Sunday, July 21, 2013

चांगल्या कामाची सुरुवात घरापासून

   चांगल्या कामाची सुरुवात घरापासून
    मुकरु एडका कोव्यास शास्त्रज्ञ मंडळींचा भयंकर राग यायचा.गप्पा छाटाव्या,मोहाची चढवावी,झिंगे ओरपावे,जवानी दिवानी करावी,अशा झक्कास गोष्टी सोडून ते बकवास गोष्टीत वेळ दवडतात. याच्यात डोकं घाल,त्याच्यात नाक खुपस,असे करतात नि मग त्यांच्या हाती जे काही लागतं त्याला संशोधन असे सांगून पाठ थोपटून घेतात.आख्खा जन्म अशा उपदव्यापात घालवलेल्या मंडळींचा शास्त्रज्ञ म्हणून गौरव होतो.याचा मुकरुला भयंकर त्रास होई. हे सारं झालं भूतकाळातलं.पण परवा मात्र मुकरु एका नव्या संशोधनानं हरखून गेला.या संशोधकांच्या संशोधनामुळे मुकरुचा शास्त्रज्ञांकडे बघण्याचा पिवळा दृष्टिकोन पांढरा झाला.आपली ही भावना व्यक्त करण्यासाठी त्याने ग्रामसेवकाला पार्टी दिली.पार्टिचा खर्चही मुकरुने केला.ग्रामसेवकाला हा धक्का होता.सूर्य कधी कधी पश्चिमेकडे उगवू शकतो,याची त्याला खात्री पटली.सरपंचाला नक्किच आमदाकीचं तिकिट पक्क झालं असलं पाहिजे असं वाटून त्याने मुकरुचे अभिनंदन केले. ग्लासात दुसरा पेग ओतत म्हणाला.
    मले,मगापासून एक प्रस्न पडला तो इचारु का..
    एक कावून,दहा हजार प्रष्न इचार.
    आमदारकीची तिकिट भेटली काजी तुमाले..
    आमदारकीले कोन चाटते.सरपंच गावचा राजा.जसा आपला दोस्त बराक ओबामा हाये.
    तो त्याच्या गावाचा नायी,त्याच्या देस्याचा राष्ट्रपती आहे.
    सरपंच सुद्दा त्याच्या गावाचा राष्टपतीच असतो.
    मंग तुमाले पार्टी मनवण्याएवढा आनंद कशापायी झालाजी.
    आज,मले या शास्त्रज्ञायचं लय कौतुक वाटाले लागलं.
    कावूनजी, तुमालेतं त्यायचा लय राग यायचा.आज तुमाले कसा का प्रेम दाटून आला.हे मणजे ओबामा सायबाले लादेनबद्दल प्रेम दाटून आल्यासारखं वाटतजी.
    मानसाचे इचार सारखे बदलत राह्यले पायजेल असं सिरोंच्याच्या रामदास बुवानं नाही का सांगितलं.
    मंग..
    मनूनच तं आजच्या पेपरातली शास्त्रज्ञायची बातमी वाचली नं माहं त्यायच्या बद्दलचे इचार बदलले.
    बातमीमंदी काय हायेजी.
      ग्रामसेवकाने विचारलं.मुकरुने त्याला आजचा पेपरच दिला.बातमी दाखवली.बातमी न्यूयॉर्कवरुन आली होती.न्यूयॉर्कच्या शास्त्रज्ञांना असा शोध लागला की,पुरुषांपेक्षा महिलांना राजकीय समज कमी असते.त्यांना राजकारण फार कळत नाही. ग्रामसेवकाने ही बातमी वाचली.तो बुचकळ्यात पडला. राहवून त्याने विचारले..
    या बातमीमध्ये तुमाले एवढा आनंद होनारी कोन्ती गोश्ट दिसली.
    शास्त्रज्ञायच मनन काय, तं बायकायले राजकारन फारसं समजत नायी.
     पन या बातमीनं तुमचं मत कावून बदललं बाँ.. माही बायको सुखाबाई,तिले लय वाटाले लागल ना की माह्यापेक्शा तिले राजकारन  जास्त समजते.तेच्यात पुन्हा 33 टक्के आरक्सन आले.तिची भूनभून चालली असते का तिले आता गरामपंचायतीच्या इलेक्सनले उभ राहाचं नं मंग सरपंच व्हाचं.
    चांगलं हाये नाजी.वयनी हुस्यारच हायेत.
    तिची हुस्यारी माह्या मुळावर येत नाही का...
    मंग..
    मंग काय,या शास्त्रज्ञायचे संशोधन आता फुडं करीन तिच्या सांगन की बघ तुले जरी वाटत असलं का,तुले राजकारण लय कयते.पन शास्त्रज्ञायचा शोध तसा नाही मनत.ज्याले राजकारनाची समज कमी हाये त्याने गरामपंचायतीच्या इलेक्शनले उभ राहून हात दाखवून अवलक्सन कशाले कराचा म्हणतो..
    म्हनजे या बातमीचा उपयोग तुम्ही वयनीले इलेक्सनले उभे राहन्यापासून रोखाले कराल.

    ती माही सत्रू थोडीच आहे.हे शास्त्रज्ञ भी माहे सोयरे नाही ना.त्यायले असा संशोधन कराची सुपारीबी देल्ली नव्हती.पन त्यायन हा सोध लावला.त्याचा काही उपेग चांगल्या कामासाठी झाला पायजेल.शास्त्रज्ञ लोक त्याचसाठी डोकं फोड करते का नाही.आतापर्यंत मले तसा वाटत नवता आता ही बातमी वाटून माहं मत परिवर्तन झालं.आन चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्या घरापासून करा लागते नं..मुकरु म्हणाला..ग्रामसेवकाने स्तब्ध होऊन मोहाचीचा आखणी एक पेग रिचवला..

No comments:

Post a Comment