिकांनी थेट घरात येऊन मला माझ्या कुटुंबियांना वाकुल्या दाखवायल्या सुरुवात केली असते.उधळी सोबतच्या गेल्या अनेक वर्षातील माझ्या घरातील पानीपताच्या मैदानात मी त्यांना पराभूत केलयं अशी जी माझी समजूत असते ती परत एकदा खोटी ठरते.
    घरात असणाऱ्या इतर अनेक जीव जंतूसोबतच उधळीचे जंतूही आपल्या आयुष्यातील इंटिग्रल पार्ट समजायला हवेत असं माझं एक मन म्हणतं.पण दुसर मन मात्र उधळीला शत्रू क्रमांक एकवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतो.शत्रुही असा ही घर फस्त करणारा.कोणतीही दयामाया नसणारा आणि मानसिक ताप संताप देणारा..या घरभेद्याशी माझा संघर्ष गेली कित्येक वर्षे सुरु आहे.पूर्वीसारखं मला आता विरश्री गाजवावी वाटत नाही.उधळीचे घरी येणे मला आता अपशकून वाटायला लागले.म्हणजे कोणत्यातरी संकटाची चाहूल.माझं मन आता कमकुवत झालय हा त्याचा पुरावाच होय.मलाही ते कळतय.सोसायटीच्या रखवालदाराला उधळी मारण्यासाठी मी टीप देतो आणि मी हनुमंताच्या मंदिरात जाऊन उधळी माझ्या घरुन जाऊ दे रे मारुतीराया अस म्हणून प्रार्थना करु लागतो..

No comments:

Post a Comment