Saturday, July 6, 2013

महाराणीच्या पडनातुची कुंडली


महाराणीच्या पडनातुची कुंडली
   मुकरु एडका कोव्याचा बापाच्या आजोबाच्या आजोबानं लिहून ठेवलेलं भविष्य खरं उतरलं होतं. महाराणीचा अंमलाचा बिगूल वाजला आणि 1857 ची आवृती असलेल्या आजोबांनी एका भूर्जपत्रावर लिहून काढलं की एक दिवस महाराणीच्या सिहांसनावर बसणारा सुपुत्र हा  हिन्दुस्थानी वंशाचा राहील. 1857 मधील महाराणीच्या  सैनिकांना आपली भविष्यवाणी पसंत पडणार नाही ,ते आपल्याला बुकलतील म्हणून त्याने जंग्योदेवीच्या मंदिरात हे भूर्जपत्र सुरक्षित ठेवले. मरणाच्या पंधरा दिवस आधी त्याच्या पोराकडे हे भूर्जपत्राचं गुपित सुपूर्द केलं.अशाप्रकारे ते सुपूर्द होत होत मुकरुकडे आलं.
   भैताड लेकाचे,असा सर्व आजोबांचा उध्दार करत त्याने हे भूर्जपत्र कोनाड्यात ठेवून दिले.पण परवा ती बातमी आली.त्याने जंग्योदेवीकडे धाव घेतली.तिच्या पायावर डोके ठेऊन सर्व आजोबांना भैताड म्हंटल्याबद्दल क्षमा कर अशी विनवणी केली.
   जंग्योदेवीचा कौल घेऊन तो ग्रामपंचायतीत आला.ग्रामसेवकला त्याने ते भूर्जपत्र दाखवले.ग्रामसेवकाने मोठ्या कौतुकानं सरंपच मुकरुकडे बघून त्याचे पाय धरले.
   कावून बाँ,मुकरु म्हणाला.जे कायी केलं ते माह्या घराणातल्या आज्यानं केलं.
   सरपंच सायेब,तुमी आता त्याचे क्रेडिट घेऊ सकता. कोन पयले क्रेडिट घेतो याचाच जमाना हाये.
   तुले का मनाचं हाये.
   तुमचा कोणता तरी आजा आजच्या जमान्यातल्या डीएनए -फिएनचा अभ्यास-बिभ्यास करनाऱ्यापेक्शा लय हुशार व्होता. त्याले भविष्यातलं दिसत होतं.तवाच त्याने असं लिवून ठेवलं का नायी.
   बराबर हाये.
   अस्या हुस्या आजोबाच्या कुळातले तुमी.ती हुशारी तुमच्यापरयंत आली नसन का?
   बराबर.पन या हुस्यारीचं मी रायतं घालू सकत नायीना आज.
   तुमच्या आजोबाले भविष्यात बघन्याची दूरदृष्टी व्होती, हे या भूर्जपत्रावरुन सिद्द होते.
   त्याचा मले काय फायदा..
   राणीच्या नातवाले होनाऱ्या पोट्याचं भविश्य कसा राहील?त्याच्या कुंडलित काळसर्प योग आहे का?त्याचा चंद्र पॉवरफूल आहे का?कुंडलितल्या सूर्य ग्रहावर राहूची छाया पडली आहे का?कुंडलिच्या पाचव्या घरातच सर्व पाप ग्रहांची गर्दी झाली आहे  का? त्याने कोनत्या वर्सी नासकात येऊन नारायन नागबळी यज्ञ केला पाहिजे,पुन्यातल्या कोनत्या मारुतीले दर सनवारी भेट द्याले पायजे? असं समंद तुमाले सांगता येईल का नायी.महारानीच्या नातवाचं भविष्य तुम्ही सांगितलं मनजे तुम्ही राज-ज्योतिशी व्हनार का नायी?
   पन त्यानं माहा काय फायदा.
   सायेब,लवकरच इलेक्शनचा टैम येनार हाये आपल्या देशात.तुमी महाराणीचे राज-ज्योतिषी म्हनल्यावर सगळे तुमच्याकडेच धावत सुटतील त्यायच भविष्य बघाले.मंग तुमच्या चारो उंगली घीमेच जानार की नायी.
   पन महारानीले कोन सांगनार माह्या आजोबाच्या भूर्जपत्राचा महिमा.
   त्यायची कायजी तुमी कावून करताजी.आपला एक दोस्त हाये मंबईचा डबेवाला.
   मंग..
   या मंबईच्या डबेवाल्याच्या लय प्रेमात हाये महाराणीचा लेक प्रिन्स चार्लस्.तो आपल्या देसी आला का त्याले ताजमहालची आठवन येत नायी पन डबेवाल्याचीच येते.तो मंबईत आला का पहले शायरुक खान,कटरिना फटरिनाले भेटाले जात नायी तं पयले या डबेवाल्यालेच भेटते.त्यानं त्याच्या लग्नाले बी डबेवाल्याले बोलावलं होते.अस्या या डबेवाल्याच्या मार्फत आपन आजोबाचं भूर्जपत्र पाठवून देऊजी.तुमी-आमी आपल्या बायकांवर जेवढा इस्वास ठेवत नायी तेवढा इस्वास हाये राजकुमाराचा या डबेवाल्यावर..डबेवाल्याकडून भूर्जपत्र आले मनल्यावर तो धावत येईन इकडे.तुमची भेट घडवून आनिन मी.मंग तुमी त्यायले सांगजा त्यायच्या नातवाचं भविष्य.कुंडली हिन्दुस्थानातच बनते.हिंदुस्थानी वंशाच्या पोराचं भविष्याची कुंडली एक हिन्दुस्थानी नाही मांडनार तं मंग का अरब मांडनार.?तुमीच सांगा..
   आपल्या स्मार्ट ग्रामसेवकाकडे मुकरु चकित होऊन किती तरी वेळ बघतच राहिला...


No comments:

Post a Comment