Friday, August 2, 2013

बैठक आणि नॉनव्हेज

बैठक आणि नॉनव्हेज
भाऊसाहेबांची पदोन्नती रावसाहेब म्हणून झाली. त्यामुळे स्वाभाविकच त्यांना आकाश ठेंगणे झाले.धोनीने पहिला हेलिकॉप्टर शॉट मारल्यावर त्याला जसा आनंद झाला असेल तसाच रावसाहेबांना झाला. त्यांना मोठे ऑफिस भेटले. बरेच अधिकराही भेटले. ते ज्या कार्यालयात रावसाहेब म्हणून पदोन्नतीने गेले,त्याठिकाणी त्यांच्यावर बॉस-साहेब होता. पण रावसाहेबांनी पहिल्या दिवसापासूनच त्यांची मर्जी संपादन केली. त्यामुळे बॉस-साहेब प्रसन्न होऊन त्यांनी रावसाहेबांना आणखी अधिकार दिले.
रावसाहेब, आता बैठका बोलावणे, त्या कंडक्ट करणे, बैठकांचा अजेंडा ठरवणे, बैठकीची सर्व व्यवस्था करणे आदी बैठकांशी संबधित सर्व विषय हँडल करु लागले.
भाऊसाहेब असताना त्यांना बैठक हा विषय जाम आवडाचा. एखादेवेळेस त्यांच्यापुढे कुणी दीपिका पडुकोन की बैठक असा पर्याय ठेवला असता तर ते दीपिकाला सोडून बैठकीकडे,भाग मिल्खा भाग केले असते. बैठकीवरचे हे प्रेम लैलाचे मजूनवर असलेल्या प्रेमापेक्षाही थोर होते. त्यांचे हे बैठकप्रेम बघून त्यांच्या ऑफिसातील लोकांना त्यांचे नामकरण बैठकराव भाऊसाहेब असे करुन टाकले होते. भाऊसाहेब असताना बैठकिंना केवळ उपस्थिती द्यावी लागे तरी त्यांचा आनंद अरबी समुद्रासारखा व्हायचा. रावसाहेब म्हणून प्रत्यक्ष बैठकीच्या सूत्रधाराचे काम अंगी पडल्यावर तर त्यांचा आनंद हिंद महासागरा सारखा अथांग झाला. आपल्या आईवडिलांनी कधीतरी जे पूण्यकर्म केले त्याचेच हे फळ असल्याचे त्यांनी ताडले आणि बैठकी कंडक्ट करण्याचा आदेश जेव्हा बॉस-साहेबांनी त्यांना दिला तेव्हा त्यांनी बॉस-साहेबांना वाकून नमस्कार केला आणि देवाघरी गेलेल्या आईवडिलांना मनातल्या मनात दंडवत घातला. त्या दिवशी त्यांना बायका-पोरांना जोरात आणि जोशात पार्टी दिली. हनुमानाच्या मंदिरात नारळ फोडला. सोसायटीत रावसाहेबांच्या पोराने पेढे वाटले. मात्र हे पेढे कशासाठी आहेत हे काही त्यास,ज्यांनी ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांना सांगता आले. त्याने घरी आल्यावर जेव्हा रावसाहेबांना पेढे-वाटप-कारण विचारले ,तेव्हा त्यांचे उत्तर एैकून आपल्या बापाने आज वाटलेले पेढे हे फोकनाड पेढे असल्याचे पोराला वाटले. कारण बैठकीची लावणी,असे त्याच्या कानावरुन गेले होते,पण बैठकीचे पेढे ,हे काही त्याने कधी ऐकले होते ना बघितले होते. रावसाहेब झाल्यावर तरी फोकनाडा कमी करायला बाबांना सांग,असे त्याने मग आईला सूचना केली. माऊलीने ही सूचना रावसाहेबांकडे पास केली.त्यांनी डोक्यावर हात मारुन घेतला.
रावसाहेबांकडे बैठकीची जबाबदारी आल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बॉस-साहेबांनी त्यांना एक महत्चाची बैठक आयोजित करण्याचे फर्मान सोडले. हे फर्मान हाती पडताच,अजी म्या ब्रम्ह पाहिले,अशी त्यांची अवस्था झाली. त्यांच्या उत्साह डोपिंग न करताही शंभर मिटर शर्यतीत पहिल्या येणाऱ्या धावपटुसारखा झाला. भराभर ते कामाला लागले. हाताखालच्या लोकांकडे अनंत सूचनांचा पाऊसच त्यांनी पाडला. बैठकीची तारीख निश्चित करुन तशी नोट त्यांनी बॉस-साहेबांकडे पाठवली.
बॉस-साहेबांकडे कोणतीही नोट वा फाइल गेली की ते दोनच शब्द लिहून नोट किंवा फाइल परत पाठवत. ते शब्द असत ओके किंवा प्लिज स्पिक. मात्र बैठकीच्या तारखेच्या नोटेवर साहेबांनी तेरा शब्दांचं एक वाक्य लिहिल्याचं दिसतात, रावसाहेबाचे गिली-गिली-अप्पाच व्हायचे तेवढे शिल्लक राहिले. श्वास रोखून त्यांनी बॉस-साहेबांनी‍ि लिहिलेले वाक्य वाचले. त्यांच्या जीव भांड्यात पडला. बॉस-साहेबांनी लिहलं होतं की, बैठक दोन तारखेएैवजी तीन तारखेस करा कारण,दोनला उपवास असतो,नॉनव्हेज कसे चालणार? रावसाहेबांनी कॅलेंडर बघितले. तीन तारखेला त्यांचा उपवास होता. बॉस-साहेबाला त्यांनी शिव्या हासडल्या..कारण आता त्यांचे नॉनव्हेज हुकणार होते..पहिलीच बैठक अशी भाकड जाणार या कल्पनेने ते हिरमुसले..लवकरात लवकर बॉस-साहेब कर,असे साकडे त्यांनी कुलदैवतेला घातले.
000



No comments:

Post a Comment