Friday, March 23, 2012

दिवाळी अंकांचं इंटरनॅशनलायझेशन-चिनी स्टाईल

दिवाळी अंकांचं इंटरनॅशनलायझेशन-चिनी स्टाईल
    महाराष्ट्राचा सांस्कृतिक उत्सव असलेल्या दिवाळी अंकाचे 100 वे वर्ष उत्साहात वगैरे साजरे झाले.त्याला यंदा 4 वर्ष होत पूर्ण होत आहेत.म्हणजे यंदाचा दीपोत्सव हो शतकोत्तर choutha आहे.(104 वा दीपोत्सव म्हणणं आणि शतकोत्तर choutha दीपात्सव म्हणणं यामध्ये तसा काहीच फरक नसला तरी शतकोत्तर choutha म्हंटलं की कसं सांस्कृतिक भारदस्तपणाची गुलाबी शाल अंगावर घेतल्यासारखी वाटते.)दिवाळी अंकांच्या शतकमहोत्सवी वर्षात महाराष्ट्र देशी मोठीच धुमधाम होती. उत्सवाचं,आनंदाचं,मंगलदायी वातावरण (कुठेही दिसल नसलं तरी) असल्याच्ंा व्हर्च्युएली जाणवलं होतं.(तसं प्रत्यक्षात होतं की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न संशोधकांनी घ्यायला हरकत नाही.पीएचडीसाठी उत्तम विषय ठरु शकतो.)
    फराळ,फटाके(शक्य झाल्यास)फुकट दिवाळी अंक प्राप्त झाल्यास दिवाळसण आनंदाचा मोठा,नाहीे कशाचा तोटा अशी भावावस्था बऱ्याच मराठी जणांची होते.धनत्रयोदशीच्या आदल्या दिवसापासून दिवाळी अंक मराठी घरातील दिवाणखान्याची शोभा वाढवू लागतात(असं बोललं जातं.तसं काही विद्वानांनी लिहूनही ठेवलंय.त्याच्या खरेपणावर अद्याप कुणीही प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने ते सत्यच असलं पाहिजे).याला परंपरचे स्वरूप आहे.महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणं  बदललं,पण दिवाळीच्या दिवसात दिवाणखान्यात येणाऱ्या दिवाळी अंकाची परंपरा शंभर  वर्षात कायम राहिली.यावरुन मराठी जणांची सांस्कृतिक संवेदनशिलता थोर असल्याचा निष्कर्ष काढता येतो.
    मऱ्हाठी संस्कृतिचा ऱ्हास किंवा मऱ्हाठी संस्कृतीवर (बिहार यूपी-छत्तीसगड)चे आक्रमण वगैरे जी भाषा होते ती मराठी जणांच्या दिवाळी अंक संवेदनशिलतेच्या 100 वर्षाच्या थोर पंरपरेमुळे फोल ठरते.ही बाब कै.ना.सी.फडके,आचार्य अत्रे,श्री ..माटे यांना सिध्द करण्यास पुरेशी ठरली असती.
    आता वैश्वविकरण-ग्लोबलायझेशनच्या काळात मराठीजणांच्या या थोर पंरपरेची कीर्ती सातासमुद्रापलिकडे पोहचण्यास कितीसा वेळ लागणार.दिवाळी अंक ही सांस्कृतिक मेजवाणी असली तरी त्यात बिझिनेस दडलेला असतो.हा बिझिनेस काही संपादक-मालकांसाठी यश चोप्रांच्या चित्रपटांसारखा भरभरुन बॉक्स ऑफिस रिटर्न देणारा तर काही संपादक मालकांसाठी बॉक्स ऑफिसवर पहिल्या शोलाच उताणा पडलेल्या रितुपर्णा घोषच्या चित्रपटांसारखा असतो.दिवाळी अंकाची इकानॉमी फार फायदेशिर ठरु शकत नाही असं उच्चरवाने सातत्यानं आपल्या कनावर पडत असलं तरी  104 वर्षे ही परंपरा अव्याहत चालू राहिली,ही बाब सुध्दा मराठी जणांच्या सांस्कृतिक जाणिवा श्रेष्ठ दर्जाच्या असल्याचं सिध्द करणारी आहे.पण मराठी माणसाची ही सांस्कृतिक संवेदनशिलता महाराष्ट्राच्या सीमारेषेत (फार तर 10 -20 अंक इंदुरला,5-10 अंक तंजावरला,20-25 अंक बडोद्याला,7-8 अंक ग्वाल्हेरला,70-75 अंक बेळगावाला,45-47 अंक निपाणीला,11-12 अंक हैद्राबादला आणि 34-45 अंक दिल्लीला जाऊन या सीमेचा विस्तार झालाय,असे म्हणता येईल.)बंदिस्त राहिली.कुणालाही ही सीमारेषा भेदावी वाटली नाही.रतन टाटा हे एखाद्या मराठी कुटुंबात जन्मले असते तर त्यांनी या बिझिनेचा विस्तार सिंगूरपासून सिंगापूर पर्यंत केला असता.मराठी समाजात टाटा जन्मले नाही आणि पारसी समाजात गरवारे जन्मले नाही हे आपलं दुर्देव्य.पण जे मराठी माणसाला जमलं नाही त्याकडे ह्यूएन त्संग ज्युनियर(2010) किंवा ह्यूएन त्संग दोन(2010) या चिनी माणसाचं लक्ष दिवाळी अंकंाचा शतकोत्सव महाराष्ट्रात साजरा होत असताना गेलं असल्याची माहिती नुकतीच हाती आली आहे.(गुगल आणि माहितीच्या अधिकाराच्या काळात काहीतरी लपून राहू शकतं का?)
