Saturday, April 21, 2012

गधा दुधाची ब्रँड ऍ़म्बेसेडर

 गधा दुधाची ब्रँड ऍ़म्बेसेडर
   मुकरु एडका कोवा जेव्हा जोरजोराने ओरडतो,तेव्हा त्याचं ओरडणं हे गाढवाच्या रेहकण्यासारखं असतं.असं त्याला त्याची बायको सुखाबाईनं लग्नानंतरच्या दुस-या वर्षापासून सांगायला सुरुवात केली होती.त्याला आता 25 वर्ष झाली पण त्यात आजतागायत खंड पडलेला नाही.त्यामुळेच आपल्या नवऱ्याचे पूर्वज नक्कीच गाढव कुळातले असले पाहिजे यावर तिची खात्री पटली होती.या खात्रीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी आपला मुलगा 12 वी झाल्यावर त्याला फॉरेसिंक टेक्नालॉजीचा अभ्यासक्रम करायला लावून कोवा घराण्याच्या डीएनएचे सुक्ष्म संशोधन त्याच्या मार्फत करण्याचे तिने मनोमन ठरवून टाकले होते.
   000
   मुकरु गाढवासारखा रेहकतो याबद्यलची दुसरी सुध्दा शक्यता कधी कधी तिच्या मनात येई.सुखाबाईला वाटायचं की मुकरुच्या मायला ती गरोदर असताना गावातला एखादा गाढव  चावला असावा किंवा ती मच्छिबाजारात जात असताना गाढव आडवा गेला असावा किंवा मुकरु लहानपणी रांगत रंागत बाहेर गेला असताना तेव्हा घराबाहेर नुकत्याच आलेल्या कुंभाराचा गाढव डसला असावा...यापैकी कोणतीही एक शक्यता पॉसिबल होती.
   000
   सुखाबाईच्या मनात कित्येकदा आलं की आपल्या डोक्यात आलेलं हे विचारांच भूत असं डुलतय..आपल्याला वाकुल्या दाखवतय हे मुकरुला सांगावं.पण आपलं बोलणं ऐकून मुकरुच्या डोक्यातलं गाढवाचं भूत बाहेर पडलं नि ते आपल्याला डसलं तर..अशी भीती तिला वाटायची.त्यामुळे ती प्रत्येक वेळी गप्प बसून डोक्यातल्या भूताला गाडून टाकायची.
   00
   आज सकाळपासून मुकरु पुन्हा गाढवासारखा आरडाओरड करायला लागल्यावर मात्र तिने ठरवले की लय झालं.आज बोलून टाकायचं..असं मनात म्हणत ती मुकरुच्या समोर गेली तर मुकरु पेपरात आलेल्या गाढवाच्या फोटोला नमस्कार घालताना दिसला.
   सुखाबाई समोर दिसताच मुकरु तिला म्हणाला..सुखे दंडवत घाल..तू बी दंडवत घाल.
   कोणाले जी.
   या गध्याले..पेपरातील गाढवाच्या फोटोकडे सुखाबाईचे लक्ष वेधून मुकरु म्हणाला.
   तुमच्या भावकीतला हाये काजी हा गधा.का तुमचा दूरचा कोनी पावना-रावना हाये  का मंग तुमच्या घराण्याचा मूळ पुरुस हाये ..
   तसं असतं किती बरं झालं असतं सुखे..पेपरातील गाढवाच्या फोटोवर नजर रोखत मुकरु म्हणाला.
   तसं नायी हे बरं नायी का..नायी तुमाले समद्या गावातले लोक गधा घराण्याचे सरंपच असं मनले असते ना..
   तस असतं लय बेस झालं असतं सुखे..
   का मनता..सुखाबाईनं आश्चर्याने विचारलं.आज मुकरुला गाढवासोबत कुत्र्यानेही चावलं तर नाही ना असंही तिला वाटलं.
   सुखे मले मालूम हाये तुह्या डोस्क्यात काय चाललं ते..मी गधा घराण्याचा हावो असच नायी तर मले तू सोता गधा हाये असं मनलं असतं तरी लय खुसी झाली असती.
