Thursday, March 1, 2012

गाढवा..

गाढवा..
    गाढवाला गुळाची चव काय?अशी आपल्याकडे म्हण आहे. गाढवाला साखर आणि गुळाच्या चवित काहीही फरक जाणवत नसावा यामुळे कदाचित ही म्हण मराठी सारस्वतांनी शोधून काढली असावी.(मराठीतील हे विद्वान गाढवाला साखर आणि गूळ देण्याइतपत उदार कधी झाले हा शोध आणि संशोधनाचा विषय ठरु शकतो.) गाढवाला फक्त मालकाच्या शिव्या खात ओझं वाहणं एवढच कळतं अशी आपली ठाम समजूत.
     गाढव आणि गाढवपणाच्या विविध म्हणी आपल्याकडे प्रचलित आहेत.प्राणी जगतात या प्राण्याला सर्वाधिक मूर्ख प्राणी ठरवण्याचं पूण्य कार्य आपण केलय. पंचतंत्रकारांना इतर प्राण्यांमध्ये विविध गुण,सद्गुण दिसले मात्र गाढव त्यांना दुर्गुणाचा पुतळा वाटला.त्यांनी गाढवाच्या मूर्खपणावर शिक्कामोर्तब करण्याऱ्या असंख्य गोष्टी रचल्या.बालपणाच्या निष्पापकाळात पंचतंत्राच्या गोष्टी कानावर पडतात त्यामुळे आपल्या मनावर गाढवाचं मूर्ख रुप आणि स्वरुप ठसठशितपणं कोरलं जातं.
    गाढव कधी शहाणा राहू शकत नाही वा त्याने दाखवलेलं शहाणपण हा त्याचा गाढवपणा सिध्द करणाराच ठरतो असं आपल्याला वाटतं ते यामुळेच.गाढवाचं बेंगरुळ रुप,त्याचं  ओरडणं,त्याचं निस्तेज दिसणं,खाली मान घालून निस्तेज चालणं सारं काही आपल्या मनात ठसलेल्या त्याच्या मूर्खपणाच्या व्यक्तिमत्वाला साजेसच असल्याचं आपल्याला वाटतं.माणूस आपल्याला मूर्ख समजतो आणि त्यांच्यातील महामूर्खांना अबे गधे म्हणून हिणवतो हे कदाचित गाढवाला ठाऊक असण्याची जराही शक्यता नाही.
    इकडचं गाढव..तिकडचं गाढव
    आपल्या देशात आणि राज्यातही गाढवाच्या नशिबी इतकं मोठं अस्पृष्यत्व आलं आहे की प्राणीजगातील अनेक प्राण्यांना निवडणूक चिन्ह म्हणून स्वीकारणाऱ्या नेते वा पक्षांनी गेल्या पन्नासवर्षात गाढवाला बोधचिन्ह म्हणून स्थान दिलेलं नाही.भारतातील मतपत्रिकेत विराजमान होण्याची कधीही संधी मिळालेल्या भविष्यात तशी कोणती संधी नसलेल्या या गाढवाच्या नावावर जगातील सर्वश्रेष्ठ महासत्तेची म्हणजेच अमेरिकेची निवडणूक लढवली जाते.गाढव हे डेमोक्रॅटिक पक्षाचे बोधचिन्ह.अमेरिकेत आलटून पालटून सत्ता रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात असते.बिल क्लिंटन हे डेमाक्रॅटिक पक्षाचे उमेदवार होते.याचाच अर्थ त्यांच्या काळात गाढवपक्ष अमेरिकेवर आणि (अमेरिकन प्रशासन आणि नागरिकांच्या ठाम समजुतीनुसार)जगावर राज्य करत होता.पुढील काही महिन्यात होणाऱ्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमाक्रॅटिक पक्षाचे उमेदवार सध्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हेच राहतील.ते त्यांच्या प्रतिस्पधी उमेदवाराला म्हणजेच रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला हरवतील असं बऱ्याच जणांना वाटतं. या पक्षाचं चिन्ह हत्ती आहे.म्हणजेच रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराचा होणारा संभाव्य पराभव हा गाढवाकडून हत्तीचा पराभव ठरेल.गाढव उधळलेला आणि हत्ती माजलेला असं आपण फार तर या निवडणुकीच्या संदर्भात म्हणू शकतो.
    बोधचिन्हाच्या रुपाने कां होईना आपण जगावर राज्य करतो हे खरोखराच्या गाढवाला कळलं तर धम्माल येईल.नाही का?जगाचं इन्सपेक्टर ऑफ जनरल हे महा - पद मिळवून देणाऱ्या आपल्या चित्राचा वापर आपल्याला विचारता केला जात असल्यानं कॉपीराईट किंवा इंटलेक्चुएल प्रॉपर्टी ऍ़क्टचा भंग होतो अशी तक्रार जगातल्या सर्व गाढवांनी  अमेरिकेतल्याच वा जागतिक न्यायालयात केली तर?किंवा आमचं चित्र वापरा पण मग रॉयल्टी द्या अशी या गाढवांनी मागणी केली तर?अद्याप आपल्या वा इतर देशातील प्राणी मित्र-मैत्रिणी यांना वा कोणत्याही प्राणीमित्र संघटनेला या विषयी काहीही हालचाल करावी वाटू नये ही आश्चर्याची बाब माणायची की गाढवाला काय कळतय?या समजुतिवर शिक्कामोर्तब करणार मानवाचं वागणं सुसंगत असं समजायचं?
   गाढवाला आपलं बोध चिन्ह करुन राजसत्ता भोगता येतं हे 1828 पासून डेमाक्रॅटिक पक्षाने सिध्द केलं असलं तरी आपल्या देशात मात्र गाढवाला राजसत्तेपासून दूर नेणारा प्राणी समजलं जातं.राजस्थानात 100 वर्षापासून गाढवांचं संम्मेलन बोलावलं जातं.अशा प्रकारचं वार्षिक संम्मेलन संबंध देशात केवळ याच ठिकाणी  भरतं.या संम्मेलनात भारत आशियाई खंडातील काही देशातील गाढवं सामील होतात.या संम्मेलानचं रितसर उद्घाटन केलं जातं.या उद्घाटनाच्या निमित्त एक वेगळया प्रकारचा संयोग वांरवार घडून आला आहे.जी राजकीय व्यक्ती या संम्मेलनाच्या उद्घाटनाला जाते एक तर त्याचं पद जातं किंवा मग ते निवडणूक हरतात.त्यामुळे  गेल्यावर्षी राज्यपातळीपासून ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या राजकीय नेत्यांनी या संम्मेलनाच्या उद्घाटनासाठी येण्यास स्पष्टपणे नकार दिला.तेव्हा या संम्मेलनाच्या आयोजकांना एका विद्यार्थी नेत्याकडून संम्मेलनाचं उद्घाटन करावं लागलं.या नेत्याने आपल्यावर काही गंडांतर येऊ नये म्हणून नव-ग्रहदेवतांची शांती करुन घेतली.त्याने आपल्यावर कोणतीही आच येणार नाही असा विश्वास व्यक्त केला होता. अमेरिकेतील राजकारण्यांचं भाग्य उजळवून त्यांना राजसत्ता मिळवून देणाऱ्या गाढवांनी आपल्या देशात कथित कां होईना दुर्भाग्याचा कां गोंधळ घातलेला असावा बरे?
000




























No comments:

Post a Comment