Sunday, March 18, 2012

फेंग शुई कटिंग सलून


फेंग शुई कटिंग सलून
    बापाचे जोडे मुलाला होउु लागले की बापाने मुलाच्या भावविश्वात लुडबूड करु नये हा वैश्विक सिध्दांत असूनही मुकरु एडका कोव्याचा बाप हा त्याच्या कामात,कार्यात आणि (अधूनमधून कामिनित सुध्दा) दखल देत असे.खरं तर ही दखलअंदाजी मुकरुला अजिबात खपत नसे.पण बापाच्या जीवावरच त्याचं सध्याचं उंडारणं चाललं असल्यानं त्याच्या विद्रोहाच्या कवितेची कळी फूल होण्यापूर्वीच गळून पडत असे.हायकमांडचा हस्तक्षेत अजिबात आवडत नसूनही पुढारी जसे हसतखेळत त्यांना स्वीकारण्याचा देखावा करुन आपल्या निष्ठांचं नाणं खणखणितपणे वाजवण्याचा आभास निर्माण करतात तसं मुकरुचं होतं.हायकमांडला खुष ठेवलं की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात हे त्याच्या लक्षात आल्यानं तो बापाची लुडबूड  सहन करायला शिकला होता.
    फक्त झोप डिस्टर्ब केली की मात्र त्याला बाप हा शत्रू नंबर एकच वाटायचा.कारण बहुदा रात्री केबलवर पाहिलेल्या कोणत्यातरी सिनेमाच्या नायिकेशी त्याचं गुटरगूँ झोपत चालू असायचं.बापानं झोपमोड केली की त्या नायिकेचा पत्ता कट व्हायचा.पण हात चोळत बसण्यापलिकडे मुकरुला अद्यापपावेतो काहीही करता आलेलं नाही.क्रांतीचा लाल झेंडा अद्याप तो फडकावू शकला नव्हता.अशा प्रसंगी  तोंडात मिठाची गुळणी धरुन बसणं अधिक चांगलं हे त्याला अनुभवानं कळलं होतं.
    आज सकाळी सकाळी त्याच्या बापाने त्याच्या डोक्यावरुन खसकन पांघरुन ओढलं.त्याक्षणी त्याच्या अवती भवती बिपाशा बसू रुंजू घालत होती.मुकरुच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाला भाळून ती त्याला चुंबन देणार तोच बापाने असा बिब्बा घातला होता.
    "काय झालं गा बापू..मले तू झोपू बी देत नाही."थोडासा चिडून मुकरु म्हणाला.
    "झोपनं,खानं पसरन्यासिवा तुले येतं का काही.."बाप त्याच्यावर डाफरला. मुकरुच्या समोर पेपर टाकला.एका बातमीकडे बोट दाखवून त्याला ती वाचण्यास सांगितलं.
    "बापू इतकं काय अर्जंट हाये गां.सकायी सकायी पेपर वाचाचा असते का?"आळोखे पिळोखे देत मुकरु म्हणाला.
    "सकायचा पेपर संध्याकायी वाचनार का तू.काही बी सांगितलं का तुहं,आताच कावून, मंग कावून नाही.. "बाप जरा घुश्यातच म्हणाला.आता जास्त वादावादी करण्यापेक्षा पेपर बघितलेला बरा.स्वत:होउन बापाने आजपर्यंत कधीही पेपर वाच असं म्हटलं नव्हतं.आज पेपर वाच म्हणतो याचा अर्थ काही तरी स्पेशल असल्याची ट्यूब मुकरुच्या डोक्यात पेटली.त्याने पांघरुन फेकून दिलं नि पेपर हातात घेतला.बापाने दाखवलेली बातमी बघू लागला.बातमीमध्ये जेनिफर लोपेजचा फोटो होता.जेनिफरवर लाईन मारण्याचं आपलं वय असताना बापाचं लक्ष तिकडे गेल्याचं त्याला सहन होईना.
    "बापू ही जेनफर लोपज माह्यापेक्शा चार वर्शानं लहान हाये..मले परफेक्ट मॅच हाये.."असं तो म्हणला."तू हिच्यावर लाईन मारु नकोस असं आडून त्याला  म्हणायचं होतं.बाप हुशार असल्याने पोराला काय म्हणायचं आहे हे तो बरोबर समजला.
    "तुले का म्हणाचं हाये ते मले समजलं.मी काही तुह्यावानी ताकाले जाचं भांडं लपवाचं असं करत नायी..तुले जास्त मालूम हाये.पन पोट्या मले त्या जेनफर का फेनफरमंदी जराबी इंटरेस्ट नायी."बाप म्हणाला.
    "मंग तू मले कावून दाखवलं तं तिचा फोटो"मुकरु म्हणाला..
    "बह्याडा मले फोटू दाखवाचा नोव्हता.तू बातमी वाच असं मले म्हणाचं होतं.तुले पागलवानी कराची सवयच हाये."बापाने त्याचा उध्दार केला.मुकरुने रागारागात सगळी बातमी जोरात वाचून काढली.
    "बातमीत काहीच दम नाही गा" तो म्हणाला.
