Friday, March 9, 2012

झोपला तो तरला

झोपला तो तरला
   ज्या मानवाला कधीही,कुठेही झोप येते तो भाग्यवान असं बाळपणापासून आपल्या कानावर पडत असतं.नेपोलियन म्हणे घनघोर युध्द चालू असताना रणांगणवरच दोन मिनिट झोपून नव्या दमानं तलवारबाजी करायचा. कुंभकर्ण सहा सहा महिने झोपला नसता तर तो कधीचाच विस्मृतीतून गेला असता.लाँगटर्म झोप हे त्याचं युनिक सेलिंग पॉइंट.रामायणाची कथा कुंभकर्णाला ओव्हरटेक करुन पुढे जाउु शकत नाही.अखंड झोप हीच त्याची शक्ती होती.
  
   कुंभकर्ण ते नेपोलियन असा झोपेचा प्रवास सुव्यवस्थित झालेला आहे.हा प्रवास कुणीही डिस्टर्ब केलेला नाही.माणूस जेव्हा झोपी जातो तेव्हा तो त्याचा नसतो.तत्वचिंतकांच्या मते तो सुक्ष्मात गेलेला असतो.हे सुक्ष्म म्हणजे अवकाश पोकळी.जिला ना आदी ना अंत.विज्ञानाने प्रचंड प्रगती करुनही अवकाश पोकळीचा वेध घेऊ शकेल असं अवकाशयान अद्याप तरी निर्माण करणं मानवाला शक्य झालं नाही. मात्र झोपेतील सुक्ष्मावस्थेत त्याला हे सहज शक्य होतं.यावर काउंटलेस बाबा-महाराज-संत-महंत-गुरु यांचं दुमत नाही.
   सुक्ष्मात गेलेली व्यक्ती स्वप्नात रममाण होते. उत्तुंग स्वप्न पाहा म्हणजे ती साकार होतील असं अमेरिकेत अब्राहम लिंकन ,रशियात लेनिन आणि चीन मध्ये माओ म्हणायचा.स्वप्न झोपेतच बघायची असतात.जागेपणी स्वप्न पाहणारा बावळट ठरतो.कारण विस्तवासारख्या वास्तवाचा सामना तेव्हा करावा लागतो.म्हणजेच जो झोपत नाही तो स्वप्न कसा बघू शकणार?जो स्वप्नच बघणार नाही तो भव्य दिव्य कसं साकारु शकणार?झोपेचं नात असं मल्टिडायमेंशनल आहे.बोनी कपूर यांनी झोपेत श्रीदेवींच्या गळयात वरमाला घातल्याचं स्वप्न बघितलं आणि जागेपणी हे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली.पुढचा इतिहास आपण जाणतोच.
   मानवानं सर्वाधिक संशोधन आपल्या झोपेवरच केलं आहे.याचा अर्थ झोप ही साधी बाब नाही.पृथ्वीच्या निमिर्तीवर ज्याप्रमाणे शेकडो सिध्दांत शोधून काढले त्याचप्रमाणे झोपेचेही सिध्दांत त्याने निर्माण केले.झोप ही कॉम्प्लेक्स चिज असल्याचं शास्त्रज्ञच सांगतात.ही चिज म्हणजे एखाद्या कतरीन कैफ किंवा ऐश्वया र्रॉय -बच्चन सारखी राहू शकत नाही कारण त्यांना बघून निंद हराम हो गई असं म्हणावं लागतं.
   मानवाचा इतिहासच मुळी स्वप्नांचा इतिहास आहे.झोपेत त्याला स्वप्न पडली आणि जागेपणी तो ही स्वप्ने साकार करण्यासाठी धडपडत राहिला.त्यात कधी पडला तर कधी घडला.मात्र त्यामुळे आजची सृष्टी दृष्टिक्षेपात आली.झोपेमुळे मानवाला मिळालेलं हे द्रष्टेपण आपणाला कसं विसरता येईल.
   कोणत्याही अँगलने विचार केला तरी झोपेचं महत्व वादातीत ठरतं.जे प्रामाणिकपणे झोपतात त्यांच्या बाबतीत प्रश्नच नाही.पण जे झोपेचं सोंग घेतात त्यांनाही हे सोंग व्यवस्थित वठविण्यासाठी झोपेचीच मदत घ्यावी लागते हे विसरता येत नाही.कधीही झोपं येणं हे मानसिक श्रीमंतीचं लक्षण.त्यांच्यासाठी झोपचं वरदान -या लक्ष्मीच्या वरदानापेक्षाही श्रेष्ठ ठरतं.हे जड वास्तव आपल्याला स्वीकारावच लागेल.तेव्हा कुठेही,कधीही झोप हे हेल्थी लक्षण समजायला हवं.जो जास्त झोपतो त्याला केवळ स्वप्नच जास्त पडत नाहीत तर कमी झोपणा-यांपेक्षा तो अधिक काळ जगण्याची शक्यता असते असं एक नव कोरं संशोधन नुकतच नेटवर आलय.म्हणजेच झोपेच्या बाजूने चहूबाजूनं वातावरण आहे.झोपला तो संपला असं म्हणण्याचे दिवस एखाद्या अवकाशयानासारखे सूर्यमालिकेच्या कक्षेबाहेर निघून गेले आहेत.झोपला तोच जगला आणि तरला जवळपास सिध्द होत आलय.त्यामुळे बिनधास्तपणे झोपेच्या अधिन व्हायला हरकत नसावी.
0000




No comments:

Post a Comment