    एखादा चिनी माणूस हा मुळात कसा आहे हे चिनच्या अभेद्य भिंतीच्या रहस्यासारखेच रहस्य असले तरी त्याला बिझिनेस चांगलाच जमतो हे वास्तव मात्र सर्व जगानं स्वीकारलं आहे.(यंदा तर चीनची अर्थव्यवस्था जगातील टॉप टू वर पोहचली आणि सध्या टापॅ वन असलेल्या अमेरिकेची त्यामुळे झोप उडाली.)अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चिनी ड्रॅगन दखल घेण्याइतपत वळवळतो.एटापल्लीतील मुकरु एडका कोवा पासून इंग्लंड मधील लॉर्ड मॅकमुल्लर किंवा अशाच इंग्रजी नावाचा कोणितरी आपली व्यक्तिगत अर्थव्यवस्था अधिक सुदृढ,सक्षम व्हावी यासाठी चिनी फेंग शुईशास्त्राचा स्वीकार करायला लागले आहेत.फेंग शुईची सुई टोचल्यामुळे कुणाची किती धन झाली हा संशोधनाचा विषय असला तरी या शास्त्राप्रमाणे लॉफिंग बुध्दापासून ते विविध वस्तू घरात ठेवा असं सांगणारे ती वस्तू उत्पादित करणारे चिनी उद्योजक मात्र गब्बर(सिंग सॉरी चिंग)झाले आहेत.तर अशा या दूरदृष्टिच्या चिनींपेैकी ह्यूएन त्संग ज्युनियर(2010) चे मराठी दिवाळी अंकाच्या 100व्या वर्षाकडे लक्ष गेलं यात नवल ते काय?
    0000
    दिवाळी अंकाची शंभरी हा इव्हेंट असल्याचं त्याच्या तेव्हाचं लक्षात आलं होतं.पण हा इव्हेंट इनकॅश करण्यासाठी एकही भारतीय उद्योगपती आणि मिडिया कसे समोर आले नाहीत याचं या चिनीला सखेद आश्चर्य वाटलं होतं.यावर तो गेली दोन वर्षे चिंतन करत होता.या चितंनातूनच त्याच्या असं लक्षात आलं की,दिवाळी अंक ही भारतीय आणि विशेषत: मराठी माणसांची मक्तेदारी असली तरी त्याच्ंा पेटंेट मात्र भारतातील एकानेही अद्याप मिळवलेलं नाही. त्यामुळे चिनला दिवाळी अंकाचं इंटरनॅशनलायझेशन करण्याची पुरेपूर संधी असून त्यात कोणताही अडथळा नसल्याचं त्याने बरोबर ओळखलं.तो झपाटून कामाला लागला.
    0000
    मराठी माणूस आणि मुलकाची ख्याती ही ताडोबातील फ्रेश वाघांमुळे यंदाच्या इअर ऑफ टायगरचे निमित्त साधून चीनमध्ये सर्वदूर ऑलरेडी पोहचलीच होती. मराठी माणूस अटकेपार म्हणजे पाकिस्तान,इंग्लड,इराण,होनोलूलू आणि कॅनेडाच्या पलिकडे कधीचाच गेला होता.शिवाय माधुरी दीक्षित किंवा मुग्धा गोडसे या शंभर टक्के आणि काजोल या 50 टक्के मराठी मुलीच्या प्रेमात जितका पडला नसेल तितका शांघायच्या प्रेमात मराठी माणूस  पडला असल्याचं या चिनीला माहीत होतं.त्यामुळे दिवाळी अंकांचा इंटरनॅशनल बिझिनेस हा अत्युत्कृष्टरित्या चिनला करता येणं शक्य असल्याचं,इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट,अहमदाबाद किंवा लंडन स्कूल ऑफ इकानॉमिक्स या स्कूलमध्ये जाता सुध्दा त्या चिनीला लक्षात आलं.