    "तुह्या काहीच लक्शात येत नाही का पोट्या.असा कसा बे तू.."बाप रागवत म्हणाला.
    "मंग तूच सांगना काय हाये या बातमीत.अशा बातम्या हररोजच येत राह्यते.."मुकरु झल्लावून म्हणाला.
    "मुकऱ्या बातमीत लिवलय का बा फेंग सूई परमाणं जेनिफरनं आपले केस कापले तिचे सरवच्या सर्व परश्नच मिटले."
    "मंग मी काय करु.."असं मुकरुला म्हणावं वाटलं.पण तो चूप बसला.
    "पोट्या,फेंगसूई परमाणं केस कापले तं आपल्या घरी दारी लक्षमी येतं.आपले सारे सत्रू मातीमोल होते.जे आपल्या मनात येते ते होते.सुख पाहिजे आसल ते मियते."बाप म्हणाला.
    "मंग मी काय करु"असं मुकरुला म्हणावं वाटलं.पण तो चूप बसला.तो काहीच बोलत नाही हे बघून बाप चिडला.
    "पोट्या मी तुह्या भल्यासाठी सांगतो तू तोंडात मिठ घेउन बसलास."
    "ह्येच्यानं माहं का भलं होनार बापू.."
    "पोटया,तू अजून पर्यंत रिकामटेकडा हायेस.नोकरी धंदयाले लागशील का नायी मले तं संकाच वाटते.तवा तू बी असा फेंग सुई हेअर कटिंग सलून टाकून दे.गावातल्या समध्या पोरीबारी येतील फेंगशुई कटिंग कराले.धंदा बी व्होईल लाईन बी मारता येईल.हळूचकन एखादी पोट्टी गटवताभी येईल तुले."मुकरुचा बाप म्हणाला.मुकरुची झोप कुठल्या कुठं पळाली.बाप बाप कां असतो.या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं.बापाच्या आयडियेवर त्याने नैऋत्य दिशेला असलेल्या जंग्योदेवीच्या मंदिरात जावून उत्तरेकडे तोंड करत दिवसभर विचार केला.आयडियात दम होता.देवीला दंडवत घालून तो घरी परतला.बापाने सांगितलेली आयडिया अंमलात आणण्याचा त्याने  निर्णय घेतला होता.
    मुर्हुत पाहून त्याने दुकान सुरु केलं." फेंगशुई हेअर कटिंग सलून"च्या उद्घाटनाला त्याने जिल्हापरीषदेच्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती आशा बाई यांना बोलावलं.त्यांना जेनिफर लोपेजने फेंगसुई हेअरस्टाईल केल्यानंतर कसं सुख,शांती,समाधन आणि पाहिजे ते मिळालं हे सांगितलं.हे एैकताच आशाताईंचे डोळे चमकले.त्या कितीतरी दिवसांपासून जिल्हा परिषद अध्यक्षपदावर लक्ष ठेउुन होत्या.ते पद हस्तगत करण्याचा मार्ग त्यांना दिसत नव्हता.फेंगशुई हेअरस्टाईल केली तर आपली ही इच्छा पूर्ण होईल असं त्यांना वाटलं नि उद्घाटनाच्या बोहनिलाच आशाताईंनी स्वत:ची फेंगशुई हेअर स्टाईल करुन घेतली.
    फेंगशुई प्रमाणे झालेल्या आपल्या नव्या हेअर स्टाईल कडे त्यांनी जेव्हा काळजीपूर्वक आरशात बघितलं तेव्हा..त्या आई गं मेले असं जोरात ओरडल्या कारण..आजपर्यंत मोठा अभिमान बाळगेला केसांचा आंबाडा नष्ट झाला होता.डोक्यावर तुरळकच केसं राहिले होते.चेहरा विद्रूप दिसू लागला होता.त्या तिथेच ओरडू लागल्या.मुकरुला शिव्याशाप देउ लागल्या.
    "आहो आशाताई .जिला परिशदेच अध्यक्षपद मोठं कां तुमचा आंबडा मोठा..आंबडा पुन्ना येईल हो..पण अध्यक्षपद काही भेटाचं नाही पुन्ना.."तो त्यांना समजावत म्हणाला.अध्यक्षपदाचं नावं कानावर पडताच त्या भानावर आलं.कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या बुंडऱ्या केसांवरुन हात फिरवला.मुकरुच्या दुकानाचं रितसर उद्घाटन झाल्याचं त्यांनी घोषित केलं.गाडीत बसूनत्या निघून गेल्या..त्या जाताच मुकरुचा बाप त्याला म्हणाला,
    "मुकऱ्या,माहं भी डोकं फेंगशुईस्टाईनलं भादरुन टाकं ताबडतोब.."
"कावून बा.."मुकरुनं विचारलं.
    "पोटया,आशाबाई जिल्हापरिषदची अध्यक्श झाल्यावर त्यायले पीएची गरज भासन .माहं डोक आतापासून फेंगसुइपरमाणं भादरुन ठेवलं तं मलेच हे पद मिळन..समजल का तुले.."मुकरुचा बाप दक्षीण दिशेकडं बघत म्हणाला...
000

No comments:

Post a Comment