Sunday, April 14, 2013

लाडक्याला शब्दसुमने,दोडक्याला शब्दाचा मार


लाडक्याला शब्दसुमने,दोडक्याला शब्दाचा मार
   आम्हाघरी शब्दे रत्नेची खाण,असं तुकाराम महाराजांनी उगाच कां म्हंटले असावे? शब्द हे धनापेक्षा मोठे आणि शस्त्रापेक्षा धारधार असते. मयसभेतील द्रौपदीआक्कांचे शब्दबाण श्रीयुत दुर्योधनाच्या किती जिव्हारी लागले.द्रौपदीआक्कांनी त्यावेळी धनुष्यबाणाचा वापर केला असता तर कदाचित श्रीयुत दुर्योधन यांनी हसत हसत तो वार झेलला असता.महाभारतही टळले असते.सासू आणि सुनेच्या अमरकथा या अजरामर होण्यासाठी शब्दांचाच हातभार लागलाय.नागराजाच्या मुखी असलेलं जहर अधिक विषारी की सासू आणि सुनेच्या मुखीचे शब्द अधिक जहरी यावर कुणी संशोधन अजून तरी कां बरे केलं नसावं?
   शब्द तेच असतात पण कालीदासानं वापरले की त्याचे साहित्य होते.आपण वापरयाला गेलो तर त्याचे हसे होते.शब्द तेच असतात पण अमिताभ बच्चन यांनी वापरले की ते बुलंद होतात,शाहीद कपूरने वापरले की फुस्स होतात.आनंद बक्षी यांनी वापरले की ते ला , ला असं फालुदा टाईप गाणं होतं.गुलजार यांनी शब्द वापरले ते आशयनघन कविता होतात.हेलनकाकूंसाठी असलेले शब्द कॅबेरे होतात.करीना कपूर-खान यांच्यासाठी हेच शब्द आयटेम साँग होतात.
   शब्द तेच पण त्याच्या छटा मात्र अमेरिकेत वेगळया,चिनमध्ये वेगळया,पाटण्यात वेगळया,मुंबईतल्या बांद्रापूर्व मध्ये वेगळया आणि लोअर परळ मध्ये वेगळया.कुणाची शब्दांवर हुकूमत असते.म्हणजे तो म्हणेल तसे शब्द वाकतात,चालतात.धावतात.कधीकधी बराच गोंधळही करुन जातात. चा मा होतो.त्यातून,काका मला वाचवा,असे ऑल टाईम सुपर ड्यूपर हिट संवाद जन्मास येतात.कधी कधी हेच शब्द एखाद्या व्यक्तीवर हुकूमत गाजवायला लागतात.तेव्हा मग तो जर्मनित हिटलर होतो आणि चीनमध्ये माओ होतो.रशियात स्टॉलीन होतो.लिबियात कर्नल गड्डाफी होतो.
   एखाद्याचा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलला जातो.तर एखाद्याचानिबंध कचराकुंडीचेच भागदेय घेऊन येते.बाबा,बापू,बुवा,महाराज,महंत यांच्या मुखीचे शब्द भक्तीचे रंग ल्यालेले असतात.सनी लेऑन,दीपिका पडुकोन,इशा गुप्ता यांच्या मुखीचे तेच शब्द प्रीतीच्या रंगा मदहोश झालेले असतात.शब्दांनी भूगोल घडविला की माहीत नाही पण इतिहास मात्र घडवला आहे.काही शब्द दारु सारखे असतात तर काही शब्द हे दारुकामासारखे असतात.
   शब्द,हा आपला,तो तुपला,असा भेद अगदी सहज करतात.आपला तो बाळ दुसऱ्याचे ते काट्टं.आता हेच बघा की,एका जणाला जेव्हा क्रिकेटच्या टिममधून काढलं जातं,तेव्हा हा शब्द विश्रांती या गुलाबी नावानं अवतार घेतो.जेव्हा दुसऱ्याला क्रिकेट टिम मधून काढलं की हाच शब्द डच्चू या अवतारात येतो.तर कधी हकालपट्टी हा शेड धारण करतो.विश्रांती,लाडक्यासाठी असते.हकालपट्टी,दोडक्यासाठी असते.विश्रांतीत आदरभाव व्यक्त करण्याचा सभ्यपणा असतो.हकालपट्टीत हुच्चेपणा दर्शवणारी तुच्छता असते.लाडका थकतो त्यामुळे त्यास विश्रांती.दोडक्याचा फार्म गेला असतो म्हणून त्याची हकालपट्टी.लाडक्याचा फार्म कधीच जात नसतो.त्याच्या धावा निघत नाहीत तेव्हा त्याचं टायमिंग जरासं बिघडलं असतं.ते दुरुस्त व्हावं म्हणून त्यास विश्रांती.मात्र दोडक्याच्या बॅटितून धावा निघत नाही तेव्हा त्याचं टायमिंग जरासं नव्हे तर निवृत्ती घेण्याचा (त्याने)विचार करण्याइतपत बिघडलेलं असतं.म्हणून मग हकालपट्टी.
   असा भेदभाव शब्द अगदी यूँव करून जातो. एकाच घटनेला असे दोन अँगलने बघण्याचा शिष्टपणा शब्द शतकानुशतके करत आला आहे.मुसोलीनी करतो ते अनन्वित अत्याचार.चर्चिल करतो ते राष्ट्रभक्ती. अमिरांचा साहेबाजादा जेव्हा,पहले शराब जिस्त थी,अब जीस्त (जीवन) है शराब/ कोई पिला रहा है,पिये जा रहा हूँ मै,असं गुणगुणतो तेव्हा त्याकडे कौतुकानं बघून त्याच्या रसकतेची वाहवा केली जाते.तुमच्या आमच्या सारख्यांचं पोरगं असं काही गुणगुणायला लागलं तर ते कामातून गेलं,वाया गेलं असं बोलून त्याचा बँडबाजा वाजवला जातो.लाडक्याला शब्दसुमने आणि दोडक्याला शब्दाचा मार..जगाची रित अशीच ..कबीर म्हणाले तेच खरं ...

No comments:

Post a Comment