Sunday, May 19, 2013

ध चा मा...


चा मा...
    मारुतीरायाच्या मंदिरात दर्शनाला मुकरु एडका सोबत गेलेल्या त्यांच्या सौ.सुखाबाई यांचं मंदिरास फेऱ्या मारता मारता मुकरुकडे लक्ष गेलं. मूर्तिच्या पाठिमागच्या भिंतीवर त्यांना काहीतरी लिहिताना मुकरु दिसला.त्यांच्या मनात उत्सुकता चाळवली.दर्शन आणि फेऱ्या संपल्यावर दोन क्षणांसाठी मंदिराच्या आवारातील आसनावर ते दोघे बसतच नाही तोच,सुखाबाईनं मुकरुपुढे आपली उत्सुकता उघड केली.
    सुखे,तू दर्सन घेत व्हतीस का माह्यावर लक्स ठेवून होतीस बॉ,मुकरु म्हणाला.
    तुमच्यावर लक्स नायी ठेवलं तं गडी बहकून कोनाच्यायी गाडीले कसा ठोस मारन हे सांगता नाही याचं.हिकडं मारुतीरायाचा,घरी माहा आन गरामपंचायतीत गरामसेवकाचा तिसरा डोया उघडा असतो मनुनशान तुमचं  हलणं-डुलणं, हिकडं तिकडं असलं तरी ते कन्ट्रोलमंदी राह्यतं का नायी,तुमीच मले सांगा..
    सुखे तुले चान्स भेटला का तुह्य पुराण लांबतच जाते बॉ.. मी सरपंच हाये,फस्ट परसन आफ अवर विलेज.माहा कायी मान-सन्मान हाये का नायी,ते मिसेल वयनी बघ, ओबामा भौचा कसा मानसन्मान ठेवते.सिक त्यायच्यापासून थोडस्स...
    सरपचं सायेब मिसेल का फिसेल वयनीले हळदीकुंकवाले बोलावून मी सिकीन त्यायच्यापासून समद,पन माहा मुद्या हा नायीच हाये,तुमाले कायी सवाल इचारला का तुम्ही त्याचा जबाब देत नायी आन दुसराच सवाल इचारता.सुखाबाई म्हणाल्या.
    यालेच तं पालटिक्स मनत्यात सुखे.असं ज्याले जमते तो अमरिकेत राष्टपती आन एटापल्लीत सरपंच होऊ सकते.तुहा भाऊ अजून सरपंच कावून नायी झाला,याचा कदी त्यांनं आन तुनं इचार केला का?सवालाचं उत्तर जबाव असत नाही तं सवालच असते..
    लय झालं तुमचं स्यानपन,मले तुम्ही सरळ उत्तर कावून देत नायी.द्याचं नसतं तसं सांगा,मीच एखाद्या दिसी इचारिन मारुतीरायाले.
    तुले तो सांगन  असं वाटते..
    कावून बा तुमीच मक्ता घेतला का...
    मी मन्तो तुले कावून इन्टरेस्ट हाये तेच्यात.
    मी तुमच्यात इन्टरेस्ट नायी घेऊ तं का सलमानखानात घेऊ.तुमाले चालल का..लय हाटपाट हाये सल्लू..
    सुखे,मारुतीरायाचा मंदिरात तरी असी बहकू नोको..
    मंग तुम्ही मले सांगून टाका ना तुम्ही मंदिराच्या पाठिमांगं काय लिवत होता.
    मी एकटाच थोडचं होतं.दुसरे बी तं लोक लिवत होते ना..
    मनुनस्यानच तुमाले मी इचारते,का लिवत होता.
    सरपंचाची सेकंड चान्स मले दे,असं लिवलंय मी.आता कोनाले सांगत बसू नोको.माह्या काकिले जावून सांगशील आन ती काकाले.तो दिवसभर मंग इथं येवून लिवत बसन.त्याचा डोया आहे कवापासून माह्या खुर्चिवर.
    मुकरुचं उत्तर ऐकून सुखाबाई हसू लागली.
    तुले का झालं दात दाखवाले.मनून मी सांगत नोव्हतो.
    तुमी जे कायी लिवलं ते मारुतीरायाले समजलं तं पायजेल ना..
    मनजे..
    तुमी जे कायी गिचमिड लिवता ते तुमाले तरी कधी समजते का.मनून तं गरामसेवक तुमाले कायीच लिवू देत नायी.लिवते तो अन सही करता तुमी.
    मारुतीरायाले समद समजते.
    कसं समजलं,तुमचं लिवनं गिचमीड.त्येचावर कोनतरी दुसरा त्येचा भाषेत लिवून गेला.त्याच्यावर तिसरा लिवून गेला,त्याच्या भाशेत.तो तुमचा मद्रासी दोस्तबी मले दिसला लिवताना.त्यायची तं भासाच अकडमतकडू.मगं मले सांगा गिचमीडची खिचडी मारुतीरायाले कसी समजन.
    तुह्या बोलन्यात पाइन्ट हाये बॉ.
    पाइन्ट काय मनता तलवार मना तलवार..आवो चा मा कवा होऊन जाईन हे समजाचं बी नायी तुमाले.खुर्ची बी जाची नं मुंडकी बी.दीडसे वर्सापूर्वी पुन्याच्या एका वाड्यात घडले व्हतं असच पुरान.घरी चाला आनं पोराकडून इतिहास जानून घ्या.सुखाबाई म्हणाल्या.
    मंदिराच्या पाठिमागच्या भिंतीवर एकावर एक लिहिल्याने चा मा झाला आनं आपल्या काकानचं आपला गेम केला तं..असं मुकरुला वाटून गेलं.त्याला दरदरून घाम सुटला.त्याने मारुतीरायाकडे बघितले..त्यांनी कधीचेच डोळे मिटून घेतले होते..
    0000

No comments:

Post a Comment