Saturday, January 12, 2013

अलिबाबाची गुहा..


अलिबाबाची गुहा..
   मोरु धावत धावतच तिसऱ्या मजल्यावर  असलेल्या आपल्या पेंटहाऊसमध्ये आला.अचानक लिफ्ट बंद झाल्याने त्याला असे धावावे लागले.त्यामुळे बिचाऱ्याचा जीव,वर- खाली नि खाली-वर होऊ लागला.त्याची ही अवस्था बघून मोरुची मदर घाबरुन गेली.ती माऊली त्यास म्हणाली,
   असा तू धावत धावत कां बरे आलास बाळा,धाप लागून हार्ट ऍ़टक आला असता तर..
   मोरुच्या मदरचे बोलणे मोरुच्या फादरच्या कानी पडताच ते गडगडून हसले.नि म्हणाले,
   अहो मिसेस तुम्ही काळजी करता कशाला,मोरुला हार्ट ऍ़टक आलाच असता तर आपण इथे एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच आणली असती ना ,मोरुच्या सेवेसाठी.त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेच्या सूर्याला, चार चाँद लागून तो आणखी तेजस्वी झाला असता.
    असे होय..मला बाई हे ध्यानातच येत नाही हो.पण ते जाऊ द्या,मोरु बाळा,तू कां बरे असा धावतपळत आलास धापा टाकत..
   अगं मम्मी आपण कालच घेतलेली पाचवी गाडी खाली कुठे दिसत नाही.मला वाटते,कुणी तरी चोरली असावी.
   अरे माझ्या रामा,आता हो काय करायचे.मोरुची मदर मोरुच्या फादरकडे दु:खी चेहऱ्याने कष्टी होत बोलल्या.
   हात्तिच्या एवढेसे ते कारण,नि त्यासाठी तू धापा टाकत धावत आलास ..
   म्हणजे चिंतेचे काही कारण नाही डॅडी..मोरु त्याच्या फादरला म्हणाला.
   मोरु,चिंता त्यांनीच करावी ज्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न नाही.माझे तसे नाही ना..
   लक्ष्मी तुमच्यावरच कां बरे प्रसन्न आहे हो डॅडी.ती मम्मीशी सारखी भांडतच असते.मोरु आपल्या मदरकडे बघत फादरला म्हणाला.आपला चिरंजीव हा मोलकरीण लक्ष्मीबाईच्याच रिंगणात असल्याचे मोरुच्या फादरच्या लक्षात आले नि ते गडगडाट करत बोलले,मोरु बाळ तू समजतोस त्या लक्ष्मीबाई नव्हे तर गॉडेस ऑफ वेल्थ-लक्ष्मी,या माझ्यावर प्रसन्न आहेत.
   तुमच्यावरच कां बरे प्रसन्न आहेत डॅडी,या गॉडेस ऑफ वेल्थ.तुम्ही तर कधी तर पूजा अर्चा करत नाहीत.महालक्ष्मीचे व्रत मम्मीच करते.मंगळवारचा उपवास मम्मीच करते.सिध्दीविनायकाला जातेच जाते पण वाटवाकडी करुन उद्यान गणेशालाही जाते.मग तिच्यावर कां बरे ही लक्ष्मी प्रसन्न होत नाही.मोरु म्हणाला.
   मोरुच्या या बावळट प्रश्नाला मोरुचा फादरने गडगडाट करत सफाईदारपणे टांग मारली नि तो म्हणाला ,मोरु चोरिला गेलेल्या गाडीचे आपण सेलिब्रेशन करु,ताजएन्डस मध्ये जाऊन.
   चोरीचे सिलेब्रेशन करण्याचा ध्वनी मोरुच्या कर्नपटलावर पडताच तो दचकला.मोरुची मदर जरासी चपापली.आपले, लक्ष्मी-प्रसन्न हजबंड ,असे कां बरे आज वेड्यासारखे वागताहेत असा एक प्रश्न त्यांच्या वेड्यामनाला पडला.पण चोरीचे सेलिब्रेशन हे सुध्दा सोसायटीमध्ये प्रेस्टिज वाढविण्यासाठीच करायचे,असेच आपले हजंबड सांगेल नि आपल्याला आनंदाच्या उकळ्या फुटतील असे त्या माऊलीला वाटले नि ती आता आपला हजबंड मोरुला काय उत्तर देतो याकडे कान टवकारुन बघू लागली.
   मोरुचे फादर त्यास म्हणाले,मोरोबा तुम्ही काळजी करुच नका.चोरांनी आपणास संधी दिली म्हणून  हे सेलिब्रेशन करायचे,असे समजा.
   पण चोरांनी संधी कशाची दिली डॅडी तुम्हांस..
   अरे मोरोबा..नवीन गाडी घेण्याची संधी नव्हे का?तू सांग बघू आता आपण ऑडी घ्यायची की रोल्स रॉयल्स घ्यायची की अतिताभ बच्चन वापरतात ती गाडी घ्यायची..
   खरे की काय..
   खोटे कां सांगू मोरोबा,या फायली बघ,मी कालच घरी आणलेल्या.
   त्यात मी काय बघू डॅडी..
   तू काही बघू नकोस रे..पण प्रत्येक फाईल अलिबाबाची गुहा आहे.फाईल ओपन केली की गुहा उघडलीच समज..गुहा उघडली की रोल्स रॉयल्स हाजीर हो...हा हा.. हा हा..मोरुचे फादर गडगडाट करत बोलले.
   आपल्या फादरकडे असलेल्या फायलीमध्ये अलिबाबाची गुहा असल्याचे कधी आपल्या फ्रेंडसला सांगतो असे मोरुला झाले नि तो धावतच खाली पळू लागला..
   अरे असा धावू नकोस ..धाप लागून हार्ट अटॅक यायचा..मोरुची मदर चिंतेने म्हणाली..
   डोण्ट वरी हो मिसेस,हार्ट ऍ़टक तर येऊ द्या मोरुस,आपण इथेच हिंदुजा हॉस्पिटल आणू..मोरुचे फादर गडगडाट करत बोलले.हे बोल कर्णपटलावर पडताच मोरुची मदर धन्य धन्य झाली..

No comments:

Post a Comment