Sunday, July 21, 2013

सोडचिठ्ठीच्या वाढदिवसाची प्रेरणा

सोडचिठ्ठीच्या वाढदिवसाची प्रेरणा
श्रीमती राणी मुखर्जी या श्रीयूत आदित्य चोप्रा यांच्या प्रेमात पडल्यापासून मुकरु एडका कोवा यांचा हरा भरा दिल,उन्हाळ्यात करपलेल्या ज्वारिच्या शेतासारखा झाला होता.श्रीमती राणी यांना ही अवदसा कां व्हावी असा सवाल मुकरुने किमान 200 वेळा स्वत:ला विचारला.या सवालाचे उत्तर राणी की आदित्य यांच्याकडून येणे अपेक्षित असल्याचे हे मुकरुस ठरवता न आल्याने अद्याप तरी त्याचे उत्तर प्रलंबित आहे. गेल्या दोन महिन्यापासून मुकरुने  राणी यांचा नाद सोडून दिला आहे.असे असले तरी दिलके तुकडे हजार हुवे कुछ इधर गिरा कुछ उधर असे काही त्याच्या बाबतीत घडले नाही,हेही तितकेच खरे.कारण राणी गेली तर एखादी महाराणी येईल हा त्याचा आत्मविश्वास होता.झालेही तसेच. त्याच्या घरी परवा श्रीमती कॅटी होम्स यांचे छायाचित्र माजघरात लावले जात असताना मुकरुने बघितले.त्याच्या दिलात आंबा मोहरला.
कॅटी,राणी नसेलही पण ती वर्षभरापूर्वी टॅाम क्रुझ नामे हॉलिवूड सुपरस्टारची महाराणी होतीच की.टॉम क्रुझची लोकप्रियता ही अमिर-शाहररुख-सलमान खान,ह्रतिक रोषण,अजय देवगण आणि अक्षयकुमार यांच्या एकत्रित लोकप्रियतेपेक्षा किमान 10 पट मेाठी आहे. अशा सुपर-ड्यूपर मेगास्टारची बायको ही एखाद्या महाराणीसारखीच की!
अशा कॅटीची छबी माजघरात लागल्याने मुकरु सैरभैर झाला. कारण त्याच्या बायकोने- सुखाबाईने ती छबी लावली होती.संतोषी मातेची,जंग्यो देवीची छबी सोडून कॅटीची छबी सुखीने कां लावली असावी,याचा किडा मुकरुच्या डोक्यात वळू लागला. तिच्या मायचा फोटो सुखाबाईने लावला असता तर त्याचे मुकरुला काहीच वाटले नसते. रडत कुथत कां होईना त्याच्या मायचा फोटो लावला असता तर त्याने तिचा गालगुच्चाच घेतला असता. चुकूनमाकून राणी मुखर्जीचा फोटो लावला असता तर घट्ट मिठीच मारली असती. पण कॅटीचा फोटो सुखाबाईने लावल्याने त्याचं दिल आणि डोकं मात्र काविळीसारखं पिवळं फटफटित झालं. पाकिस्तानी आयएसआयच्या किंवा रशियाच्या केजीबीचा तर हा डाव नसेलना असेही त्यास वाटून गेले. आपल्याला एटापल्लीच्या बाहेर कुत्रं विचारत नसताना सुखीला कोण कशाला मास्कोत मस्का मारेल,आणि इस्लामाबादेत पाव देईल? त्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यानेच स्वत:ला देऊन टाकलं.
आणि एके दिवशी सुखाबाईने कॅटीच्या फोटोला हार घालून पंचारतीने ओवळताना त्याने बघितले आणि तो बेशुध्दच पडला. मोहाचीचे दोनचार खंबे रिचवल्यावरही तो कधी बेशुध्द पडला नव्हता. शुध्दीवर आल्यावर सुखाबाईने त्याने न रिचवलेल्या मोहाचीचा उध्दार केला.मुकरुने सुखाबाईचा मोहाचीच्या बद्दलचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुखाबाई हसायला लागली.मुकरु बुचकाळ्यात पडला.
सुखे,तू कायले माही परीक्शा घेते.सांगून टाकना तू या फोटोले कावून हार घातला आन ओवाळलं तं.
सरंपच सायेब, ह्यो कॅटीबाई आमच्यासाठी लय पेरनादायी हायेत.
कोन्ती पेरना दिली.
आवो,कॅटीबाईनं तिच्या नवऱ्याले सोडचिठ्ठी देल्ली.
त्यायचा संसार तुटला मनून तुले आनंद झाला का..
मले त्याचा आनंद कावून होइन बॉ.
मंग.
त्यायच्या सोडचिठ्ठीले परवा एक वर्स झालं,न कॅटीबाईन या एका वर्साचा वाढदिवस साजरा केला.त्याचा मले आनंद झाला.बाई असी खमकी पायजेल.सोडचिठठी देल्यावर रेहकत बसली नायी. सोडचिठ्ठीचीबी सेलिब्रेशन केलं.‍ि
म्हनून तू तिच्या फोटोले ओवळलं.बोहारीन कुठची.
तुमी, नायी तं तुमची माय असलं बोहारिन.कॅटीबाईले असं बोलला तं याद राखा..सुखाबाई गरजली.
कॅटीबाईची प्रेरणी लय पॉवरफूल असल्याची खात्री मुकरुला पटली. हीच प्रेरणा घेऊन सुखाबाईने आपल्याला सोडचिठ्ठी दिली अन त्याचा वाढदिवस साजरा केला तं इलेक्शनमध्ये आपली पुंगी वाजलीच म्हणून समजा हे चाणाक्ष मुकरुने चटकन ओळखले आणि त्याने कॅटीबाईच्या छबीला दंडवत घातला.
000


No comments:

Post a Comment