   खुसी झाली असती.सुपाएवढया प्रश्नार्थक चेहऱ्याने सुखाबाईने विचारलं.खरं ते विचारणं नव्हतचं ते होतं अविश्वास दर्शवणारं किंचाळणच.आज गाढव आणि कुत्र्यासोबतच आपल्या नवऱ्याला उंदिरही चावला असावा असं तिला वाटलं.
   तुला वाटत असन आपल्या नवऱ्याले आज झालं तरी काय..त्याले कावून बा गध्यावर एवढं प्रेम वाटाले लागलं.सुखे सुखे मी गधा नायी याचं मले दु: हायेच हाये..पन आपल्याले गध्याचं पालन पोषनभी करता येत नायी याचं बी लय दुख हाये..
   कावून बा..
   सुखे गधा मोठा गुनी प्राणी हाये..मुकरु म्हणाला.
   हो ना ..तो रेहकतो..लाथा हान्तो.कोठबी हागतो..मुततो..चिखलात लोयतो..मोठाच गुनी..
   मले बी तस कराच वात्टे नं..मलेच कावून समद्या मानसायले तसच वाट्ते.मनून होयीच्या पाडव्याले मानूस गध्यावानी बोंबलते काय..फोदा करते काय,चिखल काय फेकते..कंट्री काय ढोस्ते..आन गटारात जावून काय पडते..तवा तो गध्याले बी मांगं टाकते का नायी..
   तरी तुमी त्याले गुणी मनता..
   तो काय मायावानी मोहाची घेत नायी तुह्या भावावानी कंट्री ढोसत नायी..
   आता माहा भाऊ मंधीच कुठून आला बा..
   मंधी नायी आला तुले उदाहरन देल्ल..गधा असं कायबी करत नाय.
   पण कावो तुमाले आज एवढं गध्यावर प्रेम कावून आल बा.अजून पावेतो तुमच्या त्या आवडत्या फावडत्या कायकुट्या रानी मुकर्जीच नाव बी तुमी तोंडातून काढलं नायी.
   अस्या पन्नास राण्या-फान्या गध्यावरुन मी ओवारुन टाकतो.
   रानी मुकर्जीपेक्सा तुमाले गधा भावला.डोळे विस्फारत सुखाबाईने विचारलं.
   सुखे ,आवो रानी को गोली मारो आता माझ्या दिलात फक्त गधा गधा आन गधा
   गधा नसन वो गधी.
   गधा काय गधी काय.दोनी बी ग्रेट.
   तुमाले कवा कयल बा ते ग्रेट हाये म्हणूनशान..
   आवो सुखे ते ग्रेटच हायेत.किलीओपोट्रा नावाची एक मोठ्ठी राणी होती.एकदम ढाँसू..एैश्वर्या फैश्वर्या,सुसमिता फिसमिता,करिना फरिना या आजच्या ब्युटी क्विनायन तिच्या फुढे झक मारल्या असत्या.या किलीओपाट्रावर तवाचे समधे राजे महाराजे सम्राट लाईन माराचे.अशी ढाँसू होती.
   तिचा आन गध्याचा काय संबंध.
   सुखे किलीओपात्रा राणी गध्याच्या दुधानं आंघोळ पांघोळ कराची मने दररोज.त्यामुळे तिच्या सौंदर्याले चार नोवे तं दहा दहा चाँद लागले व्हते.
   मंग..
   ती गचकली.. गध्याचे दुधाले कोनी वाली राह्यला नायी.
   मंग तुमचा काय इचार हाये.कायकुट्या रानी मुकर्जीले गध्याचं दूध इकता का.
   आता कसं माझ्या मनातलं बोललीस..मंघापासून तोच इचार करतो मी.सरपंचपदाले लाथ हाणून गधा दूध डेअरी टाकावी मनतो.एक डेअरी मी टाकतो एक बिल किंटन भाऊले टाकाले लावतो तिकडे न्युयार्कात.तिकडच्या फटाकड्या पोरियले आणखी फटाकड करण्याची ताकत गध्याच्या दुधात असल्याचा बिल भौ जोरात सांगल त्याच्याकडे धो धो पैसा येईल.हिलरी वयनीच्या इलेक्सनले त्याचा उपेग व्हईल.आपली आयडिया मुकरुने सुखाबईला बोलून दाखवली..अन झपाट्याने कामालाही लागला.

No comments:

Post a Comment