Saturday, May 4, 2013

ओम आळसाय नम:


ओम आळसाय नम:
    अरे, गधड्या असा कसा रे तू आळशी? असं सतत कानावर पडत असणाऱ्या मोरुला परवा दिलासा मिळाला.
    तो आळशी असल्याचं त्याच्या बापानं जगजाहीर करुनच टाकलं होतं.या आळश्याचं व्हायचं कसं? हा निपजलाच कसा? तो सुध्दा आपल्याच घरी कसा ? असेही सवाल मोरुचा बाप बरेचदा मोरुच्या मायजवळ करायचा.मात्र मोरुच्या मायला लेकराचं भारी कौतुक.मोरु दिवसभर चर-चर चरतो.झोप-झोप झोपतो.कोणतही काम-धाम करत नाही.टीव्हीच बघत बसतो.त्यामुळे तो कसा गोल-मटोल  म्हणजे हेल्थी झालाय.आणि हेल्थ इज वेल्थ असं गुरुजींनीच सांगितलं नाही का? मग गुरुजीची अक्कल मोठी की तुमची ? असं आणि अशा शेडचा प्रतिवाद मोरुच्या मायने त्याच्या बापाला मोरुच्या आळसाचा सवाल जेव्हा जेव्हा विचारला तेव्हा-तेव्हा केला होता.
    मोरुची आजी सुध्दा तिच्या पोराला म्हणजेच मोरुच्या आज्याला हज्जारदा असच काहीबाही म्हंटल्याचं ती या घरात सून म्हणून आल्यापासून ऐकत होती.तुम्ही सुध्दा कोणतं काम करता.गावात उंडारण्याशिवाय नि पानठेल्यावर जाऊन खर्रा कोंबण्याशिवाय पचपच थुंकण्याशिवाय,असं सुध्दा मोरुची माय तिचा या घरातला एक्सपिरियन्स वाढल्यावर आणि स्थान पक्क झाल्यावर बेधडक म्हणत असे. गंमत म्हणजे मोरुच्या आज्याने त्यास संमती दर्शवली होती.जाऊद्या जाऊद्या तुम्ही कोणते दिवे लावले हे मला सांगू नका,असं आजी,तेव्हा आज्याला म्हणाली होती.
    तर,मोरुच्या घराण्यातल्या पुरुषांचा इतिहास असा हा आळसानं समृध्द आणि संपन्न असलेला. या समृध्द इतिहासाची फळं आपला बाप आणि आपला आजा चाखत होता.आपणही तेच करतो तर आपला बाप मात्र जीव खातो.याची खंत मोरुला लागली असायची.ही खंत कशी दूर होईल या चिंतेत तो रात्रंदिवस असायचा.मिरेला जशी तिच्या प्रभुची धून लागली असायची ना,तसच हे होतं.त्यामुळे खाणं-पिणं आणि चिंतन-मनानासाठी झोपणं.या चक्राला मोरुनं जवळ केलं होतं.बापला जरी तो आळशी वाटत असला तरी खरं वास्तव हे असं होतं.मात्र ते बापाला समजावायचं कसं या प्रश्नाचा तिढा बम्युर्डा त्रिकोनाच्या तिढ्यासारखा होता.पण म्हणतात ना  भगवानके घर देर है लेकीन अंधेर नही.तसेच झाले.
    इंग्लंडचे शास्त्रज्ञ मोरुच्या मदतीला धावले.कोणत्याही देशातील शास्त्रज्ञ हे चांगल्याअर्थी बऱ्याच उपद्व्यापात गुंतलेले असतात.असाच हा उपद्व्यापी शास्त्रज्ञ परवाच त्याचं नवं संशोधन जगाला सांगता झाला.त्याच्या संशोधनाचा सार असा की,तुम्ही आळशी आहात,हा काही तुमचा दोष नाही.हा काही परिस्थितीचाही दोष नाही.हा काही शिक्षण व्यवस्था,सामाजिक व्यवस्था,आजुबाजूची सांस्कृतिक व्यवस्था किंवा मार्केट व्यवस्थेचाही दोष नाही.तर या दोषाच्या होकायंत्राची सुई तुमच्या बापाकडेच पहिल्यांदा जाते.कारण आपल्या शरीरात आपल्याला घडवणारे -बिघडवणारे अनेक जिन्स असतात.त्यात आळसाचाही जिन्स असतो.हे जिन्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, तिकडून पुढच्या पिढीकडे सुखनैव आणि शान आणि अभिमानाने ट्रान्सफर होत राहतात.तेव्हा मुलाच्या आळसासाठी बाप ,बापाच्या आळसासाठी त्याचा बाप अशी ही थोर परंपरा सुरु राहते.हा निष्कर्ष मोरुने वाचला आणि तो थुई-थुई नाचू लागला.त्याने बापाला हा निष्कर्ष वाचून दाखवला तेव्हा तो मोरुकडे कौतुकानं पाहत तोही नाचू लागला.दोघेही मिळून खटल्याला खिळलेल्या मोरुच्या बापाच्या बापाकडे गेले.मोरुने आज्याला हा निष्कर्ष वाचून दाखवला.तेव्हा म्हातारा ताडकन उठलाच नि तोही थुई-थुई नाचायला लागला..आपल्या घरातली काहीच करणारी आळशी पुरुष मंडळी वेड्यावानी कां होईना नाचताहेत ,हातपाय हलवताहेत हे बघून माऊलींनी कुलदैवतेला दंडवत घातला.

No comments:

Post a Comment