Sunday, January 20, 2013

टॉमीचा स्ट्रेस आणि आर्ट ऑफ लिव्हिंग


टॉमीचा स्ट्रेस आणि आर्ट ऑफ लिव्हिंग
   तुमचा लाडका टॉमी-डॉगी याच्याकडे कधी तुम्ही कधी 100 टक्के काळजीपूर्वक बघितलं काय ? गुरुमहाराजांची शपथ घेऊन सांगा..नाही ना..तुमचं बघणं हे 59.57 टक्के एवढचं..
   काय राव,तुम्हास  दीपिका पदुकोन,फेस टू फुट न्याहाळायसाठी भरपूर वेळ मिळतो.जॉनी डीप ज्या ऍ़म्बर हर्ड हिच्या प्रेमात पडून तिच्या नावे एका बेटाचं नाव ठेवतोय,ती कशी दिसतेय,हे बघण्यासाठी गुगल प्रवास करायला कसा बरं वेळ मिळतो तुम्हास.पण तुमच्या टॉमीकडे काळजीपूर्वक बघण्यासाठी नाही..हे काही बरे नव्हे हो..हे तुमच्या निदर्शनास आणून देण्याचं कारण की जसं तुम्ही,तुमच्या मिसेस,तुमचा चिंरजीव आणि चिंरजीवी बरेचदा स्ट्रेस मध्ये असता,जाता किंवा असण्या किंवा जाण्याच लघुनाट्य करता की नाही..तुम्ही म्हणाल म्हणजे काय,लाइफ इज लाइक दॅट.स्ट्रेसफुल.ताण नाही असा मनुष्य सापडणार नाही. मग त्या महाराणी एलिजाबेथ असू देत किंवा मग मिस्टर बराका ओबामा किंवा सिस्टर मिशेल ओबामा किंवा रामराव शामराव वनकुद्रे (राहणार चिंचोली खुर्द,तालुका पोस्ट चिखली.)असू देत,साऱ्यांनाच स्ट्रेस असतो. मग आम्ही कसे अपवाद राहू शकू.तुम्ही अगदी बरोबर विचार करताहात. स्ट्रेस शिवाय मनुष्य म्हणजे चुंबनदृष्याशिवाय हॉलिवूडचे सिनेमे.असं काहिसं म्हणता येईल.तर मुद्या हाच की,तुम्ही तुमच्या ताणाचं कौतुक करायलाच हवं.पण तुमचा टॉमीस सुध्दा स्ट्रेस येतो,हे कधी कळायचं तुम्हास.म्हणूनच आम्ही म्हणतोय त्यांच्याकडे 100 टक्के काळजीपूर्वक बघा जरा.
   त्याला कसला आलाय स्ट्रेस-फ्रेस.काय करावं लागतं त्यास,खातो - पितो, इकडे तिकडे मजेत सू- शी करतो, मालकांशी लाडी गोडी करतो,लाड करुन घेतो,एवढच कार्य आणि कर्तृत्व नाही का त्याचं. कसला स्ट्रेस-फ्रेस त्यास.
   अरेरे,तुम्ही फक्त असाच आणि असाच विचार करतात,असं जरी टॉमिस कळलं तर त्यास किती मोठा ताण येईल.त्यास असं वाटत असावं,की आपला मालक (?) आपल्यावर निर्भेळ,निर्मळ,निर्वाज्य,निरपेक्ष प्रेम ब्रिम करतो. पण छे,तसं ते नाहीय. मालकाच्या मनाच्या एका कोपऱ्यात आपल्याबद्यल वेगळच थिंकिंग आहे. टॉमीचा हा विचार अगदी खराच आहे हो.कारण तसं नसतं तर,त्यांनाही स्ट्रेस-फ्रेस असतो असं एव्हाना तुम्हाला कळलं असतच की नाही.
   जाऊ द्या.जे झालं ते झालं.टॉमी सुध्दा स्ट्रेस मध्ये असतो, हे आता संशोधनांती सिध्द झालय.हे पवित्र आणि पुण्याचं काम ब्रिटन देशी,लंडन निवासी शास्त्रज्ञ कॅरेन वाइल्ड यांनी केलय.कॅरेनराव हे पेट बिहेविरिस्ट आहेत.म्हणजे टॉमीचे स्वभावगुण, वागणुक यांच्या अभ्यासाला त्यांनी स्वत:ला वाहून टाकलंय.ते गेली बरीच वर्षं,ब्रिटनमधील टॉमिंचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासांती,टॉमीजना सुध्दा स्ट्रेस येतो, हे त्यांना दिसून आलय.