    ह्यूएनसंग सिनियर किंवा ह्यूएनसंग एक हा चिनी प्रवाशी भारत प्रवासाच्या दरम्यान महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या राजूरा तालुक्यातील माणिकगढ किल्ल्यापर्यंत पोहचला होता.त्यामुळे चिनी पावलं मराठी मुलखात कधीचीच उमटली होती.त्यामुळं दिवाळी अंकाच्या बिझिनेसचा प्रकल्प साकार करण्याचा नैतिक आणि पहिला अधिकार आपल्याला आहे,असं ह्यूएन त्संग ज्युनिअरला वाटलं. या निमित्त चीन-महाराष्ट्र(डॉ.कोटणीस की अमर कहानी)या एैतिहासिक पर्वाचं पुनरुज्जीवन सुध्दा करता आलं असतं.हे त्याने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसाठी मनोमन नोंदवून ठेवलं.
    000
    प्राथमिक पार्श्वभूमीची अशी जुळवाजुळव करुन हा चिनी माणूस कामाला लागला.दिवाळी अंकाचं बिझिनेस फायदेशिर करण्यासाठी त्याला ग्लोबल रुपडं देणं आवश्यक होतं.त्यासाठी किराणा दुकानासारखं एखादं दुकान उघडून चालणार नव्हतं.तर त्यासाठी हायपर मॉलच उघडणं आवश्यक होतं.हे चिनीने बरोबर ओळखलं.तसं प्रपोजल चिनी सरकारकडे त्याने पाठवलं.
0000
    या प्रपोजलकडे पाहून चिनी अधिकारी फिदी फिदी हसले.त्यांनी ह्यूएन त्संग ज्युनिअरला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं.त्याच्याकडे कुत्सित नजरेने बघत,एखाद्या चिनीला असले क्षुद्र स्वप्न पडतात तरी कसे असा सवाल त्यांनी केला. आपली चूक काय झाली ते त्याला कळेना.सध्या हिंदी चिनी भाईभाई हे वातावरण नसलं तरी बिझिनेस मध्ये भाई भाई नसते तिथे फक्त मनी मनीच असते.मग आपलं चुकलं काय?या अधिकाऱ्यांना थडग्यातला माओ त्से तुंग चावला की काय?अशी शंका त्याला आली.चिनीने खाली मान घातली.तेव्हा तो अधिकारी त्याला म्हणाला.मॉल काय काढतोस डुकरा,स्पेशल दिवाळी झोन-एसडीझेड काढना..
    ह्यूएन त्संग ज्युनिअरच्या कानावर विश्वासच बसेना.त्याची मान वर गेली.अधिकाऱ्याने त्याला जवळ बसवून घेतलं.त्याच्या प्रपोजलमध्ये एसडीझेडची कशी सुवर्ण शक्यता आहे हे समजावून सांगितलं .स्पेशल दिवाळी झोन काढण्यासाठी शांघायच्या बाजूला 1000हेक्टर जागा मोफत देऊ केली.
0000
    ह्यूएन त्संग ज्युनिअरला हर्षवायू झाला.1000 हेक्टर मध्ये स्पेशल इकानॉमिक झोन सारखे स्पेशल दिवाळी झोन काढण्याची आयडिया अधिकाऱ्यानं त्याला दिली होती.त्याप्रमाणे तो कामाला लागला.जयंत साळगावकारांकडून त्याने मराठी शुभमुहूर्त,बिजेन दारुवाला यांच्याकडून इंग्रजी शुभ मुहूर्त आणि पॉल ऑक्टोपस कडून चिनी शुभमुहूर्त मिळवला.त्यांना आतापर्यंतचे सर्वाधिक मानधन दिले.या तिनही तिथीचे लसावी काढून निघालेल्या तिथीच्या शुभमुहुर्तावर स्पेशल दिवाळी झोनचं-एसडीझेडचं काम सुरु केलं.
00000
    एसडीझेडमध्ये दिवाळी अंकाची छपाई,दिवाळी अंकासाठी लागणाऱ्या कागद निर्मितीचा कारखाना,लेखकांसाठी सदनिकांचे बांधकाम,प्रींटर्स,लेआऊट आर्टिस्ट कार्टूनिस्ट,पेस्टर,संगणकचालक,मुद्रित शोधक आणि जाहिरातदार यांच्यासाठी विशेष कॉलनी यांची सोय राहणार होती.अशा बहुविध प्रकारे एसडीझेडची निर्मिती सुरु झाली.
