Sunday, March 10, 2013

कालाय तस्मै नम:


कालाय तस्मै नम:
   इतकी युगे लोटली.पृथ्वीतलावरील काशीविश्वेश्वारच्या दर्शनासाठीचे नारदेश्वरांचे आगमन कधी चुकले नाही.निसर्गऋतुंचा कोणताही काळ असो.त्याकाळातील कोणताही विकार वा तब्येतीची तक्रार असो,नारदेश्वरांनी ते काही दर्शनासाठी जाण्याचे कारण बनविले नाही.पृथ्वीतलावरील त्यांच्या आगमनात कशीविश्वेश्वर दर्शन ठरलेलच.पण त्यांचे कुणाला काही कौतुकच नाही वाटले कध्धीच की त्याची कधी बातमी नाही झाली.आता आपणास वाटेल की देवाच्या दर्शनाला जाणे ही कशी काय बातमी होऊ शकते बरे.खरेच की,ते तसं व्हायला नकोच.पण झाले काय की कावळा बसला नि फांदी तुटली.कुत्र रडलं नि म्हातारी गचकली.असं बरेचदा होऊन जातं.तसंच नारदेश्वरांच्या बाबतीत झालं.
   परवा परवा ते पृथ्वीतलावर येऊन गेले.तेव्हा त्यांच्या मुक्कामी त्यांनी वर्तमानपत्रात बातमी वाचली नि त्यांचे तोंड सुकले.हेच फळ काय मम तपाला,असेही त्यांना वाटून गेले.देवदर्शनाला कुणीतरी जाणार,हे चमचमित वृत्त संबंधितांच्या चकचकित छबीसह त्या वृत्तपत्री विराजमान होते.नारदेश्वरांच्या चित्तात या वृत्तानं घालमेल सुरु झाली.इतक्या युगांमध्ये त्यांच्याबद्दल असे वृत्त कधी छापून आले नव्हते.ते तर बडे असामी.पृथ्वीतलावरच नव्हे तर आसेतु विश्व म्हणजेच विश्वाच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर टोकापर्यंत,नैऋत्य टोकापासून ते आग्नेय टोकापर्यंत संचार करण्याची सनद देवादिकांनी केवळ त्यानांच प्रदान केली होती.असे त्यांचे अनन्यसाधारण महत्व असूनही त्याची जाण आणि जाणिव पृथ्वीतलावरील मर्त्य मानवाने ठेऊ नये याची ही घालमेल होती.त्याचे दु: त्यांच्या कोमल ह्रदयास फार टोचले.हे टोचणे काही गुलाबाच्या काट्याच्या टोचण्यासारखे नव्हते.हे टोचणे काही अश्विनीकुमांराच्या इन्जेक्शनच्या सुईच्या टोचण्यासारखे नव्हते.हे टोचणे काही दोरा सुईत टाकताना अवचित सुईचे अग्र करंगळीला टोचण्यासारखे नव्हते.या टोचण्याची जातकुळी ही खांडववनी पांडवांनी निर्मिलेल्या अजब-गजब महाली श्रीयुत दुर्योधन यांची फजिती झाल्यावर श्रीमती द्रौपदी हसल्यावर,श्रीयुत दुर्योधन यांना टोचले,तसे नारदेश्वरांचे झाले.या टोचण्याने ते कावरेबावरे झाले.आपली दखल घेण्याचीही तसदी घेणाऱ्या मर्त्यमानवाचे काय करावे नि काय करु नये असे त्यांना होऊन गेले.पण आपणच काय देवादीदेव इंद्रसेन हे सुध्दा सांप्रतकाली मर्त्यमानवाचे बाल बाँकाही करु शकत नाही,हे वास्तव त्यांच्या ध्यानी येताच त्यांचा चेहराच पडला.त्यांनी त्या पडलेल्या चेहऱ्याने देवर्शनाला अमुक अमुक जाणार,हे चमचमित वृत्त पुन्हा वाचले.नारदेश्वरांपेक्षा अधिक मोठे,महत्वाचे आणि महात्म्य असणारे असे कोण असू शकतं हे जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली.अशी उत्सुकता पहिल्यांदा सुश्री मेनका इंद्रप्रस्थी आल्या तेव्हा त्यांचे दर्शन घेण्यासाठी सुध्दा त्यांना झाली नव्हती.
   वृत वाचल्यावर त्यांना कळले कुणी सुश्री एकता कपूर या काशीविश्वेश्वरसूत सिध्दीविनायक यांच्या दर्शनाला जाणार आहेत.या चमचमित वृत्तासोबत सुश्री एकता कपूर यांची चकचकित छबी ठळकपणे प्रगटली होती.ज्यांच्या दर्शनाला जाणार,त्या सिध्दीविनायकाची तरी छबी प्रगटवावी की नाही यावृत्तपत्राने,पण सारेच कसे कलीयुगीचे रामायण.हर हर,नारदेश्वर मनी म्हणाले.त्यांना मर्त्यमानवाची किवही आली.काशीविश्वेश्वर सूत मोठे की ज्या सुश्री त्यांच्या दर्शनासाठी जाणार त्या मोठया?हा सवाल त्यांच्या मनी भुंग्यासारखा भूनभून करु लागला.या प्रश्नाचं उत्तर काशीविश्वेश्वरच देऊ शकतील,असे वाटून ते त्यांच्याकडे गेले.तर ते म्हणाले,नो कॉमेंट .काशीविश्वेश्वर असे कां म्हणाले हे नारदेश्वरांनी नंदीश्वरांना विचारलं ते म्हणाले,कालाय तस्मै नम:
   आपल्या मनीच्या शंकेचे निरसन करण्याचा काशीविश्वेश्वरांचा मूड नसल्याचे नारदेश्वरांनी ओळखले.पण त्यांच्याच्यांनी स्वस्थ बसवेना.ही शंका दूर होईस्तो,स्वर्गी प्रस्थान करावयाचेच नाही असे त्यांनी ठरविले आणि ते थेट काशीविश्वेश्वरसूत सिध्दीविनायकांकडेच पोहचले.मंगळवारच्या दर्शनभक्तीचा थकवा घेऊन चार घडी विश्रांतीस निघण्याच्या तयारीस असणाऱ्या सिध्दीविनायकांच्या समोर नारदेश्वर उभे ठाकले.त्यांना बघून सिध्दीविनायकांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.येण्याचे प्रयोजन विचारले.आपली शंका नारदेश्वरांनी त्यांच्या कानी घातली.नो काँमेट.सिध्दीविनायक म्हणाले आणि त्यांनी नारदेश्वरांचा निरोप घेतला.शेवटची संधी घ्यावी म्हणून नारदेश्वरांनी मुषकस्वामींकडे आपल्या शंकेची पृच्छा केली.कालाय तस्मै नम:.मुषकस्वामी उद्गारले.नारदमुनी मुषकस्वामींकडे आवासून बघतच राहिले..

No comments:

Post a Comment