Friday, March 2, 2012

चांद का तुकडा


चांद का तुकडा
   अहो ऐकलत का?असं जोरानं ओरडत माझ्या बायकोनं माझी साखर झोप घालवली.नेमक्या त्याक्षणी डावीकडून मल्लीका शेरावतचं आणि उजवीकडून पूनम पांडे या मदनिकांचं आगमन माझ्या स्वप्नात झालं होतं.आम्ही दोघं खर तर तिघं हातात हात घालून चंद्रावर फिरत होतो.सुसाट्याचा वारा सुटला होता.(डाविकडे)मल्लिकाचे (उजवीकडे) पूनमचे केस भूरु भूरु उडू लागले होते.खाली पृथ्वी चंद्रासारखी दिसत होती.माझ्या नजिक नजिक डावीकडून एक आणि उजवीकडून एक चांद का तुकडा येत असतानाच आमच्या सौभाग्यवतीनं या सुरम्य चांद्रस्वप्नात बिब्बा घातला.मी चंद्रावरुन धाडकन पृथ्वीवर पडलो.
   काय गं सुनामी-बिनामी-फिनामी आली की काय?असं म्हणत मी डोळे उघडले.समोर सूर्यमुखी बायको पेपर घेऊन उभी.तिने त्या पेपरातील एका बातमीकडे माझं लक्ष वेधलं.
   या शुल्लक आणि फडतूस बातमीसाठी मला उठवलस होय.छान ,मस्त मस्त स्वप्न पडलं होतं. मी वैतागाने म्हणालो
   तुम्ही फक्त स्वप्नच बघत तंगडया ताणून झोपा.लोक मात्र चालले चंद्रावर..सौभाग्यवती खेकसली.तिचं हे खेकसन माझ्या मेंदूला आणि ह्रदयाला झटका देणारं ठरलं.म्हणजे माझ्या स्वप्नातलं डावीकडचं नि उजवीकडचं पात्रही हिला कळलं की काय? ,अशी शंका मला आली.मला घाम फुटला.मी ताडकन उठलोच.
   तुला कसं कळलं मी चंद्रावर गेलो होतो म्हणून.मी बोलून चुकलो.
   म्हणजे रावसाहेब स्वप्नात चंद्रावर मौजमजा करीत होते तर?बायको छद्मीपणे म्हणाली..
   चंद्रावर मी आणि माझ्या सोबत ती चंद्रसेना.मी डावी आणि उजवीकडच्या व्हर्च्यूएल नॉस्टलिजियात बोलून चुकलो आणि फसलोच.पुढं काही बायकोनं बोलूच दिलं नाही.ती विजेसारखी कडाडली.ढगांचा गडगडाट झाला.
   ऑफिसमध्ये दिवसभर तिच्या भोवती रुंजी घालता हा संशय होताच मला आणि आता तिला घेऊन चंद्रावरही जायला लागलात.तुम्हाला काही लाज लज्जा..शरम-बेशरम .. पिठाच्या चक्कितल्या पट्टयासारखा तिच्या तोंडाचा सुपरफास्ट पट्टा सुरु झाला.
   अग,तुझा काहीतरी गैरसमज झालाय बाई.माझ्या ऑफिसात एकही महिला काम करत नाही.हे मी तुला कितीदा तरी सांगितलं.त्यावर विश्वास ठेवना.विश्वास नसेल तर सीबीआय किंवा सीआयडी किंवा महिला आयोगाकडून तपासणी करुन घेना..मी बळेबळे बळ आणून बोललो.
   तुमच्या ऑफिसात जर एकही महिला नाही तर मग स्वप्नातली चांद्रसेना कोण होती?ती कशी काय तुमच्या स्वप्नी आली होती हो?सौभाग्यवती वरच्याच पट्टीत बोलली.
   हे बघ ,चांद्रसेनी कोण होती हे मला कसं ठाऊक.स्वप्नातले चेहरे  ओळखायला मी कुणी योगीपुरुष आहे का?आणि कुणी कुणाच्या स्वप्नात जावं यावर बंदी घालणारा कायदा अद्याप झालेला नाही,हा काही माझा दोष नाही ना.मी माझी भक्कम मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न करु लागलो.पण हे चांद्रसेनी प्रकरण पुढं वाढू देणं माझ्या हिताचं नव्हतं हे लक्षात येताच मी सौभाग्यवतीला मूळ पदावर म्हणजे पेपरच्या बातमीवर आणलं.