    दोन हजार प्रतिंच्या अलिकडे किंवा फार तर थोडं पलिकडे प्रती काढण्याची हिम्मत मराठी मालक-संपादक ठेवतात.ही लघुदृष्टी नवनिर्माणाच्या काळातही मराठी माणसानं जपली आहे.याचं आश्चर्य ह्यूएन त्संग ज्युनिअरला वाटलं.पण या आश्चर्यात फार गुंतून राहता त्याने दिवाळी अंकाचे प्रॉडक्शन कोटी कोटीत करण्याचं ठरवलं.
000
    मराठी लेखकांची जरी दिवाळी अंकात मक्तेदारी असली तरी वैश्वीकरणाच्या काळात अशी मक्तेदारी बरोबर नसल्यानं दिवाळीच्या मोसमात उत्तमोत्तम साहित्यफराळ वाचकांना मिळावा यासाठी ह्यूएन त्संग ज्युनिअरने सलमान रश्दीच्या अध्यक्षतेखाली जागतिक दर्जाच्या लेखकांची समिती नेमली.अरुंधती रॉयचा अपवाद वगळता सर्व लेखकांनी समितीमध्ये काम करण्यास होकार दिला.जेफ्री आर्चर यांनी आपण स्वत:पन्नास दिवाळी अंकांचं साहित्य देऊ असं घोषित केले.मराठी लेखकांसाठी मानधानाचा आकडा हार्टऍ़टक आणणारा असल्यानं बहुतेक मराठी लेखक-कविंनी आपल्याला साहित्य पाठविण्याचं निमंत्रण येईल या आशेनं दिवसाचे अठ्ठेचाळीस तास काम करुन दिवाळी अंकासाठी लेखन करण्याचा संकल्प केला.
000
    कटिंग एज टेक्नालॉजीसारखा दिवाळी अंक निर्मिती हा कट थ्रोट बिझिनेस ठरण्याची शक्यता असल्यानं त्यासाठी मोठा निधी हवा असल्याचं ह्यूएन त्संग ज्युनिअरने वर्ल्ड बँकला आणि बँक ऑफ महाराष्ट्राला कळवलं.चिनीला नकार हा भविष्यातल्या संक्रातिचं कारण ठरु नये यासाठी वर्ल्ड बँकेच्या डायरेक्टर बोर्डानं एसडीझेडसाठी मोठा निधी कोणतीही खळखळ करता किंवा अट टाकता मंजूर केला. फक्त या बिझिनेसमध्ये काही गडबड झाल्यास शांघायमधील एक 40 मजली टॉवर ताब्यात घेऊ एवढीच एक अट बँकेनी घातली.मात्र बँक ऑफ महाराष्ट्राच्या डायरेक्टर बोर्डाने ,धीस इज ऑल रबिश असं इंग्रजीत नांेद करुन चिनीचा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला.
000000
    जागतिक बँकेचा निधी मिळताच एसडीझेड वेगानं पूर्णत्वाकडं निघाला.टाईम बाऊंड काम करण्यात चिन्यांचा कुणीच हातधरु शकत नसल्यानं एसडीझेड त्यांनी दिवाळी येण्याआधीच पूर्ण केला. दिवाळी अंकांच्या कारखान्यांची सुरुवात केली.
    दिवाळी अंक केवळ मराठीेत केला तर एसडीझेड बुडित निघेल हे लक्षात येताच ह्यूएन त्संग ज्युनिअरने,दिवाळी स्पेशल-अनटोल्ड स्टोरीज ऑफ बिन लादेन अशा विषयाचा अंक उर्दू,फारसी आणि अरेबिक भाषेत काढला.बिन लादेन यांच्या संमत्तीने अशी मोहर त्या अंकावर उमटवली.त्यामुळे या अंकासाठी अतिप्रचंड अशी प्रकाशनपूर्व नोंदणी सर्व जगातून झाली.या अंकाला केवळ मुस्लिमांमध्येच इंटरेस्ट दिसला नाही तर जगातल्या प्रत्येक धर्मातील व्यक्तिला इंटरेस्ट असल्याचं चिनीच्या लक्षात आलं.
