Saturday, August 24, 2013

खऱ्या अर्थाने..

खऱ्या अर्थाने..
    माईकचा शोध लागला नसता तर काय झाले असते? तसे काहीच झाले नसते. माईक नव्हता तेव्हा सभा ,बैठक होतच होत्या की! महाभारताच्या युध्दात माईक नसतानाही इकडचे सेनापती आणि तिकडचे सेनापती आपआपल्या बाजूंच्या सैनिकांना इन्स्ट्रक्शन देतच होते की! त्यामुळे माईकचा शोध लागला नसता तरी काहीच फरक झाला नसता..
    पण माईकचा शोध लागला नसता तर मायकेलांचा जन्मही झाला नसता.
    मायकेल म्हणजे दिसला माईक की चिकट त्याला नि सुरु कर हॅलो हॅलो माईक टेस्टिंग टेस्टिंग करणारे कलाकार.माईकमुळे हे कलाकार उदयास आले.माईक नसता तर  मायकेलांचा जन्मच झाला नसता . त्यामुळे वसुंधरा अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वांना मुकली असती. पण माईकच्या शोधाने ते टळलं.
    अनेकांना किक येण्यासाठी काहीबाही प्यावं खावं लागतं. पण मायकेलांना माईक दिसताच किक लागते. माईकचे हे अनोखे आणि अद्भूत वैशिष्ट्यच होय.
    माईक दिसताच भंदू आनि भगिनोंनो असे या मायकेलांच्या तोंडून माईक हाती येण्याच्या आधीच निघून जाते. जमलेले भंदू आणि भगिनी मग मायकेलकडे टक लावून बघू लागतात. मायकेल मग कार्यक्रमाचा इतिहास आणि भूगोल सांगता सांगता त्याने पाठ केलेला ज्योक,रटाळ झालेल्या एखाद्या खटारा गजलेची ओळ, लंडनाच्या इंग्रजाला मान खाली घालायला लावणाऱ्या एखाद्या लेखकाचे स्फुर्तिदायक इंग्रजी वाक्य मायकेलच्या तोंडून धबधब्यासारखे पडू लागतात.
    भंदू भगिनींची चुळबूळ चाललीय की कुरबूर चाललीय याची या मायकेला काहीच देणे घेणे नसते.मध्येच दोन चार टाळ्या वाजतात. मायकेला वाटते या टाळ्या त्याच्याच साठी आहेत. तो भंदू -भगिनिंनो असे आणखी त्वेषाने बोलत ,खऱ्या अर्थाने देशाचा विकास होण्यासाठी आपण साऱ्यांना त्याग केला पाहिजे, अशा टाईपचे वाक्य सफाईदारपणे फेकतो. देशाचा विकास हा त्यागाने नाही तर अर्थ कारणाने होतो.हे मायकेलला कळत नाही. तो खऱ्या अर्थानेच्या प्रेमात पडून देशप्रेमाच्या भाषणात तुंडुंब भिजतो. पाहूणे अजून यायचेत आणि मायकेलच्या हातातला माईक सुटत नाही.मध्येच हॅलो हॅलो टेस्टिंग करत ,घसा खाकरत, खऱ्या अर्थानेचा जप करत त्याची गाडी फुढे फुढे चाललीच असते.
    अशा वेळेला लोडशेडिंग होऊन माईक बंद पडले तरी मायकेलच्या उत्साहात जराही फरक पडत नाही. त्याचे उंच उडालेले विमान काही खऱ्या अर्थाने खाली येतच नाही. त्याला वाटते सभा त्याच्यासाठीच, बोलावण्यात आली आहे. लाईट गेले तरी माईक सुरुच आहे तो केवळ त्याच्या कौशल्यामुळे. आपल्या या कौशल्यावर मायकेल खुष होत राहतो. त्याची खुषी वरच्या वरच्या टप्प्यांवर जात राहते. तो बोलतो ते अर्थाला धरुन आहे की अर्थविहीन आहे याच्याशी त्याला काहीच देणे घेणे नसते. त्या कार्यक्रमापासून तो अमेरिकेच्या राजकारणापर्यंत ,देशाच्या गरिबी पासून ते अर्मत्य सेनांच्या अर्थशास्त्रापर्यंत, तेंडुलकरच्या विक्रमांपासून ते शाहरुख खानच्या तिसऱ्या पुत्ररत्नाबद्दल तो सुसाट बोलतच राहतो. मध्येच पॉज घेतो. घसा खाकरतो. डॉयलॉग बाजी करतो. कवितेची ओळ म्हणून दाखवतो. विनोदी किस्सा सांगतो. अमिरखान स्टाईलत उपदेशवजा एखादं शेर फेकतो.. अधून मधून एखादी टाळी मिळाली हा मायकेल खुष. गाडी पुन्हा सुसाट.
    तेव्हढ्यात पाहुणे आले आलेचा गलका आणि मायकेला आता आपले अवतार कार्य संपली असल्याची जाणीव होते तरी सुध्दा तो खऱ्या अर्थाने किल्ला लढवतच राहतो..पाहुण्यांचे भाषण सुरु होईपर्यंत आपले अवतार कार्य सुरु राहील हे त्याला खऱ्या अर्थाने चांगलेच ठाऊक असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्याच्या हातातील माईक काढून घेतले जात  नाही किंवा हिसकावून घेतले जात नाहीत किंवा प्रेमाने दे म्हणत नाहीत तोपर्यंत मायकल धो धो वाहतच राहतो..
    000
   


No comments:

Post a Comment