Friday, May 10, 2013

गुरुवार,असाही आणि तसाही शुभच..


गुरुवार,असाही आणि तसाही शुभच..
    ज्योतिषी-भविष्यवेत्ते-टॅरोट कॉर्ड धारक-न्यूमेरालॉजिस्ट,फेंगशुई एक्सपर्ट यांचं सांगणं सोडल्यास बाबा-महाराज-बुवा-प्रवचनकार-गुरु यांच्यामते कोणताही दिवस हा शुभच असतो.हे मुकरुला चांगलं ठाऊक होतं.पण त्याच्यासाठी गुरुवार हा शुभ प्लस प्लस दिवस.कारण तो साईबाबांचा,गुरुदत्ताचा आणि स्वामी समर्थांचा.शिवाय मागचा गुरुवार आणखीच स्पेशल,कारण त्यादिवशी होती मारुतीरायांची जयंती.
    अशा या सुपर-स्पशेल दिनी मुकरु एडका कोवाची सुरुवात शुभशकुनानं झाली.सकाळी उठल्या उठल्या त्याला त्याच्या बायकोनं-सुखाबाईनं टोचलं नाही की टोकलं नाही.हाच तो शुभशकून.त्यामुळे मुकरुच्या खुषिला मोहाची धार.या खुषितच तो मारुतीरायांच्या मंदिरात दर्शनाला गेला.मनोभावे दर्शन घेतलं.सारं काही झक्कासच होऊ दे,वाईट-साईट काही होऊ देऊ नकोस रे बाबा,असं साकडं घालून मुकरु साईबाबांच्या मंदिराकडे वळला.
    हा त्याचा नित्याचाच परिपाठ.तो गेल्या कित्येक वर्षांत कोणत्याही गुरुवारी चुकला नाही.कामाच्या ठिकाणी जाताना प्रथम मंदिरात बाबांचं दर्शन आणि नंतर कार्यालयात गेल्यावर बॉसचं,ही मुकरुची गुरुवारची अनुक्रमणिका होती.
    मंदिराच्या पायऱ्यावर सँडल काढून मुकरु आत शिरला.बाबांचं मुखदर्शन घेतलं.पादुकांवर मस्तक ठेवलं.मारुतीरायांकडे जी प्रार्थना केली तीच प्रार्थना इथंही केली.पूजाऱ्याकडून तीर्थ आणि सेवेकऱ्याकडून प्रसाद घेतला.पुन्हा एकदा बाबांना वंदन करुन तो पायऱ्यावरुन खाली उतरला.शूभ दिवसाचा प्रांरभ अतिव शुभ्रतेनं झाल्यानं मुकरुचा चेहरा उजळून निघाला.
    दिवस केवळ दोन प्रहरांचा होऊनही तो सार्थकी लागल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर सदाफुलीच्या फुलासारखं हसू लागलं.पण पुढच्याक्षणी हे हसू कोमजलं,कारण तीनचार दिवसांपूर्वी घेतलेली त्याची नवी कोरी महागडी सँडल मंदिराच्या पायरीवरुन गायब झाली होती.
    शुभ दिवशीचे हे अशुभ वर्तमान सांगायचं कुणाला?मुकरुला प्रश्न पडला.तो सेवेकऱ्याच्या कानाला लागला.आमच्या मंदिरात असं काही घडणं शक्यच नाही,प्रसाद देणाऱ्या सेवेकऱ्यानं ताकडन ठासून सांगितलं.मुकरुनं मग बाबांकडे केविलवाण्या नजरेनं बघितलं.उत्तर नाहीच.इथं रेंगाळण्यात अर्थ नसल्याचं मुकरुच्या लक्षात आलं.शुभ दिवसाच्या पावित्र्याबद्दल निर्माण झालेल्या शंकेचं निरसन मारुतीरायांडे करावं काय,असं मुकरुस वाटलं.पण कामाच्या ठिकाणी जाण्यास उशीर झाला असता.त्यामुळे मारुतीरायांच्या मंदिराकडे मुकरुनं पावलं वळवली नाहीत.
     राहतं घर जवळच असल्यानं मुकरुनं घरी जाऊन जुनी चप्पल घेतली नि तो कामाला निघाला.शुभ दिवशी घडलेल्या या अशुभाचाच किडा त्याच्या डोक्यात दिवसभर वळवळत राहिला.
    कामावरुन जाण्या - येण्याचा त्याचा रस्ता हा या मंदिराजवळूनचा होता. त्यामुळे या ठिकाणाहून जाताना चालत चालत,मूर्तीच्या मुखाकडे बघत नमस्कार करण्याचा परिपाठही मुकरुकडून कधी चुकला नाही.आज मात्र विपरितच घडलं.मंदिराजवळून जाताना त्याचं लक्ष मूर्तीकडे जाता पायरीकडे गेले.हरवलेली/चोरिला गेलेली चप्पल दिसते का कुठे?या वेड्या आशेनं तो बघू लागला.
    मात्र क्षणातच ही घालमेल मुकरुच्या लक्षात आली.पायरीवरुन नजर वर करत,ओशाळून बाबांनाकडे बघत,त्यांना सॉरी म्हणून मुकरुनं घराचा रस्ता धरला.
    गेले आठदिवस असेच घडत आहे.पहिली नजर पायरीवर कुठे सँडल दिसते का यासाठीच.
    हे चाललय तरी काय,मुकरुनं घरी आल्या आल्या सुखाबाईला प्रश्न केला.
    सारं काही तर आलबेल असूनही आपला नवरा असा बहकल्यवानी कां बोलता, असं सुखाबाईला वाटलं नि ती त्याच्यावर वसकली.तेव्हा मुकरुनं तिच्यासमोर प्रस्तावनेसह सारं प्रकरणं उघडं केलं.
ते ऐकल्यावर सुखाबाई फिसकन हसली आणि गडगड करत म्हणाली, आवो तुमी कायले टेन्सन वेन्सन घेता.सँडल गेली तं गेली.नवी सँडल गेली तं आपल्या मागची इडापीठा जाते,माहा बाप मले नेयमीच सांगाचा.अन मनाचा,महाभारतातपन असच व्यासमुनिंनं लिवून ठेवलं हाये.आता आपन व्यासमुनिचं आयकाले नोकोका.लय इव्दान होता हा मुनी.तवा तुमची इडा-पीडा कोनतरी घेऊन गेला असं समजा आन खुस व्हाजी.शुभ दिवसाले सुभच घडलं.देवच पावला मनाचा तुमाले.सुखाबाईनं हे सांगितलं मुकरुचा चेहरा पुन्हा उजळला.
    गुरुवार असाही शुभ अन तसाही शुभच.याची त्यास खात्री पटली...
    000

No comments:

Post a Comment