Sunday, March 10, 2013

मै एक मुश्ते गुबाँर


मै एक मुश्ते गुबाँर
    सांप्रतकाली कुमारी असलेल्या बिपाशा बसू किंवा बासू यांसी परवा-परवा एका पत्रकारानं विचारलं की तुमचं कुमार जॉन अब्राहम यांच्याबद्दलचं मत काय?या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले.त्या म्हणाल्या हू इज ही?कोण आहे तो?मी तर गडे /बाई,त्यास ओळखतच नाही.हे उत्तर देऊन कुमारी बिपाशा प्रस्थान करत्या झाल्या.
    हे असंं कसंं होऊ शकतं,हा सवाल पत्रकारमित्रासंह आम्हालाही भेडसावयला लागला आहे.एकदाचे,कृष्ण,कोण तो?मला तर माहितच नाही,असंं राधेनं म्हंटल्याचं कर्णी पडलं तर धक्का बसणार नाही.कारण भक्तीमध्ये तसंं होऊ शकतं.कोण नकूल-सहदेव?मला अजिबातच ओळखीचे वाटत नाही,असंं द्रौपदी यांनी म्हंटल्याचं कर्नी पडलं तरी एखादे वेळेस आपणासं धक्कादायक वाटायचं नाही.मंदोदरीनं,रावणरावांसाठी अशी कमेंट केल्याचे कानी पडलं तरी ते सुध्दा धक्कादायक वाटायचं नाही.कारण मंदोदरी,रावणरावांच्या प्रेमात होत्या  किंवा कसे? हे काही वाल्मिकीमुनींनी नोदवलेलं नाही.व्यासमुनींनी सारं काही लिहिलं,पण द्रौपदी आणि नकूल-सहदेव यांच्या प्रेमाबद्दल विधान केल्याचं आम्हास तरी दिसलं नाही.
    पण बिपाशा आणि जॉन (बि-जॉ) यांचं तसंं नाही. सांप्रतकाली  बि-जॉ हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं बहुतेकांना ठाऊक होतं.हे प्रेम रोमिओ ज्युलिएटच्या प्रेमापेक्षा ,सोहिनी-महिवाल यांच्या किंवा फारच झालं तर देवानंद-सुरैय्या यांच्या प्रेमापेक्षा वरचढ होतं.रोमिओ-ज्युलिएट,सोहिनी-महिवाल किंवा देवानंद-सुरैय्या या प्रेमविरांच्या समोर त्यांच्या प्रेमगानाचे सूर, बेसूर करणारे अडचणींचे डोंगर उभे राहिले होते.दिल दिया दर्द लिया,अशा वळणावर या प्रेमगाथा पोहचल्या होत्या.पण बि-जॉचं तसं नाही झालं.कदाचित हा मुक्त अर्थव्यवस्था,ग्लोबलायझेशन,ग्लासनोस्त,पेरेस्त्रोयका आणि लोकशाहीचाही परिणाम असावा.
    बि-जॉ प्रेमात पडले.त्यांनी एकमेकांच्या घरच्यांनाही या प्रेमकथेच्या प्रेमात पाडलं.त्यामुळे तुम्ही सुखी राहा,असाच आशीर्वाद बि-जॉच्या घरुन त्यांना मिळाला. बि-जॉ मग एकाच महाली राहू लागले.प्रेमाच्या सर्वोच्च बिंदूवर शादीवादी असल्या भकंस बाबी शुल्लक ठरतात.त्यामुळे,शादी करतात आम्ही तसं राहू.तो आमचा प्रश्न असं सांगण्याचं त्यांनी कष्टही घेतलं नाही.कुत्रा भुंकला तरी हत्ती लक्ष देत नाही,हे बि-जॉला ठाऊक असावं.
    बि-जॉची प्रेमगाथा पवित्र असल्याचं सारेच समजू लागले. जॉ-च्या घरी बि-चे सुनेसारखे,आणि तिच्या घरी जॉ-चे जावयासंारखे कोडकौतुकही होऊ लागलं.तसं छापूनबिपून येऊ लागलं.शेक्सपिअर आज असते तर त्यांना या प्रेमगाथेवर सुखान्त साहित्यकृती प्रसवता आली असती.कालीदासांचेही तेच झाले असतं.लैला मजनू प्रसवणारा साहित्यचंद्र आनंदानं थय थय नाचला असता.
    मुद्दा हाच की सात आठ वर्षं बि-जॉची प्रभात ही एकमेकांचा मुखचंद्रमा बघण्यात गेली.चंद्र दूरुनच चांगला दिसतो.पण प्रत्यक्षात तो धुळीने माखलेला,ओबडधोबड आणि खड्ड्यांचा प्रदेश असल्याचं त्याच्या जवळ गेलेल्या पंचेवीस अंतराळविरांनी बघितलं.इतकी वर्षं जवळून मुखचंद्रमा बघण्यामुळे बि-जॉला एकमेकांच्या मुखचंद्रमातील डिफेक्ट्स तसेच तर वाटू लागले नाही ना!कारण आठ वर्षानंतर एके दिवशी सांप्रतकालीन लैला एकिकडे आणि मजनू दुसरीकडेच बघू लागले.दुसऱ्या दिवशी रोमिओ एकटाच दिसला आणि ज्युलिएटही एकटीच दिसली.तेव्हाच हे सिध्द झालं की पाडगावकरबाबा जे म्हणत आले आले आहेत ,प्रेम प्रेम असंतं तुमचं आमचं सेम असतं,हे काही खरे नाही.
    आता तर बि म्हणते,कोण जॉ?मग आठ वर्षं सोबत होता ,तो कोण होता ?की तो कुणिच नव्हता? की तो आभास होता? की फक्त प्रेमाची छाया होती?श्री श्री म्हणतात आपणच आपल्या प्रेमात पडायला हवं.तसं तर बि-चं नव्हतं ना.म्हणजे तिच्या सोबत असणारा तो नसून तीच होती.म्हणजे तुम्हा-आम्हा पामरांना दिसत जरी तो असला तरी तरी प्रत्यक्षात तीच होती.दिव्य प्रेम हे सामान्यांच्या आकलनाच्या पलिकडेचं असल्यानं आपणास ते कळलं नाही.पण मग अचानक एके दिवशी या दिव्य प्रेमाचे दोन मार्ग कसे झाले?
    झाले ते झाले.हा बि-जॉचा प्रश्न.त्यांनी प्रेमाचा उत्सव साजरा केला तेव्हा आपण कुठे होतो त्या उत्सवात.उत्सवाचा उत्साह ययातीलाही टिकवता आला नव्हताच की!मग बि-जॉतर मुंबापुरीच्या प्रदुषनपर्वातील मर्त्य माणसंच.असो.
    कोण जॉन?मी त्याला ओळखत नाही,असं सांगून बिपाशा यांनी जॉन यांना, किसंी की आँख का नूर हूँ/ किसंी के दिल का करार हूँ/ जो किसंी के काम सके/ मै वो एक मुश्ते गुबाँर हूँ,असं म्हणण्यासं भाग पाडलं असावं असं वाटतं.काय जॉनराव,ऍ़म आय करेक्ट?
    (छे छे कोण बिपाशा?मी तिला ओळखत नाही,असं उत्तर जॉन देणार नाही अशी अपेक्षा करु या.)

No comments:

Post a Comment