00000
    त्यामुळे मग प्रत्येक राष्ट्रनिहाय दिवाळी अंक काढण्याचं नियोजन केलं गेलं.उदाहरणार्थ रशियासाठी ऍ़ना कुर्णिकोव्हा टू मारिया शारापोव्हा-बेबी टू बॉल्स,असा विशेंषाक होता.रशियन सुंदरिंच्या हॉट-छायाचिंत्रानी नटलेला आणि सजलेला हा अंक बीन लादेन अंकासारखाच हॉट नोंदवला गेला.
    अमेरिकेसाठी-इनव्हिजीबल कामसूत्र हा विशेषांक होता.त्यासाठी अतिथी संपादक खुशवंतसिंग,सहाय्यक अतिथी संपादक शोभा डे,कला संपादक(प्लेबॉयचे संपादक)फिफनेर आणि सहाय्यक कला संपादक म्हणून एम.एफ.हुसेन या डेडली फोरची नियुक्ती केली गेली.आश्चर्य म्हणजे केवळ अमेरिकेसाठीच असलेल्या या विशेषांकाची जाहिरात दिली गेली तेव्हा पाचही खंडातून अंक खरेदीसाठी प्रचंड नोंदणी झाली.त्यामुळे शांघायच्या बाजूला असलेल्या एसडीझेडमध्ये नवी यंत्रसामुग्री लावण्याची गरज भासली.ती गरज भागविण्यासाठी अतिरिक्त भूमीची गरज पडली.ती भागविण्यासाठी शांघायचा काही भाग या एसडीझेडमध्ये जोडला गेला.
000000
    आकंठ प्रेमात बुडालेल्या फ्रांससाठी प्रेमकथा विशेषांक काढण्याचे नियोजन केलं गेलं.या अंकाच्या संपादकपदाची जबाबदारी घसघशित मानधनासह बिल क्लिंटन आणि संपादन करुन करुन जेव्हा त्यांना थकवा येईल त्या मर्यादित काळापुरते मोनिका लेंविस्की यांच्याकडे सोपविण्यात आली.या प्रेमकथा काल्पनिक नसून सत्यकथा राहणार असल्यानं त्याच्ंा आकर्षण अधिक वाढलं.डायनाच्या प्रेमकथा,नेपोलियनच्या प्रेमकथा,क्लिंटन यांची स्वत:ची प्रेमकथा,पॅरिस हिल्टनची प्रेमकथा,फ्रांसचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष सारकोजी यांची प्रेमकथा,सलमानखानची प्रेमकथा,अमिताभ-रेखाची प्रेमकथा,दीपिका पदूकोन-युवराज सिंग-रणबीर कपूर यांची त्रिकोनी प्रेमकथा,झरदारींची प्रेमकथा,मर्लिन मन्रोची प्रेमकथा असे विषय त्यात निवडले गेले.प्रेमात यशस्वी होण्याचे 1111 फार्म्यूले या विषयावर जगातील विविध प्रांतातील फंडे एकत्र करण्यात आले.सतत स्वत:वर प्रेम करणाऱ्या देवआनंद यांच्यावर या संकलनाची जबाबदारी सोपविण्यात आली.
00000
    इस्त्रालयसाठी सुध्दा विशेषांक काढण्यात आला.या विशेषंाकाचा विषय वार विदाऊट रिझन,असा होता.युध्दामुळेच हे राष्ट्र जिवंत राहिलं होतं.सक्षम झालं होतं.त्यामुळे युध्द करत राहण्यातच या राष्ट्राचं हीत होतं.तर अशा या राष्ट्राला युध्दासाठी विविध प्रकारची काल्पनिक कारणं शोधून काढता यावी यासाठी या विशेषांची बांधणी केली गेली.सध्या निवृत्तीचं जीवन जगत असलेले पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि लष्कर प्रमुख मुशर्रफ यांच्यावर या विशेषांकाच्या संपादनाची जबाबदारी सोपविण्यात आली.
000
    गरिबी,दुष्काळ,महापूर,वनवे,एडस्,भूकबळी अशा अनंत समस्यांनी आकंठ भरलेल्या आफ्रिकेच्या नागरिकांच्या जीवनात आनंद आणि हास्याचे कारंजे निर्माण व्हावेत यासाठी विनोद विशेषांकाचं नियोजन केलं गेलं.विनोदी विशेषांकात दबदबा असणाऱ्या पाटकरांच्या आवाज टीमकडे या विशेषांकाच्या संपादनाची जबाबदारी सोपविण्यात आली.फालतू विनोद ते फंटास्टिक विनोद,ब्लॅक ते व्हाईट कॉमेडी,सेक्सी ते सोबर ह्यूमर अशी मोठी रेंज या विशेषांकाची ठरविण्यात आली.आफ्रिकेतील जास्तित जास्त नागरिकांच्या हातात हा हसवणारा अंक जायला हवा म्हणून या अंकाची किंमत मूळ किंमतीच्या एक चतुर्थांश ठेवण्यात आली.बिल गेटस फौंडेशन,एम.अंबाणी चॅरिटेबल ट्रस्ट आणि .अंबानी चॅरिटेबल ट्रस्ट कडून यासाठी निधी मिळविण्यात आला.त्याच्या सहाय्याने या विनोद विशेषांकाला सबसिडी देण्यात आली.
