Sunday, January 20, 2013

कारण मीमांसा


कारण मीमांसा
   नादरेश्वरा काल तुम्ही पुन्हा बुट्टी मारली, देवेंद्र रागारागाने नारदेश्वरांना म्हणाले.ते देवेंद्रांना सॉरी म्हणण्याच्या औपचारिकतेत पडले नाही.आणि त्यांनी कारण सांगायला सुरुवात केली..
   काल घरातील मांजरीला फ्लू झाला होता.ती म्लान झाली होती.दूध पिइना की पाणी.अमृत तरी प्राशन करेल असे वाटले,पण छे.डोळे बंद करुन एका जागी पडून राहिली ती राहिलीच.सांगा बघू,देवेंद्रा,अशा स्थितीत कसा काय मी कामावर येऊ शकेन. प्राणीमात्रांवर प्रेम करा,त्यांची काळजी घ्या,असेच कधीतरी आपण,श्री ब्रम्हदेव,श्री नारायण आणि श्री महादेव यांनी सांगितल्याचे नेमके आम्हास तेव्हा आठवले. आपण जे सांगता ते सत्यच असल्याने आम्ही सत्याचा प्रयोग आमच्या मांजरीसाठी केला.आम्ही तिची सेवा करित राहिलो दिवसभर.दिवसभर अस्वस्थ असलेली ती मांजरी रात्री दोनच्या ठोक्याला निवांत निजधामास गेली,तेव्हा कुठे आमच्या जिवात जीव आला. आम्ही सुध्दा दोन घटका विश्रांती घेऊ शकलो. आज त्या मांजरीची तब्येत एकदम उत्त्तम आहे हो,देवेंद्रा.त्यामुळे बघा आम्ही कामावर रुजू झालो.आपण उदार अंतकरणाने आमची कालची किरकोळ रजा मंजूर करावी देवेंद्रा.नारदेश्वरांनी लांब प्रस्तावना करीत आपल्या किरकोळ रजेचा रजेचा देवेंद्राच्या पुढ्यात ठेवला.
   रजा मंजूर करण्यावाचून देवेंद्रापुढे पर्यायच नव्हता.
   00
   2
   नारदेश्वरा काल पुन्हा तुम्ही बुट्टी मारली.अहो तुमच्या सारखा जेष्ठच जर असे करायला लागला तर कनिष्ठांपुढे आदर्श कोणाचा बरे राहणार? तेही असेच बुट्या मारायला तर ऑफिस चालायचे तरी कसे? काम व्हायचे तरी कसे?देवेद्रांनी नारदेश्वरांना थोड्या वरच्या पट्टीत सुनावले.
   क्षमा मागण्याची औपचारिकता टाळून नारदेश्वर उत्तरले..
   काय सांगावे देवेंद्रा,अहो नेहमीप्रमाणे आम्ही अगदी वेळेवर कार्यालयाकडे निघालो.पण तेव्हढ्यात लक्षात आले की आम्ही सकाळी जो प्रसाद तुळशीजवळ ठेवला त्यास कावळा शिवलाच नाही.पुढे पडलेले पाऊल आपोआपच मागे गेले.मीच मला म्हणालो,हर हर हे काय अघटित घडले.इतक्या वर्षात असे पहिल्यांदाच झाले.कावळा प्रसादाला शिवल्या शिवाय आम्ही कधीही घराबाहेर पडलो नाहीत.अपशकून व्हायचे.एखादेवेळेस आमचा अपघातही झाला असता.त्यामुळे आम्ही कावळयांची वाट बघत बसलो,अंगणातच.पण संध्याकळाचे पाच वाजून पंचेवीस मिनिटांपर्यंत तरी कावळा आलाच नाही.आम्ही किती मिनितवाऱ्या केल्या.चुकले माकले असेल तर क्षमा करावी काकस्वामी असेही हजारएक वेळा मनी म्हणालो.नंतर जोराने म्हणालो.आम्ही जोरजोराने एकटेच बोलतोय हे बघून शेजारी पाजारी गोळा झालेत.आमचे तसे बोलणे ऐकूण फिदी फिदी हसायला लागले.हा अपमान आम्ही गिळून,कावळयाची आर्जव करीत राहिलो.आमच्या प्रयत्नांना अखेर यश आले.पाच वाजून सदतीस मिनिटांनी काकस्वामी आले आणि प्रसाद चाखून गेले.आमचा जीव भांडयात भडला.पाऊल पुढे टाकले तेव्हा लक्षात आले की कार्यालय तर साडेपाचवाजताच बंद झाले.त्यामुळे आम्ही काल येऊ शकलो नाही.या सविस्तर विवेचनासह नारदेश्वरांनी आपला किरकोळ रजेचा अर्ज देवेंद्रांपुढे ठेवला.या अर्जावर सही करण्यावाचून पर्यायच त्यांच्यापुढे उरला नाही.पुढच्या खेपेस अशी बुट्टी मारली तर एक दिवसाचा पगार कापू,अशी तंबी देवेंद्रानी नारदेश्वरांना दिली.