   अगं या गुलाबी सक्काळी सक्काळी माझ्या स्वप्नावर भांडत बसण्यापेक्षा तू  महत्वाचं काय सांगणार होतीस बरं पेपरातलं ते सांग ना..असं म्हणत मी बायकोला जवळ घेण्याचा प्रयत्न केला.तर तिने मला धाडकन ढकलच.
   मी काही स्वप्नातील चंद्रसेना नव्हे मिस्टर.ती गरजली.
   अगं पण पेपरमधील बातमीचं काय?मी तिची गाडी रुळावर आणायचा प्रयत्न करीत होतो.
   लोणचं घाला या बातमीचं.लोकांनी प्रत्यक्षात चंद्रावर फार्म हाऊस बांधण्यासाठी जागा घ्यायला सुरुवात केलीय.तुम्ही फक्त झोपा काढा.ती गडगडली.माझ्या अंगावर पेपर फेकून ताडताड दुस-या खोलित निघून गेली.
   सुप्रभाती असं भांडण लावणारा आजचा पेपर काढल्याबद्दल मी संपादकांच्या नावाने खडे फोडून भांडणाचं मूळ कारण म्हणजे बातमी वाचू लागलो.चंद्रावर जमीन विकत घेणा-या भारतीय माणसाची ती बातमी होती.सहा हजार रुपयाला त्याने जमीन घेतली होती.त्याचा खसरा नंबरही दिला होता.बायको म्हणाली तेच खरं होतं.मी फक्त झोपा काढतो नि बाकीचे चंद्रावर जागा घेतात.पण चंद्रावरची जागा आणि त्यावरचं फार्म हाऊस ही कवी कल्पना तर नाही ना?कवी मंडळी आग ओकणा-या सूर्यावरही आपल्या प्रेयसिला महाल बांधून देतील.चंद्रावरची जागा विकणारा त्याचा मालक अचानक कसा अस्तित्वात आला? चंद्राची मालकी तर समस्त पृथ्वीवासियांची.याचा अर्थ मी सुध्दा चंद्राचा मालकच की नाही.स्वत:च्या मालकीची जागा घेणारा तो भारतीय मूर्खच समजायला हवं.दॅटस् इट..मला माझ्याच हुषारीचं कौतुक वाटलं.बायकोची ,फक्त एकाच भूखंडाची मागणी असेल तिच्या वेणित आख्खा चंद्र खेचू की,एखाद्या गुलाबासारखा.मला मस्त कल्पना सूचली.यामुळे बायकोला खूष करणं ,मुळे सोपं जाणार होतं.मी तिला हाक मारली.पण उत्तर नाही.म्हणून मीच उठलो नि बेडरुमच्या बाहेर येऊन बघतो तो काय,ही सूटकेस भरत असलेली.
   कुठे चाललीस एवढया सक्काळी मी विचारल.
   परस्त्रीबरोबर चद्रांवर जाणा-यासोबत एक क्षणही मी राहणार नाही समजलं.असं ती म्हणतातच माझं डावं उजवं अंगं लुळं पडतं की काय,असं वाटू लागलं.
   अगं,तू माझं ऐकतरी, मी तिला समजवण्याचा पयत्न करु लागलो.चंद्रावरचा एक भूखंड काय आख्खा चंद्रच तुला देतो ,असं काही तरी मी बोललो..
   म्हणे चंद्र देतो.आपलं थोबाड बघून डोक्यावर कसा चंद्र उगवलाय ते बघत बसा.. असं म्हणून तिने सुटकेस उचलली नि धाडकन बाहेर पडली.मी माझ्या चंद्रावर सॉरी केसांनी असहकार पुकारलेल्या डोक्यावर हात मारुन घेतला.
  
   

No comments:

Post a Comment