000000
    एसडीझेड मधून उत्पादित होणाऱ्या दिवाळी अंकांच्या प्रसिध्दी मार्केटिंगसाठी एसडीझेडमध्ये चॅनेल दिवाळी उघडलं गेलं.दिवाळी अंकाच्या प्रसिध्दीचा इव्हेंंट म्हणून बिजिंग ऑलिंपिकसाठी बांधण्यात आलेल्या स्टेडियमध्ये श्रेयस तळपदे आणि रितेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाना पाटेकर यांच्या दिग्दर्शनाखाली माय -मराठी,चिनी व्हरायटी हा मेगा इव्हेंट घेण्याचं नियोजन केलं गेलं.
000
    दिवाळी अंकांच्या प्रमोशनसाठी व्टेंटी  व्टेंटी दिवाळी वर्ल्ड कप आजोजित करण्याची कल्पना आयसीसीचे प्रमुख आधारस्तंभ असलेल्या साहेबांच्या गळी उतरविण्यात आली.मराठी अस्मितेचं प्रतिक असलेल्या दिवाळी अंकाचं इंटरनॅशनल प्रमोशन अशा प्रध्दतीनं होत असल्यास व्हाय नॉट..असं साहेब म्हणणारच याची खात्री चिनीला होती.चिअर लिडरच्या गँगसाठी राखी सावंत,अदिती गोवित्रीकर,मुग्धा गोडसे,विद्या माळवदे,उज्वला राऊत,सोनाली बेंद्रे,उर्मिला मांतोडकर,अंतरा माळी, सायली भगत ही मराठी तारकांची फौज तयार होती. दिवाळी अंकाचं हे ग्लोबल प्रोमशन हा मोठा इव्हेंट ठरणार असल्यानं त्यातून अब्जावधी डालर्सची कमाई होणं अपेक्षित होतं.त्यातून दिवाळी अंक फौंडेशनची स्थापना करुन दिवाळी अंकांची गुणवत्ता, दर्जा वाढविण्यासाठी अभ्यासवृत्ती देण्याची तरतूद करता येईल याचा हिशोब ह्यूएन त्संग ज्युनियरने पक्का केला.
00000
    एसडीझेड मधील दिवाळी अंकाचा उद्योग असा व्यापक होण्याची जबरदस्त संभावना असल्यानं त्यासाठी लेखक,संपादक,मुद्रित शोधक,व्यंगचित्रकार,चित्रकार,सुलेखनकार,आर्टिस्ट,कवी,चारोळी कार,भाषांतरकार,प्रींटर,अशा अनेक तज्ज्ञ मनुष्यबळाची आवशक्यता भासणार होती.सध्या या क्षेत्रातील मनुष्यबळ अतिशयच कमी आहे.त्यामुळे एसडीझेडसाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भागवता यावी म्हणून एज्यूकेशनल आणि ट्रेनिंग कॉलेजेस सुध्दा सुरु करणं गरजेचं असल्याचं चिनीच्या लक्षात आलं.त्याला भारतातील स्पेशल एज्यूकेशन झोन-एसईझेडच्या घोषणेची आठवण झाली.या एसईझेडच मध्ये एसडीझेडसाठी लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भागावी म्हणून शिक्षण संस्था उभारता येतील अशी आयडिया त्याला सुचली.एसडीझेडसााठी स्पेशल शिक्षण संस्था उभारण्याचं प्रपोजल तयार करुन ते महाराष्ट्राकडे पाठविण्याचा त्याचा निर्णय झाला.अशा एसईझेड गडचिरोली,वर्धा,चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळानं-एमआयडीसीनं ताब्यात घेतलेल्या पण अद्याप एकही उद्योग सुरु झालेल्या भूखंडावर करता येणं शक्य असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
