Sunday, April 1, 2012

भारत कां हरला?

भारत कां हरला?
   भारताची विश्वविजेती क्रिकेटची चमू इंग्लंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात दणक्यात कां हरली?,याचा शोध घेण्यासाठी केबीआयची नियुक्ती क्रिकेट बोर्डानं केली.केबीआयनं बराच अभ्यास करुन आपला अहवाल बोर्डाला दिला हा
अहवाल प्राप्त झाल्यावर त्यावर चर्चा करुन पुढची एलओसी-लाईन ऑफ ऍ़क्शन ठरविण्यासाठी क्रिकेट बोर्डाच्या गुप्ततळघरात बोर्डाच्या सदस्यांची ओपन बैठक झाली.या गुप्तबैठकीवर आंतराष्ट्रीय सामन्यात संधी मिळालेला एक क्रिकेटपटू बारिक लक्ष ठेऊन होता.त्याने बैठकीच्या वेळी पेप्सी आणि कोला देण्याच्या कंत्राटदाराला पटवले नि या कंत्राटदाराचा वेटर म्हणून आत प्रवेश मिळवला.बेठकिच्या वेळी कोला आणि पेप्सी सदस्यांना देताना त्याने अधून मधून बैठकिचे स्टींग ऑपरेशन केलं.
    या स्टींग आपरेशनची दृष्यफित त्याने आमच्यासह त्याच्या खास दोस्तांना दाखवली.त्या बैठकित झालेली चर्चा ही क्रिकेटच्या हिताची असल्याने क्रिकेट प्रेमी रसिकांसाठी उघड करण्यास काहीच वावगं नाही असं काही आजी काही माजी आणि काही पाजी क्रिकेट पटूंनी आम्हाला सांगितल्यामुळे संपादित-एडिटेड गोष्टी आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवत आहोत.
000
भाग एक
    या बैठकित आपल्या देशातील सर्व महान संख्याशास्त्रज्ञ,वास्तुशासत्रज्ञ,फेंगशुई तज्ञ,ज्योतिषी,पोपटवाले,काही प्रमुख बाबा-महंत-स्वामी-महाराज यांचे यांचे सीईओ-चिफ इफेक्टिव्ह ऑफिसर उपस्थित होते.
   बैठक सुरु होताच उत्तरेकडील एका जगद्गुरु स्वामी महाराजांच्या सीईओने सांगितलं की,या सामन्यांच्या काळात एकदा खग्रास सूर्यग्रहण आणि एकदा खंडग्रास चंद्रग्रहण येऊन गेले.ही दोन्ही ग्रहणे नेमकी याच काळात कुणी घडवून आणली याचा शोध घेणं अत्यावश्यक आहे.कारण या ग्रहणांमुळेच आपल्या सर्व दस हजारी (मनसबदार) खेळांडुंच्या बॅटिला ग्रहण लागलं नि त्यंाच्या बॅटी चालल्या हलल्या आणि डुलल्याही नाहीत.ग्रहणकाळात भारतीय संघाच्या महा-व्यवस्थापकांनी जर जगद्गरु महाराजांच्या आश्रमाशी संपर्क साधला असता तर पाप ग्रहांची शांती करण्यासाठी होमहवन करता आलं असतं. पण याबाबतीत दाखविण्यात आलेल्या अनाकलनीय अनास्थेची त्रिस्तरीय चौकशी अमेरिकेच्या सीआए,रशियाच्या केजीबी आणि इस्त्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनांकडून केली जावी अशी मागणी या सीईओने केली.
   00000
भाग दोन
   या बैठकिला बोलाविण्यात आलेल्या संख्याशास्त्रज्ञ आणि आकडेवारीशास्त्रज्ञ यांचा अहवाल डोळयात अंजन घालणारा होता. या तज्ज्ञांच्या निष्कर्षानुसार भारतीय क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूने त्यांच्या सल्ल्यानुसार जर त्यांच्या त्यांच्या शुभांकाचे म्हणजेच लकीनंबरचे शर्ट घातले असते तर ते अशुभ आकड्यांच्या कचाट्यात सापडले नसते.हा मौल्यवान सल्ला फुकटात देऊनही तो भारतीय क्रिकेट संघातील एकाही खेळाडूने एैकला नाही.त्यामुळेच या संघाला अपयशाचं धनी व्हावं लागलं.
   तळटीपेत असही नोंदवण्यात आलय की,जर आमच्या सल्ल्यानुसार प्रत्येक खेळाडूने त्यांच्या त्यांच्या नावाचं नव्यानं बारसं केलं असतं - म्हणजे त्यांच्या ओरिजल नावात फक्त एक एक्स्ट्रा अक्षर टाकलं असतं तरी अनेक सामन्यात एक्स्ट्रा धावा वाचल्या असत्या प्रत्येक भारतीय खेळाडूंच्या धावसंख्येत किमान एक तरी एक्स्ट्रा धाव वाढून भारत हंड्रेट परसेंट जिंकला असता.
000
भाग तीन
