Saturday, May 4, 2013

कुबेराचा रिता खजिना


 कुबेराचा रिता खजिना
    देवादीदेव इंद्रसेन महाराजांना नको नको ते बोल कुबेरमहोदय लावत होते.त्यांचं काही चुकीचं नव्हतं म्हणा.ते नावाचेच खजिनदार कुबेर राहिले होते.खजिना रिता-रिताच होत असल्याचं पाहण्याचं त्यांच्या नशिबी आलं होतं.हा रिता खजिना बघायला इंद्रसेनांना वेळ नव्हता.एखादे समयी कुबेर इंद्रसेनांकडे गेलेच तर ते म्हणायचे बघण्याचा काळ अद्याप आलेला नाही.त्यांचा सारा काळ आणि वेळ अप्सरांच्या जुल्फ्यांमध्ये गुंतलेला.स्वर्ग दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेला असताना खजिनादार कुबेर यांची झोप जाणार नाही तर काय? त्यामुळेच त्यांचं इंद्रसेनांना बोल लावणं नारदांच्या कानी जाताच ते कुबेरांकडे धावते झाले.
    कुबेरानं नारदापुढं त्यांचं दु: मोकळं केलं.तो धाय मोकलून रडू लागला.हे हुंदके काही थांबेना.हे हुंदके व्यवस्थितरित्या कैलासनिवासी महादेव ,वैकुंठ निवासी नारायण,प्रभादेवीनिवासी सिध्दी विनायक,तिरुमालानिवासी तिरुपती यांच्यापर्यंत पोहचवण्याचं काम नारदांनी केलं.इंद्रसेनांना तोंडघशी पाडण्याची संधी ते शोधतच होते.महागाई आणि प्रवासभत्यात वाढ करण्यासाठी कायम नकार देणाऱ्या इंद्रसेनाला कोंडित पकडण्याची चांगली संधी आयतीच मिळाली होती.
    नादराचं नमक मिसळलेले कुबेराचे हुंदके पोहचताच,महादेव,श्री नारायण,श्री तिरुपती,श्री सिध्दीविनायक तडक इंद्रप्रस्थी हजर झाले.
    इंद्रसेनांमुळे कुबेरावर अश्रू ढाळण्याची वेळ आल्याचं त्यांच्या लक्षात आलं.त्यांनी इंद्रमहाली कूच केले.इंद्रसेनांना धारेवर धरुन विशेष दरबाराचं आयोजन करण्याचं फर्मान सोडलं.
    विशेष दरबार आयोजित झाला.कुबेरानं रिता होत असलेल्या खजिनाचा वृत्तांत अश्रू ढाळत सांगितला.वसुंधरा पुत्र टॉम क्रुझ,वसुंधरा सुकन्या ऐश्वर्या रॉय,वसुंधरा राजपूत्र रणबीर कपूर यांचे खजिने,हे दिन दुने रात चौगुने भरत असताना कुबेराचा खजिना रिता रिता व्हावा हे विपरित घडत असल्याचं कुबेरानं सांगून टाकलं.
    इंद्रसेना,पैसे झाडाला लागत नाही हे लहानपणी पिताश्रींनी सांगितलेलं वचन विसरलास कसा?महादेव म्हणाले.
    तुला फक्त आठवण राहते ती नव्या अप्सरेच्या डोक्यात माळलेल्या फुलांच्या रंगांची.विष्णू बोलले.
    कल्पवृक्ष नावाची फोक वसुंधरेच्या पुत्रांना सांगूनही बरीच शतके लोटली.तू या फोकानाडीच्या रम्य स्वप्नातच दिवसरात्र रममाण राहतोस रे... ब्रम्हदेव बोलले.
    खजिना भरण्यासाठी आता काय करावं,तुम्हीच सांगा,रडकुंडिला आलेले इंद्रसेन म्हणाले.
    सर्व देवांनी एकमेकांकडे बघितले.कुणालाही निश्चित उपाय सूचेना.
     काहीच करता नाही आलं तर मी माझा फंड ट्रान्सफर करीन इकडे,तिरुपती म्हणाले.
    तो तात्पुरता उपाय झाला.शिवाय वसुंधरेची सुपूत्रं त्यात बऱ्याच कायदेशीर अडचणी निर्माण करतील.त्यामुळे एक खडकूही इकडे यावयाचा नाही.श्रीकृष्ण म्हणाले
    मग आता काय करावयाचे?इंद्रसेन येऊन म्हणाले.
    तुम्ही आयआयटीच्या प्रवेशासाठी कोचिंग क्लास काढा. सिध्दीविनायक म्हणाले. प्रभादेवीस्थित त्यांच्या निवासाच्या आजुबाजूला अशा कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींचा सुकाळ त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नव्हता.त्यांच्या निवासस्थानी येणाऱ्या वृत्तपत्रांचा शुभप्रारंभ बातम्यांनी होण्याऐवजी या कोचिंगक्लासच्या जाहिरातींनी होतो,हा बदलही त्यांनी अचुक टिपला होता.आयआयटी कोचिंग क्लासचे सुवर्णपर्व महाराष्ट्रदेशीच नव्हे तर भारतदेशी आल्याचेही मुषकस्वामींनी त्यांच्या निदर्शनास आणलं होतं. हे सारं सिध्दीविनायकांनी दरबारात सविस्तरपणे मांडलं.
    आयआयटी कोचिंग क्लासेस हे कुबेरासाठी कल्पतरुवृक्ष ठरु शकतो याकडे सिध्दीविनायकांनी लक्ष वेधलं. सिध्दीविनायकांच्या चौकस बुध्दीचं सर्वांनी कौतुक केलं.
    नारदा,तू वारंवार पृथ्वीवर भ्रमंतीस जातोस,तुझ्या कसं लक्षात नाही आलं या आयआयटी कोचिंग क्लास कल्पवृक्षाबद्दल. नारदांकडे रागाने बघत नारायण म्हणाले.
    नारद करु लागले.
    इंद्रसेना,नारदाचा आतापर्यंतचा टीएडीए खारीज करुन टाका.कुबेराचा खजिना यांच्या प्रवासभत्यात आणि खाणेपिणेभत्यातच रिता होत चाललाय.आता फुकट फौजदारी बंद.जोपर्यंत 100 विद्यार्थी कोचिंग क्लासमध्ये नारद आणत नाही तोपर्यंत त्यांना पुढचा दौरा देऊ नका,महादेव गरजले.
    दुसऱ्याचं घर जळावं म्हणून लावलेली आग कधीकधी आपल्यावर उलटते,याचा अनुभव नारदांना यानिमित्त आला.


No comments:

Post a Comment