    शांघाय जवळ असलेल्या एसडीझेडच्या उपशाखा अशा प्रकारे स्थापन करुन एसडीझेडचे एक्सपांशन करता येणं शक्य होतं.शिवाय ह्यूएनत्संग सिनियर ज्या मार्गानं चीन मधून चंद्रपूरपर्यंत पोहचला,त्याच्या स्मरणार्थ विशेष कॉरिडार स्थापन करुन त्याला स्पेशल दिवाळी अंक कॉरिडॉरचं नाव देण्याची कल्पनाही चिनीला सुचली. या कॉरिडारचा विकास बुलेट ट्रेनसाठी समांतररित्या चारचाकी वाहनासांठी करुन त्यासाठी टोल घेणं शक्य होतं.या दिवाळी अंक कॉरिडॉर मध्ये दिवाळी अंक प्रमोशनासाठीचे जाहिरातफलक बॅनर,पोस्टस,र्स्ट्रीट प्ले,दिवाळी अंक अम्युझमेंट पार्क,हॉटेल्स,रेस्टारेंटस्,स्पा,चौफुला लावणी संेटर उभारण्याचं ठरविलं गेलं.एक दिवाळी अंक बहुविध आर्थिक च्रकासाठी कसं कारणीभूत ठरु शकतं हे यामुळे सिध्द करता येऊ शकेल.मार्क्सला जे जमलं नाही,किंवा माल्थसला जे कळलं नाही किंवा भारतातील रिझर्व बँकेचे गर्व्हनर आणि सार्वजनिक बँकांच्या अध्यक्षांना सुचलं नाही किंवा सहारा चिटफंडच्या सुब्रोतो रॉयच्याही जे लक्षात आलं नाही,ते आपल्याला कळलं,समजलं याचा कोण आनंद चिनीला झाला.
    0000
    दिवाळी अंकांची विक्री साखळी विणण्याचा प्लान चिनीेने केला.दिवाळी अंक घराघरात जावेत यासाठी त्याने दिवाळी अंकाची किंमत 2 रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत ठेवली.2 रुपयात तांदूळ या संकल्पनेवर आधारित ही किंमत होती.भाम्रागडासारख्या जगभरातील अविकसित आणि क्रयशक्ती कमी असलेल्या प्रदेशासाठी दोन रुपये,अंबाणी टाटा,बाटा,बिर्ला,बिल गेटस सारख्या गटांसाठी किंमत दोन लाख रुपये.मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीवर प्रेम सिध्द करण्याची नामी संधी ज्या ज्या नॉन मराठी माणसाला हवी असेल त्यांच्यासाठी पाच लाख रुपये. पत्रकार परिषदेत ही दानशुर व्यक्ती सांगू शकेल की माझे या भाषेवर इतके प्रेम आहे की मी त्या भाषेतला दिवाळी अंक विकत घेण्यासाठी पाच लाख रुपये सुध्दा(सुध्दा शब्दावर भर देवून) खर्च करु शकतो. संपादकांना मात्र स्ट्रीटक्टली दिवाळी अंक मोफत देण्याचा सल्ला चिनीला बिजिंग मधील भारतीय राजदुतावासात काम करण्याऱ्या मराठी अधिकाऱ्यानं दिला.तसं जर झालं नाही तर या संपादकांच्या टीकेच्या तलवारीला धार चढेल.तलवार गंजलेली राहू देण्यासाठी मोफत अंक ही आयडिया काही प्रमाणात फायद्याची ठरेल.असं मत त्या सल्लागारानं व्यक्त केलं नि ते चिनीला पटलं.
    सरकारनं मोफत वीज दिली तशीच मोफत दिवाळी अंक योजना सादर करता येईल का यावर विचार करण्यासाठी एक प्रपोजल त्याने इथल्या सरकारला दिलं. सांस्कृतिक मेजवाणी अशी फुकटात मिळाल्याने पॉझिटिव मेसेज तळागाळापर्यंत जाईल.असं त्या सल्लागाराचं म्हणणं होतं.त्यानुसार ह्यूएन त्संग ज्यूनिअर कृती आराखडा तयार करु लागला.
