Sunday, April 14, 2013

शुक्लकाष्ठात शेक्सपिअर


शुक्लकाष्ठात शेक्सपिअर
    शेक्सपिअर हे  शब्दप्रभू.असं मऱ्हाठी साहित्यिकांना फार पूर्वीपासून वाटत आलं आहे.इतकं की आपले कालिदास रामटेककर हे आर्यावर्ताचे शेक्सपियरच जणू,असं एक समिकरण इकडच्यांनी करुन टाकलं.
    शेक्सपिअर यांचं साहित्य म्हणजे सृजनाचा देखणा सोहळा.अल्टिमेट!अमिताभ बच्चन म्हणतात मी जिथे उभा राहतो तिथून रांग सुरु होते.तसच शेक्सपिअर  क्रंमांक एकवर आणि त्यांनतर इतर सारे असं देशी भाषिक संशोधकांना वाटतं.
    शेक्सपिअर यांचा साहित्यिक पराक्रम हा नेपोलियन आणि अलेक्झांडर यांच्या एकत्रित पराक्रमाच्या प्रभेला काळवंडून टाकणारा होता असंही काहींना वाटतं.तरी बरे या पराक्रमीविरांमध्ये कुणी औरंगजेब महादयांचे नाव सामील केलेलं नाही.
    शेक्सपिअर यांनी अब्जावधी शब्दांचे सृजन केले म्हणूनच ते शब्दप्रभू.पण या शब्दप्रभूला शब्दांनी धन काही मिळवून दिलं नसावं किंवा धन मिळालं तरी,कर लो दुनिया मुठिठमे हे स्वप्न साध्य करण्यासाठी ते धन पुरेसं नसावं.त्यामुळे शब्दांच्या साम्राज्यात अबलख घोडयावरुन रपेटिला निघालेले शेक्सपिअर म्हणे धान्याच्या  काळ्याबाजाराची कला शिकले.त्या कलेत ते लेखन कलेइतकेच तरबेजही झाले.या काळ्याबाजारातून त्यांना बरेच धन मिळाले.त्यातून त्यांनी सावकारी सुरु केली.पैसाही पैसे के पास दौडके आता है,असं थोरले अंबाणी कधी तरी म्हणालेच होते.तद्वतच शेक्सपिअरांच्या देशातला पौंड त्यांच्या पौंडाकडे धावायला लागले.इन्कमटॅक्स वाल्यांना कुणाचं चांगलं बघवत नाही.मग ते ड्रॅगनच्या , अंकल सॅमच्या की महाराणींच्या देशातले असो.त्यांनी शेक्सपिअरांच्या अतिरिक्त पौंडाचा पाठलाग केला.त्यांच्या घरावर धाडी टाकल्या.पुढचे सारे सोपस्कार झाले.इन्कम टॅक्स चुकवताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो लेखक महाशय.सूर्यही मावळणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यातील लोकांना तुम्ही आपल्या पुस्तकातील शब्दांद्वारे मूल्यशिक्षण देण्याचा आव आणता,आणि स्व:ता मात्र साव बनता..शेक्सपिअर महाराज हे बरे नव्हे हो..हा संवाद (नक्किच) घडला .(असावा.)
    पुढे हे प्रकरण संवादापुरतच मर्यादित राहिलं नाही. त्या कार्यतत्पर इन्कमटॅक्स ऑफिसरने ,आपल्या फर्राटेदार लेखणीने लिहून ठेवले,शेक्सपिअर हे करचुकवे आणि करबुडवे आहेत.(कदाचित तो शेक्सपिअरांना म्हणालाही असेल की बघा, केवळ आपणावरच सरस्वती प्रसन्न नसून माझ्यावरसुध्दा आहे.तुमचं लिखान सूर्यचंद्र असेपर्यंत असेलच पण माझी ही नोट सुध्दा अजरामर होईल.)
    ही ऐतिहासिक नोंद झालेला कागद परवाच इंग्लडात सापडला.शेक्सपिअर करबुडवे होते.धान्याचा काळाबाजार करीत होते.हे त्यातून मिडियासमोर आले.तुम्ही सुध्दा..तुम्ही सुध्दा असा घोष सुरु झाला.शेक्सपिअरांनी त्यांच्या एका पात्राच्या मुखी असं वाक्य घातलं होतं.त्याची यानिमित्त उजळणी झाली.शेक्सपिअरांचे तसे वागणे चूक होते की नव्हते ,असा प्रतिवाद सुरु झाला.ते प्रतिभावंत ना!आपल्या संजू बाबासारखेच.एके 47 बंदूक घरी ठेवण्याचा गुन्हा सिध्द होऊन तो निष्पापच,असं उच्चरवानं सांगण्याचं पवित्र कार्य आपल्याकडे चाललय, तसचं हे.शेक्सपिअर हे शेक्सपिअर असल्याने त्यांना माफ  करा,त्यांच्यासारख्या सर्जनशील लेखकानं असं केलच असेल तर त्याच्या कारणांचा मागोवा घ्या..शेक्सपिअर असं करुच शकत नाही,त्यांच्यावर जळणाऱ्या लेखकांचं हे कारस्थान कां राहू शकतं,फ्रांसने नेहमीच ग्रेट बिटनचा दु:स्वास केलाय त्यांनी त्यातून तर हे प्रकरण घडवलं गेलय नाहीय ना.. याचा आधी शोध घेतलेला बरा.हा शोध घेतला जाईल का?कधी घेतला जाईल? यथावकाश कळेलच.पण शेक्सपिअर यांनी असं जर काही खरोखरच केलं असेल तो फारच उद्दमी आणि उद्योगी होता हे सिध्द होतं.अशी उद्योगी माणसंच कर्तृत्वान ठरुन त्यांच्या घरातल्या हंडयात ऋध्दीसिध्दी पाणी भरतात,मग ते सहारा श्री असोत की मिस्टर शेक्सपिअर..आणि अशांच्याच पाठिमागे कोणते ना कोणते शुक्लकाष्ठ कधी ना लागतेच लागते, मग ते श्रीयुत दाऊद असोत की मिस्टर शेक्सपिअर..
    000

No comments:

Post a Comment