   सन्मानीय फेंगशुई तज्ज्ञ यांनी भारतीय संघाच्या पराभवाला हातभार लागलेल्या कारणांची मालिका दिली.त्यात नैऋत्य दिशेला असलेल्या हॉटेलमध्ये संघाचा मुक्काम नसने,वायव्यपूर्व दिशेला असलेल्या स्वीमिंग पूलचाच वारंवार वापर भारतीय खेळाडूंनी करणे,धोनिला सांगूनही त्याने आपल्या खोलीत काचेच्या बेडकाच्या पोटावर झेंडूचं फूल ठेवणे,निळया तबकडित पिवळ्या मेणबत्ती ऐवजी हिरव्या रंगाची मेणबत्ती लावणे,सेहवागने लॉफिंग बुध्दासोबत हिरवा प्रिझ्म  आपल्या बेडरुममध्ये ठेवणे अशा कारणांचा समावेश होता.
   फेंगशुई तज्ज्ञांच्या कथनानुसार इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ज्या हॉटेलात भारतीय खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यांची रचना फेंगशुईच्या नियम आणि उपनियमानुसार जर केली गेली असती तर कोणत्याही परिस्थितीत भारतीय संघांचा पराजय झालाच नसता.
   भारतीय क्रिकेट मंडळ हे जगातील सर्वाधिक श्रीमंत महामंडळ असल्यानं खरं तर हे दोन्ही दौरे सुरु होण्यापूर्वीच भारतीय खेळाडुंना राहण्यासाठीच फेंगशुई आणि वास्तुशास्त्राच्या नियमांचं काटेकोर पालन करुन भव्य वास्तु बांधण्याचं नियोजन करायला हवं होतं. या वास्तुंुची शुभमुहुर्तावर शास्त्रशुध्दपध्दतिने वास्तुशांती केली असती तर या वास्तुतील वास्तुपुरुष आपल्या सर्व खेळाडुंच्या मदतिला योग्यवेळी धावून गेला असता.मात्र असं प्लानिंग करणं बोर्डाला  जमलं नाही. त्यामुळं भारतीय संघाला अपवित्र आणि तंात्रिकदृष्ट्या अयोग्य अशा वास्तुत राहावं लागलं.दोन्ही देशातील त्या वास्तुंमध्ये भूताटकी तर होतची होती पण त्या वास्तुला पिशाच्चबाधाही झाली होती..या भूताटकीची बाधा झाल्यानेच प्रत्येक सामन्यात भारतीय खेळाडूंचं फुस्स झालं.खरा दोष त्या भुताटकीला जातो.भारतीय खेळाडूंच्या बॅटिला दोष देणं म्हणजे चोर सोडून सन्याशाला फाशी देण्यासारखं ठरतं. शिवाय फॉरेन प्रशिक्षकला फी पोटी जेवढी रक्कम दिली जाते त्यात या दोन्ही देशात होण्याऱ्या प्रत्येक सामन्याच्या ठिकाणी वास्तूशास्त्र आणि फेंगशुई आधारित  एक एक पंचतारांकित शुभवास्तू बांधून झाली असती.
   समजा एवढं करुनही अपयशाचा सामना करावा लागला असता तर  या हॉटेलचा उपयोग क्रिकेट टुरिझम साठी करता आला असता नि आधीच श्रीमंत असलेल्या क्रिकेट बोर्डाची तिजोरी आणखी फुगली असती. अनेक क्रिकेटपटूंनी भारतात वेगवेगळया ठिकाणी हॉटेल्स काढली आहेत.त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना क्रिकेट मंडळाची या दोन्ही देशातील हॉटेल्स चालविण्यासाठी व्यवस्थापक म्हणून नोकरी देता आली असती.
00
भाग चार
  भारतीय संघावर टीकेची झोड उठाली असताना एक फार थोर माणूस म्हणाला की ,भारत कां हारला यासाठी खऱ्या कारणांचा शोध घ्या.खोट्या कारणांच्या मागे लागू नका.सध्या आपल्याकडे तेच चाललेय.आपल्या खेळाडूंनी टायगर बिस्किट खाल्ले नाहीत,बूस्ट पिलं नाही,च्यवनप्राश प्राशन केलं नाही.काम्लान,बोर्नव्हिटा कशाशी खातात किंवा पितात हे तर या क्रिकेटपटूंना माहीत असण्याचं कारणचं नाही.यांचं एनर्जी ड्रिंक कोणतं तर पेप्सी नाहीतर कोकाकोला.परिणाम असा. निर्बुध्दतेची हाईट झाली की ही.ड्रिंकच प्यायचे होते तर मग मल्लिका शेरावत पिते ते स्प्राईट प्यायचं  होतं. स्प्राईट पिऊन मल्लिका कशी एनर्जीटिक झालीय हे समस्त हिंदुस्थानच नव्हे आता सारं जगही बघते आहे.
   (केबीआयच्या अहवालाच्या शेवटी ही प्रतिक्रिया सुध्दा नोंदविण्यात आली आहे.त्यावर आपण आता पुढच्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यापर्यंत चर्चा करायला हरकत नाही.)
00
   भाग पाच
(या अहवालात क्रिकेटच्या हिताच्या बऱ्याच गोष्टी नमूद आहेत.एसएससी बोर्डाचा पेपर जसा फुटतो तसाच क्रिकेट बोर्डाचा हा अहवाल फुटण्याची शक्यता गृहित धरुन बोर्डानेच हा अहवाल बासनात गंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं ताजं वृ- आहे.)

No comments:

Post a Comment