0000
    दिवाळी अंकाचं पेटंेंट जरी एकाही मराठी माणसानं काढलं नसलं तरी एसडीझेडसाठी जेव्हा हयूएन त्संग ज्युनियरनं काही मराठी संपादक,लेखक,प्रकाशकांसोबत व्यावसायिक सामंजस्य करार केले तेव्हा मात्र गहजब झाला.कारण मराठीत मीच श्रेष्ठ,बाकीचे कनिष्ठ ,असा वाद दिवाळी अंकाच्या जन्मापासून आजतागायत चालत आलाय.त्यामुळे मराठी वृत्तपत्रांमध्ये एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडू लागल्या.अमक्याला दिवाळी अंकातलच काय,साहित्यातलं तरी काय कळतं?त्याने कधी इब्सेन(कोण बरे हा)वाचला तरी काय?साहित्याच्या अंर्तप्रवाहाच्या सूक्ष्म जाविणांच्या संवेदना वैश्विक पातळीवर नेण्याचा संकल्प केला जातो तेव्हा त्यात सृजनात्मकतेची बिजं ही अस्सलच असायला हवी.ही बिजं जर शेक्सपियरीयन नेणिवेच्या पातळीवर वर्डस्वर्थशी एकीकडे आणि मर्ढेकरांशी दुसरीकडे संमातर गेल्यास साराच घोटाळा व्हायचा.एसडीझेडमध्ये कोण असावे ही बाब व्यावसायिक मूल्यांच्या तडजोडीची अनिवार्यता असेलही पण ती सांस्कृतिक ऱ्हासाचा पुढचा टप्पा ठरु नये.अशा आशयाच्या,चिनी सोबतच मराठीतील 9 कोटी 99 लाख 990 वाचकांना कळणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या.वाद विवाद झडू लागले.
    काही संघटनांना यात वेगवेगळे रंग दिसू लागले.एसडीझेडचा जनक असलेल्या चिनीपर्यंत पं.बंगाल की बराक ओबामा की मायावती की अमरसिंह की विजय मल्यांद्वारे पोहचता येईल का याचाही प्रयत्न झाला.चिनीच्या या एसडीझेड मुळे सामाजिक अन्याय होण्याची शक्यता असल्यानं तिथे राखीव जागा असल्याच पाहिजेत असा ठराव काही संघटनांच्या विशेष बैठकीत करण्यात आला.आमचं सरकार सत्तेवर आलं की ही मागणी पूर्ण करेल असं एका पक्षानं घोषित केल्ंा.पण चीनमध्ये आपला पक्ष कसा सत्तेवर येईल,हे मात्र या पक्षानं जाहीर केलं नाही.एसडीझेडसाठी करावयाच्या कॉरिडारला विरोध करण्याचा संकल्प काही पुरोगामी आणि काही प्रतिगामी संघटनांनी केला.पब्लिक लिटीगेशन झालं.एखाद्या राष्ट्राच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याची विनंती करणाऱ्या पब्लिक लिटिगेशनवाल्या समाजसुधारकाला न्यायमूर्तिंनी झाप झाप झापले.या समाजसुधारकाला आंतरराष्ट्रीय न्यायालय हे हेगला की प्रॉगला आहे याची कल्पना नसल्यानं तो शांत बसला.
    महाराष्ट्रातील 200 हून अधिक साहित्य परिषदा आणि साहित्य संस्थांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली.एसडीझेड विरोधातच मराठी संस्कृतिचे हित सामावले असल्याचं सर्वानुमते ठरलं.रिपब्लिक ऑफ चीन असल्या विरोधाला भीक घालत नाहीत हे बिजिंगवरुन घोषित झालं.
    0000
    या वादविवादामुळे एसडीझेड आणि महाराष्ट्राच्या दिवाळी अंकांची ख्याती जगाच्या कानाकोपऱ्यात आपोआप पोहचली.हॅरी पॉटरच्या पुस्तकांच्या आगमनासाठी जगभरातील वाचकांची उत्सुकता शिगेला पोहचत असे तशीच उत्सुकता सगळीकडे निर्माण झाली.दिवाळी अंक कधी येणार,कधी येणार याची विचारणा होऊ लागली..नोंदणीचे विक्रम घडू लागले...डॉलर्स पोैड,रियाल,दिनार,युरोच्या राशी पडू लागला.मराठी माणसाला जे शंभर वर्षात जमलं नाही ते चिनी माणसाने एका दिवाळी अंकात करुन दाखवलं.
    जगातील पहिला विशेष दिवाळी झोन-एसडीझेड यशस्वी केलेल्या चिनीने आता एसडीझेडच्या श्रृंखला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काढण्याचा संकल्प केला आणि ह्यूयन त्संग सिनियर ज्या मार्गाने महाराष्ट्रात पोहचला त्याच मार्गाने निघायचा संकल्प ह्यूयन त्संग ज्युनियरने सोडला.त्याआधी त्याने शांघायजवळच्या एसडीझेडला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं नाव देण्याचं घोषित केलं.त्यामुळे बसपा आणि पुरोगाम्यांनी जल्लोष केला.सरकारनंही अभिनंदन केलं.विविध पक्षांनी पक्षहित बाजूला ठेवून समाधानाच्या प्रतिक्रिया दिल्या.हे केवळ आमच्यामुळेच घडल्ंा अशा परिपत्रकांचा पाऊस पडला..
000000000000000000

No comments:

Post a Comment