   00
   3
   काल पुन्हा नारदेश्वरांनी बुट्टी मारली.आता नारदेश्वरांना जबर शिक्षा करायचीच,अन्यथा काळ सोकावत राहील,असे स्वत:च्या मनाशी ठरवून कार्यालयाच्या प्रवेशद्वारी हातात छडी घेऊनच देवेंद्र उभे राहिले.आधी छडिचा प्रसाद आणि नंतर नारदेश्वरांकडून स्पष्टीकरण घ्यायचे,हा निर्धारच त्यांनी केला. पावणे दहा वाजता नारदेश्वरांचे आगमन झाले.प्रवेशद्वारी देवेंद्र बघून नारदेश्वरांना किंचिंत आश्चर्यही वाटले.आपलं गुपित यांना कसे बरे कळले.सोबत येताना पेढ्याचा पुडा तरी आणायला हवा होता.असा संवाद स्वत:शीच साधत नारदेश्वर प्रवेशद्वारी आले.
   प्रवेशद्वार येताच ते देवेंद्रांच्या पायी पडले.
   अहो नारदेश्वरा हे तुम्ही काय करता आहात.
   देवेंद्रा,आजच्या काळात तुमच्यासारखा मोठ्या मनाचा आणि कदर करणारा कुणी आहे का सांगा बरं.माझे ह्रदय भरुन आले हो.तुम्ही माझ्या कौतुकासाठी प्रवेशद्वारी जातिने हजर झाल्याबद्यल.
   हो ना.आज आम्हास तुमचे खास कौतुक करावयाचे आहे सर्वांदेखत.काल तुम्ही बुट्टी मारलीत ना त्याबद्यल..देवेंद्र तिरकसपणे उद्गारले.
   देवेंद्रा,तेच हो,तुम्हाला सारं काही कळलय,बरे झाले.
   आम्हास काय कळले.
तेच की आम्ही काल का नाही आलोत कार्यालयात ते कां नाही.
   सांगतो ना सारे काही.तुम्हास थोडे फार कळलेच आहे.पूर्ण कळल्यावर तुमचा उर अभिमानाने भरुन येईल.पण आपण आत जाऊन बोलू या का.असे प्रवेशद्वारी संवाद घडणे उचित नाही.
   देवेंद्रांचा नाईलाज झाला नि उत्सुकताही वाढली.त्यामुळे नारदेश्वरांसोबत ते कार्यालयाच्या आत आले.आपल्या खुर्चिवर बसत म्हणाले,
   बोला नारदेश्वरा..
   देवेंदा,अहो काल मी कार्यालयात आलो नाही कारण की काल दिवसभर माझा हॉर्पिन्स ऍ़ण्ड कॉलिन्सच्या संपादकांशी चर्चा सुरु होती हो.
   कशाबद्यल.
   देवेंद्रा,ही मोठीच प्रकाशन संस्था आहे.त्यांनी मला ऑफर दिलीय मोठ्ठी.
   हो का.
   मला ते एक ग्रंथ लिहायला सांगताहेत. मानधनाबद्यल बरीच घासाघिस करावी लागली.चर्चेच्या अनेक फेऱ्या घडल्या.पावने सहाच्या सुमारास सारे काही अंतिम झाले. माझ्या साऱ्या अटी त्यांनी मान्य केल्या.घसघशित मानधन देण्याचे मान्य केले गेले.
   वा वा,पण नारदेश्वरा तुम्हांस कोणता बरे ग्रंथ लिहावयास सांगितला हार्पर आणि कॉलिन्स की फॉलिन्सने.
   अहो,सुट्टी आणि बुट्टी मारण्याची कारणे आणि वास्तव.माझ्याइतका सातत्यशील वसुंधरा भ्रमर कुणी नसल्याने बुट्यांविषयीचं माझं ज्ञान अगाध असल्याचं हॉर्पर आणि कॉलिन्सच्या संपादकांनी बरोबर ताडलं.त्यातूनच त्यांनी हा विषय मला ग्रंथासाठी दिला.
   काय.आश्चर्याने देवेंद्र उदगारले.म्हणून तुम्ही काल बुट्टी मारली .
   देवेंद्रा.अहो पावणे सहा वाजता माझी चर्चा संपली. कार्यालय तर बंद झाले होते...तेव्हा येऊन काय बरे केले असते आम्ही..तुम्हीच सांगा.
   हातातल्या छडीचा मार स्वत:लाच द्यावा असे पुन्हा पुन्हा देवेंद्रांना वाटू लागले..
   00

No comments:

Post a Comment