   हे टॉमिज ब्रिटीश असले तरी ते इंडियन टॉमिजपेक्षा वेगळे नाहीत. ब्रिटिश टॉमीज भुंकतात आणि इंडियन टॉमिज बार्क करतात तेव्हा येणारा आवाज हा भौ भौच असतो.ब्रिटिश टॉमिज हे केवळ दूध-आणि ब्राऊन ब्रेडच खातात नि इंडियन टॉमिज केवळ हाडूकच चघळतात असेही नाही.या दोन्ही टॉमिज किंवा जगातील सगळ्याच देशातील टॉमिजना दोन्ही गोष्टी समानरित्या आवडताच. जगातील सगळेच मिस्टर टॉमिज हे मिस टॉमिजशी प्रणयरंग उधळतांना मी ब्रिटनचा,मी व्हाईट हाऊसमधचा,मी सल्लू भायचा,मी टॉम क्रुझजा,मी इस्तुंबलचा,मी विजय मल्ल्यांचा असा विचार करीत नाहीत.या प्रणयरंगांची उधळण सर्वत्र सेम-टू-सेम असते. त्यामुळे ब्रिटिश टॉमिजना स्ट्रेस येतो याचा अर्थ इंडियन टॉमिजनाही येतो. त्यामुळे त्यांच्याकडे 100 टक्के काळजीपूर्वक बघणं हे आपलं कर्तव्य ठरतच.
   कॅरनराव हे केवळ टॉमिजना स्ट्रेसमधून जावं लागतं,असं संशोधन करुन थांबले नाहीत,तर हा स्ट्रेस कमी करण्याचा उपायही त्यांनी सुचवलाय. टॉमिज जेव्हा रात्री झोपण्याची तयारी करतात,तेव्हा त्यांना गुज-गोष्टी सांगितल्या तर त्यांच्यावरील स्ट्रेस हा खूप खूप कमी होतो,असं कॅरेनरावांना वाटतं.त्यामुळे त्यांनी टॉमिजसाठी बेडटाइम स्टोरीज तयार केल्या आहेत. या कथांमुळे टॉमिजचा स्ट्रेस कमी होतो. त्यांना हलकं हलकं वाटायला लागतं.आपण आपल्या दोन वर्षांच्या छकुल्याशी ज्या प्रेमानं बोलतो ना तसं समजून या गोष्टी टॉमिजना सांगायच्या. बस्स एव्हढचं.
   ग्लोबलाझेशनचा जमाना असल्यानं या गोष्टी नजिकच्या काळात आपल्याकडे येतील तेव्हा येतील.पण आपल्याकडे अशा गोष्टींची कमतरता थोडचं आहे.पंचतंत्र, इसापनीती, अकबर-बिरबल,तेनालीराम,तारक मेहता का उल्टा चष्मा,गुटर गुँ अशा अनंत गोष्टींचं शाश्वत भांडार आहे.शिवाय आर्ट ऑफ लिव्हिंग आहेच की.
   आपण आपला स्ट्रेस कमी करण्यासाठी जातोच ना या वर्गांना.आर्ट ऑफ लिव्हिंग हे आपलं इंडियन म्हणजे नेटिव्ह संशोधन. ते आपल्या टॉमिजना सुटही होइल नाही का..पण त्यासाठी तुम्ही टॉमिजकडे 100 टक्के काळजीपूर्वक बघायला हवं.तेव्हाच तुम्हास कळेल ना ते स्ट्रेस मध्ये आहेत म्हणून.टॉमी आणि तुम्ही जेव्हा ऑर्ट ऑफ लिव्हिंगच्या वर्गाना एकत्र जाल,तेव्हा डॉग इज बेस्ट कॅम्पियन ऑफ मॅन,हे सुप्रसिध्द वचनही आपोआपच सिध्दही होईल..आणि दोघांचाही स्ट्रेस-फ्रेस कमी होईल.
   2013 मध्ये हा संकल्प करायला काय हरकत आहे.?
  

No comments:

Post a Comment